प्रत्येकाला आकळणारा वेगळा गांधी !

-प्रवीण बर्दापूरकर

( महात्मा गांधी प्रत्येकाला वेगवेगळ्या रुपात भेटतो आणि आकळतो . सात आंधळे आणि हत्ती या कथेची अनुभूती म्हणजे महात्मा  गांधी आहे . जर्मनीतल्या छळ छावण्या बघतांना मला गांधी कसे नव्यानं आकळले त्याचा अनुभव आहे – )

सॅल्झबर्ग सेमिनार २००७’ चा विषय ‘द न्यू इन्फर्मेशन नेटवर्क : चॅलेन्जेस अ‍ॅण्ड अपॉर्च्युनिटी फॉर बिझिनेस, गव्हर्मेंट अ‍ॅण्ड मीडिया’ असा होता . जगभरातील ४२ देशांचे ५८ प्रतिनिधी त्यात सहभागी झाले होते . त्यात भारतातील ५ , पाकिस्तानातील ३ आणि अमेरिकेतील ६ प्रतिनिधींचा समावेश होता . भारतातील पाच प्रतिनिधींपैकी अस्मादिक एक , भारतीय मुद्रित माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून निवड झालेले . फॅकल्टी मेंबर्समध्ये अमेरिकेच्या तज्ज्ञांची संख्या जास्त होती . सॅल्झबर्ग हे ऑस्ट्रियातील एक निसर्गरम्य गाव . आल्पस् पर्वताच्या पायथ्याशी सॅल्झबर्ग सेमिनारची इमारत अठराव्या शतकातली आणि एकेकाळी ख्रिश्‍चन धर्मगुरूंचे वास्तव असलेली . अतिशय देखणी आणि खानदानी आब असलेली ऐटदार वास्तू आहे ती . या इमारतीची वास्तुशास्त्रानुसार रचना आणि कलाकुसर डोळे विस्फारुन टाकणारी आहे . वास्तू जुनी पण, मजबूत आणि अद्ययावतही . ही चर्चा , त्यातून निघालेले निष्कर्ष , मते-मतांतरे पुस्तकरूपात प्रकाशित केली जातात. संबंधितांपर्यंत पोहोचवली जातात .

सॅल्झबर्ग सेमिनार या विश्‍वस्त निधीची स्थापना १९४७ मध्ये झालेली . जागतिक पातळीवरील अनेक महत्त्वाच्या विषयांवर , प्रसिद्धीच्या प्रकाशात न येता मूलभूत पातळींवर चर्चा घडवून आणण्याचं काम सॅल्झबर्ग सेमिनार ही संस्था स्थापनेपासून करत आहे . अशा चर्चा घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात आणि त्यात सहभागी होण्यासाठी अनेक तज्ज्ञांना अभ्यासवृत्तीही (फेलोशिप) दिली जाते . अनेकदा अमेरिकन सेंटर अशा अभ्यासकांच्या प्रवास आणि निवासाच्या खर्चाची काळजी घेते. सॅल्झबर्ग सेमिनारचं अ‍ॅकॅडेमिक पातळीवरील महत्त्व खूप मोठे आहे, याची जाणीव मला फारशी नव्हती ; असण्याचे कारणही नव्हते ; आपली कधी या सेमिनारसाठी निवड वगैरे होण्याची कल्पनाही मराठी पत्रकारितेत कोणाला सुचण्याचं कारणच नव्हतं ! मात्र, एकदा त्या प्रक्रियेत अडकल्यावर आणि विशेषत: सनदी सेवेतील अधिकारी आणि मूलभूत संशोधन करणार्‍या काही संशोधकांशी चर्चा करताना हे महत्त्व आणि गांभीर्य अधोरेखित झालं . मग मीही या अभ्यासवृत्तीबद्दल जरा गांभीर्यानेच घेतलं . तेव्हा अमेरिकन काऊन्सिलचा ‘प्रेस अ‍ॅडव्हायझर’ म्हणून काम करणारा इंडियन एक्सप्रेसमधील एकेकाळचा सहकारी प्रमोद पागेदारसोबतच शेतकरी संघटनेचे एकेकाळचे विदर्भातील नेते आणि इंग्रजीचे प्राध्यापक शरद पाटलांकडूनही तिथं सादर करावयाच्या प्रेझेन्टेशनचे ड्राफ्ट वगैरे तपासून घेतले . जी आकडेवारी वापरणार होतो तिच्याबद्दलची खात्री अधिकृत खात्यांकडून किंवा त्या-त्या वेबसाईटवर जाऊन करवून घेतली .

सॅल्झबर्गच्या पहिल्या दिवशी दुपारपर्यंतचा वेळ प्रतिनिधींच्या आगमनाचा होता आणि दुपारी बारानंतर परस्परांच्या ओळखीचा कार्यक्रम होता. साडेपाच-पावणेसहा तासांचा ‘जेट लॅग’ असूनही आयोजकांनी पोहोचलेल्या प्रतिनिधींना आरामाची फारशी संधी न देता लगेच कामाला लावलं . परस्पर ओळखीच्या सत्रानंतरही संध्याकाळी सातपर्यंत काही कार्यक्रम नसल्याने प्रतिनिधीही परस्परांच्या अधिक तपशीलाने ओळखी करून घेण्यात आणि आपापले ‘गोट’ कसे फॉर्म करता येतील , याची चाचपणी करत फिरत होते. भारत आणि पाकिस्तानच्या प्रतिनिधींचा गोट लगेचच स्थापन झाला. ओळखीच्या सत्रात मी स्वत:ची ओळख नागपूरहून आलो, अशी करून देतानाच नागपूरची भूमी जवळच असलेल्या वर्धेच्या सेवाग्राम आणि पवनार आश्रमामुळे पुनीत झालेली आहे. कारण, महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचं वास्तव्य या ठिकाणी प्रदीर्घ काळ होतं , हे आवर्जून नमूद केलं .

आमच्या फॅकल्टीचे एक मेंबर योची बँकर हे होते . भली मोठी दाढी आणि चेहर्‍याची उभी ठेवण असणारा हा गुटगुटीत अमेरिकन इसम मीडियामध्ये बदलणार्‍या नेटवर्कच्या संदर्भातला जाणकार माणूस . त्या संदर्भातली त्यांची काही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत आणि त्या विषयावर त्यांनी डॉक्टरेटही संपादन केली आहे . चहाच्या वेळेस गप्पा मारताना नेमका ‘महात्मा गांधी’ या एका शब्दाच्या आधारे हा गृहस्थ शोध घेतमाझ्याजवळ आला आणि चर्चा सुरू झाली ती सेवाग्रामचा आश्रम कसा आहे , तिथं महात्मा गांधी किती काळ वास्तव्याला होते , मी तिथं किती सातत्यानं भेटी देतो वगैरे वगैरे. खरं तर, अलीकडच्या काही वर्षांत सेवाग्राम-पवनारला मी गेलेलोही नाही. मात्र, राजीव गांधी पंतप्रधान असेपर्यंत आणि त्यातही विशेषत: विनोबा भावे हयात असेपर्यंतचा एक काळ असा होता की , राज्य काय किंवा केंद्र काय, या दोन्ही  ठिकाणच्या सरकारातील नेतृत्वापासून अन्य कुणालाही पवनार किंवा सेवाग्रामला महिना-दोन महिन्यातून एकदा खेप घातल्याशिवाय सत्तेत जणू राहताच येत नसे ! नेमक्या याच काळात हे बीट माझ्याकडे असल्यानं या दोन्ही आश्रमांविषयीची माहिती मला होतीच . नाही तरी महात्मा गांधी माहीत नसणारा कुणी भारतीय माणूस आहे ? या पुंजीच्या आधारे मी बरंच काही सांगितलं . शिवाय, माझ्याजवळ महाराष्ट्र सरकारनं १९९४ साली प्रकाशित केलेली ‘गांधीजींची विचारधारा’ ही पुस्तिकाही बहुसंख्य वेळा असते . सॅल्झबर्गमध्येही ती होती . त्या आधारेही मी बरंच काही बोलू लागलो . त्या लोकांना वाटलं मी महात्मा गांधी यांचे तत्त्वज्ञान कोळून का काय म्हणतात ते प्यायलो आहे आणि माझा भाव साहजिकच वाढला . ‘थँक्स टू गांधीजींची विचारधारा’ आणि ती प्रकाशित करणारे महाराष्ट्र सरकार ! मग महात्मा गांधी  आणि आजचे समाज जीवन, बेन किंग्जलेचा गांधी हा चित्रपट , गांधींचं आजचंही भारतातलं महत्त्व आणि अस्तित्व वगैरे अनेक पैलू या चर्चांना   फुटले . बँकरसोबत अनेक युरोपियन्स विशेषत: ऑस्ट्रिया , जर्मनी , हंगेरीचे त्या चर्चेत उत्साहानं सहभागी होऊ लागले . त्यांना माहीत नसलेले आणि मला माहीत असलेले गांधी, असे एकमेकांत एक्स्चेंज होऊ लागले. गांधीजींची विचारधारा या मराठीतील पुस्तिकेच्या झेरॉक्सही काहींनी काढून घेतल्या , इत्यादी इत्यादी. महात्मा गांधी युरोपियन्सना एवढे का जाणून घ्यावंसे वाटतात , हे कोडं काही मला उलगडलं नाही . या सर्वांना आणि विशेषत: युरोपियन्सना महात्मा गांधी एवढ्या असोशीनं का जाणून घ्यावेसे वाटतात , याची उत्सुकता मला वाटू लागली .

मध्य युरोपातील निसर्गरम्य स्थळं पाहण्यापेक्षा विशेषत: मला उत्सुकता होती ती छळ छावण्यांची . हिटलरने १९३३ ते १९४५ या काळात अक्षरश: लाखो लोक जिथं छळ करून करून टाकले त्या माणुसकीला काळिमा फासणार्‍या छळ छावण्यांविषयी खूप ऐकलं होतं . अशीच उत्सुकता पाकिस्तान आणि म्यानमारमधून आलेल्या फेलोंमध्ये निर्माण करण्यात मला यश आलं . एक शनिवार-रविवार जर्मनीला भेट द्यायची ठरलं तेव्हा या छळ छावण्या बघण्याची संधी मिळू शकते , हे समजलं . त्याप्रमाणे दौर्‍याचं नियोजन करून म्युनिचला जाताना एका ठिकाणी थांबून आम्ही क्रौर्याची परिसीमा गाठणारे दोन कॉन्सन्ट्रेशन कॅम्प पाहिले .

५०ही लोक मावू शकणार नाही , अशा जागी दीड हजार-दोन हजार लोक कोंबणं येथपासून ते हजारो लोकांना चेंबरमध्ये कोंडून गॅसच्या सहाय्याने ठार करणं , अशा क्रौर्याची परिसीमा गाठणार्‍या कथा शालेय शिक्षणात वाचल्या होत्या . हिटलरचं चरित्र, दुसर्‍या महायुद्धाचा इतिहास अभ्यासताना हे सगळे वाचनात आलेलं होते . तळहातावरचा दिवा भर वादळातही जपून ठेवावा त्या पद्धतीने मध्य युरोपात आणि त्यातही प्रामुख्याने जर्मनीत असे  कॉन्सन्ट्रेशन कॅम्पस जागोजागी जपून ठेवले आहेत . त्या छळवणुकीत जीव गमावलेल्यांपैकी कुणाचा चष्मा , कुणाचा पेन , कुणाच्या शर्टाचं बटन , कुणाचा शर्ट , कुणाची सिगरेट केस , अशा एक ना अनेक लाख्खो वस्तू एकेका कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये आहेत. या वस्तू बघताना अक्षरश: गलबलून येतं . आपल्या रक्तामांसाचं कोणी गमावल्यासारखी होणारी हुंदका भरली आठवण होते . तिथं खूप छायाचित्रं आहेत , त्या छळासंबंधीची आणि पुढे त्या छळाच्या चौकशीची हजारो कटिंग्ज आहेत आणि या संपूर्ण परिसरात एखाद्या समुद्रावर भीषण तांडव यावं ; त्या रौद्र वादळाचे दु:ख पोटात पचवून आतल्या आत  घुसमट सहन करत समुद्रानं सळसळही न करता झोपी जावं, तशी अभद्र शांतता असते . त्या छळाचंही युरोपियन्सनी अतिशय गांभीर्याने पण , तितक्याच व्यावसायिकतेनं मार्केटिंग केलेले आहे . कारण, अशा एकेका कॅम्पला दररोज हजारो लोक भेटी देत असतात आणि ते बघण्यासाठी पैसेही मोजावे लागतात . एकेकाळी हिटलरनं केलेल्या छळवणुकीचा एकाप्रकारे मांडलेला तो व्यापारच आहे !

आम्ही पाहिलेल्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये २लाख ६ हजार २६६ कैदी होते आणि त्यापैकी तब्बल ८० हजारांचा मृत्यू ‘हिटलर सेने’च्या छळामुळे झाला . युरोपच्या भूप्रदेशात माणुसकीचा गळा घोटला गेला असताना सांस्कृतिक सुबत्तेच्या आणि सभ्यतेच्या आजच्या मारल्या जाणार्‍या गप्पा किती तकलादू आधारावर उभ्या आहेत, हे या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये गेल्यावर सहज लक्षात येतं . युरोपियन देशांच्या आजच्या आर्थिक सुबत्तेच्या पायव्यातल्या अदृश्य अश्रूंचा उष्ण स्पर्श अस्वस्थ करतो , त्या क्रौर्याचे बळी ठरलेल्यांचे हुंकार, उसासे ऐकू आल्याचे भास होतात आणि गलबलून येतं… कालच्या छळ आणि क्रौर्याचे मळभ आजही वातावरणात दाटलेले असतं आणि आजची सुबत्ता व संस्कृती शरमेने काळी ठिक्कर पडली आहे, असंच वाटतं .

अहिंसेच्या मार्गानंच संघर्ष केला पाहिजे, याचा आग्रह धरणार्‍याच नव्हे तर, हा आग्रह आयुष्यभर श्रद्धेनं व्रत म्हणून सांभाळणार्‍या महात्मा गांधींबद्दल आजच्या युरोपियनांना एवढी उत्सुकता का आहे, या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी हे कॉन्सन्ट्रेशन कॅम्पस् बघितल्यावर कुठं जाण्याची गरजच उरत नाही . महात्मा गांधींच्या देशात आपण राहतो , याचा मग सार्थ अभिमान मला वाटू लागला आणि त्या महात्म्याला मनोमन पुन्हा एकदा वंदन केलं .

( ग्रंथाली’ने प्रकाशित केलेल्या ‘नोंदी डायरीनंतरच्या, या पुस्तकातून साभार )   

9822055799

Previous articleमहात्मा गांधी जगातील सर्वात मोठ्या लोकलढ्याचे नेते
Next articleमहात्मा गांधींची अनोखी प्रेमकहाणी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here