प्रोफाइल लॉकः फेसबुकचा समाजविघातक अजेंडा

-विजय चोरमारे

अमेरिकेच्या ‘वॉल स्ट्रीट जनरल’ या वृत्तपत्रात १४ ऑगस्ट २०२० रोजी `Facebook’s Hate-Speech Rules Collide With Indian Politics` अशा शीर्षकाचा लेख प्रसिद्ध झाला होता. भारतीय जनता पक्ष आपल्या राजकीय अजेंड्यासाठी फेसबुकचा गैरवापर करीत आहे,आणि फेसबुक त्यासाठी पूरक भूमिका बजावत आहे, असा त्याचा आशय होता. भारतीय जनता पक्षाचे एक नेते टी. राजा सिंग यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मुस्लिमांना देशद्रोही संबोधले होते आणि रोहिंग्या मुसलमानांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे म्हटले होते. फेसबुकच्या कर्मचा-याने त्याला आक्षेप घेऊन हे कंपनीच्या नियमांच्या विरोधी असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. परंतु कंपनीच्या भारतातील अधिका-यांनी त्यासंदर्भात काहीही कार्यवाही केली नाही. फेसबुकच्या विश्वसनीयतेसंदर्भात त्यावेळी विविध थरांतून प्रश्न विचारले जात होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वॉलस्ट्रीट जर्नलमधील या लेखानंतर ट्विट करून, `भारतातील फेसबुकवर भाजप आणि आरएसएसचा कब्जा आहे. त्या माध्यमातून ते फेक न्यूज आणि विद्वेष पसरवण्याचे काम करतात, असा आरोप केला होता.

राजकीय कलगी-तु-यामध्ये फेसबुकचा पक्षपातीपणा समोर आला, तेव्हा फेसबुकने १६ ऑगस्टला एक गोलमाल खुलासा केला. त्यात म्हटले होते की, ” द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट आणि हिंसाचार भडकवणाऱ्या गोष्टींवर आम्ही बंदी घालतो. हे धोरण आम्ही जागतिक पातळीवर राबवत असून राजकीय परिस्थिती किंवा नेता पाहून धोरण ठरवत नाही. आम्हाला माहित आहे की विद्वेष पसरवणा-या पोस्ट आणि प्रक्षोभक कंटेट रोखण्यासाठी जास्त काम करण्याची गरज आहे. निष्पक्षता आणि अचूकता निश्चित करण्यासाठी आम्ही आमच्या प्रक्रियेचे नियमित मूल्यमापन करीत असतो. “

हा सगळा गोंधळ सुरू असताना फेसबुकच्या नियमित वापरकर्त्यांमध्येही बरीच चर्चा झाली होती. राजकीय वाद बाजूला ठेवून माझ्यासह अनेकांचे असे म्हणणे होते की, आपले म्हणणे पोहोचवण्यासाठी आजघडीला फेसबुक हेच प्रमुख माध्यम आहे. आपण त्याचा सकारात्मक वापर करावा वगैरे वगैरे.

दरम्यानच्या काळात मधे आठ महिने निघून गेले आणि पुन्हा एकूण सगळ्या परिस्थितीकडे मागे वळून पाहिले, तेव्हा लक्षात आले की, राजकीय पक्षपाताचा आरोप झाल्यानंतर फेसबुकचा खुलासा जेवढा गोलमाल होता, तेवढीच आपली त्यावेळची भूमिकाही भाबडी होती. कारण उच्च नीतीमूल्ये वगैरे गोष्टी करीत फेसबुक भारतातील विद्वेष पसरवणा-या लोकांना पर्यायाने भारतीय जनता पक्षाच्या समर्थक मंडळींना पूरक भूमिका बजावताना दिसत आहे. किंबहुना भारतात विद्वेष पसरवण्यात फेसबुक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. म्हणजे ऑगस्टमध्ये हा सगळा गदारोळ झाल्यानंतर महिनाभरातच फेसबुकने `फेसबुक प्रोफाईल लॉक` नवे फीचर फक्त भारतापुरते लागू केले आणि विद्वेष पसरवण्याची आपली मोहीम अधिक जोमाने सुरू राहील याची व्यवस्था केली. धूळफेक करण्यासाठी फेसबुकने या फीचरला महिलांचे खासगीपण जपण्याचे कारण दिले.

`फेसबुक प्रोफाईल लॉक` फीचर लाँच करताना फेसबुकने म्हटले होते की, “आपले प्रोफाइल लॉक करण्याचे फीचर खास भारतातील लोकांसाठी तयार केले आहे, विशेषत: महिलांसाठी. त्यामुळे त्यांना त्यांच्या फेसबुक अनुभवावर अधिक नियंत्रण ठेवता येईल. फेसबुक प्रोफाइल लॉक ही कंपनीने काही वर्षांपूर्वी सादर केलेली प्रोफाइल पिक्चर लॉकची प्रगत आवृत्ती आहे, यामुळे वापरकर्त्याला त्यांचे प्रोफाइल कोणी पाहावे यावर नियंत्रण ठेवता येईल.

ट्विटरवर बिन नावाच्या, बिनगावाच्या, बिनआईबापाच्या अनौरस अवलादींचा उच्छाद असायचा. म्हणजे आजही असतो. फेसबुकवर भांडायला, वाद घालायला येणारी व्यक्ती किमान चेहरा असलेली असायची. परंतु प्रोफाईल लॉक फीचर आल्यापासून फेसबुकवरही अनौरस अवलादींचा उच्छाद सुरू झालाय. फेसबुकने हे फीचर लॉक करताना महिलांना अधिक सुरक्षा पुरवण्याचे कारण दिले असले तरी जी परिस्थिती निर्माण झालीय, त्यामुळे प्रत्यक्षात त्यांचा उद्देश राजकीयच असावा असे दिसून येते.

प्रशासनात वरिष्ठ अधिकारी असलेले मित्रवर्य Guru Nileasha यांनी एक पोस्ट केली होती. त्यांनी म्हटले होते की, प्रोफाईल लॉक असणाऱ्यांचे प्रामुख्याने

1. महिला

2. घाबरट गांडू

3. अंधभक्त

4. चाळीस पैसेवाले

असे प्रकार माझ्या निदर्शनास आले आहेत.

(याला काही अपवाद असणारच. कारण नियम अपवादाने सिद्ध होतो).

आणखी एक मित्र Anand Shitole यांनीही त्यासंदर्भात एक पोस्ट करून म्हटले होते की, `सुरुवातीला पोस्टवर काही ठराविक चेहरे ड्युटी लावल्यागत आलटून पालटून असायचे, असंबद्ध कमेंट, विषयाला सोडून काहीतरी लिहिणं हे चालायचं. मित्र यादीत असलेले बरेच सन्मित्र त्यांच्याशी वाद घालायचे, क्वचित कधीतरी चर्चा पातळी सोडून जायची. आता ही वार लावलेली माणसं कमी झालीत. काही पोस्टवर अचानक ट्राफिक प्रचंड वाढलीय. बहुतांशी प्रोफाईल लॉक असणारी मंडळी, विचित्र भाषा, कमेंट हे टिपिकल ट्रोल लक्षण आहेतच. काही महिलांची प्रोफाईल आहेत. या मंदबुद्धी भक्तांना उत्तर देणं आणि वाद घालणं म्हणजे शेणात, चिखलात दगड मारणे. द्वेषाने आंधळ्या झालेल्या लोकांकडे दुर्लक्ष करा.`

अर्थात व्यक्तिगत शिवीगाळ करणा-या विकृत भक्त मंडळींकडे उदारपणे दुर्लक्ष करता येईल, ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करता येईल. परंतु सामाजिक स्वास्थ्य बिघडवणा-या पोस्ट करणारी, कमेंट करणा-या समाजकंटकांकडे कसे दुर्लक्ष करायचे. त्यात महाराष्ट्र सरकारचा सायबर क्राइम विभाग निष्क्रिय तर आहेच, परंतु अद्याप महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असल्याच्या मानसिकतेतून बाहेर आलेला नाही. त्यामुळे कायदेशीर कारवाईचा आग्रह धरणे म्हणजे एकवेळ रेडा दूध देईल, पण सायबर क्राईम विभागाकडून काही होणार नाही.

त्यासाठी फेसबुकवरच दबाव वाढवायला हवा. कायदेशीर मार्गाने प्रयत्न करायला हवेत. प्रसंगी फेसबुकला कायदेशीर धडा शिकवायचीही तयारी ठेवायला हवी.

विविध लोकशाही देशांमध्ये फेसबुकचे नियम वेगवेगळे का आहेत, असा प्रश्नही वेळोवेळी उपस्थित झाला आहे. आताही तो त्यांना विचारायला हवा. प्रोफाइल लॉक फीचर भारतापुरते लागू करून फेसबुकने इथल्या राज्यकर्त्यांना सोयीचे धोरण पुढे रेटले आहे, हे त्यांना थेट सांगायला हवे.

ज्यांना आपलं प्रोफाईल लॉक ठेवायचं असेल त्यांनी खुशाल ठेवावं. परंतु स्वतःचं प्रोफाईल लॉक ठेवणा-यांना इतरांच्या भिंतीवर जाऊन घाण करण्यास प्रतिबंध करावा. ओढाळ जित्राबासारखं कुठंही तोंड घालण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीवर अंकुश ठेवायला हवा. फेसबुकने हे करायला हवं आणि सरळमार्गाने ऐकणार नसतील तर कायदेशीर मार्गाने ते करायला भाग पाडायला हवं. तुम्ही भाजपचा अजेंडा चालवा नाहीतर आणखी कुणाचा. त्यासाठी भारतातले सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा परवाना तुम्हाला मिळालेला नाही, हे फेसबुकला ठणकावून सांगायला हवं. प्रोफाईल लॉक ठेवणा-यांना शिखंडी वगैरे संबोधून, त्यांची हेटाळणी करून हलक्यात घेण्याजोगता हा विषय नाही. ट्विटरवरचा विद्वेष अलीकडे फेसबुकवरही पसरू लागला आहे, तो वेळीच रोखायला हवा. प्रोफाईल लॉक ठेवून विद्वेष पसरवणा-या या समाजविघातक प्रवृत्ती आहेत. त्यांना संरक्षण देऊन फेसबुकने समाजविघातक माध्यम बनू नये, एवढीच अपेक्षा!

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

9594999456

 

Previous articleलसीकरण की सेंट्रल व्हिस्टा?
Next articleजिव्हारी लागलेला घाव…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here