ताजे वृत्त तू आणि ती… By Team Media Watch - March 8, 2023 -डॉ मंजुषा वाठ- झगडे मला तू दिसतेस स्वतःच्या नटण्या मुरडण्यात किती तास आणि त्याचा पैसा पार्लरमध्ये घालवताना कुठल्याही साध्याच्या कार्यक्रमासाठी निवांत निखळ आनंद लुटताना. मनापासून फार नसल्या तरी लुटूपुटूच्या मैत्रिणी करून तोंडाचे चंबू केलेले फोटो अपलोड करताना कुठलेही वाचन पुस्तक यांना जवळ फिरकू न देता तो ऑफिसला गेला की मस्त ताणून देताना. संध्याकाळी नीट घर आवरून प्रसन्न चेहऱ्याने तयार होऊन त्याच्या समोर जाताना किती सुंदर ,घरगुती, सर्वांचं करणारी म्हणून तुझ्याकडे त्याने एक लडिवाळ कटाक्ष टाकताना. पार्टी समारंभ सहल कुठलेही कष्ट न करता मनमुराद आनंद लुटताना साधा सर्दी पडसा ताप आला तरी डोक्यावर पांघरून घेऊन दिवसभर कौतुक करून घेताना . मुलांच्याही अभ्यासात फारसे डोकं न घालता त्यांना ट्युशन लावून मोकळ होताना कुणी चंद्रावर गेलं काय कोणी ऑलम्पिक मध्ये जिंकला काय कुठलाही तणाव न घेता निवांत जगतांना. तीही मला दिसते घर आणि नोकरी करताना कितीतरी अग्नी दिव्य सहज पार करताना बिना वेळापत्रकाच्या आणि पूर्व सूचना नसलेल्या अनंत परीक्षा दररोज देताना झालेल्या जखमांच्या लवकरात लवकर मलमपट्टी करून हसत हसत उभे राहताना सर्दी, पडसा, ताप तर सोडा प्रसुतीचं ,आजारपणाचं कौतुक बाजूला करीत सहज वावरताना शरीराचं आणि मनाचं अवघडले पण बाजूला सारत परत नव्या दमान बाहेरच्या जगात स्वतःला सिद्ध करताना नोकरीत झालेही खच्चीकरण तरीही तणाव्यविरहित चेहऱ्याने परत सिद्ध होताना आणि हो नोकरीतले तणाव घरी न दाखवता घराचे स्वास्थ्य जपताना मुलांच्या प्रगतीत सोबत करता करता बापापेक्षा तुम्ही मुलांना बोचताना बाभळीचे काटे नसतील हल्ली पण मोहक गुलाबाची काटी हळुवार बाजूला सारताना. मेनोपोजमुळे आलेली चिडचिड बंड हे तुमच्या एकटीच द्वंद म्हणून स्वतःशीच झगडताना. स्वतःला सुपर वुमन म्हणून सिद्ध करता करता घर आणि नोकरी अशी तारेवर कसरत करताना. तुझी नवीन पिढी मात्र दिसत नाही हल्ली या भावनिक गुंताऱ्यात पडताना. तू अपडेट होत गेलीस परंतु समाजाचे जुने सॉफ्टवेअर दिसत नाही अपडेट होताना. अजूनही दिसतात भोवताली सारे तुम्हा दोघींकडून सारख्याच अपेक्षा ठेवताना तरीही तू दिसतेस फाईल मध्ये डोकं घालताना विमान चालवताना, मोठमोठी भाषणे देताना, कार्पोरेट जगात उच्च पदावर चमकताना, राजकारणात स्वतःला सिद्ध करताना . कितीही उंच गेलीस तरी पिल्लांकडे सतत एक नजर ठेवताना . स्वतः सोबतच घराला ,समाजाला, पर्यायाने देशालाही एका उंचीवर नेऊन ठेवताना प्रत्येक दिवसच तसा तुझा तरीही आनंद होतोय तुला महिला दिनाच्या शुभेच्छा देताना. (कवयित्री अमरावतीच्या शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेत अधिव्याख्याता आहेत) 9423424710