कोरोनाची ‘पेशंट झिरो’: वेई गुझियान

-नितीन पखाले

जगात सर्वत्र कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांची संख्या दहा लाखाच्या वर गेली आहे.  मृतांचा आकडा ५५ हजाराच्या घरात पोहोचला आहे. अशा विदारक स्थितीत ‘कोरोना पेशंट झिरो’ हा  काय प्रकार आहे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. कोरोना विषाणूची  लक्षणे आढळलेला पहिला रूग्ण, पहिला वाहक  याला ‘पेशंट झिरो’ असे संबोधले जात आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण म्हणून चीनच्या वुहान शहरातील मासे व कोळंबी विक्रेती सत्तावन वर्षीय वेई गुझियान हिची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे कोरोना विषाणूची पहिली शिकार ठरलेली वेई गुझियान एक महिन्यांच्या औषधोपचारांनतर आता ठणठणीत बरी  झाली आहे.

जगभरात कोरोनाचा पेशंट झिरो कोण असेल याबाबत भरपूर चर्चा रंगली. अनेक दावे, प्रतिदावे करण्यात आले. मात्र ‘द वॉल स्ट्रिट जर्नल’ व अन्य माध्यमांमधून वेई गुझियान हिचे नाव प्रसिद्ध होताच ‘पेशंट झिरो’ म्हणून तिच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे . ‘पेशंट झिरो’ म्हणजे ज्या रुग्णात नवीन विषाणू वा आजाराची पहिली लक्षणे आढळतात अशी व्यक्ती. जगात कोरोनामुळे दररोज हजारो लोक मृत्यूमुखी पडत असताना वेई गुझियान यातून सहिसलामत बाहेर कशी पडली, हा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.

१० डिसेंबरला वेई गुझियान हुआनैनच्या सी-फूड मार्केटमध्ये झिंगे विकत होती. दरम्यान नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ती नैसर्गिक विधीकरीता परिसरातील सार्वजनिक शौचालयात गेली. त्या दिवशी काम करताना तिला जरा कणकण वाटत होती. सायंकाळपर्यंत तिला सर्दी, पडसे झाले. तिने घरगुती उपचार केले, परंतु आराम पडला नाही. दरम्यान सर्दी, पडसे, ताप अशा आजारावर उपचार करून गेलेल्या काही लोकांची यादी वुहान महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने ३१ डिसेंबरला प्रसिद्ध केली. कोरोना संक्रमित झालेल्या ज्या २७ लोकांची या यादीत नावे होती, त्यात वेईचेही नाव होते. तिच्यासह सी-फूड मार्केटमधील २४ व्यक्ती कोरोना संक्रमित झाले होते. एकाचवेळी अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे वेई गुझियान ही पेशंट झिरो असल्याचा दावा वेळोवेळी फेटाळून लावण्यात आला.  चीनच्या ‘द पेपर’ या न्यूज वेबसाईटने सर्वप्रथम वेई गुझियान ही पेशंट झिरो असल्याचा रिपोर्ट वाचकांसमोर आणला होता. मात्र वेई गुझियान ही महिला कोरोना विषाणूची पेशंट झिरो असल्याबाबत चीन सरकाराने कोणताही अधिकृत खुलासा केला नाही.

दरम्यान चीनच्या ग्लोबल मीडियाने कोरोना विषाणू अमेरिकेतील सैन्य प्रयोगशाळेत विकसित करण्यात आल्याचा आरोप केला आहे. ग्लोबल मीडियाचा हा दावा होता की, ऑक्टोबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरात आयोजित विश्व मिल्ट्री क्रीडा स्पर्धेसाठी आलेला अमेरिकाचा सायकलपटू मजाटूजे बेनासी हाच कोरोना विषाणूचा पहिला वाहक होता. या मुद्यावरून चीन आणि अमेरिकामध्ये अनेक आरोप –प्रत्यारोपही रंगले. मात्र मार्च महिन्याच्या पहिल्याआठवड्यात ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने  वेई गुझियान हीच कोरोनाची ‘पेशंट झिरो’ असल्याचा पुन्हा दावा केला. या वृत्तांकनात चीन सरकारवर कडक ताशेरेही ओढण्यात आले. २७ मार्चला युरोपमधील अनेक न्यूज पोर्टलवर वेई गुझियान हीच कोरोनाची पेशंट झिरो असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या.

दरम्यान वुहानमध्ये एक महिन्याच्या औषधोपचारानंतर वेई गुझियान ही कोरोना संसर्गातून बरी झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना तिने सांगितले की, ‘दरवर्षी थंडीच्या ऋतूत तिला सर्दी, पडसे, ताप असा किरकोळ आजार होतोच. मात्र १० डिसेंबरला सर्दी, पडसे झाल्यानंतर तो नेहमीचा प्रकार नसल्याचे जाणवले, कारण सतत थकवा जाणवत होता. तेव्हा जवळच्या दवाखान्यात औषध गोळ्या घेऊन परत कामात व्यस्त झाले. मात्र त्यानंतर खूप अस्वस्थ वाटत असल्याने वुहानच्या अनेक हॉस्पिटलमध्ये दाखवले. मात्र काहीच फरक पडला नाही . बहुतेक हॉस्पिटलमध्ये नेहमीचीच औषधे देऊन परत पाठविण्यात आले.’

परंतु त्यानंतर प्रकृती अधिकच बिघडल्याने वुहानच्या सर्वात मोठ्या युनियन हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आले. तिथे योग्य तपासणीनंतर डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात तिला ’क्वारंटाईन’ करण्यात आले. दरम्यानच्या काळात वेई गुझियानच्या संपर्कात आलेला तिचा पती, मुलगी आणि भाची यांनाही कोरोनाची लागण झाली. यानंतर वेई वुहानच्या ज्या सी-फूड मार्केटमध्ये झिंगे विकायची तेथील अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. वेई गुझियान एक महिन्याच्या उपचारानंतर जानेवारी २०२० मध्ये या आजारातून बरी झाली. चीन सरकार मात्र  या विषयात तोंड उघडायला तयार नाही.

(लेखासोबतचा फोटो प्रातिनिधिक आहे. फोटोतील महिला वेई गुझियान हे खात्रीने सांगता येत नाही)

(लेखक लोकसत्तेचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी आहेत)

९४०३४०२४०१

(संदर्भ – इकॉनॉमिक टाईम्स, अमर ऊजाला आदी)

Previous articleतर्काच्या विजयाची वाट
Next articleहिंदू पुरोगाम्यांचा सनातन बोटचेपेपणा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here