सावित्रीबाईं फुले यांच्या शिक्षिका- सिंथिया फरार

-कामिल पारखे

सिंथिया फरार हे नाव कधी कानांवर पडलं आहे का?  कधी, कुठं हे नाव वाचण्यात आले आहे का?  या मिस सिंथिया फरार आहेत हिंदुस्थानात येणाऱ्या पहिल्या अविवाहित महिला ख्रिस्ती मिशनरी. सिंथिया फरार थेट अमेरिकेतून २९ डिसेंबर   १८२७ रोजी  हिंदुस्थानात आल्या, सुरुवातीला काही वर्षे मुंबईत, अल्पकाळ महाबळेश्वर येथे आणि नंतर अहमदनगर येथे दीर्घकाळ मुलींच्या शिक्षण कार्यात स्वतःला वाहून घेत तेथेच त्यांनी देह ठेवला. सिंथिया फरार यांची एक अत्यंत महत्त्वाची ओळख म्हणजे समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या सिंथिया फरार या शिक्षिका. अर्थात मिशनरी रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांच्या पत्नी मिसेस (मारिया हे मॅकेंझी उर्फ फ्लायटर) मिचेल यांनीही पुण्यातल्या आपल्या नॉर्मल स्कुलमध्ये सावित्रीबाई फुलेंना शिकवले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी पुण्यात सुरु केलेल्या मुलींच्या शाळेत शिकवणाऱ्या फातिमा शेख यासुद्धा फरार यांच्या अहमदनगर येथील मुलींच्या शाळेत शिकल्या.

  महिलांच्या शिक्षणासाठी आणि उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाचे योगदान केलेल्या सिंथिया फरार आणि मिसेस मिचेल यांची चरित्रे किंवा स्वतंत्र माहिती आतापर्यंत कुठेही लिहिली गेलेली नाही त्यामुळे या दोन समाजसुधारक महिलांची सहसा कुणालाच काही माहिती नसते. असे असले तरी भारतातील आणि महाराष्ट्रातील सामाजिक इतिहास, विशेषतः स्त्रीमुक्ती चळवळीचा आणि शैक्षणिक इतिहास, त्याशिवाय सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांची चरित्रे सिंथिया फरार यांच्या उल्लेखावाचून पूर्ण होऊच शकत नाही, असे त्यांचे भरीव योगदान आहे.अहमदनगर येथे सिंथिया फरार मॅडम मुलींसाठी शाळा चालवत होत्या. महात्मा जोतिबा फुले यांनी आपल्या मिंत्रांसह या शाळेला भेट दिली आणि मुलींना शिक्षण देण्याच्या या कार्याबाबत ते प्रभावित झाले. आपली पत्नी सावित्रीबाई यांना त्यांनी अहमदनगर येथे फरार मॅडमच्या शाळेत शिक्षण अद्यापनाच्या प्रशिक्षणासाठी पाठवले. फरार मॅडमच्या मुलींच्या शाळेपासून प्रेरणा घेऊन महात्मा फुले यांनीं आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई यांनीं पुण्यात मुलींसाठी शाळा सुरु केली होती असे खुद्द महात्मा फुले यांनी म्हटले आहे.

मात्र एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस म्हणजे ब्रिटिश अमदानीच्या सुरुवातीच्या काळात हिंदुस्थानात आधुनिक शिक्षण देणाऱ्या सिंथिया फरार या पहिल्याच व्यक्ती नाही. मिस सिंथिया फरार यांच्या कितीतरी वर्षे आधीच इतर परदेशी ख्रिस्ती मिशनरींनीं देशांत आधुनिक शिक्षण देणाऱ्या मुलांमुलींच्या शाळा सुरु केल्या होत्या. फरार हिंदुस्थानात येण्याआधी त्यांच्या अमेरिकेतील पूर्वायुष्याची काहीही माहिती उपलब्ध नाही. मुंबईत २९ डिसेंबर १८२७ रोजी आल्यानंतर सुरुवातीच्या त्यांच्या मुंबईतील कार्याविषयी आणि नंतर अहमदनगर येथील त्यांच्या आयुष्याच्या अखेरीपर्यंतच्या दीर्घ कालावधीतील सेवेबाबत मात्र अनेक उल्लेख अमेरिकन मराठी मिशनच्या वार्षिक अहवालांत आणि इतर कागदपत्रांत आढळतात. सिंथिया फरार यांचा भारतातील मिशनरी आणि शैक्षणिक क्षेत्रांतील कालखंड १८२७ ते त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १८६२ इतका आहे. अमेरिकन मराठी मिशनच्या १८१३ ते १८८१ या कालखंडात हिंदुस्थानात कार्य केलेल्या सर्व मिशनरींच्या सेवेचा कालखंड देण्यात आला आहे. त्या यादीत `मिस सिंथिया फरार – आगमन २९ डिसेंबर १८२७ , निधन २५ जानेवारी १८६२’ अशी नोंद आहे.

यादरम्यान अमेरिकेतून  मुंबईत आल्यावर सिंथिया फरार यांनी अमेरिकन मराठी मिशनच्या मुलींच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले. मिशनच्या १८२९ सालच्या अहवालात या शाळांची संख्या वाढत चालली आहे असे नमूद करून विद्यार्थिनींची संख्या चारशेहून अधिक झाली आहे आणि त्यापैकी १२२ मुली चांगल्यापैकी वाचू शकतात, सुंदर अक्षरात लिहू शकतात असे म्हटले आहे.मुलींच्या शाळांतील विद्यार्थिनींची १८३२ साली एक सार्वजनिक परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसंदर्भात `बॉंबे हुरकरू’ आणि `वर्तमान’ वृत्तपत्रांत बातमी आली   होती आणि त्याचा इंग्रजी अनुवाद `दर्पण’ वृत्तपत्रात खालीलपणाने प्रसिद्ध झाला होता :

” गेल्या गुरुवारी, २९ नोव्हेंबर रोजी, भेंडी बझार इथल्या अमेरिकन मिशन चॅपलच्या हिंदू मुलींच्या शाळांची परीक्षा घेण्यात आली. अनेक युरोपियन महिला आणि पुरुष यावेळी उपस्थित होते, आम्हीसुद्धा तेथे होतो.  सकाळी अकरा वाजता मराठीत परिक्षा घेण्यात आली आणि विद्यार्थिनींनी उत्तमरीत्या वाचन केले. त्यांनीं प्रश्नांची उत्तरे  लगेचच दिली, एक ख्रिस्ती गायन त्यांनी सुमधुर स्वरात गायले आणि हे गायन इंग्लिश मुलांच्या तुलनेत अधिक चांगले होते.  वाचन परीक्षा संपल्यानंतर मुलींच्या केलेल्या विणकामाच्या, भरतकामाच्या वस्तूंचे आणि पायमोज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. प्रदर्शनातील या वस्तूंचा दर्जा इंग्लंडमधील असल्या प्रकारच्या वस्तूंसारखा होता. इंग्लंडमध्ये तयार केलेल्या वूलनच्या पायमोज्यांपेक्षा इथले पायमोजे अधिक मुलायम होते. तिथे उपस्थित  असलेल्या महिलांनी मुलींचे आणि त्यांना शिकवणाऱ्या महिलेचे कौतुक केले.  या मुलीनीं  केवळ सहा महिन्यांच्या अल्पकाळात  विणकाम आणि भरतकाम आणि इतर बाबतीत प्रशिक्षण घेतेले होते आणि  या मुली इतर उपयुक्त वस्तू बनवण्यास अशाच पद्धतीने लवकर शिकतील असे तयार  उपस्थित असलेल्या लोकांचे ठाम मत झाले होते.

या परीक्षेबाबत एका वाचकाचे पत्र प्रसिद्ध झाले होते. त्यात म्हटले होते.”

“या  शाळांनी  युरोपियन समुदायातील सर्वोच्च आणि उत्तमोत्तम लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांचा पाठिंबा मिळवला.  गव्हर्नर, चिफ जस्टीस, कौन्सिलचे सभासद, डायोसिसचे आर्चडिकन  (नंतरचे बिशप) आणि महिला यांनीं  या परीक्षांना हजर राहून आणि उदारहस्ते मदत देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला. या शाळांच्या मदतीसाठी एका वर्षी १८८०  रुपये तर दुसऱ्या वर्षी २००० रुपये देण्यात आले. अशा प्रकारे दोन देणाऱ्या व्यक्तीमध्ये त्यावेळचे मुंबईचे गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एलफिस्टन यांनी ५०० रुपये दिले तर त्यांच्यानंतर गव्हर्नर बनलेल्या सर जॉन माल्कम यांनी ३०० रुपये दिले. ”

अमेरिकन मराठी मिशनचे मिशनरी अहमदनगर येथे पोहोचल्यानंतर लगेचच या मिशनरींच्या पत्नींनी तिथल्या स्थानिक मुलींना  आपल्याकडे बोलावून शाळा सुरु केल्या. या शाळांत मुलींना लिहिणे, वाचणे शिकले जाई आणि बायबलमधील काही प्राथमिक तत्त्वे शिकवली जाई.  मुलींच्या शिक्षणाबाबत समाजात अत्यंत प्रतिकूल मत आणि  कडवा विरोध असल्याने या शाळांत मुलींना बोलावण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागायची. धर्मप्रसार करताना या कार्याचाच एक भाग म्हणून स्थानिक मुलांसाठी शाळा सुरु करणाऱ्या मिशनरींना अनेक समस्यांना तोंड ध्यावे लागले होते. मुलींच्या शाळा सुरु करताना, या मुलींनी शिक्षण सोडू नये यासाठी प्रयत्न  करताना अनेक प्रसंगी त्यांना अपयश येत असे.

अमेरिकन मराठी मिशनच्या १८३४ सालच्या अहवालात मिशनच्या मुंबईच्या शाळांची माहिती दिली आहे. त्यात तेथल्या कार्यरत व्यक्तींच्या यादीत मुलींच्या शाळांच्या सुपिरिटेंडंट मिस सी. फरार असा उल्लेख आढळतो. मुंबईत त्यावेळीं मुलांसाठी पाच तर मुलींसाठी तेरा शाळा होत्या, या शाळांत कुठल्याही प्रकारची फी नव्हती. त्याशिवाय इतर ठिकाणी मुलांसाठी आणि मुलींसाठी बारा शाळा होत्या. अहमदनगरमध्ये १८३५ साली अमेरिकन मराठी मिशनच्या नऊ शाळा होत्या.आपल्या मिशनरी वृत्तीच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याने आधुनिक काळात भारतातील संपूर्ण समाजजीवन सकारात्मकतेने बदलून टाकणाऱ्या महान आणि द्रष्ट्या समाजसुधारक मिशनरींमध्ये अहमदनगरच्या सिंथिया फरार यांचा समावेश होतो.

अमेरिकन मराठी मिशनतर्फे पहिल्यांदा सुरु केलेल्या मुलांच्या बोर्डिंग स्कुल्स मिशनरी कुटुंबांत चालवल्या जात असत कारण बोर्डिंगमधल्या या मुलांमुलींची काळजी घेणे आणि त्यांना शिकवणे अधिक सोयिस्कर होते. सन १८३६ ला मात्र मुलींची पहिलीवहिली बोर्डिंग स्कुल मिस सिंथिया फरार यांनी चॅपलला लागून असलेल्या मिशन हाऊसमध्ये सुरु केली, या बोर्डिंग स्कुलमध्ये १३ मुली होत्या, त्यापैकी पाच जणी गुलामांच्या जहाजातून मुक्त केलेल्या निग्रो होत्या.अमेरिकन मराठी मिशनच्या मुंबईच्या विविध परिसरांत त्यावेळी मुलींसाठी तब्बल १२ शाळा होत्या आणि या शाळांत दोनशे ते तिनशे विद्यार्थिनी होत्या. मात्र कालांतराने या शाळांची संख्या कमी करुन या शाळांचे एकत्रिकरण करून चॅपलसमोर असलेल्या भेंडी बझार केंद्रात आणि भायखळा मॅन्शन येथे या शाळा चालू ठेवण्यात आल्या. मिस सिंथिया फरार अनेक वर्षे या शाळांच्या सुपरिंटेंडेन्ट होत्या,

प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मायदेशी अमेरिकेत परतावे लागले. अमेरिकेतून . १८३९ ला पुन्हा भारतात आल्यानंतर त्यांचे कार्य महाबळेश्वर येथे आणि त्यांच्या १८६२ सालच्या मृत्यूपर्यंत अहमदनगर येथे चालू राहिले. सिंथिया फरार अमेरिकेत परतल्या होत्या तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीत मुलींची ही बोर्डिंग मिसेस ऍलन यांनी चालू ठेवली. ह्युमस दाम्पत्याचे १८३९ साली मुंबईत आगमन झाल्यानंतर त्यांनी ही बोर्डिंग चालू ठेवली. फरार भारतात परत आल्यानंतर अहमदनगर येथेसुद्धा  फरार यांनी  मुलींच्या शाळांवर आपले लक्ष केंद्रित केले.  अमेरिकन मराठी मिशनच्या १८४५ आणि १८४६ सालच्या  अहवालात म्हटले होते कि ” मिस फरार यांच्या सुपरिंटेंडंटपदाच्या देखरेखीखाली मुलींच्या चार शाळा सुरु आहेत आणि या शाळांत १०० विधार्थिनी आहेत.”

या शाळांच्या अधिक्षक या नात्याने फरार यांनी केलेल्या परिश्रमामुळे या क्षेत्रात आधी इतरांना अपयश आले होते तसे त्यांच्या बाबतीत झाले नाही. त्यांना ज्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते ते पाहता इतर कुणी असे कष्ट करण्याचे धाडसच केले नसते. मुलींना शिक्षण देण्याबाबत समाजात विरोध असल्याने या शाळांतील मुलींनी शिक्षणात केलेल्या प्रगतीबद्दल त्यांच्या पालकांना अजिबात कौतुक नसायचे. त्यामुळे आपल्या मुली नियमितपणे शाळांत जाण्याची गरज आहे असे त्यांना बिलकुल वाटत नसे. या कारणांमुळे या शाळांतील मुलींना कुठल्याही निमित्ताने किंवा कारणाखाली शाळेत पाठवणे अचानक बंद केले जाई किंवा या मुलींना कुठल्याही करण्यासाठी परगावी महिनाभर किंवा थेट काही महिन्यांसाठी पाठवले जाई. मुलींचे लहानपणीच लग्न लावून देण्याची पद्धत तर त्यांच्या शिक्षणासाठी एक मोठा अडसर होता. या मुलींना त्यांच्या सासूच्या हाताखाली आणि सतत चालणाऱ्या जिभेच्या प्रभावात प्रशिक्षण घेणे शाळेतील शिक्षणापेक्षा महत्त्वाचे समजले जायचे. सिंथिया फरार यांनी त्यांच्या शाळांत शिकणाऱ्या मुलींचे प्रेम संपादन केले, त्यांच्यामध्ये शिकण्याची गोडी निर्माण केली आणि अशाप्रकारे शिक्षणात किमान थोडीफार प्रगती होईल इतका काळ या मुलींना शाळांत येण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात त्या यशस्वी ठरल्या.
तरीसुद्धा आपल्या शाळांतील अनेक मुलींना लवकरच शाळेतून काढले गेले आणि त्यामुळे आंपल्या आयुष्यभरातल्या शैक्षणिक कामात फार थोडे यश मिळाले अशी खंत फरार मॅडम अनेकदा व्यक्त करत असत.

सिंथिया फरार आणि त्यांच्याप्रमाणेच इतर मिशनरी महिलांनी भारतात मुलींच्या शिक्षणाच्या प्रसारासाठी केलेल्या कामामुळे हळूहळू मुलींच्या शिक्षणाबाबत त्यांच्या पालकांचा आणि एकूणच संपूर्ण समाजाचा असलेला विरोध मावळत गेला आणि मग मुली अधिक संख्येने शाळांत येऊ लागल्या. अमेरिकन मराठी मिशनच्या १८८१च्या वर्धापनानिमित्त मिसेस एल एस गेट्स मिसेस लेखात लिहितात: “सन १८२७ ला महिलांसाठी कार्य करण्यासाठी मिस सिंथिया फरार हिंदुस्थानात आल्या. मुंबईत त्यांनी मुलींसाठी अनेक शाळा सुरु केल्या. दयाळू वृत्तीच्या मित्र असलेल्या ब्रिटिशांसह उच्च पदांवरील अनेक भारतीय सद्गृहस्थांनी मुलींच्या या शाळांना पाठबळ पुरवले. याचे कारण म्हणजे या शाळांतील मुलींनीं केलेली प्रगती त्यांनी पाहिली होती. ब्रिटिश लोकांच्या मदतीवर चाललेल्या काही शाळांच्या सुपरिंटेंडंट म्हणून त्यांनी काम पाहिले. आपल्या कामावर त्यांनीं अलोट प्रेम केले. भौतिक साधने मिळवण्याची त्यांना संधी असतानाही त्यांनी या भौतिक सुखाकडे पाठ फिरवली आणि पवित्र ध्येयाने प्रेरित होऊन त्त्यांनी नम्र वृत्तीने आपले कार्य सुरु ठेवले. आपल्या प्रभूसाठी कार्य करण्यासाठी त्या सदैव उत्सुक असायच्या. आपल्या स्वतःबद्दल त्यांनीं म्हटले आहे: ”मी माझे निरुपयोगी आणि अगदी हलके असलेले श्रम (आपल्या श्रमाबद्दल त्यांची अशी धारणा होती) माझ्या तारणहार प्रभूच्या चरणापाशी प्रत्य्येक रात्री ठेवत होते, माझ्या या अपर्णाचा त्याने स्वीकार करावा अशी मी प्रार्थना करत असे.” अशा भावनेने फरार यांनीं काम केले. आपल्या कामाबाबत त्या सतत उत्साहाने असायच्या. त्यांच्या विद्यार्थिनी त्यांची अत्यंत प्रेमाने आणि कृतज्ञतापूर्वक आठवण करत असत.

  सन १८५२ ला मिस फरार यांना अहमदनगर शहरातल्या आणि नजिकच्या परिसरातील काही सद्गृहस्थांचे बोलावणे आले. आपल्या कुटुंबियांना आणि महिलांना शिक्षण कसे द्यायचे याबाबत फरार यांनी मार्गदर्शन करावे अशी त्यांनी विनंती केली. अहमदनगर येथील दोन शाळांना ब्राह्मणांचे पाठबळ होते, आणि यापैकी एका शाळेतील एक ब्राह्मण शिक्षक ख्रिस्ती झाल्यानंतर या शाळांतील मुलांना पालकांनी काढून घेतेले आणि त्यामुळे या शाळा बंद पडल्या.मिस फरार यांच्याविषयी स्थानिक लोकांमध्ये खूप आदराची भावना होती. त्यांच्याकडे हे लोक एक दैवत म्हणूनच पाहायचे. इथला समाज महिलांकडे एक दुय्यम, हलकी व्यक्ती अशा नजरेने पाहत असायचा, त्या लोकांसाठी फरार यांची निष्ठा, जीवनातील पावित्र्य, मनातील चांगुलपणा आणि स्त्रियांसाठी त्यांनीं घेतलेले परिश्रम खूप नवलाईची बाब होती.

अहमदनगर येथील मुलींच्या शाळेबद्दलची माहिती ऐकून महात्मा जोतिबा फुले यांनी या शाळेला भेट दिली आणि त्यानंतर आपल्या पत्नी सावित्रीबाई यांना या शाळेत दाखल केले.सिंथिया फरार यांच्या स्त्रीशिक्षणविषयक कार्याचा महात्मा फुले यांच्यावर गाढ प्रभाव पडला होता असे त्यांनीं स्वतः लिहिले आहे. अहमदनगर येथे नोकरीला लागलेले त्यांचे मित्र सदाशिवराव गोवंडे यांच्यामुळे ते फरार मॅडमच्या शाळेत गेले होते. याबाबत धनंजय कीर यांच्या `महात्मा जोतीराव फुले’ या पुस्तकात खालील उल्लेख आहे. ”नोकरीवर रुजू होण्यासाठी सदाशिवराव गोवंडे अहमदनगरला गेले तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर जोतिबांना नेले. त्याकाळी अहमदनगर हे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी चालविलेल्या शिक्षणकार्याचे एक मोठे केंद्र बनले होते. तेथे गेल्यावर एके दिवशी सदाशिवराव गोवंडे व जोतिबा ह्यांनीं अमेरिकन मिशनमधील मिस फरारबाईंच्या शाळेला भेट दिली.

मुलींची शाळा काढण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टी केल्या ह्याविषयी जोतिबा म्हणतात: माझ्या देशबांधवांपैकी महारमांगचांभार ह्या कनिष्ठ जातींतील बंधू हे दुःख आणि अज्ञान यांत साफ बुडालेले आहेत. त्यांची स्थिती सुधारण्यासाठी दयाळू देवाने मला प्रेरणा दिली. स्त्रियांच्या शाळेने प्रथम माझे लक्ष वेधले. पूर्ण विचारांती माझे असे मत झाले कि, पुरुषांच्या शाळेपेक्षा स्त्रियांच्या शाळेची अधिक गरज आवश्यकता आहे. स्त्रिया आपल्या मुलांना त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांत जे वळण लावतात त्यातच त्यांच्या शिक्षणाची बीजे असतात. अशा विचारात मी असताना अहमदनगर येथील अमेरीकन मिशनमधील मिस फरार या बाईने चालविलेल्या शाळा मी एका मित्रांसमवेत पाहिल्या. ज्या पद्धतीने त्या मुलींना शिक्षण देण्यात येत होते ती पद्धत पाहून मी फार खुश झालो.
हिंदुस्थानात स्त्रीशिक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात येते याबद्दल जोतिबा आणि गोवंडे यांच्याजवळ मिस फरारने अत्यंत दुःख व्यक्त केले. आपल्या देशाची सुधारणा करण्यासाठी [परकीय लोक जे चिकाटीने प्रयत्न करीत होते ते पाहून जोतिबा आणि गोवंडे यांचा मनावर फारच चांगला परिणाम झाला. आपल्या देशबांधवांच्या सुधारणेकडे आपले लोक दुर्लक्ष करतात याविषयी त्यांना खंत वाटली. यास्तव प्रत्येकाने आपल्या पत्नीस शिक्षण देऊन शिक्षणप्रसाराच्या कार्यात तिचे साहाय्य घ्यावे, असे त्यांनी ठरविले. त्याप्रमाणे जोतीराव पुण्यास परत आल्यावर त्यांची पत्नी सावित्रीबाई ह्यांचे शिक्षण सुरु करण्यात आले आणि त्यांनी स्वतः कनिष्ठ वर्गातील मुलींसाठी . एक शाळा उघडली. जोतिबा म्हणतात : ”मी पुण्यास येताच कनिष्ठ वर्गातील मुलींसाठी एक शाळा सुरु केली. मात्र त्या शाळेत ज्या मुलांना शिक्षण घेण्याची आवड असेल त्यांनाही प्रवेश दिला. या शाळेत मी वाचन, अंकगणित आणि व्याकरणाची मूलतत्त्वे हे विषय शिकवीत असे”.

  ख्रिस्ती मिशनरींतर्फे चालवल्या जाणाऱ्या `ज्ञानोदय मासिकात जोतिबांचे हे मनोगत १८५३ साली प्रसिद्ध झाले होते. जोतिबा लिहितात :“ अतिशूद्रादिकांस विद्या शिकविण्याविषयांची मंडळी
या मंडळीचे पुढारी जोतिराव गोविंद फुले आहेत आणि अलीकडे जेव्हा या शाळेची परीक्षा झाली तेव्हा त्यांनी बोलणे लावले की महार, मांग, चांभार हे या देशात फार असून ते अगदी नीचावस्थेत आहेत. हे पाहून ईश्वराच्या प्रेरणेने माझ्या मनात अशी इच्छा उत्पन्न झाली असल्यास सुशिक्षित करण्याविषयी काहीतरी उपाय योजावा. प्रथम मनात आले की आईच्या योगाने मुलांची जी सुधारणूक होते ती फारच चांगली आहे म्हणून त्या लोकांच्या मुलींचीच शाळा प्रथम घालावी आणि असा विचार करता करता मी एका मित्रालासुद्धा अहमदनगरात जाऊन तेथे अमेरिकन मिशन खात्यातील फारा मडमीच्या कन्याशाळा पाहिल्या आणि पाहून मला मोठा आनंद झाला कारण की त्या चांगल्या रीतीने चालल्या होत्या. मग मी पुण्यास परत येऊन लागलीच एक मुलींची शाळा घातली व तिथे वाचणे लिहिणे, गणित, व्याकरण असा अभ्यास चालविला.’’.

महाराष्ट्र सरकारच्या महात्मा जोतीराव फुल चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे प्रकाशित केलेल्या “महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा” या पुस्तकाच्या संपादकीयात हरी नरके यांनी लिहिले आहे: “२२ नोव्हेंबर १८५१ च्या `बॉंबे गार्डियन’ने याबद्दल विस्तृत नोंद केली आहे. “१८४८ मध्ये सदाशिव बल्लाळ गोवंडे हे अहमदनगर येथे जज्जाच्या कचेरीत नोकरीस लागले, तेव्हा त्यांनीं जोती गोविंद फुले या आपल्या मित्राला नगर येथे नेले होते. एके दिवशी हे दोघे मिस फरारच्या मुलींच्या शाळा पहावयास गेले. तेथील व्यवस्था बघून त्यांना आपल्या देशातील स्त्रियांना शिक्षण दिले जात नाही याची खंत वाटली. फुले पुण्यात गेले व त्यांनीं मित्रांना हे काम हाती घेण्याचा बेत सांगितला. त्यांच्या पत्नीला शिक्षण देऊन त्यांनी शाळा सुरु केली. मग पुण्यातील महारा-मांगांसाठी शाळा काढली. पण पुढे सहाच महिन्यांत दुदैव ओढवले. लोकांच्या मूर्ख पूर्वग्रहाचा प्रभाव पडून त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले व शाळा बंद पडली. गोवंडे पुण्यात आले व त्यांनी सावित्रीबाईंना नगरास नेले. पावसाळ्याच्या प्रारंभी त्या परत आल्या. मग केशव शिवराम भवाळकर यांनी त्यांना शिक्षण द्यायची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. शाळातून शिकविण्यात उपयोगी होतील अशा तरुण स्त्री शिक्षकांचा वर्गही घेण्याचे ठरले. भवाळकरांनीं खटपट करून पुण्यात स्त्रिया जमवून त्यांना शिक्षण दिले.’’

याच संपादकीयात नरके यांनी म्हटले आहे कि ‘’ “सावित्रीबाईनी अहमदनगर येथे फरार बाईच्या व पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमध्ये अध्यापनाचे प्रशिक्षणही घेतले होते.अमेरिकन मराठी मिशनच्या वतीने मिस सिंथिया फरार यांच्यावर १८६२ साली लिहिलेल्या मृत्युलेखात महात्मा जोतिबा फुले यांचे प्रत्यक्ष नाव न घेता पुढील संदर्भ देण्यात आला आहे :` मुलींना शिक्षण देण्याची खूप इच्छा असलेल्या पुणे शहरातील एका तरुण सद्गृहस्थाला मिस फरार यांनी  आनंदाने सल्ला आणि मार्गदर्शन पुरवले. मुलींच्या शाळा सुरु करण्याबाबत आणि या शाळांचे व्यवस्थापन करण्याबाबत फरार यांनी या तरुणाला मार्गदर्शन केले. अहमदनगरहून पुण्याला परतल्यावर या तरुणाने हिंदू मुलींना शिक्षण देण्यासाठी तेथे  शाळा सुरु केल्या. मुलींच्या या शाळांना स्थानिक लोकांनी तसेच काही सत्प्रवृत्त ब्रिटिश लोकांनीं मदत केली आणि या शाळांनी पुढील काही वर्षांत खूप प्रगती केली. ‘’

अमेरिकन मराठी मिशनच्या सिथिया फरार यांच्याबाबत अमेरिकन मराठी मिशनच्या १९२०च्या अहवालात खालील माहिती आढळते-“या मिशनच्या कार्यात सहभागी होणाऱ्या सिंथिया फरार या पहिल्या अविवाहित अमेरिकन महिला होत्या. शंभर वर्षांपूर्वी, २९ डिसेंबर १८२७ रोजी, त्याचे येथे आगमन झाले.  अहमदनगर  येथे पहिल्यांदाच त्यांनी मुलींच्या शाळा सुरु केल्या.  त्यांनी ही सेवा सुरु केली तेव्हा काही हिंदू लोकांनी तिरस्कारयुक्त शब्दांत त्यांना सुनावले. ” आधी गाढवांना वाचण्याचे धडे ध्या आणि मग आमच्या मुलींना शिकवण्याचा  प्रयत्न करा !” मिस फरार यांच्यासाठी हा  नक्कीच खूप कष्टाचा मार्ग होता. मात्र हिंदुस्थानातल्या महिला आणि मुलींसाठी त्यांनी आपले कार्य त्यांना २५ जानेवारी १८६२ रोजी बढती मिळेपर्यंत ( निधनापर्यंत) सतत चालूच ठेवले.  त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ, या मिशनने अहमदनगर येथील मुलींच्या तीन डे -स्कुल्सचे नाव – द फरार स्कुल्स’ असेच ठेवले आहे. या तीन फरार शाळांच्या आता सुपिरिटेंडंट असलेल्या मिसेस एच फेयरबॅक यांनी लिहिले आहे “मागील वर्षाकडे वळून पाहताना आणि सर्व बाबी विचारात घेता, फरार स्कुल्समध्ये चालू  असलेल्या चांगल्या कार्याबाबत आनंद आहे. शाळांचे शिक्षक प्रामाणिक आहेत आणि शाळेतल्या छोट्या मुलींशी प्रेमाचे नाते आहे. गेल्या वर्षी  या तिन्ही शाळांना याआधी कधीही मिळाले नव्हते अशा  मोठ्या रकमेचे सरकारी अनुदान मिळाले आहे.” याच अहवालात अहमदनगर येथील फरार स्कुलच्या मुलींचा एक फोटो छापण्यात आला होता. विशेष म्हणजे अमेरीकन मराठी मिशनच्या वेळोवेळीच्या अहवालांत आणि इतर दस्तऐवजांत विविध मिशनरींचे, इतर व्यक्तीचे स्वतंत्र किंवा समूह फोटो प्रकाशित केलेले आहेत, मिस सिंथिया फरार यांचा मात्र त्यांच्या नावानिशी एकही स्वतंत्र फोटो दिसत नाही. कदाचित काही समूह फोटोंमध्ये फरार मॅडम असण्याची शक्यता आहे.

अमेरीकन मराठी मिशनच्या दस्तऐवजांत मिस सिंथिया फरार यांच्या व्यक्तिगत जीवनाविषयी आणि कार्याविषयी पुढील टिपण्णी आढळते-‘’ फरार यांच्या पूर्वायुष्याबद्दल सांगण्यासाठी आवश्यक ती माहिती आमच्याकडे नाही. रेव्हरंड सायरस स्टोन या आपल्या चुलतभावासह त्या हिंदुस्थानात १८२७ साली आल्या होत्या इतकेच आम्हाला माहित आहे. त्यावर्षी मुंबईत डिसेंबर अखेरीस पोहोचल्यानंतर लगेचच त्यांनी त्या शहरातील हिंदू मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न  सुरु केले. त्यांनीं मुलींच्या अनेक शाळा स्थापन केल्या आणि या शाळांत सर्वांत उच्च जातींच्या मुलीसुद्धा होत्या. या शाळांच्या त्या सुपरिंटेंडेंट म्हणून अनेक वर्षे कार्य करत असतानाच त्या शाळांत शिकवतसुद्धा असत. त्यांच्या या कार्यात मुंबईतील उच्चपदांवरील महिलांचे आणि सद्गृहस्थांचे त्यांना  प्रोत्साहन आणि मदत मिळत असे. आर्चडिकन (नंतरचे बिशप ) कार, सर रॉबर्ट ग्रांट यांच्या निधनानंतर मुंबईचे गव्हर्नर बनलेले जेम्स फारीश आणि त्याशिवाय इतर कितीतरी व्यक्तींनीं फरार यांना विविध प्रकारे मदत केली, त्यांना कौतुकाच्या शब्दांसह आपल्या कृतीनेही खूप प्रोत्साहन दिले.  आदरणीय आर्चडिकन  कार  यांच्यामार्फत एका इंग्लिश सोसायटीने अर्थसहाय्य  पुरवलेल्या अनेक शाळांच्या फरार सुपरिंटेंडंट होत्या.

फरार यांना आपल्या कामाची आवड होती आणि कुठलीही भौतिक सुखासाठी त्यांनी आपले हे कार्य सोडले नसते. कठीण परिश्रमांमुळे त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे .१८३७ साली त्यांना आपल्या मायदेशी, अमेरिकेत, परतावे लागले होते, मात्र रेव्हरंड बर्जेस यांच्या कुटुंबासह त्या १८३९ साली  हिंदुस्थानात परतल्या. या देशातल्या  आगमनानंतर लगेचच त्या बर्जेस दाम्पत्यासह अहमदनगर येथे आल्या. काही महिन्यांचा अपवाद वगळता या शहरातच त्यांचे कायम वास्तव्य होते आणि इथेच प्रामाणिकपणे आपले कार्य करत असताना त्यांचे निधन झाले. आपल्या तारणारा प्रभूसाठी सतत काही तरी करत राहण्याची त्यांची धडपड असायची. मृत्युशय्येवर असताना त्यांनीं म्हटले कि आपले दररोजचे परिश्रम (त्यांच्या स्वतःच्या दृष्टीने  अगदी सामान्य आणि हलक्या दर्जाचे ) दररोज रात्री आपल्या प्रभूच्या चरणी ठेवत त्यांचा स्वीकार व्हावा अशी प्रार्थना करत असत .

याच भावनेने त्यांनी आयुष्यभर खूप परिश्रम केले. फरार यांच्या शाळांतले अनेक माजी विद्यार्थिनी पत्नी आणि माता बनल्यानंतर आपल्या या शिक्षिकेची आठवण करत असत. फरार यांच्याविषयी प्रेम व्यक्त करणारी आणि त्यांनीं दिलेल्या ज्ञानदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी या विद्यार्थिनींची पत्रे फरार यांना वेळोवेळी यायची. मिस फरार यांच्याविषयी स्थानिक लोकांमध्ये  खूप आदर होता.  या लोकांच्या त्यांच्या स्वतःच्या   स्त्रियांबाबत असलेल्या दृष्टिकोनामुळे फरार यांना हे लोक एखादी दैवी व्यक्तीच  मानत असत.  फरार यांच्या जीवनातली शुद्धता आणि पावित्र्य, त्यांच्या हृदयाचा चांगुलपणा आणि स्त्रियांच्या कल्याणासाठी त्या करत असलेले परिश्रम या लोकांसाठी एक अत्यंत नवलाची बाब होती.

सन १८६० च्यानंतर सिंथिया फरार यांची प्रकृती ढासळत गेली. लष्कर लाईन्समधल्या मुलींची शाळा आणि कॅथेखिस्ट शाळेशी संबंधित असलेल्या मुलांची शाळा मिस फरार यांच्या देखरेखीखाली चालू राहिल्या. त्यांची प्रकृती बिघडल्यामुले या शाळांचे काम त्यांना थांबवणे भाग पडले. ते काम पुन्हा सुरु करणे त्यांना शक्यच झाले नाही. ‘’ सिथिया फरार यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी २५ जानेवरी १८६२ रोजी अहमदनगर येथे निधन झाले

फरार यांच्या निधनामुळे स्थानिक महिलांना धक्का बसला. यापैकी शेकडो महिला त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाल्या होत्या, त्याआधी या महिलांनीं कधीही कुठल्याही ख्रिस्ती विधीला हजेरी लावली नव्हती. त्यांच्या नेहेमीच्या परिचयाच्या चेहेऱ्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी या महिला शवपेटीजवळ आल्या तेव्हा एखाद्या दैवताचे दर्शन घ्यावे अशा पद्धतीने त्यांनी मान लववून वंदन केले.  या लोकांना नेहेमी जात येईल अशा ठिकाणी जर फरार यांना दफन केले असते तर कदाचित यापैकी अनेक महिलांनीं एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्राप्रमाणे त्या ठिकाणी भेट देऊन त्या कबरीवर फुले वाहिली असती. फरार यांच्या निधनानंतर अशाप्रकारे स्थानिक लोकांनीं त्यांच्याबद्दलचा आपला आदर आणि भक्तीच्या भावना प्रकट केल्या.

विशेष म्हणजे मिस फरार यांच्या निधनाच्या वेळी वीस वर्षे आधी अहमदनगर येथील अमेरिकन मराठी मिशनच्या  कुठल्याही मिशनरीचे किंवा सहाय्यक मिशनरींचे  कार्य करत असताना निधन झाले नव्हते. अहमदनगर येथील कबरस्थानात त्यावेळी आधीच्या केवळ तीन मिशनरींच्या कबरी होत्या. त्यापैकी एक रेव्हरंड हर्व्हे यांची होती, अहमदनगर येथे अमेरिकन मराठी मिशनचे केन्द्र स्थापन झाल्यानंतर सहा महिन्यांतच १८३२ला त्यांचे निधन झाले होते. दुसरी कंबर १८४२ साली निधन झालेल्या मिसेस बर्जेस यांची होती आणि  तिसरी कबर आता १८६२ साली निधन झालेल्या मिस फरार यांची होती. मिस फरार यांच्या निधनानंतर त्यांनीं अनेक वर्षे चालवलेल्या लष्कर लाईनमधल्या मुलींची शाळा बंद करणे भाग पडले. याचे कारण म्हणजे दोन वर्षांपूर्वी या परिसरातला आर्टिलरी आणि इंस्ट्रक्शन डेपो दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आला आणि त्यामुळे तेथील अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाले आणि फरार त्यांच्या या शाळेतील मुलींची संख्या एकदम घटली. फरार यांच्या निधनाआधीच या शाळेत नियमितपणे येणाऱ्या फक्त  तेरा-चौदा मुली होत्या.

फरार यांच्या मुलींच्या शाळेपाशी एक मुलांची शाळा होती.  मुलांच्या या शाळेच्या सुपरिंटेंडंट म्हणूनही त्यांनी काही काळ जबाबदारी सांभाळली होती. फरार त्यांच्या निधनानंतर त्यांच्यामागे राहिलेली रक्कम लष्कर लाईन्स मधल्या मुलींच्या आणि मुलांच्या शाळांसाठी वापरली जात होती. सिंथिया फरार यांची   मुलींची ही शाळा बंद करण्याचा दुःखद निर्णय अमेरिकन मराठी मिशनला घ्यावा लागला, मात्र दुसरा काही पर्याय नव्हता. मुलांच्या  शाळेने मात्र नंतर खूप प्रगती केली.फरार यांच्या मागे राहिलेल्या रकमेचा विनियोग शाळांतीळ मुलांसाठी करण्याचा निर्णय मिशनने घेतला.      अमेरिकन मराठी मिशनच्या १८६३ च्या अहवालानुसार, “अहमदनगर येथील मिसेस बॅलेन्टाईन यांच्या देखरेखीखाली असलेल्या शाळेची प्रगती होत आहे., या शाळेतील पाच मुलींना त्यावर्षी ख्रिस्ती धर्माची दीक्षा देण्यात आली. त्याशिवाय वयाने मोठ्या असलेल्या तीन विद्यार्थिनींची स्थानिक ख्रिश्चनांशी विवाह झाले आहेत. उच्च जातींतील मुलांसाठी आम्ही दोन शाळा चालवत आहोत. यापैकी एक शाळा अहमदनगर येथे आहे आणि दिवंगत मिस फरार यांच्या मागे राहिलेल्या निधीतून लष्कर लाईन्समध्ये आहे. या दोन्ही शाळांची भरभराट होत आहे.’’

मिस सिंथिया फरार यांच्या चरित्राविषयी आणि कार्याविषयी त्रोटक माहिती अमेरिकन मराठी मिशनच्या इतिहासात आणि गॅझेट्स मध्ये शोधावी लागते.सिंथिया फरार यांच्या विद्यार्थीनी असलेल्या सावित्रीबाई फुले यांचे नाव आता पुणे विद्यापिठाला देण्यात आले आहे. एकोणिसाव्या शतकात स्त्रीशिक्षणाबाबत त्यांनी केलेल्या महान योगदानाबद्दल तो त्यांचा उचित सन्मानच आहे. मात्र सिंथिया फरार यांचे नाव किंवा त्यांचे स्त्रीशिक्षणाबाबत योगदान याबद्दल आजही लोकांना काहीच माहिती नसते.महात्मा फुले यांना प्रेरणा देणाऱ्या सिंथिया फरार यांच्याविषयीचे फुले यांच्या वेगवेगळ्या चरित्रांत ओझरते उल्लेख वाचून फरार मॅडमच्या चरित्राबाबत उत्सुकता माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मात्र भारतीय स्त्रीशिक्षणात अत्यंत मोलाचे योगदान असणाऱ्या फरार मॅडमबाबत इतर कुठेही काही माहिती उपलब्ध नाही असे आढळले. मिस सिंथिया फरार यांच्या चरित्राविषयी आणि कार्याविषयी त्रोटक माहिती अमेरिकन मराठी मिशनच्या इतिहासात आणि गॅझेट्स मध्ये शोधावी लागते. अमेरिकन मराठी मिशनच्या गेल्या दोनशे वर्षांची कागदपत्रे, पुस्तके आणि अहवाल मी नजरेखालून घातले तेव्हा या दस्तऐवजांत वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली फरारबाईंची ही माहिती सापडली, त्यातून मिस सिंथिया फरार यांचे हे पहिलेच छोटेखानी चरित्र उभे राहिले आहे.

मुंबईत निधन झालेल्या आणि तेथेच स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहाचे दहन झालेल्या रेव्हरंड नारायण वामन टिळक यांची कबर अहमदनगर येथेच आहे. सिंथिया फरार यांची अहमदनगर येथे असलेल्या कबरीचा कधीकाळी शोध लागेल अशी शक्यता आता राहिलेली नाही.

एकोणिसाव्या शतकाच्या अगदी सुरवातीस कोलकाता येथे मेरी अँन कुक, मुंबईत मार्गारेट विल्सन, महाबळेश्वर येथे मिसेस मेरी ग्रेव्ह्ज, आणि मुंबई व अहमदनगर येथे मिस सिंथिया फरार या महिलांनी स्त्रीशिक्षणासाठी आणि महिला सबलीकरणासाठी मोठे योगदान दिले. या महिलांच्या या कार्यांची नोंद घेणे आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे योग्य ठरेल.

(उत्तरार्ध)

(लेखक नामवंत पत्रकार व ब्लॉगर आहेत)
९९२२४१९२७४

 

Previous articleस्त्रीशिक्षणाचा पाया आणि ख्रिस्ती मिशनरी
Next articleतू आणि ती…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.