पत्रकारितेत बदलांमधील संधी !

-शेखर पाटील

प्रसारमाध्यमांच्या कार्यसंस्कृतीत असणार्‍या अर्ध-सरंजामी ( काही ठिकाणी पूर्ण सरंजामी ! ) पध्दतीत सोशल मीडियाच्या आगमनानंतर बर्‍यापैकी फरक पडल्याचे दिसून येत आहे. अगदी आधीचे सासू-सुनांमधील नाते हे अलीकडच्या काळात बर्‍यापैकी बदललेले दिसते. याच प्रकारे, अलीकडे संपादक तसेच वरिष्ठ पातळीवरील मंडळींचे सहकार्‍यांसोबतचे वागणे हे ‘रिश्ता वोही सोच नयी !’ अशा पध्दतीत बदलल्याचे आपण पाहत आहोतच. यासोबत आपण मीडियाच्या अमुक-तमुक मोठ्या ब्रँडमध्ये काम करतोय आणि दुसरा तुलनेत लहान संस्थेत काम करतोय याबाबत असणारा तुच्छतावादही मोडीत निघण्याच्या मार्गावर आहे. कारण आज जसा संपादक आणि एखाद्या खुर्द वा बुद्रुक गावाचा वार्ताहर हा एकाच पातळीवर आहे; अगदी तशाच प्रमाणात मोठ्या मीडिया हाऊसेसमधील कर्मचारी आणि गावोगावची हौशी पत्रकार मंडळीदेखील एकसमान पातळीवर आल्याचे दिसून येत आहे. कारण त्यांच्या समोरील आव्हाने आणि अमर्याद संधी एकसमान आहेत. गेल्या काही दिवसांमधील दोन महत्वाच्या घटना याची ग्वाही देणार्‍या ठरल्या आहेत.

राज्यातील आघाडीचे मीडिया हाऊस असणार्‍या लोकमतने अलीकडेच ‘लोकमत भक्ती’ या नावाने युट्युब चॅनल सुरू केले आहे. याआधी काही दिवसांपूर्वीच सकाळनेही ‘सुगरण टिव्ही’ या नावाने युट्युब चॅनल कार्यान्वित केलेले आहे. यातील ‘सुगरण टिव्ही’ हे चॅनल ओटीटी अर्थात ‘ओव्हर द टॉप’ या प्रकारातील असून यात स्ट्रीमिंगचा समावेश आहे. तर लोकमतचे कार्यक्रम हे ‘रेकॉर्डेड अपलोड’ या प्रकारातील आहे. या दोन्ही घटनांचे आपण खुल्या दिलाने स्वागत केले पाहिजे. बहुतांश वर्तमानपत्रांच्या न्यूजरूममध्ये युट्युब अथवा फेसबुकच्या व्हिडीओजबाबत हेटाळणी केली जात असतांना आघाडीची दोन वर्तमानपत्रे हे उशीरा का होईना याचे महत्व ओळखू लागल्याची बाब लक्षणीय आहे. यातील दुसरा मुद्दा हा संबंधीत युट्युब चॅनलच्या विषयांचा आहे. लोकमतचे भक्ती हे चॅनल नावातच नमूद असल्यानुसार आध्यात्मिक विषयांशी संबंधीत असून सकाळचे सुगरण हे चॅनल खाद्यसंस्कृतीला समर्पित असणारे आहे. या दोन्ही मातब्बर मीडिया हाऊसेसनी आपापल्या चॅनल्ससाठी निवडलेले विषय देखील बदलत्या काळानुसार असल्याचे आपण लक्षात घ्यायला हवे. प्रसारमाध्यमांमध्ये व्यवसाय करणार्‍या कंपन्यांच्या मालकांना आता ‘काँटेक्श्‍चुअल कंटेंट’ हवे आहे. अर्थात, आपले वर्तमानपत्र असो की, डिजीटल मंच ! आता बातमीची प्राथमिकता बदलली आहे. आपल्या मीडिया हाऊसमधून प्रकाशित वा प्रसारीत होणारे कंटेंट हे वर्तमानाशी सुसंगत व प्रासंगीक असावे. विविध ‘टार्गेट ग्रुप्स’ लक्षात घेऊन त्या पध्दतीने याची गुंफण करण्यात यावी अशी अपेक्षा आता मीडिया संस्थांच्या मालकांची आहे. यामुळे आता प्रसारमाध्यमांमधील बीटची संकल्पना सुध्दा नवीन पातळीवर जाणार आहे. यातील बदलांना स्वीकारणार्‍यांना अमाप संधी असली तरी बदलण्यास तयार नसणारे या स्पर्धेतून बाद होणार आहेत.

साधारणपणे २०१० पर्यंत वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या जे सादर करतील ते वाचक/प्रेक्षक स्वीकारत होता. कारण त्यांना कोणताही पर्याय नव्हता. यानंतर मात्र सोशल मीडियामुळे सर्वसामान्यांना एक विश्‍वव्यापी व सर्वात महत्वाचे म्हणजे सुलभ आणि मोफत माध्यम उपलब्ध झाले. यातून मोठ्या जनसमुदायाच्या आवडी-निवडी ठळकपणे समोर येऊ लागल्या. मीडिया हाऊसेसलाही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केलेल्या कंटेंटला मिळालेल्या प्रतिसादावरून अनेक नवीन बाबींचे आकलन झाले. लोकांना नेमके काय आवडते याची माहिती लाईक/कॉमेंट/शेअरच्या माध्यमातून मिळू लागली. याचे विश्‍लेषण करून टार्गेट ग्रुप्स समजले. यातून आपल्या मीडियात कामाचे काय ? आणि भारूड भरती काय ? याचे आकलनही झाले. यामुळे विद्वत्ता प्रचुर अथवा कितीही वैचारिक लिखाण दिले तरी लोकांना आकर्षीत करणारे कंटेंट नसेल तर याचा काहीही लाभ होत नसल्याचेही स्पष्ट झाले. यातून वर नमूद केल्यानुसार वर्तमानाशी सुसंगत कंटेंट देण्याची स्पर्धा सुरू झालीय. लोकमत आणि सकाळच्या युट्युब चॅनल्सचे विषय हेच दर्शवत आहेत.

वर्तमानपत्रांच्या मालकांनी जसा गिअर बदललाय तसाच आता जाहिरातदारही बदलण्याच्या मार्गावर आहेत. आधी वर्तमानपत्राच्या संपादकाचा अग्रलेख वा अन्य वैचारिक लिखाण हे सर्वाधीक लोकप्रिय असल्याची समजूत होती. ‘कंटेंट अ‍ॅनालिसीस’ने यापेक्षा बॉलिवुड वा क्रिकेटच्या बातम्या, गुन्हेगारी, राजकीय उखाळ्या-पाखाळ्यांना अधिक वाचकवर्ग असल्याचे दाखवून दिल्यानंतर अग्रलेख हा नावापुरता उरला आहे. अगदी त्याच प्रकारे जाहिरातदारही बदलू पाहत आहेत. आजवर वर्तमानपत्राच्या खपावर जाहिरातीचे दर ठरतात. मात्र माझी जाहिरात लोक पाहतात की नाही ? याचा मला नेमका किती लाभ होणार ? याचे अ‍ॅनालिसीस आता अनेक जाहिरातदार वैयक्तीक पातळीवर करू लागले आहेत. यामुळे जाहिरातीच्या पानांचे पेज पोझीशन बदलण्याची शक्यता आहे. जिथे वाचक जास्तीत जास्त वेळ असतो त्या पानावर आमची जाहिरात हवी अशी मागणी जाहिरातदार करू शकतात. डिजीटल मीडियात काऊंट स्पष्टपणे दर्शविण्यात येत असतो. तर मेनस्ट्रीम मीडियात अशी कोणतीही सोय नसल्याने अनेक जाहिरातदार त्रासल्याचे दिसून येत आहेत. यामुळे अर्थातच, वर्तमानपत्राच्या मालकांना ज्या पध्दीत काँटेक्श्‍चुअल कंटेंट हवेय, अगदी त्याच प्रकारे जाहिरातदारांना आपण खर्च करत असलेली रक्कम आणि याच्या बदल्यात होणारा लाभ याचे गुणोत्तर हवे आहे.

प्रसारमाध्यमांचे अविभाज्य घटक असणारे वाचक/प्रेक्षक व अलीकडच्या भाषेत सांगायचे तर युजरची आवड-निवड स्पष्ट झालीय. मालकही यानुसार बदलू पाहत आहेत. जाहिरातदारही या बदलास औत्सुक्याने बघत आहेत. तर या प्रणालीतील चौथा आणि सर्वात महत्वाचा घटक अर्थात पत्रकार हा या बदलांना कसे स्वीकारणार यावरच आधीच्या तिन्ही घटकांचे समाधान अवलंबून आहे. यात अलीकडच्या काळाचा वेध घेतला असता, पत्रकाराला आपल्या कौशल्यात थोडी वृध्दी करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आजवर मुद्रीत माध्यमातील पत्रकार हा शब्द संपादन करत असल्याचे सर्वांना माहित आहेच. याच्या जोडीला प्रतिमा व चलचित्र संपादनाची प्रक्रिया देखील मीडियाचा अविभाज्य घटक बनली आहे. तर डिजीटल माध्यमात एकंदरीतच माहितीवरील प्रक्रियेचा समावेश आहे. यामुळे पत्रकाराची भूमिका ही माहिती/शब्द संकलन व संपादनापासून ते इन्फो प्रोसेसरपर्यंत पोहचली असल्याचे आपल्याला लक्षात घ्यावे लागणार आहे. यामुळे व्यापक अर्थाने विचार केला असता, मोठ्या संपादकापासून ते अगदी मिनीमम रिसोर्सेसमध्ये पोर्टल वा युट्युब चॅनल सुरू करणार्‍या समोरचे आव्हानही एकसमान आहेय अन् संधीही ! या दोन्ही टोकाच्या घटकांना आपापल्या इन्फो प्रोसेसिंगचे कौशल्य पणास लावावे लागणार आहे. कारण वाचक/प्रेक्षक/युजर यांना काय आवडेल आणि काय नाही याचे अचूक गमक कुणालाही समजलेले नाही.

आज लोकमत व सकाळने भक्ती वा रेसिपीची चॅनल्स सुरू केलीत. येत्या काळात मनोरंजन, व्यापार, उद्योग, कृषी, लोकसंस्कृती आदींसारखे अनेकविध चॅनल्स सुरू होतील हे आजच लिहून ठेवा. आणि संपादक व न्यूजरूमधील अन्य कर्मचार्‍यांची गुणवत्ता आणि उपयुक्तता ही अर्थातच, लाईक/कॉमेंट/शेअर म्हणजे व्यापक स्वरूपात ‘एंगेजमेंट’च्या स्वरूपात जोखली जाणार आहे. अजून एक महत्वाची बाब म्हणजे, आजवर संपादक म्हटला की, तो राजकीय, सामाजिक व एकूणच वैचारिक लिहणारा वा यावर बोलणारा असावा असा अलिखीत नियम आहे. आता संक्रमणाच्या काळात संपादक हा उत्तम ‘इन्फो प्रोसेसर’ व वर्तमानाची जाण असणारा असावा हे अधोरेखीत झाले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे पत्रकारीतेत आजवर वर्ज्य असणार्‍या विषयांवर लिहणारे, बोलणारे अथवा कार्यक्रमाचे सादरीकरण करणारेच भविष्यातील संपादक व मोठे पत्रकार असतील. लोकप्रिय भाषेत बोलायचे तर पत्रकार हा ३६० अंशातून जगाकडे बघणारा आणि त्याच प्रमाणे कंटेंट क्रियेट करणारा असावा हे अभिप्रेत आहे. यात खूप मोठी संधी दडलीय. जो बदलेल तो यश मिळवेल. जे बदलणार नाहीत ते बदलांना शिव्याशाप देण्याशिवाय काहीही करू शकणार नाहीत.

(लेखक नामवंत पत्रकार , ब्लॉगर व टेक्नोक्रेट आहेत.)

92262 17770

https://shekharpatil.com

Previous articleकाश्मीरची नवी ‘आशा’
Next articleएकाकीपण की समाजविन्मुखता?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here