जीवाची काहिली करणाऱ्या उन्हात होरपळणाऱ्या स्थलांतरीतांचा विषय कुणालाच सुचला नाही , हे तर आपली सरकारे आणि प्रशासन किती खुज्या आकलनाचे आहे , याचंच लक्षण आहे . टाळेबंदी लागू करण्याच्या आठवडाभर आधी स्थलांतराचा प्रश्न निर्माणच न होण्यासाठी त्यांना घरी परतण्याची उपाययोजना हाती घेता आली असती . तसं घडलं असतं तर , पायाचे तळवे फुटेपर्यंत शेकडो किलोमीटर्स लोक चालले नसते . चालता चालता रस्त्यात तडफडून मेले नसते , औरंगाबादजवळ रेल्वे रुळावर चिरडून मजूर मेले नसते आणि त्यांच्या हातातल्या रुळावर पडलेल्या पोळ्यांची छायाचित्रे बघून कुणाही संवेदनशील माणसाच्या काळजावर ओरखडा उमटला नसता…वातानुकुलीत केबिनमध्ये बसून कारभार हाकणाऱ्या प्रशासनाला सर्वसामान्य लोकांच्या हालअपेष्टांची जाणीव नसते , हेच यातून दिसलं . खरं तर , अशा अधिकऱ्यांची यादी करुन त्यांना या टळटळीत उन्हात , पाण्याची बाटलीही न देता किमान १००/१५० किलोमीटर्स पायी चालण्याची शिक्षा द्यायला हवी !