टीव्ही 9 नंबर 1 आले कसे?

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूनंतर वृत्तवाहिन्यांनी ज्या प्रकारची रिपोर्टिंग केली होती त्यावर ‘टबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारीतेचा मृत्यू’ या मथळ्याखाली लेख लिहून  टीकेची तीव्र झोड उठवली होती. त्या लेखाला उत्तर देणारा हा टीव्ही 9 वृत्तवाहिनीचे वृत्त संपादक माणिक बालाजी मुंढे यांचा लेख . ( निखिल वागळे यांचा लेख याच पोर्टलवर अन्यत्र उपलब्ध आहे)

माणिक बालाजी मुंढे

विजय तेंडुलकरांच्या औंदुबर नावाच्या लेखानं मला एवढं जखडून ठेवलं होतं की गुरुवारी येणाऱ्या टीआरपीच्या आकड्यांचंही भान नव्हतं. एबीपी माझातल्या माझ्या एकेकाळाच्या सहकाऱ्याचा फोन आला त्यावेळेस औंदूबरमधून बाहेर आलो. तो म्हणाला, कोणता बोकड कापला होता बे तुम्ही, एवढा टीआरपी आला? क्षणभर मला लक्षातच आलं नाही की हा काय बोलतोय. नंतर लक्षात आलं, आज गुरुवार म्हणजे टीआरपीचे आकडे आले असणार. मग त्यानंच सांगितलं, टीव्ही 9 ला 16 पॉईंटसची जंप आहे आणि अर्थातच चॅनल नंबर वन. मी म्हणालो जाता जाता श्रीदेवी घरच्यांना प्रॉपर्टी देऊन गेली आणि आम्हाला टीआरपी तोही चॅनलला नंबर वन बनवणारा. सगळं हसत खेळत बोलणं.

फोन ठेवता ठेवता तो म्हणाला, तुम्ही तिला पुन्हा एकदा बाथटबमध्ये मारलं, त्याच्या बोलण्यात एक मिश्किलपणा होता. थोडासा हेटाळणीचाही सुर. मी शेवटी त्याला एवढंच म्हणालो की, ‘माझा’ जसं बराच काळ दोन नंबरवर गेलेलं होतं, तसं आताही असतं तर तुम्ही श्रीदेवीची बिकिनी सापडली असती तर तीही दाखवली असती, एवढच नाही तर तशीच नवी बिकिनी विकत आणली असती, त्याच साईजची मॉडेलही आणून उभी केली असती. सिस्टर चॅनल एबीपी न्यूजनं मौत का बाथटब नाही केला का? अर्थातच त्याचंही मी समर्थनच केलं असतं. पोलीसांनी क्राईम सीन क्रिअट करणं गुन्हा नसेल तर पत्रकारांनी तसं करण्यात चुक कशी असू शकते? पोलीसांनी क्राईम सीन क्रिअट करण्याचा उद्देश काय असतो? गुन्हा समजून घेणं, टीव्ही चॅनल्सचा काय उद्देश असेल? प्रेक्षकांना घडलेली घटना सोप्या पद्धतीनं दाखवून देणं. यात नैतिक-अनैतिकतेचा प्रश्न येतो कुठून?

निखिल वागळे सरांनी ‘टबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारीतेचा मृत्यू’ ह्या मथळ्याखाली एक लेख लिहिलाय. अर्थात बातमी भुतकाळात सांगायची नसते हे ते मथळ्यातच विसरून गेलेले दिसतात. त्या लेखात ते लिहितात, त्या 72 तासात भारतीय पत्रकारिता बाथटबमध्ये बुडाली. मराठीतलं एखादं चॅनल सोडलं तर इतर कुणी श्रीदेवीच्या मृत्यूबाबत बीभत्सपणा केला नाही असंही ते लिहितात.  त्यांचा रोख टीव्ही 9 बद्दल आहे. टीव्ही 9 हे एकमेव चॅनल होतं ज्यानं श्रीदेवीच्या मृत्यूचं कव्हरेज सलग चार दिवस केलं. दुसरी क्वचितच बातमी गेली असेल. वागळे सरांना आक्षेप ह्या सलग कव्हरेज करण्याबद्दल आहे. पण एखाद्या बातमीचं सलग चार दिवस कव्हरेज करणं तुम्हाला एवढं सोपं वाटतं? कंटेंट काय आकाशातून पडतो? तेही टीव्ही 9 सारखं चॅनल जिथं रिपिटला फार चान्स नसतो. एखाद्याच्या मृत्यूच्या वेगवेगळ्या शक्यता धूंडाळणं म्हणजे बीभत्सपणा असतो? आताचे मराठीतले किती संपादक किंवा आभासी संपादक (संदीप रामदासी यांचा शब्द जे स्वत:ला संपादक समजत न्यूजरूममध्ये वावरत असतात) आहेत जे एखाद्या बातमीचं सलग चार दिवस कव्हरेज करण्याची क्षमता ठेवतात? श्रीदेवीच्या मृत्यूचं सोडा, ह्यांनी कुठल्या तरी बातमीचं मोठं कव्हरेज केल्याचं तुम्ही पाहिलंय का? दुसऱ्या एका चॅनलमधला सहकारी मला त्याच दिवसात भेटला होता. तो म्हणाला, आम्हाला दोन पॅकेज करायचे श्रीदेवीबद्दल तर मारामार होतेय, तुम्ही एवढं कंटेंट आणताय कुठून? नंबर 1 चॅनलनं एखादी गोष्ट न करणं त्यांना परवडतं. कारण ते नंबर वन आहेत, इतरांचं काय, नंबर वनला फॉलो करणं म्हणजे सुसाईडच ठरते ना?

बरं बातमीवर बळजबरी नाही चालत, मुळात त्या बातमीत तशा क्षमता लागतात. आणि त्या क्षमता ओळखणारा उत्तम भविष्यकार. एखादा म्हणाला की मी ही बातमी अशीच चार दिवस चालून दाखवतो तर शक्यच नाही. आणि एखादा म्हणाला की मी दाबून दाखवतो तर तेही शक्य नाही. उत्तम बातमी कशाचीच मोहताज नसते. बळजबरीनं चालत असलेल्या बातमीसारखं टीव्हीवर दुसरं काही विद्रुप नाही.

वागळे सरांच्या लेखात त्यांनी बाजारूपणाचा उल्लेख केलाय. एवढच नाही तर चॅनल्सवाले कसे चेकाळले होते अशीही भाषा वापरलीय. त्यात स्वत:च्या शुचितेचा दाखला देताना त्यांनी आयबीएन लोकमतच्या त्यांच्या संपादकिय दिवसातला दाखला दिलाय. ते ज्या चॅनलचे सात वर्षे संपादक होते, त्याच चॅनलचा मी जवळपास 14 महिने न्यूज एडीटर होतो, त्यात 4 महिने माझ्याकडं मुख्य संपादकाची जबाबदारी होती. बीव्ही राव सर्वेसर्वा होते. आयबीएन लोकमत हे खुद्द वागळे सरांच्या काळातही कधीच महाराष्ट्राचं नंबर वन चॅनल झालं नाही. का? बरं रिलायन्सनं नंतर ते हातात घेतलं आणि  बाजारू केलं असं त्याचं म्हणनं असेल तर मग महाराष्ट्र 1 नावाच्या चॅनलचेही ते संपादक होते, त्याचं त्यांनी काय केलं? आपण सोडून गेल्यानंतर जर ते चॅनल उत्तम चाललं तर समजावं आपण काही तरी चांगलं उभं केलंय, पडझड झाली तर ते सर्वात मोठं अपयश. मग वागळे सर संपादक म्हणून यशस्वी झाले?

वागळे सर पहिल्यापासून कायम टीआरपीच्या गणितातून पळ काढतात. ह्या लेखातही त्यांनी चांगले कार्यक्रम केलं की पुरेसं आहे असं म्हटलंय. आम्ही काही टीआरपीच्या मागे लागत नाही असं ते थोतांड मानतात. तुमच्या मान्य करण्या न करण्यानं काय फरक पडतो. चॅनलचं सगळं भविष्य आणि अस्तित्व तर टीआरपीवरच आहे ना? माझं असं म्हणणं आहे की, वागळे सरांची अवस्था त्या गाडी ड्रायव्हरसारखी आहे ज्याच्या गाडीचा कधी अपघातच झाला नाही. कारण त्यानं गाडी कधी फलाटातूनच काढली नाही? जो माणूस टीआरपी आणू शकत नाही, त्यानं टीआरपीवर का बोलावं? अगोदर टीआरपी आणून दाखवा ना? तोही चॅनलचा, स्वत:च्या एखाद्या कार्यक्रमाचा नाही, तुम्ही संपादक पूर्ण चॅनलचे आहात ना? बरं टीआरपी काय आहे? तुमचा कार्यक्रम किती लोकांनी बघितला हे सांगणारी व्यवस्था. बरं समजा वागळे सर म्हणतात तसा खुप चांगला कार्यक्रम बनवला पण तो कुणी पाहिलाच नाही तर त्याचा उपयोग काय? जंगल मे मोर नाचा देखा किसने? टीआरपी नाकारून त्यांनी चॅनल डबघाईला नाही आणले? महाराष्ट्र 1 नावाचं चॅनल त्यांनी टीआरपीत चालवलं असतं तर शंभर, दोनशे कुटुंबांसह महाराष्ट्राचंच भलं झालं असतं ना?

बरं वागळे सरांसारखे संपादक प्रेक्षकांना मुर्ख समजतात आणि सगळं शहाणपण स्वत:कडे घेतात. श्रीदेवीच्या लेखातही त्यांनी ह्याचा उल्लेख केलाय. वागळे सरांच्या अशा विचाराची खुप माणसं तुम्हाला टीव्हीत काम करताना सापडतील. खरं तर ह्या सगळ्या मंडळींच्या समजचा प्रॉब्लेम आहे. प्रेक्षकांना मुर्ख समजताना, त्यात ते स्वत:ला कधीच धरत नाहीत आणि बातमी करताना मात्र ते आवर्जून स्वकेंद्री होतात.  प्रेक्षकच काय सिनिकल माणूससुद्धा कुणाचाच सिनिकलपणा खपवून घेत नसतो. याचाच अर्थ असा की जे चॅनल्स सिनिकल होत जातात त्यांच्यापासून प्रेक्षक हळूहळू दुरावतात किंवा त्याला खपवूनच घेत नाहीत,  जे चॅनल्स स्केप्टीकल राहतात ते वाढत जातात. सिनिकल म्हणजे स्वत:कडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असल्याचा दावा करणारा आणि स्केप्टीकल म्हणजे प्रश्न घेऊन उभा राहाणारा. वागळे सर काय करतात? कदाचित एवढ्याच गोष्टीमुळे प्रश्न नाचता है प्रश्न के कंधे पे चढकर असं पाशनं लिहिलं असावं.

बरं टीआरपी कुणाला मिळतो? एबीपी माझा हे मधला काही वर्षभराचा काळ सोडला तर कायम नंबर वन चॅनल राहिलेलं आहे. झी चोवीस तास दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर असतं. आयबीएन लोकमत हे गेल्या वर्षभरापासून चौथ्या नंबरवर आहे. टीव्ही नाईन हे चौथ्या नंबरवरून सरकत तिसऱ्या क्रमांकावर आहे. महिन्यातनं एखाद दोन आठवडे ते नंबर दोनवरही असतं. गेल्या आठवड्यात तर ते नंबर वन झालं जे अनेकांना खटकतंय. असं दिसतं की टीव्ही 9 हे एकमेव ग्रोथ होत जाणारं चॅनल आहे. मी त्याचा भाग आहे म्हणून नाही सांगत. आकडेवारी सांगतेय. अगदीच ज्याचा टीआरपी 12, 13 होता तो 36 वर जाणं ही वाटते तेवढी सोप्पी गोष्ट आहे? आयबीएन लोकमतनं, न्यूज 18 लोकमत नावानं रिलॉचिंग केलं. मुंबईसह महाराष्ट्रभर त्याची जाहिरातबाजी केली. त्यांना विचारा टीआरपी एकने तर वाढला का?  हिंदीत महत्वाच्या चॅनल्सच्या संपादकांनी पुढं काम करायचं की घरी जायचं हे दर गुरुवारी आलेल्या टीआरपीवरून ठरतं. तशीच फुटपट्टी मराठीतल्या संपादक आणि आभासी संपादकांना लावली तर?

मग टीव्ही 9 नं अशी काय जादू केली की एवढा टीआरपी आला?सारासार असं दिसतं की न्यूज चॅनल्समध्ये जे लोकं काम करतायत त्यांना टीव्ही 9 म्हणजे काहीही उडपटांग दाखवणारं चॅनल वाटतं. म्हणजे पृथ्वीचा सर्वनाश वगैरे. बरं कधी तरी एकदा असा कार्यक्रम केल्यानं चॅनलला कायम टीआरपी मिळतो? ज्या आठवड्यात टीव्ही 9 दोन नंबरला पोहोचला त्या आठवड्यातल्या काही घटना बघा. ज्यादिवशी टीव्ही 9 ला आग लागली, सेट अप वगैरे बंद पडलं, त्याच दिवशी कोरेगाव भीमाची दंगल उसळली. त्यानंतर मुंबई वगैरे बंद झाली. त्या आठवड्यात टीव्ही 9 टीआरपीत नंबर 2 ला पोहोचलं. ज्या चॅनल्सच्या टेलिकास्टचा प्रॉब्लेम झाला ते दोन नंबरला कसं काय पोहोचलं असेल? त्या चार एक दिवसातला टीव्ही 9 आणि इतर चॅनल्समधला फरक बघा. एबीपी माझा, झी चोवीस तास आणि आयबीएन लोकमत हे चॅनल्स ज्यादिवशी खरोखर दंगल उसळली त्यादिवशी त्यांनी बातमीच दाखवली नाही.

टीव्ही 9 नं मात्र जे घडतंय ते दाखवण्याचा निर्णय़ घेतला. इतर चॅनलचं कारण असं की शांतता वगैरे बिघडेल. साफ खोटं, पत्रकारांचं काम रिपोर्ट करण्याचं आहे, शांतता निर्माण करण्याचं काम पोलीसांचं आहे. एका सर्टन स्टेजपर्यंत यात प्रशासनाला मदत करावी. पण बातमीचा बळी देऊन नाही. उलट कोरेगाव भीमाची दंगल चॅनल्सनी दाबली म्हणून तर दुसऱ्या दिवशी मुंबई पेटली ना? याचाच अर्थ टीव्ही 9 इतर चॅनल्सच्या चोवीस तास पुढं होतं. बरं नुसतं पुढं होऊन नाही चालत, अचूक वेळेला, अचूक प्रश्न निर्माण करून टेलिव्हिजनचा अफलातून टायमिंग साधता यायला लागतो. ज्यावेळेस आघाडीचे चॅनल्स संभाजी भिडेचा उदोउदो करत होते किंवा प्रकाश आंबेडकरांनाच कटघऱ्यात उभं करत सिनिकल भूमिका घेत होते त्यावेळेस टीव्ही 9 फक्त सवाल खडे करत होतं. परिणाम तुमच्यासमोर आहे. यात कुठं श्रीदेवी होती?

बहुतांश जणांचा समज असा आहे की लोकं चर्चा खुप पाहतात. संपादकांनी तसा पद्धतशीरपणे समज पसरवलाय. टीआरपीचे आकडे असं सांगतात की हे साफ खोटं आहे. कोणत्याच चॅनल्सचा, कोणत्याच चर्चेचा शो टॉपच्या शंभरमध्ये सुद्धा नाही. आयबीएन लोकमतचा न्यूजरूम चर्चा हा कार्यक्रम गुरूवार, शुक्रवारी कधी तरी रेकॉर्ड करून तो रविवारपर्यंत तीन चार वेळेस रिपिट करतात. तुम्हाला माहितीय टीआरपीत हा कार्यक्रम पहिल्या 1 हजार कार्यक्रमांमध्ये सुद्धा नाही. खुद्द टीव्ही 9 नं जे क्राईम फाईल आणि घरोघरी मातीच्या चुली असे कार्यक्रम सुरु केले त्यांचीही अवस्था यापेक्षा काही वेगळी नाही. आयबीएनचा न्यूजरूम चर्चा हा संपादकांचा शो आहे, क्राईम फाईल आणि घरोघरीच्या अँकर ह्या अनुक्रमे क्रांती रेडकर आणि अलका कुबल आहेत तरीही ही अवस्था. खुद्द आयबीएनच्या समुह संपादकांचा बेधडक हा टॉक शोही टॉपच्या शंभरमध्ये नसतो. असं का असेल? प्रेक्षकांना एखादी गोष्ट नाही बघायची तर ते नाहीत बघत. लोकांना तुमच्या चॅनलवर आणनं म्हणजे कॅबिनमध्ये बसून गप्पांचा फड रंगवण्याएवढं सोप्पं असतं? ज्या कार्यक्रमांना प्रेक्षक बघत नाहीत, ते तसेच चालू ठेवले तर ते अख्खं चॅनल घेऊन बुडतात. पण हे कोण सांगणार?

मग टीआरपीत टॉपला काय आहे तर फक्त न्यूज. म्हणजे ज्यात बातम्या दाखवल्या जातात असे बुलेटीन्स. म्हणजे जे चॅनल बातमीवर राहिल ते टॉपला जाईल.

मग बातमीवर राहाणं एवढं अवघड आहे का? तर हो. बातमीवर राहायचं असलं की, बीव्ही रावांसारखं वर्षानुवर्षे अखंडीत रोज सकाळी सहाला ऑफिसला पोहोचायला लागतं, विनोद कापरींसारखं न्यूजरूममध्ये कधीच न येताही प्रत्येक स्टोरी, तिचा अँगल ना अँगल , एवढच काय प्रोमो पण लिहून द्यायची तयारी असावी लागते. नाही तर मराठी संपादक, आभासी संपादक  म्हणजे फक्त चर्चेला बसणार, त्याचं अँकरींगच करणार, बातम्या, रन डाऊन म्हणजे काही तरी तुच्छ असं लेखणार. ज्या संपादकांना किंवा आभासी संपादकांना नाईट शिफ्ट तर सोडाच मॉर्निंग शिफ्टला पण यायचं नसतं, दुपारी बारानंतर न्यूजरूमला उगवायचं असतं, गुरूवारपासूनच ज्यांना सुट्टीवर जाण्याचे वेध लागतात, शनिवार, रविवार तर फक्त रेकॉर्डेड कार्यक्रम लावायचे असतात त्यांना टीआरपी मिळणार कसा आणि ते बातमीवर राहणार कसे? टीव्ही 9 नं जिथं बाजी मारली त्या ह्याच डेथ ओव्हर्स आहेत.

टीव्ही 9 नं सलग कव्हरेज फक्त श्रीदेवीचंच केलं असं नाही तर पाच दिवस अखंडीत असं मोर्चाचं कव्हरेज टीव्ही 9 शिवाय दुसरं कुणी केलं का? जस्टीस लोयांच्या मृत्यूची बातमी तुम्ही टीव्ही 9 शिवाय कुठं पाहिली का? 200 सुपरफास्ट बातम्या तुम्ही कुठल्या चॅनलवर पहाता काय? तुम्ही तगडं कंटेट निर्माण केलं तर आयबीएन लोकमतसारखं चॅनलही रावांच्या काळात चौदा-पंधरावरून 20 च्या आसपास गेलं होतं हे कसं नाकारता येईल? मंदार-म्हात्रे सरांच्या काळातही ते उठलं होतंच ना? मधात साम टीव्ही आयबीएन लोकमतला मागे टाकत चौथ्या नंबरला आलं होतं. कारण त्यांचा व्हायरल सत्यसारखा एकमेव प्रोग्राम. तुमचं कंटेट मजबुत असावं लागतं आणि प्रेक्षकांच्या इच्छा आकांक्षा तुम्हाला व्यापूनही टाकता याव्या लागतात त्यावेळेस कुठं चॅनल्सना टीआरपी मिळत जातो. वागळे सरांना हे समजत नसेल?

न्यूज चॅनल्स म्हणजे बातमीचा उद्योग.( म्हणजे संपादकांनी मार्केटींगच्या स्लॉटची काळजी करणं नाही) तो काहींना जमतो, काहींना जमत नाही. ज्यांना तो जमत नाहीय ते एक तर हळूहळू दांभिकतेच्या झुली पांघरतात, कारणांची पिसं गाळीत फिरत असतात, सामाजिक भानाचे डोस पाजत असतात, खोटेपणाच्या तुताऱ्या वाजवतात, न्यूजरूम सोडली तर ते सगळीकडे दिसतात.

मी तर पत्रकारही नाही, पत्रकारीतेचं माझं कुठलंच शिक्षण झालेलं नाही. पत्रकारीतेचं शिक्षण घेतलेले आणि संपादकीय वाचणारे चॅनल्सच्या फार काही कामाचे नसतात. मी तर मास कॉमलाही नापास झालेलो होतो. आमचे आदरणीय बापू मेघराज पाटील म्हणतात तसा मी मीडिया प्रॅक्टीशनर आहे. म्हणजे डॉक्टर जशी मेडिसिनची प्रॅक्टीस करतो तसा मी मीडियाची. माझी फी मला मिळते म्हणून मी ऑफिसला जातो. समाजाच्या भल्यासाठी तू एक दिवस फुकट काम कर म्हटलं तरी मी नाही करू शकणार. कारण समाजाचं भलं करायला निघालेले समाजाचं सर्वात मोठं नुकसान करतात. ते रँडच्या फाऊंटेन हेडमधल्या टुहीसारखे आहेत.

नवा टीआरपी यायला आणखी दोन एक दिवस आहेत. कदाचित टीव्ही 9 पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर येईलही. पण घर बांधायचं म्हटलं तर चिऱ्यावर चिरा रचत जायला लागतं आणि जोपर्यंत विनोद कापरींसारखा संपादक आहे आणि जीव तोड मेहनत करणारी टीम आहे तोपर्यंत चिंता नाही. दोन दिवसांपुर्वी शेतकरी लाँगमार्च दरम्यान आम्ही कापरी सरांना म्हणालोत की वागळे सरांना बोलवायला पाहिजे गेस्ट म्हणून चालेल का? ते क्षणाचाही विचार न करता म्हणाले, क्यूँ नही, जरूर बुलाना चाहिए. आम्ही वागळे सरांना फोन केला अर्थातच ते नाही म्हणाले. बस्स, फरक फक्त एवढाच आहे.

आज परत एक झी २४ तासमधला मित्र भेटला. म्हणाला, काय राव तुम्ही तर श्रीदेवीत ठार वेडे झाला होता. सगळी आग लावली. त्याच्याही बोलण्यात एक हेटाळणीचा सुर होताच. मी म्हणालो, बरोबर आहे, तुम्हाला वेडं होता येत नाही हाच तर तुमचा प्रॉब्लेम आहे आणि तसंही देव काही सगळ्यांच्या बुडात निखारा ठेवून खाली पाठवत नाही.

माणिक बालाजी मुंढे

9833926704