खोटेपणा व नौटंकीला चपराक

‘तुम्ही काही काळ काही लोकांना मूर्ख बनवू शकता. मात्र सर्व काळ सर्व लोकांना मूर्ख बनवू शकत नाही’, या आशयाचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. त्याची प्रचिती बडनेराचे आमदार रवी राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालाने आली असेल. ज्या जुगाडूपणाने त्यांनी आपल्या पत्नी नवनीत राणा यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट खेचून आणलं होतं. त्याच जुगाडूपणाने अमरावतीत विजय मिळविता येईल, असा त्यांचा कयास होता. पण टोकाचा खोटेपणा व नौटंकी जनता जास्त काळ खपवून घेत नाही, हे अमरावतीच्या निकालाने सिद्ध झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पक्षाच्या जागा वाढविण्याच्या नादात रवी राणा व नवनीत कौर यांच्या चकाकीला भुललेत. मात्र त्यांची चकाकी म्हणजे अँल्युमिनिअमच्या भांड्याला कल्हई लावण्याचा प्रकार आहे, हे आता दोन्ही पवारांच्या टाळक्यात शिरलं असेल.


 रवी राणा यांची राजकारणातील ताकद काय?, काँग्रेस या सहयोगी पक्षात त्यांना किती स्वीकारार्हता आहे?, जिल्ह्यातील राजकारणाची दिशा ठरविणारी जी माणसं आहेत, त्यांच्यामध्ये राणांची इमेज काय आहे?, लोकसभेसारख्या मोठय़ा निवडणुकीची रचना व नियोजन करण्याची त्यांच्यात कुवत आहे काय?, अशा कुठल्याही गोष्टींचा विचार न करता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तथाकथित सर्व्हेंच्या आधारावर नवनीत राणांना उमेदवारी बहाल केली होती. मात्र हे सर्व करतांना अमरावती जिल्ह्यात राष्ट्रवादी उभी करण्यासाठी ज्यांनी जीवापाड मेहनत केली त्या संजय खोडकेंना विश्‍वासात घेण्याचीही गरज त्यांना भासली नाही. एकंदरित झाल्या प्रकारामुळे दुखावलेल्या संजय खोडकेंनी आपली नाराजी व्यक्त करताच मुजोरी व मस्ती हा स्थायीभाव असलेल्या अजित पवारांनी एवढय़ा वर्षाची पक्षनिष्ठा, मेहनत याचा काहीही विचार न करता त्यांना पक्षाबाहेर काढले. खरं तर त्याच दिवशी अमरावती लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला होता.

रवी राणांचा जुगाडूपणा व लायझनिंगमधल्या कसबाला क्वॉलिटी समजणारे त्यांचे कट्टर सर्मथक वगळता अमरावतीचा निकाल काय लागणार, याबाबत कोणाच्याही मनात शंका नव्हती. ज्याला थोडंफार जरी राजकारण समजते त्या सार्‍यांना नवनीत राणा किमान लाखभर मतांनी आपटणार याबाबत खात्री होती. ज्या खोट्या जात प्रमाणपत्राच्या जोरावर त्यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघाची उमेदवारी मिळविली (त्या प्रमाणपत्राच्या वैधतेबाबतचा निकाल निवडणुकीपूर्वी येऊ नये, यासाठी अजित पवारांनी आपली सारी ताकद खर्च केली. एवढी ताकद त्यांनी निवडणुकीत लावली असती तर राष्ट्रवादीची एवढी बेअब्रू झाली नसती.) तेच प्रमाणपत्र त्यांच्या पराभवाचं कारण ठरलं, हे राणा दाम्पत्याच्या अजूनही लक्षात आलं असेल की नाही, शंकाच आहे. अमरावतीत विजय मिळविण्यासाठी रवी राणांनी सरळसोपं गणित लावलं होतं. एक लाख मुस्लीम, दीड लाख दलित, एक लाख आदिवासी व एखादा लाख इतर समाजाची मते, असं ते गणित होतं. हे सारे घटक मोदींना व शिवसेनेला अजिबात पसंत करणार नाही. त्यामुळे आपण पुन्हा चमत्कार घडवून आणू शकू, असा विचार राणांनी केला होता. त्यांचं गणित फार काही चुकीचं होतं, अशातला भाग नाही. मात्र राखीव जागेवर नाना लटपटी-खटपटी करून खोटं प्रमाणपत्र मिळवून नवनीतने तिकीट मिळविलं, ही गोष्ट दलित समाजाला प्रचंड खटकली. राखीव जागांवर जर राणांसारखे इतर समाजाचे धनाढय़ माणसं खोटं प्रमाणपत्र घेऊन लढायला लागले, तर डॉ. आंबेडकरांनी ज्या उद्देशाने राखीव जागांची निर्मिती केली, त्यालाच धक्का बसतो, याची चर्चा समाजामध्ये सुरु झाली. त्याचदरम्यान राष्ट्रवादीने डॉ. राजेंद्र गवईंना जी ट्रीटमेंट दिली ती सुद्धा समाजाला चांगलीच बोचली. स्वाभाविकच त्याची रिअँक्शन आली. जो दलित समाज बहुतांश निवडणुकीत भाजप-सेनेला रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत करतो, त्यांनी अमरावतीत राष्ट्रवादीकडे पूर्ण पाठ फिरविली. दलित समाज राणांना मदत करणार नाही, हे निवडणुकीच्या पहिल्या काही दिवसातच स्पष्ट झाल्याने नवनीत राणा हरणार हे सांगण्यासाठी कुठल्याही भविष्यवेत्याची गरज उरली नव्हती.

संजय खोडके फॅक्टर व काँग्रेस आमदारांची भूमिकाही या निवडणुकीत निर्णायक ठरली. राष्ट्रवादीने खोडकेंची हकालपट्टी केल्यानंतर नवनीत राणांना हरविणं हेच आपल मिशन आहे, हे खोडकेंनी जाहीर करुन टाकलं होतं. आपलं हे मिशन पूर्ण करण्यासाठी एवढय़ा वर्षाचा राजकीय अनुभव त्यांच्या कामी आला. रवी राणा हे मुस्लीम, आदिवासी व दलित अशी मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहे, हे लक्षात येताच खोडकेंनी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार गुणवंत देवपारे यांना उघडपणे आपला पाठिंबा जाहीर करून टाकला. यामुळे त्यांना मानणारे सर्मथक व मतदारांना नेमकी दिशा मिळाली. खोडकेंचे दलित, मुस्लीम सर्मथक उघडपणे देवपारेंकडे गेले, ज्यांना देवपारे चालत नव्हते, ते अडसुळांच्या कॅम्पमध्ये गेले. परिणामी अडसुळांना नाही म्हटलं तरी एखादा लाख मतांचा बोनस मिळाला. काँग्रेस आमदार रावसाहेब शेखावत व यशोमती ठाकुरांनी यांनीही राणासोबतचे हिशेब चुकते गेले. गेल्या पाच वर्षात राणांनी या दोघांना अनेकप्रकारे दुखावले आहे, डिवचले आहे. त्याचे उट्टे त्यांनी काढले. रावसाहेब व यशोमतींनी वरवर दाखवायला राणाचं काम केलं. पण मनातून नवनीत निवडून यावी, अशी दोघांचीही कधीच इच्छा नव्हती. यशोमती ठाकूर व भैय्यासाहेब ठाकुरांनी तर शेवटच्या दिवसात उघडपणे राणाच्या विरोधात काम केलं.

सुनील देशमुखांच्या सक्रियतेमुळे दुखावलेल्या रावसाहेबांनीही राणांबद्दल फार काही ममत्व दाखवलं नाही. रवी राणांनी पाच वर्षात जे पेरंल होत तेचं शेवटी उगवलं. एवढय़ा सार्‍या प्रतिकूल बाबी असताना राष्ट्रवादीतील चिल्लर व सुमार नेत्यांच्या साथीने निवडणूक लढणारे राणा काही ठराविक आखणी, नियोजन करून निवडणूक लढत आहे, असे कधीच दिसले नाही. दिसला तो त्यांचा फक्त नाटकीपणा, खोटेपणा… निवडणुकीच्या सुरूवातीच्या काळात एका वृत्तवाहिनीच्या धावत्या बसमधील लाईव्ह कार्यक्रमात आनंदराव अडसूळ यांनी आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले, असा कांगावा करून नवनीत यांनी सहानुभूती मिळविण्याचा जबरदस्त प्रय▪केला. मात्र २४ तासानंतर जेव्हा त्या वाहिनीने तो संपूर्ण कार्यक्रम अनकट प्रसारित केला, तेव्हा राणांची ही आणखी एक नौटंकी आहे, हेच सिद्ध झाले. या संपूर्ण काळात खोटानाटा प्रचार मतदारांना कन्फयूज करण्याचा पुरेपूर प्रय▪राणा व त्यांच्या सर्मथकांनी केला. एका प्रख्यात मराठी वृत्तवाहिनीच्या निवडणूकविषयक चर्चेच्या कार्यक्रमाला ओपिनियन पोलचे स्वरुप देऊन सुहास पळशीकरसारखा ख्यातनाम राजकीय अभ्यासक अमरावतीत नवनीत राणा विजयी होत आहे, असे सांगत आहे, हे भासविण्याचा प्रय▪त्यांनी केला. मात्र ही बदमाशी करताना मतांचे आकडे एवढे विसंगत टाकले, की त्यामुळे ही चलाखी आहे, हे सर्वांच्याच लक्षात आले. राणांच्या अशा या बालिश व खोट्या वागणुकीने अडसुळांना ही निवडणूक सोपी गेली. खरं तर निवडणुकीच्या सुरुवातीला अडसुळांसाठी चित्र अजिबात अनुकूल नव्हतं. वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांच्याबद्दल बर्‍यापैकी नाराजी होती. योग्य नियोजन व व्यवस्थित उमेदवार असला तर अडसूळ पडू शकतात, असं वातावरण होतं. मात्र राष्ट्रवादीने राणांना उमेदवारी बहाल केल्याने सारंच चित्र बदललं. राणांचं खोटं जात प्रमाणपत्र, खोडकेंना त्यांच्या पक्षाने दिलेली वागणूक, त्यानंतर पक्षातून त्यांचे झालेले निष्कासन यामुळे बघता-बघता वातावरण बदलंलं. महिन्याभरापूर्वी ज्यांनी अडसुळांना मतदान करायचे नाही, असं ठरविलं होतं, त्यांच्यावरही अडसुळांना मतं देण्याची पाळी आली. राणांपेक्षा अडसूळ कितीतरी अधिक बरे, असा सूर वाढायला लागला.अर्थात अडसुळांनी मेहनत प्रचंड घेतली, हे नाकारण्यात अर्थ नाही. निवडणूक लढताना त्यांनी कुठलीही कसर ठेवली नाही. जात प्रमाणपत्राच्याविषयात विषयात जवळपास महिनाभर त्यांनी राणांना कायदेशीर लढाईत अडकून ठेवलं. इकडे मैदानात प्रत्येक आघाडीवर ते लढले. शिवसेनेत जी छोटीमोठी कुरबूर होती, ती त्यांनी यशस्वीपणे शांत केली. नरेंद्र मोदींपासून, श्री श्री रवीशंकर, रामदेवबाबा, नरेंद्र महाराज अशा सार्‍या बुवा-महाराजांना त्यांनी अमरावतीत आणलं. विदर्भात ते शिवसेनेचे एकमेव उमेदवार होते, ज्यांच्यासाठी नरेंद्र मोदींनी सभा दिली. भारतीय जनता पक्षानेही त्यांच्यासाठी मनापासून मेहनत घेतली. खोडके फॅक्टर होताच. पैशाचीही त्यांनी काही काटकसर केली नाही. परिणामी सलग पाचव्यांदा ते संसदेत पोहोचले आहेत. ते मंत्री होतील, अशी त्यांना व अमरावतीकरांनाही अपेक्षा आहे. सलग पाचव्या कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा देतानाच या पाच वर्षांत त्यांच्या हातून अमरावती जिल्ह्यासाठी काहीतरी भरीव व्हावं, ही अपेक्षा आहे.

(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)

भ्रमणध्वनी-८८८८७४४७९६

Previous articleढोंगीपणा, दहशत व पैशाची मस्ती उतरविणारी निवडणूक
Next articleविदर्भात राष्ट्रवादी काय दिवे लावणार?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.