जगाचा कंटाळा आला की आपल्या आत शिरायचे एकांतात वा एकाकीपणात. आणि आपला कंटाळा आला की आपल्यातून बाहेर पडून जगात यायचे असा हा खेळ आहे. जग विविधांगी, विविधरंगी मुलामाणसांनी, स्त्रियांनी आणि पुरुषांनीच भरले नाही, ते चित्रांनी, शिल्पांनी, विविधरंगी पोषाखांनी, देशांनी, धर्मांनी, शास्त्रांनी आणि जीवनपद्धतींनीही भरले आहे. (तेवढे सारे कोणा एकाच्या व अनेकांच्या वाट्याला अर्थातच येत नाही. आहे त्या कुंपणात माणसे जगतात. मग ती कुंपणे कंटाळवाणी होतात. तेव्हा हा खेळ सुरू होतो. आपला एकाकीपणाही बहुविध ढंगांचा, रंगांचा, चांगल्याचा आणि वाईटाचाही असतो पण तीच ती चित्रे किती पाहायची आणि तोच तो अभ्यास तरी किती करायचा?) या लपाछपीत आतले बरेचसे बाहेरही आठवत असते आणि बाहेरचेही आत. मग त्यात एकारलेपणा येतो. तोचतोपणाही येतो. मग खर्या वैतागाला, उद्विग्नतेला आणि अंतरकलहाला सुरुवात होेते. बहुतेक माणसांच्या वाट्याला येणारा कंटाळा वा वैताग असा असतो.
दरवेळी नवे काय आणायचे, कसे आणि कुठून आणायचे? ते म्हणतात, ’प्रतिभावानांना एक जग पुरेसे नाही.’ पण तेवढी प्रतिभा असणारे आहेत किती आणि त्यांच्याही प्रश्नांना कुंपणे आहेत ती याच जगाची की नाही? माणसे जेव्हा आपण या आयुष्याला कंटाळलो असे म्हणतात तेव्हा त्यांना याहून वेगळे काही म्हणायचे नसते. आहे त्यात आनंद मानण्याची, मिळेल तेथून तो मिळविण्याची वृत्ती किती जणात असते? भारतासारख्या देशात इच्छामरणाची मागणी करणारी माणसे खूप आहेत आणि त्यांचे तसे अर्ज सरकारदरबारी धूळखात पडले आहेत. त्याचवेळी दुसर्या ग्रहांवर चक्कर मारून येऊ इच्छिणार्यांचेही अर्ज नासा व इतर संस्थांकडे जमा होत आहेत. या दोन्ही ओढींमागचे सूत्र एकच. कंटाळा. या जगाचा आणि आपलाही. जे आशावादी यातून वेगळा अर्थ काढतील त्यांचा आशावाद पूर्ण व्हावा एवढीच शुभेच्छा येथे त्यांना द्यायची.
घड्याळाच्या काट्याप्रमाणे चाकोरीबद्ध आयुष्य काढणारी काही माणसे व कुटुंबे असतात. आमचे आयुष्य आणि त्यातली कामे थेट टाईमटेबलातल्यासारखी असतात. त्यात सहभाग असतो, सहयोग असतो. अशा चौकोनी कुटुंबात एकाकीपण कुठे असते? की ते नसतेच?… फक्त त्यातल्या कोणा एकाला वेगळे करून उकलायचेच तेवढे असते. तसे उकलता आले की त्या व्यक्तींचे व कुटुंबांचे घड्याळातले एकाकीपण व कोरडेपणही समजते. मराठीतील किती थोरामोठ्यांनी आपली आत्मचरित्रे अशा कोरडेपणाने, सत्य टाळून, असत्याची कास धरून व एकाकीपण झाकीत आनंदमय असल्याचे सांगणारे लिहिली आहेत. आपली लग्ने, मुले, त्यांचे संबंध यांची चर्चा न करणारी आत्मचरित्रे महाराष्ट्राला ठाऊक आहेत. काही चरित्रांत वा त्यांच्या चर्चेत एकच एक आनंदपर्व तेवढे येते. प्रेम येते. आस्थेच्या जाहिराती येतात. फक्त वास्तव येत नाही. एकांतामागचे कोरडेपण येत नाही. घरातले एकाकीपण येत नाही.
महाराष्ट्राचे एक थोर साहित्यिक नागपूरच्या एका तशाच नामवंत लेखकाकडे मुक्कामाला होते तेव्हाची गोष्ट. नागपूरकर लेखकाने त्यांच्या स्वागतासाठी सायंकाळी खूप चांगली माणसे गर्दीने गोळा केली होती. पाहुणेही प्रसन्न होते. जरा वेळाने ते त्यांचे अनुभव त्यातल्या विनोदासह सांगू लागले. सारी मैफिल हसून दाद देत होती. पाहता पाहता प्रस्तुत लेखकाचे लक्ष दारात बसलेल्या त्यांच्या पत्नीकडे गेले. त्यांचा चेहरा थंड व कोरडा होता. काहीसा कंटाळलेलाही होता. जरा वेळाने त्या उठून खालच्या मजल्यावर गेल्या. न राहवून हा लेखकही त्यांच्या मागे गेला. त्यांना थांबवून म्हणाला, ’वर केवढी मैफल रंगविली आहे त्यांनी आणि तुम्ही अशा खाली एकट्याने का आलात?..’ जराही न रागावता त्या म्हणाल्या, ’अरे, हे रोजचेच आहे. त्याच त्या गोष्टी मी कितीदा अन् कशा ऐकायच्या.’ आता अवाक् होण्याची पाळी प्रस्तुत लेखकाची होती. तो त्या दाम्पत्याकडे आनंदाचे कारंजे म्हणून पाहत आला. त्या कारंज्यात असे कोरडेपण वा एकाकीपण असेल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. मतभेद असतात. वाद व चर्चाही असतात. पण येथे उदासीनता होती. त्याच त्या अनुुभवांचा आणि ते ऐकण्याचा कंटाळा होता. हे कारंजे असे तर बाकीची कोरडी ठणठणीत असणारी व नुसतीच उभी असणारी कारंजी कशी असतील? ज्या दाम्पत्याविषयी हे लिहिले त्यातले दोघेही लेखक रसिक, संगीत, कला, नाटक अशा सर्व क्षेत्रात एकत्र वावरणारे. आणि तरीही त्यांच्यात तोचतोपणाचा व्यत्यय.
माणसे जराशी खरवडूनच तेवढी पाहावी लागतात. तशी पाहिली की ती एकटी व एकाकीच दिसतात. प्रकाशकणांच्या गर्दीत राहतात पण एकेकटी असतात. ज्यांना त्यांचे आप्तस्वकीय आहेत, नातेवाईक आणि मित्र आहेत पण तरीही त्यातले आपले म्हणावेेसे कोणी वाटत नाही त्या अभाग्यांच्या एकाकीपणाचे मूळ कशात असते? त्यांच्या अपुरेपणात की त्यांच्या सामाजिकतेच्या तुटकेपणात? अशी माणसे व स्त्रिया आपल्या जगात फार आहेत. आपले म्हणावेसे आहेत त्यांना जवळ करता येत नाही. आणि सभोवतीचे सारे पुन्हा वेगळेच असतात वा जाणवतात. अशी माणसे या ’आपल्या’ कडून नको तशा जास्तीच्या अपेक्षा बाळगतात काय की त्यांच्या अपेक्षांना ती पुरी पडत नाहीत. शेवटी आत्मीयता हा दुतर्फी अनुभवाचा विषय आहे. तो अनुभवता येत नसेल तर त्याचा दोष कोणाला तरी द्यावाच लागतो. एक थोर मराठी विचारवंत म्हणाले, ज्यांची बुद्धिमत्ता व प्रतिभा फार वरच्या प्रतीची असते त्यांच्या वासना लैंगिक व मानसिकही फार मोठ्या असतात. त्यांना तेवढा प्रतिसाद देणारी माणसे वा मित्र कसे सापडणार? मग ती माणसे एकाकी राहतात व तसे अनुभवणे त्राग्याचे वा निराशेचे करतात. ’ही माणसे तशा मैत्रीखातर पुढाकार घेत नाहीत काय?’ या प्रश्नावर ते म्हणाले, ’त्यांना नकाराची भीती वाटते वा शंका असते. शिवाय त्यांच्यातल्या काहींना तो कमीपणाही वाटतो. मग ती नुसतीच मुकाट भिरभिरत असतात.’ अशी मुकाट भिरभिरणाची मोठी माणसे प्रस्तुत लेखकानेही खूप पाहिली आहेत. त्यातल्या काहींच्या रोजनिशाही वाचल्या आहेत. प्रामाणिकपणे आपले अपुरेपण सांगणार्या.
आजचे जग ज्ञानाच्या स्फोटाचे आहे. त्यात दाही दिशातून अंगावर येणारे ज्ञानाचे प्रकाशझोत दिपविणारे आहेत. त्यांचा प्रकाशझोत एवढा दीप्तीमान की तो पाहणार्याचे डोळे दीपवून टाकतो. परिणामी खूपदा त्यामुळे माणसांची खरी दिशाच त्यांना दिसेनाशी होते. तसे झाले की त्यांच्या वाट्याला ते भिरभिरणे येते. त्याही प्रकाशझोतात ज्यांना त्यांच्या दिशा व मार्ग ठामपणे दिसत व जाणवत असतात. ते भिरभिरत नाहीत. त्यांना इतरांचे भिरभिरणे दिसत असते. त्यात त्यांना ठाम वाटणारी जवळची माणसेही कधीकधी सापडतात. तर कधी ठाम वाटणार्या माणसांचे पाचोळा असणेही जाणवते. हे प्रकाशझोत खूपदा डोळ्यांपुढे अंधारीही आणतात. त्यात संबंधिताला आपले जरा वरच्या स्तरावरचे अस्तित्व जाणवते. त्याच वेळी तेथे आपल्या सोबत कोणी नाही हेही त्यांच्या ध्यानात येते. माणसांचे मन कधी स्थिर नसते. एका क्षणी या पातळीवर तर दुसर्या क्षणी ते दुसर्या पातळीवर जात असते. अशा मनाला मग कधी आत्मीयता जाणवते, जवळचे दिसतात, तर दुसर्याच क्षणी त्यांचे दूरत्वही त्यांना दिसू लागते.
एक अभ्यासू महिला म्हणाली, ’मला पहाटे खूपदा शारीरिक व मानसिक एकाकीपण आल्याचे जाणवते. उजाडले की ते नाहीसे होते. नंतरच्या काळात दर दोन अनुभवांदरम्यान ते अधूनमधून डोकावते.’ अनुभव काळाने मर्यादित असतात. पण एकाकीपण तसे नसते. ते अमर्यादही असते आणि क्षणिकही असते. मग मनात येते, आज आपल्याला खरी साथ हे एकाकीपणच देते काय? आपले खरे स्वरूप तेच असते काय? कारण ते न बोलविता येते व राहते. अनुभव येतात, आणावे लागतात, पुढे ते विस्मृतीतही जातात. ते कशाचे स्थिरपण? मग अॅरिस्टॉटल म्हणतो तसा माणूस हा सामाजिक प्राणी असतो की नाही? माणसाचे असणे आणि त्याचे समाजाचे अभिन्न अंग होऊन राहणे यावरच तर सार्या जगाच्या समाजकारणाची, राजकारणाची, धर्मकारणाची, संस्कृती व जीवनपद्धतीची मदार उभी आहे. एकाकीपण खरे मानले तर सामाजिकता बाधित होते. आणि तिच्या बाधित होण्याने सारेच विषय त्यांच्या आजवरच्या इतिहासासह जमीनदोस्त होतात. सामाजिकता हे सत्य की गृहीत? काही समाजशास्त्रज्ञ अलीकडे समाज ही एक अमूर्त कल्पना आहे असे म्हणूही लागले आहेत. ती माणसांची एकत्र राहण्याची निखळ गरज असते. समाज नसतोच. असतो तो समूह. ती माणसांची एकत्र राहण्याची निखळ गरज असते. तो समाज नसतो, समूहही नसतो, ती निव्वळ एकेकट्या माणसांची गर्दी असते. त्या क्वांटासारखी किंवा पाण्यातल्या मोलेक्युलसारखी.
तसेही प्रत्येक माणसाचे जग ही एक स्वतंत्र दुनिया असते. तिचे स्वरूप, आकार आणि वस्तूमान हे सारेच त्याच्या मनाने व बुद्धीने ठरविले असते. ते सार्यांना सारखे दिसते वा अनुभवता येते असेही नाही. परिणामी जेवढी माणसे तेवढ्या दुनिया. माणसांच्या संख्येएवढीच मग जगांचीही संख्या. माणसे परस्परांशी जुळवून घेतात म्हणजे तरी काय? आपापल्या जगांच्या मर्यांदांना व आकारांना कमी अधिक करून ती दुसर्यांना सामावून घेतात. पण मूळ माणसे एकेकटी व स्वतःच्या जगातलीच असतात. त्यांचे अनुभवच नव्हे तर मनोव्यापारही परस्पर भिन्न असतात. कधी जुळणारे तर कधी दुरावणारे. तरीही जग असते. त्यातली माणसे असतात. जंगलातल्या वाघांना एक मर्यादित क्षेत्र त्यांचे स्वायत्त म्हणून हवे असते असे प्राणीशास्त्र सांगते. माणसांचे मनोव्यापारही असे त्यांच्या क्षेत्रातलेच असतात. त्या क्षेत्रांच्या कडा परस्परांना घासल्या की त्यात संघर्ष उडतात. एरव्ही माणसे परस्परांना समजून व सामावूनही घेतात. पण असे क्वचित घडते व घडते तेही नाईलाजाने, मने मारून आणि स्वतःचा संकोच करून. मग हे जग व्यक्तीचे की समूहाचे, समाजाचे की गर्दीचे?
व्यक्तीच्या अंगाने विचार केला तर या प्रश्नाचे येणारे उत्तर समाजाच्या केलेल्या विचाराहून वेगळे येते. माणसे परस्परांशी जुळवून घेत या परस्पर विसंगत उत्तरांसह जगतात. तेच जीवन व तोच समाज. एकेका समाजात जेवढी माणसे एकत्र येतात तेवढे त्यांचे विकल्प वा कळप होतात. देश, धर्म, वर्ग, जाती, पंथ ही त्याचीच रूपे. यातही माणसे असतात ती एकाकी व एकटीच. पण सुरक्षेची गरज व नाईलाज या गोष्टी त्यांना परस्परांपासून दूर राहू वा जाऊ देत नाहीत एवढेच.
अशावेळी ज्या गोष्टींचे स्मरण होते, त्या याहून वेगळ्या आहेत. आणि त्या हे वास्तव नाकारणार्या वा दुर्लक्षिणार्या आहेत. जगाला एका सूत्रात राखणारी आदिशक्ती ब्रह्म ही आहे. आणि बाकीचे जग ही त्याची आंशिक वा भ्रष्ट रूपे आहेत असे वैदिक धर्म सांगतो. बुद्धधर्म असे ब्रह्म वा अंतिम तत्त्व मानत नाही पण तो जग चालवू शकणारे व त्यातच अंतर्भूत असलेले एक सामर्थ्य मानतो. ते सामर्थ्यच जगाला चालना देते, त्याचा लोभ करते व त्याला पुनश्च नवे जीवन प्रदान करते. ज्यू वा ख्रिस्ती धर्म किंवा इस्लाम एखादे होली घोस्ट वा परमपवित्र अल्लाला अंतिम शक्ती मानतात. त्या शक्तीच या जगाचे चालक, पालक व अखेरचे न्यायाधीश असल्याचेही सांगतात. धर्मश्रद्धांना तर्क लावायचे नसतात. त्यांना प्रश्न विचारायचे नसतात व कारणमीमांसाही मागायचे नसते. त्या सार्या केवळ श्रद्धेने स्वीकारायच्याच तेवढ्या असतात. सारे जग या श्रद्धांवर विसंबून आहे.
अगदी अलीकडे आपल्यातील राजा राममोहन रॉयसारख्या सुधारकाला ब्रह्मोसमाजाची स्थापना करावीशी वाटली. जोतिबांनी निर्मिक मानला. सारे संत या श्रद्धेच्या परंपरेतले. आणि सुधारकही त्यातलेच. (अपवाद एकट्या आगरकरांचा) टिळक, गांधींना गीता हा प्रमाणग्रंथ वाटायचा. डॉ. राधाकृष्णन्ही वेदांतीच. प्रत्यक्ष नेहरू व इंदिरा गांधी स्वतःला वेदांती समजत. आंबेडकरांनाही बुद्धाचा मार्ग स्वीकारावासा वाटला. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातही मध्ययुगात ईश्वराची अंतिम सत्ता मानणारे लोक व तत्त्वज्ञ झाले. शास्त्रज्ञ व वैज्ञानिकातही तो वर्ग होता. सारेच विकेंद्रित व भिन्न असताना त्यांना एकत्र राखणारे एक वैश्विक मन असते असे हेगेल म्हणाला. आईन्स्टाईन हा वैज्ञानिकही या विश्वातल्या वस्तूमानाचे वेगळेपण सांगताना वेग व दृष्टी यांच्यामुळे त्यात येणारे एकत्व सांगतो. प्रकाशाचे कणही एकाच प्रवाहात पण वेगळे असतात. एकाकीपण मान्य पण त्या एकाकीपणाला सांधून ठेवणारे, अजून कोणाला न गवसलेले एक अंतिम सत्य, सूत्र वा तत्त्व असते वा असावेच असे या सार्यांचे म्हणणे आहे. एवढ्या सार्या थोरांचे म्हणणे आपण एकाएकी मोडीत कसे काढायचे? तो मार्क्सच तेवढा म्हणाला, हे सारे मानवी जीवन शोषणाच्या व्यवहाराने आणि शोषकांच्या सामर्थ्याने बांधले आहे. हॉब्जच्या मते राजतंत्र सार्यांना एकत्र व धाकात ठेवते. तर लॉक म्हणतो एकत्र राहण्याचा करार माणसांनी आपसात केला असतो. रुसो सारे स्वातंत्र्य मान्य करतो. निसर्गातले गुण स्वीकारतो. पण त्यालाही एक करार मान्यच आहे.
सारांश हे क्षेत्र अजून त्याच्या निर्णायक उत्तरापर्यंत पोहोचायला या वैश्विक श्रद्धांचा अडसर दूर करावा लागतो आणि तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तर्क आणि श्रद्धा, मेंदू आणि मन यांच्यातले हे सनातन भांडण तसेच पाहावे व अनुभवावे लागते. एक गोष्ट मात्र आश्वस्त करणारी. तर्क कधी हरत नाही आणि सत्य कधी पराभूत होत नाही. त्यांच्या विजयाची जगाला वाट आहे एवढेच अशावेळी मनात येते.