|
|
भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी यांनी मिळविलेल्या अभूतपूर्व यशाचे सध्या हरेकप्रकारे विश्लेषण सुरू आहे. हे यश मोदी लाटेमुळे मिळालं की, काँग्रेसची ना-लायकी व नाकर्तेपणामुळे मिळालं…. की, या दोन्ही घटकांमुळे मिळालं, यावर वेगवेगळे तज्ज्ञ डोकेफोड करीत आहे. लालकृष्ण अडवाणींप्रमाणे कद्रुपणा दाखवत मोदींचं श्रेय नाकारण्यात अर्थ नाही. या माणसाने निवडणूक जिंकण्यासाठी जी अपार मेहनत घेतली त्याला तोड नाही. इंदिरा गांधीनंतर देशाचा कानाकोपरा पिंजून काढणारा हा पहिला नेता आहे. मात्र मोदींच्या मेहनतीसोबतच संघ परिवारातील लाखो कार्यकर्त्यांचे नियोजनबद्ध प्रयत्न, प्रत्येक मतदारसंघातील अफाट असं बूथनिहाय प्लॅनिंग, कॉर्पोरेट जगताकडून अखंडित पुरवठा असलेली पैशाची रसद , २४ तास चालणार्या वृत्तवाहिन्या व सोशल मीडियाचा कल्पक वापर, गुजरात मॉडेलबाबत देशातील मध्यमवर्गीयांमध्ये निर्माण केलेली क्रेझ, अशा अनेक गोष्टींच्या एकत्रित परिणामांतून मोदींनी हे नेत्रदीपक यश खेचून आणलं आहे.
मोदींच्या या प्रयत्नांना साथ देण्यात काँग्रेसने (महाराष्ट्रात राष्ट्रवादीसुद्धा) कुठलीही कसर सोडली नव्हती. एकापाठोपाठ एक घोटाळे उघडकीस येत असताना मौनीबाबा बनून राहिलेले पंतप्रधान मनमोहन सिंग, आपला जावई व मंत्र्यांच्या घोटाळ्यांकडे सोयीस्कर डोळेझाक करणार्या सोनिया गांधी आणि भ्रष्टाचार आणि देशाच्या सद्य:स्थितीबाबत आपल्याला चीड आहे, असा आभास निर्माण करणारे पण प्रत्यक्षात काहीही न करणारे राहुल गांधी… या सर्वांबद्दलच देशातील जनतेच्या मनात प्रचंड संताप साचला होता. त्यातच गेल्या काही वर्षांत भडकलेली महागाई व रोजचं आयुष्य जगताना निर्माण झालेली असुरक्षितता, यामुळे सामान्य माणूस खदखदत होता. देशातील सर्वसामान्य माणसाला काँग्रेस, भाजपा, आप वा इतर कुठल्याही राजकीय पक्षाच्या विचारांसोबत, त्यांच्या तत्त्वज्ञानाशी काही देणेघेणे नाही. त्याच्यासाठी त्याचं रोजचं जगणं तेवढं महत्त्वाचं असतं. हे जगणं ज्यांच्यामुळे कठीण झालं आहे, त्या सरकारला उलथवून टाकायचं आहे, हे या देशातील मतदारांनी ठरविलं होतं. त्यामुळे जो कोणी काँग्रेसला झोपवू शकेल, त्याला त्यांनी भरभरून मते दिली. चार महिन्यांपूर्वी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत याच भावनेतून त्यांनी आम आदमी पक्षाला डोक्यावर घेतले होते. मात्र या पक्षाने निराशा केल्याने आणि देशपातळीवर ते काँग्रेसला हरवू शकत नाही, हे लक्षात आल्याने ताकदवर नेता म्हणून समोर आलेल्या मोदींना लोकांनी उचलून धरलं. संघ व भाजप नेत्यांनी स्वप्नातही अपेक्षित केलं नसेल, असं यश त्यांना मिळवून दिलं.
खरं तर काँग्रेसची कबर खणण्याची सुरुवात तीन वर्षांपूर्वीच झाली होती. २0११ मध्ये अण्णा हजारेंच्या दिल्लीतील रामलीला मैदानावरील आंदोलनाला देशाच्या कानाकोपर्यातून जो प्रतिसाद मिळाला, तेव्हाच काँग्रेसने बदललेल्या वार्याची दिशा ओळखायला हवी होती. पण काँग्रेसी आपलं मूलभूत वैशिष्ट्य असलेल्या मस्तवालपणात गेले. त्यांचे घोटाळे, भानगडी सुरूच राहिल्या. मनमोहनसिंग व सोनियांच्या मख्खपणातही काहीही बदल झाला नाही. नंतर अण्णांच्या वाटेवरून वाटचाल करीत केजरीवालांनी दिल्लीचं सरकार उलथविलं, तरीही काँग्रेस आपल्या मस्तीतच होती. (मुस्लिम व दलितांच्या व्होटबँकेमुळे आपला बालही बाका होत नाही, हा त्यांना तगडा आत्मविश्वास होता. तो आताआतापर्यंत सार्थही ठरला.) शेवटी-शेवटी राहुल गांधींनी आपल्याच सरकारचे वाभाडे काढायला सुरुवात केली होती. मात्र त्याला उशीर झाला होता. तोपर्यंत काँग्रेसचे शंभर अपराध सामान्य मतदारांच्या मनात ठसठशीतपणे इंप्रिट झाले होते. तो सारा भडका मतदारांनी मतदान करताना बाहेर काढला. परिणामी स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला सर्वात मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागले. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीतही काँग्रेसचे एवढे पानिपत झाले नव्हते. काँग्रेसची ही स्थिती केवळ मोदी लाटेमुळे झाली हे म्हणण्यात व मानण्यात अर्थ नाही. काँग्रेसच्या पराभवात मोदी लाटेपेक्षा स्वत:च्या कर्तबगारीचा अधिक वाटा आहे.
१६ व्या लोकसभेची ही निवडणूक अनेक अर्थाने वेगळी ठरली आहे. पहिल्यांदाच एका गैरकाँग्रेसी पक्षाला स्पष्ट बहुमत देणारी ही निवडणूक आहे. काँग्रेसला पन्नासपेक्षा कमी जागांवर आणून ठेवतानाच बहुजन समाज पक्ष, अण्णा द्रमुक, नॅशनल कॉन्फरन्स या वळवळ्या पक्षांचे नामोनिशाण संपविणारी ही निवडणूक आहे. आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ढोंगीपणा, दहशत व पैशाची मस्ती बाळगणार्यांचा माज उतरविणारी अशी ही निवडणूक ठरली आहे. भूमिकांच्या विषयात ज्यांनी ज्यांनी ढोंगीपणा केला ते अमेरिका असो, नितीशकुमार, मायावती, समाजवादी मंडळी, धर्मनिरपेक्षवादी कंपू या सार्यांनाच या निवडणुकीने जबरदस्त झटका दिला आहे. हा धक्का एवढा मोठा आहे की, आपले बेसिक्स तपासण्याची वेळ अनेक विचारवंतांवर आली आहे. गुजरात दंगलीच्या विषयात मोदींना कायम आरोपीच्या पिंजर्यात उभे करून त्यांचा मौत के सौदागर असा उल्लेख करणार्यांना देशाने मोदींना डोक्यावर घेतलं आहे, हे पाहावं लागत आहे. त्यामुळे आता सारा देशच धर्मांध झाला आहे, असे हे तथाकथित विचारवंत म्हणतात की काय, हे बघणे रंजक ठरणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारमधील मुसलमान मतदार नाराज होतील, या एका कारणामुळे मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला विरोध करून बिहारमधील भाजपासोबतची युती तोडली होती. मात्र बिहारमधील मतदारांनी भाजपाला भरभरून मते देऊन नितीशकुमारच्या ढोंगीपणाला चपराक दिली आहे. असाच प्रकार मायावती, मुलायमसिंह, लालूप्रसाद यादव यांच्याबाबतीत झाला आहे. कुठल्याही परिस्थितीत मोदींना पंतप्रधान होऊ देणार नाही, अशा घोषणा करीत त्यांनी एका समुदायाला खूश करण्याचा प्रय▪केला. मात्र या प्रयत्नात ते पार अप्रासंगिक ठरले आहेत. एका समूहाचे लांगुलचालन करण्याच्या नादात व धर्मनिरपेक्षतेच्या भ्रामक कल्पना जपण्याच्या भरात आपण एका बहुसंख्य समूहाला दुखावतो आहे. त्याला एकत्रित होण्यास, रिअँक्शन देण्यास बाध्य करतो आहे, याचाच या नेत्यांना विसर पडला. अशीच स्थिती अनेक विचारवंतांचीही झाली आहे. हिंदूंच्या धर्मांधतेबद्दल गळा काढताना इतरांबद्दल ब्र ही काढायचा नाही, हा त्यांचा दुटप्पीपणा आता चालणार नाही, हा संदेश या निवडणूक निकालांनी दिला आहे. देशातील नेते व विचारवंतांना या निवडणूक निकालांनी उघडे पाडले त्याच पद्धतीने अमेरिका, ब्रिटनसारख्या ताकदवर देशांनाही कोलांटउडी घेण्यास भाग पाडले. ज्या मोदींना अमेरिका-ब्रिटन व्हिसा द्यायला तयार नव्हते, ते देश आता मोदींसाठी रेड कार्पेट अंथरण्यास सज्ज झाले आहेत. शेवटी जग ताकदीसमोरच नमते हेच खरं. ढोंगीपणासोबतच घराणेशाही, दहशत व पैशाच्या जोरावर राजकारण करणार्यांनाही या निवडणुकीने जमिनीवर आणले आहे. महाराष्ट्राने तर यादृष्टीने फारच चांगले निकाल दिले आहेत. नारायण राणे, छगन भुजबळ, पद्मसिंह पाटील, गणेश नाईक या दादागिरीच्या भरवशावर राजकारण करणार्या नेत्यांना जनता चिडली म्हणजे काय होते, याचा अनुभव निवडणूक निकालाने आला असेल. या तीनही मतदारसंघांत विरोधकांना धमक्या देणे, मारहाण करणे, त्यांची घरं-दुकानं जाळणे, त्यांना कायमचं उद्ध्वस्त करून टाकण्याचा प्रय▪करणे, असे अनेक प्रकार कित्येक वर्षांपासून चालले होते. पत्रकार परिषदेत पत्रकारांनी एखादा अडचणीचा प्रश्न विचारला तरी त्याला पाहून घेण्याच्या धमक्या देणे, त्याच्या व्यवस्थापनाकडे तक्रार करणे, असे प्रकार करणार्या नेत्यांना जनतेने त्यांची जागा दाखविली, हे चांगलं झालं. पैशाच्या जोरावर सब कुछ करता येते, अशी समजूत असणार्यांनाही मतदारांनी सातवं आसमान दाखविलं. विश्वजित कदम, अमरीश पटेल, मिलिंद देवरा, सुनील तटकारे, विदर्भात प्रफुल्ल पटेल, सागर दत्ता मेघे, नवनीत राणा यांचे पराभव यादृष्टीने बोलके आहेत. या नेत्यांनी अक्षरश: करोडो रुपये उधळले. कुठेही काहीही कसर ठेवली नाही. तरीही दणदणीत पराभव त्यांच्या वाट्याला आला. थोडक्यात भारतीय मतदार राजकीयदृष्ट्या शिक्षित नसला तर समंजस व शहाणा आहे, हे या निवडणुकीच्या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)
भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६ |