मला (बि)घडवणारे चित्रपट-५
– सानिया भालेराव
साधारण मला माहित असलेल्या प्रत्येकी एका भाषेतला एक चित्रपट निवडून लिहायचा असं ठरवलं होतं. आज हिंदी भाषेचा नंबर आहे . कोणता चित्रपट निवडावा ह्यावर जरा गोंधळलेले होते. हृषीकेश मुखर्जी, श्याम बेनेगल, मणी कौल अश्या कित्येक दिग्दर्शकांचे अप्रतिम सिनेमे डोक्यात आहेत. पण मग ए निवडला तर दुसऱ्यावर अन्याय ठरेल आणि म्हणूनच नव्या दमाच्या दिग्दर्शकाचा चित्रपट निवडायचा ठरवला कारण गेल्या दशकात लॉजिकल आणि जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टीकोन देणारे असे बोटावर मोजण्याइतकेच हिंदी चित्रपट बनले आहेत. त्यातही फायनल चॉइस “मसान”आणि आँखो देखी ह्यांमध्ये! मग “आँखो देखी” निवडला.
…………………………………………………………………….
काही चित्रपट दुर्दैवाने दुर्लक्षित राहतात. त्यातलाच रजत कपूर दिग्दर्शित “आँखो देखी”. हा चित्रपट बघायला गेलं तर अत्यंत सोप्या आणि समजायला गेलं अत्यंत क्लिष्ट अश्या एका गोष्टीभोवती फिरतो. ते म्हणजे सत्य. आयुष्याचं सत्य! आपण लहानपणापासून नेहेमी खरे बोलावे हे ऐकत असतो. मला आठवतं मी साधारणतः आठवीत असताना बाबांनी मला गांधींचं my experiment with truth हे पुस्तक वाचायला दिलं. त्यानंतर थोडीफार अक्कल येईस्तोवर आणि त्यानंतरही सत्य एकच असतं असं वाटायचं. जे ह्या चित्रपटाने बदललं. प्रत्येकाचं सत्य हे वेगळं असू शकतं किंवा प्रत्येकाचं सत्य हे त्याच्या स्वतःच्या अनुभवावरून बनलेलं असतं. फार इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. ही गोष्ट आहे बाबूजी ( द ग्रेट संजय मिश्रा ) त्यांची बायको सीमा भार्गव आणि एक मुलगा , मुलगी आणि त्यांचा भाऊ रजत कपूर आणि त्याच्या कुटुंबाची! हे दोघे भाऊ आपापल्या कुटुंबासोबत एकत्र राहत असतात . बाबूजी म्हणजे एक सर्वसामान्य मिडलक्लास ९ ते ५ नोकरी करणारा , मुलगी लग्नाला आलेली असा माणूस. एका छोट्याश्या प्रसंगामुळे त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. त्याची आयुष्याची फिलॉसॉफी एकच होते . जे मी अनुभवलं तेच माझं सत्य! म्हणजे बायको म्हणाली की चला आंघोळीचं गरम पाणी काढून ठेवलं आहे तर बाबूजी जाणार पाण्यात हात घालणार आणि मग म्हणणार ” पाणी गरम आहे आता अंघोळ करून घेऊया “. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन मगच ती करणारे , मग अगदी वाघाला बघून त्याची डरकाळी ऐकूनच हा वाघ आहे हे सत्य मी मानतो असे म्हणणारे बाबूजी, ट्रॅव्हल कंपनीतीतली आपली नोकरी ह्याचं सत्याच्या वेडापायी सोडणारे बाबूजी , आपल्यालाही थोडे वेडेच वाटतात. पण जसा जसा चित्रपट उलगडत जातो तसतसा बाबूजींच्या हा फिलॉसॉफीचे फॅन केवळ त्यांच्या आजूबाजूचे मित्रच नाही तर आपणही होतो. त्यांच्या वयात आलेल्या मुलीच्या प्रियकराला मारायला गेले असतानांचा प्रसंग , आपल्या पुतण्याच्या गणिताच्या मास्तरांना इन्फिनिटीवर प्रश्न विचारतानाचा प्रसंग, पत्त्यांचा जुगार घेळण्याच्या ठेकदाराबरोबरचा प्रसंग असे कित्येक बढिया आणि कसदार अभिनय दाखवणारे प्रसंग संजय मिश्रांनी दिले आहेत.
आपण लहानपणापासून आपल्याला जे जे सांगत गेले , शिकवत गेले ते सगळं खरं मानून जगत गेलो. अगदी आईवडिलांपासून ते वर्तमानपत्रांपर्यंत जे जे ह्यांनी ह्यांनी सांगितले ते खरे मानत गेलो. कित्येक खोट्या गोष्टी न अनुभवता खरं मानत गेलो. मात्र आता इथून पुढे जे मी अनुभवणार, डोळ्याने बघणार आणि माझ्या कानाने ऐकणार तेच आणि तेवढंच सत्य. माझं सत्य! ही बाबूजींची फिलॉसॉफी वरवरून गमतीशीर वाटली तरी तिला अत्यंत सुरेख आणि गंभीर असे पदर आहेत आणि रजत कपूर यांनी आपल्या सहज सुंदर दिग्दर्शनातून ते प्रभावीपणे उलगडून दाखवले आहेत . बाबूजी पुढे मौन पाळतात , आणि भर चौकात एक पांढरा बोर्ड घेऊन उभे राहतात . त्यावर लिहिलेलं असतं ” सब कुछ यही है आँखे खोल कर देखो “आणि त्यांच्या ह्या वेडात त्यांचे पंटर पण सामील होतात . त्यांच्या घरातल्याच एका शाळकरी मुलाला सतत काहीतरी बोलायचा झटका येतो , सगळे त्याला वेडं समजतात पण बाबूजी त्याचा हात हातात घेऊन त्यांचं बोलणं शांतपणे ऐकत राहतात , त्यांच्या त्या प्रेमळ स्पर्शाने आणि तासंतास शांतपणे ऐकून घेण्याने तो मुलगा बडबड थांबवतो , मग पुढे बाबूजी मौन सोडतात , जुगार खेळणं अनुभवतात त्यात पैसे कमावतात , दुसरीकडे घर थाटलेल्या छोट्या भावाशी मुलीच्या लग्नात जुळवून घेतात आणि लग्न कार्य उरकून आपल्या बायकोबरोबर हिल स्टेशनला फिरायला येतात. आपल्याला वाटतं असतं की हा चित्रपट एका हॅपी नोटवर संपणार पण इथेच रजत कपूर दिग्दर्शक म्हणून भाव खाऊन जातो. शेवट सांगितला तर चित्रपट पाहायला अर्थ उरणार नाही म्हणून तो गुलदस्त्यातच राहू देत. पण शेवट हॉन्टिंग आहे . कित्येक दिवस मी अस्वस्थ होते . असा शेवट का करावासा वाटावा एखाद्या दिग्दर्शकाला ह्याचं उत्तर शोधत होते. माझ्या परीने मी अर्थ काढला. अगदी शेवटालाही अनुभव हेच सत्य असं मानणाऱ्या बाबुजींसाठी ह्याहून सुखद शेवट असू शकत नाही असं मला वाटलं. मणि कौल आणि कुमार शहानी ह्यांना गुरुस्थानी मानणाऱ्या रजत कपूरने दिग्दर्शक म्हणून आपला ठसा उमटवला आहे. पडद्यावर संयमित अभिनय आणि पडद्यामागे अतिशय अवघड विषयाला हात घालून तो इतक्या प्रभावीपणे प्रेकक्षकांपर्यंत पोहोचवण्याची कमाल रजत कपूरने केली आहे .
ह्या चित्रपटाबद्दल कितीही लिहिलं आणि तुम्ही ते माझ्या शब्दातून अनुभवलं तरीही ती ह्या चित्रपटाच्या मूळ थीमशी प्रतारणा ठरेल. कारण हे माझं सत्य आहे जे मी हा चित्रपट बघून अनुभवलं. जेव्हा तुम्ही तो बघाल आणि अनुभवाल ते तुमचं सत्य! आपण कित्येकदा समाज , आपल्या आजूबाजूचे लोक ह्यांचं ऐकून आपली मतं बनवतो. कित्येकदा नात्यांमध्ये आजूबाजूचे लोकं खोटंनाटं बोलून काड्या करायचा प्रयत्न करतात आणि आपण न पडताळता ते खरं मानून जिवाभावाची नाती , माणसं तोडतो. चांगलं वाईट , चूक – बरोबर , नैतिक – अनैतिक अश्या किती फुटपट्या लावून माणसं , सिचुएशन जोखतो. जे स्वतः अनुभवलं , पाहिलं , ऐकलं तेच खरं मानलं तर आयुष्य सोपं होईल कदाचित. कारण आपलं जगणं हे आपल्या सत्यावर बेतलेलं असेल. त्या आयुष्यातला चांगल्या वाईटाची जवाबदारी आपली असेल. दुसरी व्यक्ती त्याला हवं तसं जगू शकते आणि आपला आनंद शोधू शकते हे देखील आपल्याला समजेल. त्या व्यक्तीला , तिच्या वर्तनाला आपण जज करणार नाही . लिव्ह अँड लेट लिव्ह हा फंडा जर प्रत्यक्षात आला तर खरंच आयुष्य जगणं सोपं होईल. खूप काही सांगून जाणारा . अनुभव संपन्न करणारा बहारदार अभिनयाचा परिपाक असलेला हा चित्रपट बघावा असाच आहे . अर्थात यह मेरा सच है और आप लोगोकोंभी आपका सच मिल जाये! “सब कुछ यही है आँखे खोल कर देखो!”
(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही त्यांची आवड आहे .)
हे सुद्धा नक्की वाचा- नवरा – बायकोतल्या नात्यावर सेन्सीबली भाष्य करणारा – बेलाशेषे- http://bit.ly/2LgHILE
जगावं कसं आणि कशासाठी हे सांगणारा – ‘कास्ट अवे’!– http://bit.ly/2VVvmcR
‘द नोटबुक’-जन्म मृत्यूच्या पलीकडे जाणारी प्रेमकहाणी– http://bit.ly/2UAWW2m
ह९६- हळुवार,अलवार प्रेमाची गोष्ट सांगणारा चित्रपट– http://bit.ly/2G2DlQ1