हाक ना बोंब

-प्रतिमा जोशी

काय मोल या भाकरीचे?
माणसाची स्वप्नंच नाही, तर माणसंच चिरडून टाकणारी ही भूक…
भूक… मृत्यूलाच लागलेली अनावर भूक.
चहूबाजूंनी फक्त त्याच्याच भुकेच्या हाका…
विषाणूच्या रूपात
वायूगळतीच्या रूपात
या संचारबंदीतही अपघातांच्या रूपात
भुकेच्या रूपात
भयाच्या रूपात
स्थलांतराच्या रूपात
बेकारीच्या रूपात
कर्जाच्या खाईत
मरणाच्या घाईत
कानांवर फक्त मृत्यूच्या हाका
आणि मग…
मग त्याचे दणकट हात मनेभोवती करकचलेले
श्वास पूर्ण बंद पडेपर्यंत आवळलेले
त्याला रक्तमांसाची चटक लागलीय
नरडीचे घोट घेत सुटलाय तो…
रोजचं पोट हातावर घेऊन चालणाऱ्या कष्टकऱ्यांत मृत्यूलाही दिसतंय सॉफ्ट टार्गेट
धडधडत जातोय तो त्यांना जिथे मिळतील तिथे चिरडत.
रस्ता म्हणू नका, रेल्वे म्हणू नका, घर म्हणू नका, दार म्हणू नका…
कुत्र्यामांजरीसारखी बेमौत मरणारी माणसं
थकलेली, सांडलेली, उपाशीतापाशी, हाकलून दिलैली, तिरस्कारांच्या नजरा झेलत हेलपाटणारी, दोन पाच रुपड्यांसाठी घणाचे घाव अंगावर घेणारी…
कोंदट झोपड्यांत कोंडलेली, फूटपाथवर सांडलेली, पायपात वसलेली, गावकुसाबाहेर फेकलेली, पोरीबाळी दांडग्यांच्या अंगाखाली जाताना असहाय्यपणे बघणारी, खिचडीच्या पाकिटासाठी रणरणत्या उन्हात रांगा लावणारी, भाकरीचा चंद्र शोथत अख्खं आयुष्य अवसेच्या अंधारात काढणारी…
मायबाप सरकारच्या कृपेनं हजारो मैल पायपीट करणारी आणि वाटचाल करता करता रस्त्यांनीच गिळून टाकलेली…
माणसं…
छे
त्यांना नाहीच दर्जा माणसाचा
ती फक्त डोकी
नगास नग
एक गेला तर दुसरा
कसंही मारा त्यांना
हाक ना बोंब

……………………………………

-मुग्धा कर्णिक

उपासमारी, रोगमारी, महामारी
अशा त्रिदेवी आल्या आहेत धावून
तेहत्तीस कोटींमधून तुमच्या बखोटी धरायला
पूर्वजन्मीच्या पाप्यांनो,
पायापासून निपजलात तुम्ही आमच्या महान देवाच्या.

कुणी काही करू शकत नाही बघा.
आम्ही डोके,धड, मांड्यांपासून जन्मलेले सारे पहा,
कसे छान साजूक जगतो आहोत आहे त्या भीषण परिस्थितीत.
सारे चालवून घेतो.
जेवतो खातो, टीव्ही बघतो, कंटाळतो,
काही नवीन शिकतो, काही नवीन शिजवतो,
काही छंद नवे जडवून घेतो…
दारूच्या दुकानांसमोर पैसे देऊन काहींना उभे करतो रांगेत.
मद्यही आणवतो घरी- कसेबसे.
अडजस्ट करावंच लागतं.

पूर्वकर्मसुकृत बरं…
उगीच देशाच्या महान नेतृत्वाला नावे ठेवू नका.
राज्याराज्यांची नेतृत्वेही कामं करत आहेत.
त्यांना थोडं कोसा, कारण ते जरा ब्येकार आहेत.
अकार्यक्षम कुठले…

मरतील ते सुटतील
असं म्हणत दिवस ढकलतो पहा आम्ही
कंटाळ्याशी किती घोर झुंजत…

नेटफ्लिक्सला काय धाड भरलीय आज कोण जाणे…
टीव्हीचा वैताग आलाय आता…
—————————————————————

-संजय आवटे

उत्खननात उद्या सापडतील
प्रेतं आक्रसलेली… आणि,
त्यांच्या शेजारी,
निवर्तलेली भाकरी!
तेव्हा, ‘विकास’ ही त्या काळातील
सगळ्यात मोठी ‘फेक न्यूज’ होती,
एवढाच निष्कर्ष उद्याच्या पिढ्या काढतील.

…………………………………………

समीर गायकवाड

रुळाजवळ तुटून पडलेली ती बत्तीस पावलं चालून चालून भेगाळून चिरून गेलेली होती.

त्यांच्या देहावरून रेल्वे गेली तेंव्हा ते थकलेले जीव निद्राधीन झालेले.

त्यांचे डोळे सताड उघडे नव्हते हे एका अर्थाने बरेच होते.

नाहीतर कालच्या रात्री त्यांच्या स्वप्नात आलेलं

त्यांचं चंद्रमौळी घर,

फाटक्या साडीतली बायको,

डोईची चांदी झालेली आई,

दृष्टी अंधुक झालेला जन्मदाता आणि

आपला बाप येण्याच्या खुशीनं अर्धपोटी झोपलेली चिंधूडकी पोरंबाळं,

हे सगळं त्यांच्या डोळ्यात तरळलं असतं.

ते पाहून काहींनी अश्रू पुसले असते तर काहींनी उसासे सोडले असते.

त्यांच्या कलेवराशेजारी सापडलेल्या भाकऱ्यांवर

श्रमिकांचं भूकसूक्त कोरलेलं होतं.

ते वाचता येणाऱ्या माणसाचा शोध जारी आहे…

तोवर त्या बत्तीस पावलांचे चित्र काढून

हिमालयाच्या शिखरावर खिळ्यांनी ठोकलं पाहिजे.

रोरावत येणार्‍या वार्‍याला,

हिमालयापाशी अडणार्‍या मेघांना

आणि आसमंतातून पाहणाऱ्या

समग्र ग्रहतार्‍यांना त्यांचं दुःख कळलं पाहिजे.

माणसांना तर ते कळले नाही निदान चराचराला तरी कळलं पाहिजे..

चराचराला तरी कळलं पाहिजे..

………………………………..

संजय इंगळे तिगावकर, वर्धा.

रूळ आणि माणसे

रुळांच्या काठाकाठाने चालत राहतात

तरुणांचे काही जत्थे

पाठीवर मोठी बॅग…

बॅगेतून डोकावणारी पाण्याची बाॅटल

त्यांच्या मागोमाग

कडेवर लेकरं घेतलेल्या आयाबाया अन्

खांद्यावर संसाराचा भार वाहणारे बापे

त्यांच्याही मागे काही

फरफटत येणारे म्हातारेकोतारे

अनुभवाचं गाठोडं पाठीवर

अन् हातात भाकरी

एवढीच मिळकत परतीची.

चालत राहतात रुळाच्या काठाकाठानं

रात्रभर… तासोंतास… जत्थेच्या जत्थे…

माहीत असतंच की धावणार नाही

रुळावरून कोणतीही गाडी आता…

पण मरणाची मालगाडी कुठे वेळ ठरवून येते?

ते चालत राहतात…

रक्ताळलेल्या पावलांनी, थकलेल्या विचारांनी

घरादाराच्या आसक्त ओढीनंही

ते चालतच राहतात…

माझी लेक घरी पोचते सुखरूप

रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये.

पण रुळाच्या काठाकाठानं चालणारा जमाव

त्यांचं काय?

त्यांच्यासाठी कुठली फोनाफोनी?

कोण करणार ऑनलाइन अॅप्लिकेशन त्यांच्यासाठी?

त्यांच्यासाठी कुठून येणार परमिटेड कार?

पोलिसांच्या नजरेस पडू नये म्हणून

रात्रंरात्र कित्येक मैल चालणारे पाय…

त्यांचं काय?

स्वातंत्र्याच्या सत्तर बहात्तर वर्षांनंतरही

धावताहेत रूळ समांतर… संपत नाही अंतर…

सोशल डिस्टंसिंगचे… माणसामाणसातले…

या रुळांवरून धडधडत धावत राहते

मदमस्त सत्तेची गाडी… नेहमीच…

लाॅकडाऊन असो वा नसो !

संजय इंगळे तिगावकर, वर्धा.

Previous article‘अत्त दीप भव’ हाच ‘पासवर्ड’ आहे ‘बुद्ध’ होण्याचा!
Next article‘जीना और मरना भी कोरोना के साथ…’
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.