एकाकीपण की समाजविन्मुखता?

साभार: साप्ताहिक साधना

– सुरेश व्दादशीवार

माणसे सारखी नसतात. ‘व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती’ असे आपणच म्हणतो. प्रत्येकाचे संस्कार, अनुभवविश्व आणि वैचारिक वेगळेपण लक्षात घेतले की; त्या साऱ्यांचे एकाकीपणही सारखे नसणार, हे लक्षात येते. कोणी अंत:स्थ होईल, तर कोणाला बाह्य जगताची ओढ वाटू लागेल. कोणी शांत, तर कोणी अस्वस्थ असेल. एखाद्याचा दाबून ठेवलेला संताप कधी तरी उफाळेल, तर कधी काहींचे दडवलेले प्रेम उगवू पाहील. सगळी माणसे साधू वा संत नसतील. त्यांना ईश्वरचरणी लीन होण्यात एकाकीपण घालवावेसे वाटेल. सामान्य माणसांचे साधेपण त्याहून वेगळे असते. त्यातून आताचे जग व्यक्तिकेंद्री, विकेंद्रित होत जाणारे, व्यक्तीला स्वयंभूपण देणारे आणि तिचे आत्मभान वा अहंता वाढविणारे आहे. त्यामुळे एकाचा विचार वा निष्कर्ष साऱ्यांना लागू करता येणार नाही. तसे करणे हा साऱ्यांवरचा अन्याय होईल. परिणामी, प्रत्येकाचे एकाकीपण हा एक स्वतंत्र विषय होतो.
…………………………………………………..

ज्यांचा साऱ्यांना आधार वाटतो, ज्यांच्या अस्तित्वामुळेच अनेकांच्या मना-जीवनात एक सुरक्षिततेची व आश्वस्ततेची भावना येते, त्यांना कोणाचा आधार असतो? त्यांना कोणामुळे त्यांचे एकाकीपण घालविता येते? अशी माणसे राष्ट्राच्या जीवनात असतात, समाजजीवनात असतात आणि कुटुंबातही असतात. बाकीची माणसे त्यांच्याकडे मार्गदर्शन, दिशा, सल्ला असे सारेच मागतात वा तशी अपेक्षा त्यांच्याकडून राखतात. या लोकांच्या आश्वस्त असण्याचा प्रश्न नसतो; ते ज्यांच्यामुळे आश्वस्त होतात त्यांचा असतो. राजीव गांधींच्या मृत्यूनंतर सोनिया गांधी बरीच वर्षे राजकारणापासून दूर राहिल्या.

काँग्रेस पक्षाचे सारे नेतृत्व 1999 च्या सुमारास त्यांच्याकडे येऊन त्याच त्या पक्षाच्या आधारशिला बनल्या. मुले लहान होती आणि पक्षात अनुयायी होते, ते एकनिष्ठही होते. पण अखेरचे निर्णय घेताना, पक्षाला नवी दिशा देताना, त्याला पराजयाकडून विजयाकडे नेताना आणि अखेरच्या क्षणी देशाने दिलेले पंतप्रधानपद सोडून तो सन्मान डॉ.मनमोहनसिंग यांना देताना त्यांच्याजवळ कोण होते? त्यांना कोणाची साथ वा सल्ला होता? सारे निर्णय त्यांचेच होते. अशा व्यक्तींची उदाहरणे इतिहासात व वर्तमानातही अनेक सापडतील. अशा व्यक्तींच्या एकाकी अवस्थेचा विचार करताना आपलीच बुध्दी मार्ग शोधू लागलेली दिसते. नेतृत्वाला जनतेचा आधार असतो, पक्षाचा पाठिंबा असतो; पण ज्यांचे नेतृत्वच नव्याने उदयाला येत असते, त्यांच्या मानसिकतेचे चित्र कसे असते?

हे मनमोहनसिंगांबाबत किंवा वाजपेयींबाबत म्हणता येत नाही. मनमोहनसिंगांवर काँग्रेसाध्यक्ष व यूपीएच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधींचे वर्चस्व होते; शिवाय त्यांची मानसिकता अशी की, उद्या राहुल गांधी पंतप्रधानपदावर आले तर त्यांचा सहकारी म्हणून काम करायलाही मला आवडेल, असे ते म्हणायचे. वाजपेयींचे पक्षावर नियंत्रण नव्हते, त्याची सूत्रे अडवाणींच्या हाती होती आणि संघ परिवार त्यांना जुमानत नव्हता. वाजपेयी नागपूरच्या संघस्थानी गेले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी संघाचा कोणताही मोठा नेता उपस्थित राहू नये, अशी व्यवस्थाच संघाने केली होती. परिणामी- ते आले, त्यांनी एकट्यानेच डॉ.हेडगेवारांच्या समाधीचे दर्शन घेतले व सरळ विमानतळ गाठून ते दिल्लीला रवाना झाले. मोदी सर्वतंत्र स्वतंत्र आहेत. पक्ष मुठीत आणि संघ त्यांच्या भीतीत आहे. त्यामागे फारसे जाण्याचे कारण नाही. नेहरू सर्वश्रेष्ठ होते. इंदिरा गांधींना ते स्थान 1969 नंतर प्राप्त झाले. राजीव गांधींवर नियंत्रणे नव्हती. नंतरचे सारे पंतप्रधान आघाडी सांभाळण्यात त्यांचे स्वत्व घालवितानाच अधिक दिसले. पंतप्रधानपदावरील मोठ्या माणसांसारखीच स्थिती अन्यत्रही आढळते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान किंवा म्यानमारच्या आँग साँग स्यू की या लष्कराच्या हातचे बाहुलेच तेवढे आहेत. मिळेल तेवढ्या मोकळेपणातच त्यांना त्यांचे व्यक्तित्व अनुभवता येते.

उद्योगपती, पक्षनेते, संघटनांचे पुढारी व अगदी कुटुंबप्रमुख यांचीही स्थिती यातल्या काहींसारखीच असते. प्रस्तुत लेखकाच्या संबंधातले एक उद्योगपती आहेत. त्यांच्या गावोगावी इस्टेटी व मालमत्ता आहेत. घरातली मुले दूर राहतात, आई गेली, पत्नी गेली. आपले एकाकीपण घालविण्यासाठी ते जगभर फिरतात, देशातही कुठे कुठे जातात, पण जाणवते हे की, प्रत्येक जागी त्यांचे एकाकीपण त्यांच्यासोबत असते व त्यावर मात करण्याची त्यांची धडपड असते. मात्र अशीही माणसे प्रसंगी विरघळतात. सोबतच्या साऱ्यांची होतात. त्यांचे दूरस्थ एकाकीपण काही काळ हरवल्यासारखे होते. तो क्षण कशाचा असतो? आत्मविस्मृतीचा, आत्मलढ्याचा की ओढून-ताणून आणलेले पांघरूण घेणे. पण यातले खरेपण कधी कधी जाणवते व ते आपल्यालाही स्पर्शून जाते.

ज्यांचे अहंकार मोठे असतात, त्यांनी त्यांच्या आत्मविश्वासावरही मात केलेली असते. त्यांचे एकाकीपण हेच त्यांचे जीवन होत असावे काय? ट्रम्प, पुतिन, जिनपिंग किंवा मोदींचे एकाकीपण या पातळीवरचे आहे काय? इतिहासातले सम्राट, राजे, रजवाडे असेच सांगता येतील. पण त्यातही अंतर आढळते. कौरवांमध्ये ही बाजू दिसते, पांडवांमध्ये दिसत नाही. अहंताच आत्मविश्वासाच्या पातळीवर उतरणारी असेल, तर राम तयार होतो. तेथे एकाकीपण असले, तरी ते जाणवत वा खुपत नाही. एक गोष्ट मात्र नक्की की, अशी ही अहंकारी माणसे सदैव आत्ममग्न राहत असल्याने तशीही एकटी व एकाकीच राहतात. ही आत्ममग्नता समाधान देणारी असते, ती केवळ आपल्या अस्तित्वाचे अतिरिक्त भानच तेवढे देत असते.

आत्ममग्नता म्हटली की, आपल्या पुराणकथांमधील व वैदिक काळातील ऋषी-मुनींची आयुष्ये डोळ्यांसमोर येतात. त्यांच्या कथा ज्ञानी माणसांच्या आहेत, पण समाधानी माणसांच्या नाहीत. तशा त्या नीतीच्याही कमीच आहेत. अशा माणसांचे एकाकी जिणे कसे असेल? वेदांच्या रचयित्यांमध्ये ‘दीर्घतमस काम’ या जन्मांध ऋषीची कथा आहे. त्याच्या अश्लील चाळ्यांना कंटाळलेल्या त्याच्या पत्नीने व मुलाने त्याला दोरांनी बांधून गंगेत सोडून दिले, असे ही कथा सांगते. याज्ञवल्क्याने यतातीच्या मुलीच्या मोबदल्यात त्याला हजार गाई दिल्याचीही एक गोष्ट त्यात येते. मग या कथा वाचू नये, असेच मनात येत राहते. अशा वेदज्ञांच्या जीवनातले एकाकीपण तरी समाधानाचे असेल काय? ऋषींच्या कथा अशा, तर दैवतांच्या? त्याही तशाच. दशरथराजा पुत्रांसाठी दुःखी. मग त्याचे यज्ञयाग. त्याव्दारे त्याला पुत्रप्राप्ती. पुढे पुत्रवियोग. सीतादेखील शेतात सापडलेली. महाभारतात तर कौरव-पांडवांच्या युद्धाएवढ्याच त्यांच्या, त्यांच्या गुरूंच्या व पूर्वजांच्या जन्मकथाही गूढांनीच दडवलेल्या आहेत. त्यातले सत्य सांगणाऱ्या सोबतच्या कथा तर अतिशय व्यथित व अचंबित करणाऱ्या आहेत. ही माणसे त्यांची आयुष्ये कशी जगली असतील? त्यांना त्यांच्या जन्मकथांनी व्यथित केले असेल, की तत्कालीन परंपरांनी त्यांच्या मनांची समजूत खरोखरीच घातली असेल? ही माणसे ज्ञानी होती, राजपदावर होती म्हणून हे विचारायचे. इतरांच्या कथा तर आणखीच दयनीय व विलक्षण.

एकाकीपणाची आणखी एक व्यथा ही की, पुरुषांना ती बोलून दाखविता येते. स्त्रियांना ती चोरटेपणीही सांगता येत नाही. निदान आपल्याकडे नाही. आहे ते सारे व्यवस्थित आहे- घरातली माणसे, मुलेबाळे सारे सांभाळून घेणारी व आपल्यालाही समजून घेणारी आहेत- असा आवच त्यांना बहुधा आणावा लागतो. एकट्या राहणाऱ्या, एकटेपण वाट्याला आलेल्या, अविवाहित, परित्यक्त्या, विधवा वा जाणीवपूर्वक एकट्या राहिलेल्या स्त्रियांची अवस्था कशी असते? ज्या स्त्रियांकडे पाहावे असे वा अशा कुणी नाही. ज्याच्याशी वा जिच्याशी बोलावे, निदान फोन करावा असे कोणी नाही. त्यातून आपल्या एकाकीपणाला दुबळेपण वाटू न देण्याचीच त्यांची शिकस्त असते. मग त्या आणखीच दयनीय होतात. मला आजवर कोणाची कधी गरजच वाटली नाही, वाटत नाही वा वाटणार नाही असे म्हणणारे पुरुष व स्त्रिया या मुळातच अभागी व दुर्दैवी असतात. त्यांचे ते वरपांगी सांगणे सहजपणे लक्षात येणारे असते.

या साऱ्या चर्चेच्या मुळाशी असणारा खरा प्रश्न हे एकाकीपण एकट्याला वा समूहात राहणाऱ्या अनेकांच्या वाट्याला येतेच का व कसे? सहयोगी होणारे कोणी नसते म्हणून की सहयोग करावा असे त्यांच्याजवळ काही नसते म्हणून, सहयोग असतानाही ते येत असेल तर तो सहयोग खोटा असतो की केवळ देखावा? आपले, एकटेपण वा एकाकीपण दयनीय होणे व तसे ते इतरांना वाटू न देणे म्हणून असे केले जाते काय? ‘आहेत ना आमचे, जरा दूर आहेत एवढेच- पण धावून येतात’, असे सांगणाऱ्यांचे दिखाऊपण कळणारे असते की नाही? पण तरीही ते केले जाते, कारण एकाकी असणे व तसे ते जाणवणे हेच भयकारी असते. निराधारपण सांगणारे असते आणि जगात आपले असणारे, तसे जाणणारे कोणी प्रत्यक्षात नसते म्हणूनही.

ग्रीकांच्या थेल्स या पहिल्या तत्त्वज्ञापासून आपल्याकडील ऋषी-मुनींपर्यंतच्या साऱ्यांनी आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगितली आहे- ‘स्वतःला जाणा’ (नो दायसेल्फ). या शिकवणुकीचा खरा अर्थ या जगाकडे पाठ फिरवा आणि आपल्या आत बघा वा शिरा. त्यात तुम्हाला तुम्ही सापडाल आणि आपल्याला आपली खरी ओळख पटेल. यातली पहिली अडचण ही की- जगाकडे पाठ फिरविली की, जगही त्याची जागा बदलून नव्या दिशेला येते व समोर उभे राहते. जिकडे वळू तिकडे तेही वळते. परिणामी, हे काम फार अवघड होते. आणि दुसरी अडचण ही की, आत शिरल्याचे वा आत पाहिल्याचे प्रत्यक्षात कधी कळतेच असेही नाही. त्यातून त्यातल्या दर वेळी एकच एक आपण सापडतो, की आणखी काही वेगळे हाती येते- ही शंकाही असतेच.

मग आपण आपल्याला पाहिल्याचे व जाणल्याचे कसे समजायचे? डोळे मिटले की अंधारी येते, कान मिटले की बधिरपणा येतो आणि श्वास थांबविला की सारेच संपते. पण ते म्हणतात, माणूस त्या ‘जाणत्या’ अवस्थेत जागा असतो. पूर्णपणे सजीव व समर्थ असतो. समर्थ असेल; पण तेव्हाचे एकाकीपण समाधान देणारे, प्रत्ययकारी व आत्मसामर्थ्य वाढविणारे असते काय? हा अनुभव कधी व कोणी घेतला? घेतला तो खरा होता की आभासरूप? त्यांनी तो सांगितला म्हणून, की शिष्यांनी गौरविला म्हणून? या शोधाच्या वाटचालीत कोणत्याही तऱ्हेच्या अध्यात्मात शिरणे हा हेतू नाही. पण त्यात आलेले व सांगितलेले ते ‘सर्वश्रेष्ठ एकाकीपण’ही कधी तरी तर्काच्या व विचारांच्या कक्षेत आणायचे की नाही? ते तसेच श्रध्देच्या परिघात राहू दिले, तर पुन्हा ते एक गूढ होते आणि आपण त्याच्याचकडे पाठ फिरविल्यागत होतो.

माणसे सारखी नसतात. ‘व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती’ असे आपणच म्हणतो. प्रत्येकाचे संस्कार, अनुभवविश्व आणि वैचारिक वेगळेपण लक्षात घेतले की; त्या साऱ्यांचे एकाकीपणही सारखे नसणार, हे लक्षात येते. कोणी अंत:स्थ होईल, तर कोणाला बाह्य जगताची ओढ वाटू लागेल. कोणी शांत, तर कोणी अस्वस्थ असेल. एखाद्याचा दाबून ठेवलेला संताप कधी तरी उफाळेल, तर कधी काहींचे दडवलेले प्रेम उगवू पाहील. सगळी माणसे साधू वा संत नसतील. त्यांना ईश्वरचरणी लीन होण्यात एकाकीपण घालवावेसे वाटेल. सामान्य माणसांचे साधेपण त्याहून वेगळे असते. त्यातून आताचे जग व्यक्तिकेंद्री, विकेंद्रित होत जाणारे, व्यक्तीला स्वयंभूपण देणारे आणि तिचे आत्मभान वा अहंता वाढविणारे आहे. त्यामुळे एकाचा विचार वा निष्कर्ष साऱ्यांना लागू करता येणार नाही. तसे करणे हा साऱ्यांवरचा अन्याय होईल. परिणामी, प्रत्येकाचे एकाकीपण हा एक स्वतंत्र विषय होतो. त्याचे स्वरूप वेगळे व त्याच्या जाणिवाही वेगळ्या. ही माणसे एकत्र आली तरी परस्परांशी सहयोग करून ते एकाकीपण घालविणार कसे? की ते जपत-जपतच परस्परांशी संबंध राखणार? हा मग एका शास्त्रीय अभ्यासाचा विषय राहत नाही. अनेकांच्या एकाकीपणाचे स्वरूप जाणून घेऊन त्यांचे स्वतंत्र निष्कर्ष काढण्याची गरज सांगणारा तो विषय होतो.

ज्या समाजात समूहभावना मोठी असते, त्या आदिवासींच्या जगात सारी माणसे समाजाला बांधलेली असतात. त्यांचे विचार एकत्र करता येणे व तसे अभ्यासता येणे त्यामुळे शक्य व सोपे होते. प्रगत समाजातल्या माणसांचे आत्मभान त्यांना वेगळे बनवून त्या सामाजिक बांधिलकीपासून मुक्त करते. त्याच वेळी ते माणसांचे एकाकीपण जागवून त्यांच्याही स्वतंत्र सीमारेषा आखत जाते. हा समाज समूहाचा नसतो. खरे तर तो समाजही नसतो, ती माणसांची एकत्र राहण्याची अवस्थाच तेवढी असते. अशी कुटुंबेदेखील आपल्या पाहण्यात असतात; तशा संस्था असतात, संघटना असतात, अगदी देवही असतात. त्यांना गरजांनी बांधलेले असते, मनाने नव्हे. स्वतंत्र माणसांचे एकत्र राहणे नसते. सुरक्षिततेसाठी एकमेकांजवळ राहणाऱ्या परावलंबी माणसांचे ते दूरस्थ जगणे आहे. माणसे प्रेमाने, आस्थेने व आत्मीयतेने जवळ येणे आणि केवळ गरज म्हणून एकत्र राहणे यातले अंतर साऱ्यांना अशा वेळी कळावे.

स्वीडनमध्ये असतानाची एक आठवण येथे नोंदवावीशी. तो देश जगातला सर्वाधिक उत्तम व राहायला योग्य म्हणून गौरविला जाणारा. एका संध्याकाळी त्याच्या राजधानीच्या मध्यवर्ती चौकात असलेल्या सिमेंटच्या बाकड्याशेजारी सतरा-अठरा वर्षे वयाची एक तरुण मुलगी बेशुध्दावस्थेत पडलेली दिसली. माणसे येत होती, जात होती; पण कोणी म्हणून तिच्याकडे बघत नव्हते. मग मीच न राहवून तिथल्या एकाला थांबवून विचारले. पण तिथल्या माणसांना फारसे इंग्रजीही येत नाही. मग दोन-तीन जणांकडे विचारणा करून झाली. त्यातल्या एकाने अत्यंत कोरडेपणाने सांगितले, ‘‘ड्रग घेऊन पडली असेल. शुध्दीवर आली की जाईल आपल्या ठिकाणी.’’ तिच्याकडे न पाहताही तो म्हणाला आणि चालू लागला. स्वयंभू एकाकीपण, दूरस्थ ऐक्य आणि ऐश्वर्यशाली एकाकीपण या साऱ्यांचा तो संयुक्त नमुना फार काही सांगणारा व कायमचे अस्वस्थ करणारा होता.

तिच्याविषयी कोणाला काही वाटत नव्हते काय? ती अनोळखी असली तरी आपली- ‘स्विडिश’ होती. तरुण अन्‌ देखणी होती. तिच्याबाबत काही अभद्र घडू शकले असते म्हणून तरी पोलिसांची मदत घ्यावी, असे कोणालाच का वाटत नव्हते? तिने ड्रग्ज घेतले असतील. कदाचित ते तिचे एकाकीपण घालवायला वा विसरायला तिने ते घेतले असेल; पण तिच्या त्या अवस्थेकडे पाहूनही न पाहिल्यासारखे करणाऱ्यांचे ते वागणेही त्यांचे एकाकीपण सांगणारे नव्हते काय?… माणसांना माणसांविषयी वाटणारी आस्था कमी झाल्याने, की माणसांची आत्ममग्नता वा समाजविन्मुखता वाढल्याने असे होत असेल?

(लेखक नामवंत संपादक व विचारवंत आहेत)

9822471646

हे सुद्धा नक्की वाचा-

१.एकाकीपणावर मात… http://bit.ly/2UAwp42

२.जगन्मिथ्या म्हणजे तरी काय? http://bit.ly/2MDdy3J

३. एकाकीपणाशी मैत्र… http://bit.ly/2EI5eLE  

४. एकाकीपणाचे पिशाच!- http://bit.ly/2OPFa7a

 

Previous articleपत्रकारितेत बदलांमधील संधी !
Next articleसॉक्रेटीस, प्लेटो,ॲरिस्टॉटल
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.