संदीप सारंग
आषाढी एकादशी ! मराठी माणसाच्या सांस्कृतिक जीवनातला अत्यंत महत्त्वाचा दिवस. बहुजन समाजाच्या उत्साहाला-आनंदाला या दिवशी उधाण येते. खाण्यापिण्याची पर्वा न करता, मिळेल तिथे मुक्काम करत, ऊन-वारा-पाऊस-गारा अंगावर झेलत पंधरा-वीस-पंचवीस दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चालत येऊन पंढरीत दाखल झालेल्या वारकऱ्यांच्या कष्टाचे आज चीज होणार असते. आज त्यांना त्यांच्या लाडक्या विठूरायाचे दर्शन होणार असते. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः पंढरपूरात एक आगळेवेगळे चैतन्य पसरते. सबंध माहौल भक्तीरसाने ओसंडून वाहतो. आसमंत विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून जातो.
विठ्ठलभक्तांच्या या भावधुंद उपस्थितीला काहीजण ‘वैष्णवांची मांदियाळी’ म्हणतात. वास्तविक, आषाढी एकादशीनिमित्त जनमानसात जे चैतन्य तरारून येते, त्याचे असे वर्णन करणे चुकीचे आहे. ते वस्तुस्थितीला धरून नाही. किंबहुना, ते सत्याचा विपर्यास करणारे आहे. गेली किमान सातशे वर्षे केवळ वैष्णवच नव्हे, तर शैव, शाक्त, बौद्ध अशा विविध विचारधारेचे लोक विठ्ठलाच्या भेटीसाठी एका आंतरिक ऊर्मीने-ओढीने पंढरपूरला येत आहेत. बहुजन, दलित, अस्पृश्य असे अनेक समाजसमूह कितीही अडचणी आल्या तरी पंढरपूरची वारी चुकवत नाहीत. मुस्लिम, सुफी इ. मंडळीही या सोहळ्यात मनःपूर्वक सहभागी होत असतात. याचा सरळ अर्थ, वारीच्या व्यापक अभिसरणाला ‘वैष्णवांची मांदियाळी’ असे संबोधणे संकुचितपणाचे ठरते. विठ्ठल कधीच विशिष्टांचा नव्हता. तो कायम अमर्याद होता, सर्वांचा होता.
परंतु काटेकोरपणे ठरवायचेच झाले तर, तो वैष्णव असण्यापेक्षा अवैष्णवच जास्त होता. भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून दोन ठळक आणि परस्परविरुद्ध प्रवाह चालत आलेले आहेत. एक वैदिक, तर दुसरा अवैदिक! यापैकी अवैदिक संस्कृती ही भारतीय भूमीतली मूळची लोकपरंपरा होय. याच लोकसंस्कृतीने मोहेंजोदडो-हडप्पा नावाची त्याकाळची प्रगत संस्कृती जन्माला घातली. भूशास्त्रीय किंवा पर्यावरणीय किंवा अन्य कोणत्या तरी कारणांनी ती जमिनीखाली गाडली गेली. जी वाचली-बचावली ती आपल्या शैलीत श्रमिक जीवन जगत राहिली. पुढे अनेक समूह स्थलांतर करत भारतभूमीत आले. स्वाभाविकच, मूळचे आणि उपरे असा संघर्ष झाला. परंतु क्रमाने त्यांच्यात समन्वयही झाला आणि संकरही झाला. संघर्ष-समन्वयाच्या या दीर्घ-व्यामिश्र प्रक्रियेत जे जेते ठरले ते स्वतःला उच्च व वरिष्ठ मानू लागले. वेदांना आणि त्यातल्या यज्ञरूपी कर्मकांडांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी
वैदिक संस्कृती निर्माण केली. या संस्कृतीत पुरोहितवर्ग सोडून इतरांना दुय्यम, कनिष्ठ ठरविण्यात आले आणि त्यांचे दमन केले जाऊ लागले. या वर्गाने समाजातील उर्वरित जीवनवैशिष्ट्यांचे पतन करून स्वतःची संस्कृती प्रस्थापित करण्याचा अथकपणे प्रयत्न केला. विषमता हा या संस्कृतीचा प्राण होता, तर शोषण हा स्थायीभाव ! चातुर्वर्ण्यव्यवस्था हे तिचेच अपत्य !
वैदिकांच्या या लोकविरोधी धोरणाविरुद्ध अवैदिक संस्कृतीने सातत्याने संघर्ष केला. याच संघर्षातून शिव, राम, कृष्ण, बुद्ध, महावीर, बळी, प्रल्हाद, विरोचन असे असंख्य नेते आणि तत्त्ववेत्ते जन्माला आले. या सर्वांनी त्यांच्या त्यांच्या काळात वैदिकपुरस्कृत विषमतेच्या आणि शोषणाच्या विरोधात रणशिंग फुंकून शेतीप्रधान गावगाड्यातील शेतकऱ्यांना आणि अन्य समूहांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यातूनच हे सर्वजण लोकांच्या गळ्यातले ताईत झाले. लोकनायक म्हणून गणले जाऊ लागले. बहुजन समाजाने त्यांना साक्षात परमेश्वराचा दर्जा दिला.
जसजसे अवैदिक छावणीत शिव, राम, कृष्ण मोठमोठे होत होते तसतसे त्यांना टक्कर देण्यासाठी तिकडे वैदिकांच्या गोटात इंद्र, विष्णू इत्यादी देव उदयाला येऊ लागले. कालांतराने इंद्र मागे पडला आणि विष्णू उरला. अवैदिक परंपरेत जेव्हा बुद्ध जन्माला आला, तो लोकप्रिय होऊ लागला, जगभर पसरू लागला, तसतसा त्याला रोखण्यासाठी विष्णूला मोठं करण्याशिवाय वैदिकांसमोर पर्याय उरला नाही. मात्र इतके करूनही विष्णू एका विशिष्ट गटापुरताच मर्यादित राहत होता. ही मर्यादा वैदिकांच्या फायद्याची नव्हती. कारण त्यांचे जगणे त्यांच्या स्वतःच्या गटावर अवलंबून नव्हते, तर ज्या मोठ्या समाजगटात शिव, राम, कृष्ण, महावीर, बुद्ध, बळी यांना मानाचे स्थान होते त्या गटावर अवलंबून होते. समाजाच्या या मोठ्या गटाचे, म्हणजेच बहुजन समाजाचे शोषण हा वैदिकांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य स्रोत आणि आधार होता. त्यामुळे त्याच्यापासून तुटले जाणे हे वैदिकांच्या दृष्टीने आत्मघात करून घेण्यासारखे होते. हा पेच सोडविण्यासाठी अफलातून रणनीती आखण्यात आली. अवैदिकांना (म्हणजे बहुजनांना) वैदिक हे आपलेच वाटत राहावेत यासाठी त्यांचे लोकनायक आपलेसे करण्याचा सपाटा वैदिकांनी (म्हणजे वैष्णवांनी) लावला. त्यातूनच राम, कृष्ण, महावीर, बुद्ध हे सारे विष्णूचेच अवतार आहेत, असा प्रचार करण्यात आला. ‘वैष्णवांची मांदियाळी’ ही शब्दयोजना त्यातूनच आली आहे.
इसवीसनाच्या तीनचार शतके आधी आणि सातआठ शतके नंतर भारतीय समाजावर बौद्ध धर्माचा व्यापक प्रभाव होता. महायान बौद्धांनी बुद्धाचे प्रचंड उदात्तीकरण केले होते. केवळ भारतातच नव्हे, तर आशिया खंडात सगळीकडे बुद्धाच्या भव्य मूर्ती, लेणी, स्तूप, विहार, चैत्य बांधले जाऊ लागले होते. बुद्ध एका अढळ स्थानावर, अप्राप्य उंचीवर पोहोचला होता. लार्जर दॅन लाइफ बनला होता. यातूनच त्याची भक्ती करण्याची प्रथा सुरू झाली. भारतीय उपखंडातील भक्ती चळवळीचा हा उगम होय. भागवत संप्रदायाची ही पार्श्वभूमी आहे. भागवत हा शब्द बुद्धाच्या भगवान या उपाधीतून आला आहे.
हळूहळू बुद्ध विविध रूपात जागोजागी दिसू लागला. पंढरपूरचा विठ्ठल हा त्यापैकीच एक ! इथे एक लक्षात घेतले पाहिजे ते म्हणजे, विठ्ठल (बुद्ध) केवळ भक्तीचा विषय नव्हता, तर तो काहीएक विचारही सांगत होता. हा विचार समतेचा, सेवाभावाचा, करुणेचा, बुद्धिप्रामाण्याचा होता. म्हणूनच विठ्ठलाचे कोणतेही कर्मकांड नाही. त्याच्या दारात समानता आहे. (त्याचे वैदिक पद्धतीचे कर्मकांड, मंदिरातला भेदभाव इ. गोष्टी वैदिकांनी नंतरच्या काळात चलाखीने सुरू केल्या.) विठोबा हा मुख्यतः समाजातल्या उपेक्षित, कनिष्ठ थरातील मंडळींचा जिवाभावाचा सखा होता. संतांच्या दुर्मीळ पोथ्या, ओव्या, अभंग आजही दलित, ओबीसी समाजातील कुटुंबांमध्ये सापडतात. जे स्वतःला वैष्णव म्हणवितात त्यांच्या घरी नव्हे ! अगदी अलीकडेपर्यंत भगवद्गीता, वारकरी परंपरा, भागवत संप्रदाय या गोष्टी आपल्या नाहीत ही भावना उच्चवर्णात प्रबळ होती. ब्राह्मण वर्गात मागच्या दीडदोनशे वर्षांपर्यंत गीता वाचण्यावर बंदी होती. यावरून हे स्पष्ट होते की, पंढरपूरची गर्दी ही वैदिकांची वा वैष्णवांची मांदियाळी नाही. शेकडो वर्षे तिथे जमणाऱ्यांमध्ये बहुसंख्य बौद्ध असत. म्हणून तर चंद्रभागेच्या वाळवंटात जमलेल्या
लाखो भाविकांकडे पाहून संत रामदास ‘…येथे बौद्धजन दिसती…’ असे उत्स्फूर्तपणे उद्गारले होते ! नामदेव, जनाबाई, ज्ञानेश्वर, चोखामेळा, सोयराबाई, सावता माळी, गोरा कुंभार, एकनाथ, तुकाराम हे सारे संत जातीपातीच्या पलीकडे गेले होते. किंबहुना म्हणूनच ते भागवत संप्रदायाचा अविभाज्य भाग बनले. भागवत संप्रदाय हे वर्णजातनिष्ठ धारणा बाळगणाऱ्या वैदिक संप्रदायाच्या विरोधातले एक प्रकारचे बंड होते. ‘ज्ञानदीप लावू जगी’ हा नामदेवांचा ध्येयवाद वैदिकांच्या संस्कृतीत कुठे बसत नाही. अवघ्या विश्वाचे कल्याण मागणारे ज्ञानेश्वरांचे पसायदान आणि प्राणिमात्रांवर प्रेमाचा वर्षाव करणारी एकनाथांची करुणा वैष्णव परंपरेत आढळत नाही. रंजल्यागांजल्यांना ‘आपुले’ म्हणणारे तुकाराम वैदिकांना झोंबतात. याचा अर्थ, वैदिक धर्म आणि भागवत धर्म हे एकच नव्हेत. थोडक्यात, आषाढी एकादशीला पंढरीत जमते ती सकलांची, विशेषतः अवैष्णवांची मांदियाळी असते, केवळ वैष्णवांची नव्हे…
(लेखक हे संतसाहित्य व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत)
9969864685
एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात ‘वारी’ बद्दल जे अपसमज आहेत ते दृढ करण्याचे कार्य वैदिकांनी केले, आपण त्या कटकारस्थानांचे बळी आहोत,ही जाणीव ही मांडणी करुन देते. सामाजिक अभिसरनास उपयुक्त.