-प्रवीण टाके
आपल्या अवतीभवती असणारी, नात्याने ग्रहासारखी कक्षेत फिरणारी, सण, उत्सवाला, तोरणात, मरणात नियमित भेटणारी माणसे, साधारणतः आपले जग असते. तरीही या कोषात जगताना, परग्रहावरील अनामिक एलियनसारखे आपल्याला कुणाचे वेड का असावे? ज्यांच्यासोबत आयुष्य जगतोय त्यांना सोडून मनात कुणाच्या तरी भेटीची ओढ, अनामिक हुरहुर का असावी? हळूच पहाटे जाग आल्यावर, कधीकधी रात्री उशिरा चांदण्यांनी डोळ्यांत गर्दी केल्यावर आपलं मन हळूच हळवं का व्हावं ? बर्डीच्या बाजारात, अमरावतीच्या इर्विन चौकात , मॉलच्या विंडोशॉपिंगमध्ये, मोहरमच्या गर्दीत, बहिरमच्या यात्रेत, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर, लोकलच्या गर्दीत, विमानतळावर, अगदी विदेशात, दुसऱ्या समूहाच्या लग्नात, अनोळखी चेहऱ्यांमध्ये हरवल्यावर डोळ्यांना कुणाचा शोध का असावा ?
समोर मृत्यू उभा तरीही
नसे तुझे वेड सोडिले मी
तुझीच गाणी अजून असती
थरारणाऱ्या स्वरात माझ्या
…अशी आपली अवस्था का व्हावी ? अपूर्णतेचा अख्खा बाजार आपल्याच आयुष्यात का मांडला जावा ? अनेक लोकांशी आपली नावं जोडली गेल्यानंतरही मनात मात्र एक घर खालीच का राहावं ? मानवी संबंध, भावनांचा कल्लोळ, जिव्हाळा, प्रेम, मैत्री, आसक्ती, अशा किचकट विषयांवर पीएच.डी. केल्यानंतरही चौथीतल्या प्रश्नासारखा तुम होती तो ऐसा होता… हा प्रश्न का अनुत्तरित राहावा ? रसायनशास्त्राच्या रंग बदलण्याच्या सूत्रांचा मुखपाठ अभ्यास असणारे आपण… ॲक्शन अँड रिएक्शन इक्वल अँड अपोझिट हा न्यूटनचा नियम जाणणारे आपण, चांद्रयान, मंगलयानावर खगोलशास्त्रज्ञासारखे बोलणारे आपण, अनेकांच्या आयुष्यातले गुंते लीलया सोडवणारे आपण… या हुरहुरीच्या प्रश्नावर मात्र भरकटलेले सॅटेलाइट का होतो? कालपर्यंत हसत-खेळत असणारा माणूस अचानक असा कोपऱ्यात जाऊन भीड़ में भी तनहा का होतो ? साऱ्याच विषयांतील पारंगत आपण… पण का आयुष्य आपलं गहाण राहतं एका साध्या कोड्यात ? अतृप्तता, अपूर्णता, अस्वस्थता का टोचत राहते टायरमध्ये घुसलेल्या खिळ्यासारखी? बुटाच्या सोलमधल्या अदृश्य काट्यासारखी ?
कब्र में पैर लटका है मामू ! और फिर भी याद उसी को कर रहे हो… असा समवयस्क दोस्त आपली फिरकी का घेत राहतो ? सोडा ना ! मुलांची लग्न व्हायला आली, मुलगी लग्न करून दुसऱ्या घरी गेली तरी तुमचं सुरूच… अशी बायको, नवरा सतत ओरडत का राहतो…
ही कुठली मेंदूची रचना आहे ? ही कुठली अस्वस्थता आहे ? या आपल्या रात्री इतक्या जीवघेण्या, इतक्या बेचैन का आहेत? हा दम नेमका का घुटतो आहे ? आपण नेमके का घुटमळतो आहे ? हा जीवघेणा नेमका कोणता केमिकल लोच्या आहे?
परवा मात्र आयुष्यभराच्या कोड्याला प्रसिद्ध गीतकार संतोष आनंद यांनी लिहिलेल्या या एका गीताने अलगद सोडवले. मनाला शांती दिली. आयुष्याला उभारी दिली. उत्तर अगदी संक्षिप्त, थोडक्यात आहे…. त्याच्या, तिच्यासोबत जगलास ना ! ते जगून घेण्याचे दोन क्षणच तुझं खरं आयुष्य होतं… ती जी तुझी – माझी समाधी लागली होती ना ! अरे तेच तर जीवन होते. बाकी जगणे म्हणजे सगळा व्यवहार आहे, जन्म आणि मृत्यू मधले अंतर पार करणे आहे….
गेली कित्येक वर्षे आपण हे गाणं ऐकतोय… ‘शोर’ चित्रपटातील लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिलेलं सुरेल संगीत आणि आयुष्याच्या गुंत्याला अलगद सोडविणारे ख्यातनाम कवी संतोष आनंद यांचे बोल… जगण्याचे मर्म दोन ओळीत. अवघ्या आठ शब्दांत… *दो पल के जीवन से, एक उम्र चुरानी है… सही* में. जिंदगी और क्या है… तेरी मेरी कहानी है…
कुछ पाकर खोना है
कुछ खोकर पाना है
जीवन का मतलब तो
आना और जाना है
दो पल के जीवन से
इक उम्र चुरानी है
ज़िंदगी और कुछ भी नहीं
तेरी मेरी कहानी है….
संपूर्ण गाणे पाहण्यासाठी ,ऐकण्यासाठी समोरील लिंकवर क्लिक करा- .https://www.youtube.com/watch?v=HD6JPjWF9z4
( नागपूरचे जिल्हा माहिती अधिकारी असून विविध विषयांवर लिहिणारे लेखक आहेत.)
9702858777