युएस कॉन्स्युलेटच्या एका फेलोशीप अंतर्गत नोव्हेंबर २०२४मध्ये अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. अमेरिकेतील माध्यमांत सर्वसमावेशक पत्रकारिता कशाप्रकारे केली जाते, ते समजून घेण्याची संधी त्या फेलोशीपमध्ये होती. शिकागोमध्ये काही महिला पत्रकारांशी भेट झाली. मला विकसनशील देशातली स्त्री म्हणून विकसित देशातील त्या स्त्रियांविषयी कुतूहल होतं. अमेरिकतील स्त्रियांची तेथील समाजजीवनातील स्थिती आणि स्थान काय प्रकारचं आहे, ते जाणून घ्यावंसं वाटलं. त्यावर, तिथल्या स्त्रिया किती आधुनिक विचारांच्या, स्वतंत्र प्रतिभेच्या, स्वावलंबी आणि मुक्त आहेत, असंच उत्तर येणार, याची खात्री होती. त्यामुळं त्यांना तसा प्रश्न करत असतानाही तो बाळबोध असल्याची भावना मनात होती. मात्र, त्या स्त्रियांचं उत्तर वेगळं होतं. त्यांच्या मते, पितृसत्ता तिथंदेखील आहेच.
‘अमेरिकन स्त्रिया इतर अविकसित किंवा विकसनशील देशांच्या तुलनेत अधिक स्वतंत्र भासत असल्या तरी, तिथेही बहुतांश स्त्रियांचे स्थान हे पुरुषांनंतरच येतं. तिच्या मताला फारशी किंमत नाही, अद्यापही तिचं नेतृत्व मान्य केलं जात नाही. त्या घर आणि धार्मिकता यात अडकल्या आहेत. त्यांना नोकऱ्यांमध्ये दुय्यम स्थान आहे. नोकऱ्यांमध्ये स्त्रियांचं प्रमाणही कमी आहे. त्यातच, त्या कुठल्या वर्ण-वर्गातून येतात, त्यातूनही त्यांची स्थिती आणि स्थान ठरतं. या सगळ्याचं कारण आपल्या धर्मग्रंथांत आहे. जगातील सर्वच धर्मग्रंथांत स्त्रियांचं स्थान दुय्यम आहे. शिवाय, अलिकडे एकूणच समाज धार्मिकतेच्या बाबतीत अधिक कट्टर आणि ‘कन्झर्वेटीव्ह’ होत चाललाय…’
त्या ज्येष्ठ अमेरिकन महिलेचं उत्तर ऐकताना आपल्या देशात काही वेगळी स्थिती नाही, याची जाणिव होत होती. अमेरिकेच्या निवडणूकीत कमला हॅरिस यांची स्वत:ची कणखर स्त्री प्रतिमा असो, वा अमेरिकतील स्त्रियांना गर्भपाताचा अधिकार असावा ही त्यांची भूमिका असो, ती तेथील कट्टरतेकडं झुकणाऱ्या समाजाला नको वाटली. परिणामी, हॅरीस यांचा निवडणूकीत पराभव झाला, असंही त्या पत्रकार सांगत होत्या. आजवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी ‘वूमन ऑफ कलर’ नाही, याची खंत त्यांच्या बोलण्यात होती. प्रगत देशातील स्त्रियांनाही नवनव्या लढाया होत्याच. आणि त्या लढायांमध्ये धार्मिक गुलामीविरुद्धचा संघर्षदेखील होता. किंबहुना आहे. ते सारं चित्र आपल्या देशात अधिक गडद होऊन जातं हेही लक्षात येत होतं. उलट, आपल्या देशातलं धर्मवैविध्य आणि जातवैविध्य इतकंय म्हटल्यावर चुरस लागावी त्याप्रमाणे धर्म, जाती, परंपरा अधिक हिरीरीने प्रदर्शित केल्या जातात. सोशल माध्यमांनी त्यासाठी एक व्यापक व्यासपीठच मिळवून दिलं आहे.
खरंतर, संयुक्त राष्ट्राने १९७५मध्ये ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ घोषित केल्यानंतर अनेक स्त्रीमुक्ती चळवळींना बळ मिळालं होतं. स्त्रीवादी दृष्टीकोनातून चळवळी आकाराला आल्या. तोपर्यंत अस्तित्वात असणाऱ्या विविध चळवळींमध्ये स्त्रियांचा सहभाग होता, मात्र त्यात स्त्रियांच्या दृष्टीकोनाला फारसं स्थान नव्हतं. ते अधोरेखित होण्यास आणि स्त्रियांना स्वत:चा आवाज मिळण्यास त्या काळात बरीच मदत झाली. त्यातून स्त्रिया स्वत:ची ओळख मिळवण्यासाठी धडपडू लागल्या, विवाह संस्थेतील फोलपणावर बोट ठेवू लागल्या, कुंकू-मंगळसूत्र, जोडवी या आणि अशा सौभाग्याच्या प्रतिकांना फाटा देऊ लागल्या. सणवारांमधला वावर आटोपशीर ठेवू लागल्या, बुरखा, तलाक, बहुपत्नीत्व विरुद्ध मोर्चे काढू लागल्या, मुस्लीम महिलेला सिनेमाबंदी झाल्यावर त्याविरुद आवाज उठवू लागल्या, स्त्रीयांचं शोषण करणाऱ्या प्रथा-परंपरांशी फारकत घेऊ लागल्या. शिक्षणातून गवसलेलं आत्मभान जपत स्वतंत्र उपजिविकेची ओढ बाळगू लागल्या. कामातील समान मोबदल्याबाबत ठणकावून प्रश्न करु लागल्या. त्या घुसळणीत अगदी कामगार स्त्रियादेखील ओढल्या गेल्या. मात्र, मुक्तीची कवाडं सर्वच स्त्रियांसाठी खुली झाली नाहीत. जातव्यवस्थेमुळे स्त्रीमुक्तीचा संघर्ष अधिक व्यामिश्र होतो. तरीही, पितृसत्तेतून मुक्तीची वाट शोधण्याचं महत्त्वं त्याही काळी बहुतेकींना मान्य होतं. बऱ्याच जणी त्या साऱ्या लढाया लढून पुढं आल्या आणि पुढं येताना मागून येणाऱ्या स्त्रियांसाठी नव्या पायवाट आखत आल्या. त्या विस्तृत पार्श्वभूमीवर अलिकडच्या शिकल्या-सवरलेल्या, उच्चपदस्थ-जाणकार महिला जेव्हा पुन्हा त्याच प्रथा-परंपरा आणि धार्मिकता यांचे पदर पकडताना दिसतात, तेव्हा नवल वाटतं.
बहुतांश धर्मांनी स्त्रियांचं स्थान दुय्यम ठेवलं, त्यांना अनुल्लेखानं मारलं ही बाब काही नवी नाही. परंतु, ती सर्वदूर पोचली नाही हेही तितकंच खरं. पितृसत्ताक व्यवस्थेत महिला मानसिक गुलामगिरीच्या शिकार ठरतात. मुलगी म्हणून वाढतानाच तिने कसं वागावं, कसं रहावं आणि तिच्याकडून इतरांच्या काय अपेक्षा आहेत अशा शिकवणीचे डोस बळजबरीने प्राशन करतच मुली मोठ्या होतात. त्यातच, धर्माचरण हे तर स्त्रियांसाठीचं राखीव क्षेत्र ठरतं. पितृसत्ताक मानसिकतेतील स्त्री-पुरुष दोघांचीही इच्छा असते, की स्त्रियांनी ‘घरधर्मा’चं पालन करुन त्याचा खुंटा सतत बळकट करण्याचं काम करावं. मात्र, तोच धर्म स्त्रियांना अनेकानेक प्रकारची बंधनं घालतो, तिचं स्वतंत्र अस्तित्व नाकारतो आणि तिनं पुरुषापुढे जाऊ नये असं अघोषित वचन घेतो हे सहज डोळ्यांआड केलं जातं. ही मांडलेली निरीक्षणं यत्किंचितही नवी नाहीत. वर्षानुवर्षे स्त्रीवादी स्त्री-पुरुष या दांभिकतेविषयीची अशी मांडणी करत आले आहेत. बाबा-बुवा, धार्मिक प्रथा, परंपरा यांचा कडाकडून विरोध करत आले आहेत. तो विरोध काळाच्या ओघात तीव्र होण्याऐवजी बोथट होत चाललंय का? धार्मिक शोषणातून मोठ्या कष्टाने मिळवलेली मुक्ततेची समज हळुहळू नाहीशी होत आहे का? अनेक स्त्रीवादी चळवळींनी धर्माचे काच सैल करून बऱ्याच मुलींना घराबाहेर पडण्याचा मार्ग मोकळा करुन दिला. मात्र, आजच्या डिजिटल युगात शिक्षित, आधुनिक स्त्रिया त्या धार्मिक प्रथांचं गौरवीकरण करताना दिसतात, तेव्हा ते सारं कुठून येतं असा प्रश्न पडतो. ते सारं काही खरंतर डिजिटल माध्यमांतूनच येतंय!
समाजमाध्यमं आपल्या जगण्याचे अविभाज्य भाग झाले आहेत. गरिबातील गरिबाकडंही ॲन्ड्रॉइड मोबाइल असतो. त्यावर व्हॉटसॲप आणि युट्युब या दोन गोष्टी तर असतातच. मुबलक प्रमाणात डेटा आणि अन्नापेक्षा स्वस्त असे डेटापॅक उपलब्ध झाल्यानं समाजमाध्यमांचं कन्झ्मशनही निश्चितच वाढलं आहे. आयुष्याला आलेल्या वेगाने विचार, मंथन, खातरजमा, शहानिशा या वेळखाऊ गोष्टींना डिलीट करुन टाकलंय. लोकांना पूर्वी वर्तमानपत्रात येणारा मजकूर खरा आहे, याची खात्री वाटायची. आता ती खात्री व्हॉटसॲपवरील माहितीबाबत वाटते. चांगलं-वाईट सगळंच त्यावरुन फॉरवर्ड होतं. त्यामध्ये, कुठल्या प्रकारची स्त्री चांगली माता असते, आपल्या माता पित्यांवर प्रेम असेल तर अमूक एक व्हिडीओ लाईक करा – शेअर करा, अमूक एका बुवांचं नाव स्टेटसला ठेवल्यास तुमचं कल्याण होईल, अमूक मेसेज इतक्या लोकांना पाठवल्यास काही तासात तुम्हाला आनंदाची वार्ता मिळेल, स्त्रियांच्या सौभाग्य लेण्याचं महत्त्व काय आहे, जुम्मा मुबारक करताना अल्लाहचे स्मरण केल्यास कसे पुण्य लाभेल, अमूक पुजा कशी करावी, अमूक पद्धतीने ती न केल्यास देवाचा कसा कोप होतो, अमूक सणाचे महत्त्व काय, मुलं कशी घडवली पाहिजेत त्याचा मंत्र, खोकला घालवण्याच्या आयुर्वेदीक काढ्याची पाककृती अशा प्रकारचे अगणित मेसेजेस व्हॉटसॲपवर येऊन धडकतात.
काही जण हे मेसेज पुढे पोचवण्याचं काम श्रद्धापूर्वक नित्यनेमानं करतात. एखाद्याला वाटेल, की सुवचन, सुविचार असतील आणि त्यातून चांगल्या नीतीमूल्यांची पेरणी होत असेल तर त्यात वावगं ते काय? मात्र, विशिष्ट विचारसरणीच्या माहितीचा मारा ठराविक मर्यादेनंतर परिणाम घडवू लागतो. खोटी बाब ओरडून वारंवार सांगत राहिली, की तीदेखील खरी वाटू लागते, तशी गत होऊन जाते. त्यातून ऑनलाईन जगात धार्मिक, रुढीग्रस्त कंपू तयार होतात. अशा प्रकारच्या ध्रुवीकरणातून आपला धर्म, संस्कृती, परंपरा हीच गौरवशाली आहे आणि त्याचा प्रतिवाद करणारं किंवा त्याहून वेगळा विचार मांडणारं अन्य काहीही हे आपल्या धर्म-संस्कृतीला छेद देणारं आहे, असं चित्र उभं केलं जातं. त्यामुळं महिलांमधील सार्वत्रिक भगिनीभाव कमी होऊ लागतो. स्त्रिया एकमेकांविरुद्ध उभ्या राहणं, हे पितृसत्तेच्या पथ्यावर पडणारं असतं. अशा प्रकारच्या धार्मिक अस्मितांमध्ये अडकल्यावर स्त्रियांना मुक्तीचा विसर पडणं स्वाभाविक होऊन जातं. त्यात आपल्याकडच्या जातव्यवस्था! त्यामध्ये अडकलेल्या मध्यम किंवा कष्टकरी वर्गातील महिलांना उच्चवर्णीय-वर्गीय महिलांसोबतचं ‘असोसिएशन’ आणि ‘बिलाँगिंग’ आकृष्ट करत राहतं. त्यामुळं अलिकडं बऱ्याच बहुजन स्त्रियादेखील उघडपणे धार्मिक परंपरांमध्ये सहभागी होताना दिसतात. आपण एका मोठ्या कंपूचा भाग आहोत ही भावना त्यांना महत्त्वाची वाटत असते.
स्त्रियांचा पूर्वीपासूनच सत्संग, कीर्तन, भजन, इज्तेमा अशा धार्मिक गोष्टींमध्ये सहभाग राहिला आहेच. त्याला आता ऑनलाईन माध्यमाची जोड आहे. अनेकदा घराबाहेर पडून कुठल्यातरी बाबा-महाराजांचं प्रवचन ऐकण्यास असमर्थ असणाऱ्या स्त्रियादेखील आता घरबसल्या झूमवरुन किंवा गुगल मीटवरुन ऑनलाईन सेशनला हजेरी लावतात. महिलांना मागं खेचणाऱ्या माहितीला दाद देत राहतात. मुस्लिम स्त्रियादेखील अशा प्रकारच्या ऑनलाईन इज्तेमा, कुरआन शरिफ शिकवणारे ग्रुप, हदीसची ओळख करुन देणारे व्हिडीओ यांच्याशी जोडून घेतात. घरातली इतर काम करता करता ऐकणं, पाहणं ही फार सहज गोष्ट त्यातून घडते. मात्र त्यातला कंटेण्ट नेमका काय सांगतो? त्यातील मांडणीत ‘स्त्रियांनी चूलमूल केल्यास त्या अधिक सुरक्षित’ असा भाव असेल तर त्यांच्या मनावरचा परिणाम काय असणार? रोज-रोज अशा प्रकारच्या माहितीचं बंबार्डिंग होत राहिल्यावर मेंदू हायजॅक होण्याची शक्यता वाढते. तसं होणं म्हणजे मुक्तीपासून दुरावत जाणं.
सोशल मीडियाने ‘आपण सुसंस्कृत आहोत’ याचं प्रदर्शन करण्याची जागा लोकांना खुली करुन दिली. सणवाराला नटून-थटून फोटो टाकण्याचं अवाजवी प्रेशर महिलांना वाटत राहतं. त्यात करवाचौथ, हरितालिका, वटपौर्णिमा किंवा नवरात्र यांसारख्या सणांना तर उधाण येतं. एकच पती सात जन्म मिळावा म्हणून केवळ महिलांनीच उपासतपास करण्याच्या विचारधारेपासून एकेकाळी स्त्रियांनी स्वतःची सुटका करुन घेतली. पण आता त्यापुढची पिढी त्याच परंपरांचं अवडंबर माजवत आहे. मालिका, सिनेमांमध्ये या प्रकारच्या पुजा करणाऱ्या स्त्रिया किती नैतिक असतात, पतीव्रता असता, कुटुंबवत्सल असतात याच्या लार्जर दॅन लाईफ प्रतिमा उभ्या केल्या. मग ती ‘पवित्र ताकद’ वापरुन त्या मृत पतीलाही जिवंत करु लागल्या. त्याच्यावरचं संकट केवळ त्यांच्या उपवासामुळं टळलं या टीव्हीतून ओकल्या जाणाऱ्या प्रतिमा कुटुंबासह मिटक्या मारत पचवल्या जाऊ लागल्या. त्यात थोडासा बदल करुन पतीदेखील पत्नीसाठी उपवास करतोय, अशा भ्रामक इमेजमधून समतावादी पतीचं चित्रं उभारण्यात आलं.
नव्वदच्या दशकात तेही एका मर्यादेपर्यंत ठीक होतं. पण अजूनही या चित्रांत फरक पडला नाही. एखादा समतावादी, संवेदनशील पती असेल तर तो पत्नीचा शक्य असलेला त्रास टाळण्यासाठी प्रयत्न करीन, त्याऐवजी तो स्वत:ही त्यात उडी नाही घेणार. हेच माध्यमातल्या प्रतिमेवरून वाटतं. एकदा एका परिसंवादात, एका लेखक-दिग्दर्शकानं म्हटलं होतं, की आपल्याकडच्या मालिकांमध्ये अजूनही महिला या वैमानिक, गिर्यारोहक किंवा उच्चपदस्थ दिसत नाहीत. चॅनेलच्या निर्मात्यांना अशा प्रकारची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या स्त्रीची गोष्ट सांगितली, तर ते आनंदानं स्वीकारतील. मात्र ती कथा, ती वैमानिक असूनही कुटुंबकबिला कसा चालवत आहे, कुटुंबातील हेवेदावे कसे सोडवत आहे, किचन पॉलिटीक्स कसं डील करत आहे, याच वाटेनं पुढं जाणार. प्रेक्षकही तेच चवीनं पाहणार.
या प्रतिमांच्या पार्श्वभूमीवर नवरा दारुडा, मारझोड करणारा किंवा कसाही असला तरी त्या दिवशी त्याच्या नावानं करवाचौथ किंवा वटपूजा करुन त्याचे व्हिडीओ-फोटो टाकणं हे अजिबातच कष्टाचं नाहीये. मग त्या दिवशी सोशल मीडियावरही ज्योतिबाची सावित्री की सत्यवानाची सावित्री अशा प्रकारचा वाद उफाळून येतो. ज्योतिबाची सावित्री हुशार होती, तर सत्यवानाची सावित्रीदेखील चतुर होती. तिनं मृत पतीचे प्राण माघारी आणले. मात्र, तिचं चातुर्य गुंडाळून ठेवून तिची पतीव्रता म्हणून मोठी प्रतिमा तयार केली गेली. त्या दिवशी पूजा सावित्रीच्या चातुर्याची होत नाही, तर पतीच्या दीर्घायुष्यासाठी होते. एखाद्या गोष्टीचा अन्वयार्थ लावण्यातही आपला मेंदू किती गरिब आहे. सारासार विचारांपासून बहुतांश स्त्रियांनी दूर जावं असं वाटत असल्यानेच तर सोशल मीडियावर प्रदर्शनाचा पूर वाहतो. कुठलाही विचार करण्याच्या कष्टापेक्षा फोटोंच्या स्पर्धेत भाग घेणं जास्त सोपं होऊन जातं. शिवाय तुमच्या वैयक्तिक नात्यात सारं आलबेल आहे हेही दाखवण्याचा प्रयत्न असतो. पती-पत्नीचं नातं चांगलं आहे, म्हणजे पत्नी म्हणून ती परफेक्ट आहे, अशा प्रकारच्या धारणांमुळंही महिलांना ते सारं ‘दाखवणं’ त्यांच्या मानसिक आनंदाचाही भाग वाटतो.
‘गुड वूमन’ किंवा चांगली स्त्री कोण? या प्रश्नाचा गदारोळही महिलांच्या मुक्तीसाठी मारक ठरतो. मग महिला नोकरदार, कमावती, जबाबदार असली, तरीही तिला चांगली पत्नी किंवा सून होण्याचा सिंड्रोम ग्रासतो. मग नोकरीपाणी सांभाळूनही व्रतवैकल्य करणाऱ्या स्त्रिया असतात. साग्रसंगीत स्वयंपाक करुन जेवू घालणाऱ्या स्त्रिया असतात. आपण ते सारं आनंदानंच करतो, असंही त्या म्हणत राहतात. पण हे पुन्हा पिअरप्रेशरच असतं. नव्वदीनंतरच्या काळात पुरणपोळीला फाटा देत पुरी-खीर, किंवा श्रीखंड असं गोडाचं जेवण करणाऱ्या कुटुंबातील आताची पिढी ‘पुरणपोळीच हीच खरी परंपरा’ म्हणत राहते. मग स्वतः रांधून तयार केलेल्या भरल्या ताटाचे फोटो शेअर करणं आलंच. त्या फोटोपोस्टमध्ये त्या कामात कुटुंबातील इतरांची किती मदत झाली याचा काहीही उल्लेख नसतो. बऱ्याचदा ती मूड येऊन केलेली ‘मदत’च असते. कुणी त्या कामाची जबाबदारी घेऊन हातभार लावला आहे, असं फारच कमी वेळा होतं. चांगली स्त्री होऊन दाखवण्याच्या धडपडीत स्त्रीया अशा चक्रव्यूहात अडकतात. त्यामुळं अलिकडे काही जणींना नोकरीचाच जाच वाटतो. कुटुंब आणि नोकरी अशी दुहेरी कसरत करण्यापेक्षा, त्या आपल्या उच्चशिक्षणावर तुळशीपत्र ठेवून कुटुंबालाच प्राधान्य देऊ पाहतात.
कुटुंबाला प्राधान्य स्त्री आणि पुरुष दोघांच्या बाबतीत समान हवं. मात्र, आपल्याकडे पूर्वापार काळापासून, कुटुंब ही बाईचीच जबाबदारी आहे असे संस्कार अधिक घट्ट आहेत. त्यामुळे मुली आणि स्त्रीया स्वत:ची स्वतंत्र ओळख मिळवण्यात शरिर-मन झिजवण्यापेक्षा त्यापासून दूर जाणं प्रिफर करतात. त्यामागचा विचार, कुटुंबाकडे लक्ष पुरवायचं आहे, मुलांचं बालपण हिरावून घ्यायचं नाहीये, मुलांना पाळणाघरात ठेवणं चुकीचं आहे, आता मुलांकडे नाही पाहणार तर कधी? असा असतो. मात्र, स्त्रीया अशा प्रकारची वक्तव्य करुन स्वत:ला ‘वेगळ्या’ आणि ‘कुटुंबवत्सल’ म्हणून रेखांकित करु पाहतात. तसं करताना त्या नोकरदार महिलांना अपराधभाव देतात. त्या कुटुंबाचं आलं-गेलं बघण्यात बाई म्हणून कशा कमी पडतात याचा सतत गजर केला जातो. ते प्रेशर घेत नोकरदार महिला जीवाची ओढाताण करुन सगळीकडे परफेक्ट राहण्याचा प्रयत्न करतात. अशा स्थितीत स्वत:ची ओळख किंवा स्वतंत्र पैसे मिळवून काय करणार आहेत, पैसा पुन्हा कुटुंबातच द्यायचाय, पुन्हा कुटुंबाचं एकटीनंच सगळं बघायचं, या साऱ्या गोष्टी नकोशा वाटणं साहजिक आहे. पण त्याऐवजी कुटुंबातील जबाबदाऱ्यांचं, आर्थिक वाटणीचं योग्य नियोजन केलं तर स्त्रीयांना नवऱ्याच्या कमाईवर का निर्भर राहावं लागेल? मुल हे केवळ पालकांचं नसून समाजाचंही आहे, या भूमिकेतून पाळणाघरं किंवा सर्वांना परवडतील अशा सपोर्ट यंत्रणा निर्माण केल्या तर स्त्रीयांना सतत माणूस होण्यापासून परावृत्त का व्हावं लागेल? यातही एखाद्या स्त्रीला नोकरी नको असेल तर तिला तशी निवड करण्याचा अधिकार हवा. तिच्यावर विपरीत परिस्थितीमुळं लादलेपण येऊन पर्यायच न उरणं असं व्हायला नको. मात्र, स्त्रीयांचं बाईपण सतत अधोरेखित करुन समाजव्यवस्थेतील त्यांचं दुय्यम स्थान ‘जैसे थे’ ठेवण्याचा प्रयत्न असतो. म्हणूनच डिजीटल युगातही जग डिजिटायलजेशनच्या क्रांतीकारी संक्रमणात असतानाही जगभरातील महिला अधिक धार्मिक आणि पारंपरिक होताना दिसतायत.
मध्यंतरी मराठी अभिनेत्रींच्या श्रद्धाळूपणाचे व्हिडीओ चर्चेत आले. माझ्या श्रद्धास्थानानं मला संकटातून वाचवलं, तो श्रद्धेचा चमत्कार आहे, दैवी अनुभव आहे असं म्हटलं गेलं. अशा प्रकारचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. एखाद्या नामवंत, समाजमनावर प्रभाव असणाऱ्या अभिनेत्रीच्या वैयक्तिक अनुभवाचं सार्वजनिकीकरण केलं जातं. एवढी मोठी आणि ‘शहाणी’ अभिनेत्री जर असं सारं म्हणत असेल, तर ते खरंच असणार असं मानून साध्या-भोळ्या बायकाही त्या देवभोळेपणाच्या वाट्याला लागतात. त्यातून विशिष्ट श्रद्धास्थानांचं प्राबल्य वाढण्यास मदत होते. मग त्यातून कुठल्याही प्रकारचं शोषण झालं, तरी ते बिनमहत्त्वाचं होऊन जातं. आपल्याकडे आसाराम बापू, फलहरी बाबा, राम रहीम अशा काही बाबा-बुवांवर बलात्काराचे आरोप झाले तरीही त्यांच्या भक्तगणांच्या संख्येत घट झाली नाही. उलट, आपल्या बाबांना फसवलं गेलंय अशा प्रकारची मानसिकता त्यांच्यात तयार केली जाते. बायकांनी चार पाच मुले जन्माला घालावीत, ते स्वतःचं कर्तव्य समाजावे असे उपदेश देणाऱ्या महाराजांचे व्हिडीओ चवीने पाहिजे जातात. ज्यांच्या वक्तव्याचा राग यायला हवा त्यांना पूजनीय करून अधिक महत्त्व दिले जाते.
आता गंमत अशी, की सोशल मीडिया एका अर्थानं तटस्थ आहे. त्याचा आपल्याला हवा तसा वापर करता येतो. उदाहरणार्थ ऑनलाइन फोटो अल्बम आणि/किंवा मेमरी बुक म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. आपल्या वापरावर सारं काही अवलंबून आहे. पण आपण नेमकं काय निवडावं हे आपल्या लक्षात येण्याआधी आपल्या पुढ्यात आपण काय करावं ते येतं. न्यूरोमार्केटिंग आणि अल्गोरिदमच्या विलक्षण खेळामुळं अमूक एखादी साइट किंवा ॲप वापरत असताना माणसाच्या तर्कशुद्धपणे विचार करण्याच्या क्षमतेवरच घाला येतो. फेसबुकचे माजी अध्यक्ष सीन पार्कर यांनी काही वर्षांपूर्वी अगदी स्पष्ट म्हटलं होतं, “आम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ कसा घेऊ शकतो आणि तुमचं लक्ष/भान कसं हिरावू शकतो याकडे लक्ष देणं हेच आमच्या कंपनीचं ध्येय आहे.” अशा स्थितीत स्त्री-पुरुष दोन्हींपुढं तारतम्यानं पुढं जाण्याचा मार्गच खुंटतो. आपलं स्वतःच्या निवडीवर नियंत्रण उरत नाही. ती कुणाच्या तरी कम्पलशनचा आणि अलगोरिदमचा भाग होऊन जाते. हे दुसऱयाच्या हातचं कळसूत्री बाहुलं होणं नव्हे काय? मग ठराविक विचार-जाणिवा येऊन आदळत, साचत, मनात आकार घेत राहतात. त्यातूनच, सोशल मिडीयावर सातत्याने आपल्या कथित धार्मिक जाणिवांचं प्रदर्शन करत राहणं आपल्यावर आपसूक लादलं जातं.
‘प्यू रिसर्च सेंटर’ने २०२४ सालात दोन संशोधनं प्रसिद्ध केली. त्यातील एका संशोधनात लोकांना आपल्या नेत्याच्या धार्मिकतेविषयी प्रश्न करण्यात आला. त्यात, नेता हा जनतेच्या धार्मिक भावनांची कदर करणारा असावा असं जगभरातील नागरिकांनी मान्य केलं. युरोप, अमेरिका, आशिया, आफ्रिका खंडातील पस्तीस देशांत हे संशोधन झालं. त्यात भारताचाही समावेश आहे. त्यामध्ये, देशाच्या नेत्याची धार्मिक श्रद्धा आणि नागरिकांची श्रद्धा यांत अंतर असेल तरी चालेल, मात्र तो श्रद्धावान असावा असं म्हणणारे देश तर आहेतच, मात्र जनतेचा धर्म हाच नेत्याचाही धर्म असावा असं म्हणणारे देशही आहेत. या दुसऱ्या प्रकारात भारताचा समावेश होतो. भारतातील ८१ टक्के लोकांचं म्हणणं, आपल्या श्रद्धा असणाराच देशाचा नेता असावा, असं आहे. दुसरं संशोधन धर्माची सार्वजनिक जीवनातील भूमिका विशद करणारं आहे. तो अभ्यास केवळ अमेरिकेपुरता झाला. त्यात सुमारे ५७ टक्के लोकांच्या मतानुसार, सार्वजनिक जीवनातून धर्माच्या भूमिका आक्रसत आहेत असं म्हणणं पडलं. इतकंच नव्हे, तर त्या ५७ टक्के लोकांना त्या आक्रसत झालेल्या जाणिवांचं दु:खदेखील होतं. वेगळ्या शब्दांत, त्या लोकांना सार्वजनिक जीवनातून धर्म वजा होऊ नये असं वाटतं. या दोन्ही संशोधनातून संपूर्ण जग धार्मिक श्रद्धा आणि जाणिवा यांच्या दिशेनं निघालं आहे, असा अंदाज वर्तवता येतो.
मानसिक आधारासाठी श्रद्धाळू असणं किंवा अन्य कुणावरही अन्याय न करता श्रद्धा जपणं, याचा कुणीही विरोध करणार नाही. मात्र, तशा प्रकारची डोळस श्रद्धाळू व्यक्ती होण्यास मुळात धर्मांचाच अटकाव आहे. ‘आपलं तेवढं श्रेष्ठ’ ही भूमिका प्रत्येक धर्माची आहे. अशा परिस्थितीत निर्लेप श्रद्धावान माणूस होणं ही कठी साधना ठरते. ते असो. पण या धार्मिकतेचा प्रवास कट्टरपंथाकडे होऊ लागल्यावर त्याचा परिणाम स्त्रीयांवर अधिक होतो. तिचं दुय्यम स्थान वगैरे गोष्टी आपण जाणतोच. त्यातूनच ‘नो बिंदी, नो बिझनेस’ किंवा ‘कुंकू असेल तरच मुलाखात देईन’ या प्रकारची वक्तव्य करण्याचं धाडस वाढतं. त्यांचं नॉर्मलायझेशन होऊ लागतं. अशा प्रकारच्या विचारांचा रेटा रोखण्यासाठी स्त्रीयांना डोळसपणे एकत्र येण्याची गरज आहे.
आणि म्हणूनच यंदाच्या वर्षी युनेस्कोनं जागतिक महिला दिनाची थीम ‘ॲक्सरलेट ॲक्शन’ म्हटलं आहे. स्त्री-पुरुषांच्या समतेच्या प्रयत्नांचा, स्त्रीमुक्तीच्या चळवळींचा आताचा वेग पाहता समता येण्यासाठी अजूनही सव्वाशे वर्ष लागतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आणि स्त्रीयांना जर सातत्याने धर्मग्रंथातील जाचक अटींकडे वळवलं जात असेल, शोषणावर आधारित प्रथांमध्ये गुरफटून ठेवलं जाणार असेल आणि चांगल्या स्त्रीच्या भ्रामक कल्पनेत अडकवलं जाणार असेल, तर साहजिकच साऱ्या समतावादी प्रयत्नांचा वेग मंदावणार. त्यात बदल घडावा म्हणूनच युनेस्कोनं आपल्या प्रयत्नांचा वेग वाढण्याची अपेक्षा केली आहे. त्याचा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. आपल्या चळवळींमध्ये, विचारप्रवर्तक व्याख्यानांमध्ये, कार्यशाळांमध्ये कुंकू-मंगळसूत्र घालणाऱ्या स्त्रिया नकोत, त्या पारंपरिकच आहेत अशी कप्पेबांधणी बंद करायला हवी. धार्मिक कार्यक्रमांमध्ये एखादा वेगळा दृष्टीकोन देणारा सांस्कृतिक कार्यक्रम पेरता येईल का हे पहायला हवं. रमजानमध्ये कुरआनच्या तफसीलबरोबरच स्त्रीयांवरच्या अन्यायावर चर्चा होतेय का हेही पहायला हवं. किमान स्त्रीयांनी तरी अन्य स्त्रीयांना वेगवेगळ्या चौकटीत बंद करुन, एकमेकांच्या सपोर्ट सिस्टीम होऊ शकणाऱ्या भगिनीभावाला तडे देऊ नयेत. तसं केल्यानं मुक्तीच्या, प्रगतीच्या वेगाला खीळ बसते.