बुधवारी श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांची ‘पत्रकार परिषद’ झाली. खरं म्हणजे त्याला ‘पत्रकार परिषद’ म्हणता येणार नाही. श्री. फडणवीस साहेब यांनी निवेदन केले आणि शुद्धलेखन लिहून घेतल्यासारखे, पत्रकारांनी ते निवेदन लिहून घेतले. लगेच फडणवीससाहेब उठले आणि निघून गेले. पत्रकारांना आमंत्रण गेले होते ते ’पत्रकार परिषद’ होणार म्हणून. पत्रकार परिषदेत नेत्याचे निवेदनझाल्यावर प्रश्न विचारले जातात. कालच्या पत्रकार परिषदेत एकही प्रश्न विचारला गेला नाही. फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातल्या भाजपा पराभवाची जबाबदारी घेतली. त्याअगोदर त्यांच्या पक्षाची बैठक झाली होती. त्या बैठकीला मुंबई भाजपा अध्यक्ष श्री.आशिष शेलारसाहेब हजर होते. निवडणूक पक्षाने लढवली होती. त्यामुळे पराभवाची जबाबदारी महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री.बावनकुळे साहेब आणि मुंबईचे अध्यक्ष श्री.शेलार साहेब यांनी जबाबदारी स्वीकारायला हवी होती.
जर कॉंग्रेसचा असा दारुण पराभव झाला असता तर, याच बावनकुळे आणि शेलार यांनी महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष, यांचे राजीनामे मािगतले असते. पण हे दोघेही चिडीचूप होते. फडणवीस साहेबांनी पराभवाची जबाबदारी घेतली. ‘उपमुख्यमंत्रीपदातून माझी मुक्तता करा’, अशी पक्षश्रेष्ठींना विनंती करीत असल्याचे सांगितले याचा अर्थ पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिली तरच ते उपमुख्यमंत्रीपद सोडणार पण ती परवानगी येण्यापूर्वीच पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे यांनी जाहीर करुन टाकले की,’फडणवीससाहेबांमध्ये हनुमानाचा अंश आहे म्हणून त्यांनी सरकारातही राहावे आणि पक्षातही काम करावे, महाराष्ट्र पिंजून काढावा…’ या लोकसभा निवडणुकीत फडणवीससाहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढलाच होता. त्यांनीच सांगितले होते की, ‘सगळ्यात जास्त सभा मीच घेतल्या’. त्यांनी पिंजून काढलेल्या महाराष्ट्राचे काय झाले हे दिसले. आता, त्यांनी नेत्यांवर आपले भविष्य सोपवले आहे. त्यामुळे ‘मी पुन्हा येईन’ ही धून सध्या तरी बंद आहे.
पक्षाचा पराभव झाला म्हणून फडणवीस खरोखर गंभीर असते तर त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारल्यावर राजीनाम्याची परवानी मागणी करण्याचे कारण नव्हते. मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपपवून द्यायचा पण तसे झालेले नाही. फक्त हवा तयार केली. आता हे पक्क आहे की, मोदी आणि शाह यांचे महाराष्ट्र भाजपमधील आणि सरकारमधील एकच विश्वस्त आहेत ते फडणवीससाहेब. त्यांच्याखेरीज, एवढाविश्वास ठेवावा असा माणूस महाराष्ट्रात कोणीही नाही. त्यामुळे राजीनाम्याची परवानगी मिळणे शक्य नाही. फडणवीसांना त्याची खात्री असेल. त्यामुळे कालच्या पत्रकार परिषदेचा खटाटोप ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’ या थाटाच आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यापूर्वी ‘फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि मी उपमुख्यमंत्री होतील असे शिंदे साहेबांनाही वाटत होते. त्यांनी तसे बोलूनही दाखवले. त्यावेळी फडणवीस म्हणाले मी पक्षाध्यक्ष होतो, सत्तेत राहत नाही. ५ मिनीटात अमित शाह यांचा फोन आला आणि फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. राजभवनवरचे हे नाट्य सगळ्यांनी पाहिले सगळ्यांना आठवतसुद्धा असेल. त्यामुळे फडणवीसांना सरकारातून बाहेर पडायला परवानगी मिळणे जवळजवळ अशक्य आहे, हे फडणवीसांनाही माहीत असेल. त्यामुळे कथानक ज्याप्रमाणे लिहिले होते. त्याप्रमाणे पत्रकार परिषद झाली. आता पुन्हा ते बोलायला मोकळे आहेत ‘पक्षश्रेष्ठी परवानगी देत नाहीत…’ त्यामुळे बावनकुळेंचाही जीव भांड्यात पडला असेल. कारण २०१९ साली बावनकुळे यांचे विधानसभेचे तिकीट फडणवीसांनीच कापले होते.विनोद तावडे यांचेतिकीटही फडणवीसांनीच कापले होते. मग तडजोड म्हणून बावनकुळेंना अध्यक्ष केले, असे हे सगळे नाटक होते.
फडणवीस यांचा कालचा आवेश असा होता की… मी सत्ता सोडतो, पक्षाध्यक्ष होतो. महाराष्ट्रभर फिरतो आणि भाजपाचे सरकार आणून दाखवतो. जणू यापूर्वी ते महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष नव्हतेच, मुख्यमंत्री नव्हतेच, २०१४ ते २०१९ तेच मुख्यमंत्री होते ना. २०१४ साली भाजपाचे १२२ आमदार होते. फडणवीस मुख्यमंत्री असताना पाच वर्षानंतरच्या िनवडणुकीत १२२ वरुन भाजप आमदारांची संख्या १०५ वर आली. १७ आमदार घटले. आता सत्ता सोडून नुसते अध्यक्ष म्हणून फडणवीस फिरू लागले तर, आणखीन ५० घटतील. कारण महाराष्ट्रातील आजचं घाणेरडे राजकारण, त्यांच्याच पुढाकाराखाली झालेले आहे. पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. या घाणेरड्या वातावरणाची जबाबदारी कोण स्वीकारणार? हे वातावरण कोणामुळे झाले? कोणत्या फाेडाफोडीेने झाले, त्याला जबाबदार कोण? फडणवीस जेव्हा पक्षाध्यक्ष म्हणून फिरतील तेव्हा त्यांना या प्रश्नाची उत्तर द्यावी लागतील.शिवाय आता मोदी आणि शाह यांना विधानसभा निवडणुकीत प्रचाराला आणण्याची भाजपाची मानसिकता असेल असे काही वाटत नाही. कारण हे दोन्ही नेतेजिथे -जिथे प्रचाराला गेले, तिथे लोकसभेचे भाजप व महायुतीचे उमेदवार पडले, त्यामुळे आता ‘मोदी शाह यांची सभा आम्हाला नको’, असे भाजपाचे उमेदवार सांगतील. आणि जिथे कॉंग्रेसचे उमेदवार आहेत ते उमेदवार ‘मोदीसाहेबांची सभा झाली तर मला मदत होईल’ असेच म्हणतील. या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी अनेक गंमती केल्या. तर आता आपण वाट बघूया फडणवीस राजीनामा कधी देतात. आणि हो… कोणीतरी काल म्हटलं… ‘सौ चुहै खाके िबल्ली चली हज…. ‘ हे फडणवीसांना थोडसं लागू पडेलही. पण फडणवीसांना भाजप पराभवाचा एवढा पश्चाताप झाला असेल तर पश्चातापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते, असे काही ऐिकवात नाही.
फडणवीस जर अध्यक्ष झाले तर महाराष्ट्रभर फिरणार आहेत, गावोगावी सभा घेणार आहेत. काल रात्री माझ्या स्वप्नात आचार्य अत्रे आले. ते म्हणाले ‘तू माझा शिष्य आहेस ना, लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना नुसता लिहित बसू नको, शब्दाची तलवार करचं, पण वाणीची तोफ करण्याची गरज आहे,’ क्षणात जाग आली, अस्वस्थ झालो. १३ जूनला आचार्य अत्रे यांची ५५ वी पुण्यतिथि आहे. त्यांच्या आत्म्याला साक्ष ठेवून मनात आले की… ‘जर फडणवीससाहेब सभांसाठी बाहेर पडले तर त्यांची जिथे जिथे सभा होईल, त्या त्या जागेवर आपण सभा घेत का फिरू नये? कोणी बोलवो न बोलवो… गर्दी जमो न जमो… सकाळी एका राजकीय मित्राला कल्पना सांगितली . तो म्हणाला ‘नुसत जाहीर करां बघा कशी गर्दी जमते’ आणि हे यासाठी केलं पाहिजे की, नवीन पिढीला या महाराष्ट्राचे वातावरण गलिच्छ होण्याचे धोके सांगितले पाहिजेत , ‘ही माझ्या पिढीची जबाबदारी आहे’, असा अत्रे साहेबांच्या आदेशाचा मी अर्थ लावतो. त्यावेळी मला ८५ वर्ष वे सुरु झालेले असेल. वय वाढेल हे खरे पण अनुभवही वाढेलच ना. तेव्हा बघू या कसं जमतंय ते,
फडणवीससाहेब, तुम्ही सभांचे ठरवून टाका. मी ठरवतो, तुम्ही खूप मोठे आहात, मोठ्या पदावर राहीले आहात… गंगाधररावांचे पुत्र आहात.. ते मनाने फार मोठे होते, त्यांना विधान परीषदेत मी ऐकले आहे, नागपूरच्या तुमच्या घरी मातोश्रींच्या हातचे जेवलोही आहे. वामनराव परब, राम कापसे, मधु देवळेकर, या भाजपच्या मित्रांबरोबरच गेलो होतो. त्यावेळचे भाजपाचे लोक मैत्रीलाही खूप छान होते. रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे, रामभाऊ नाईक हे ‘तीन राम’ यांनी विधानसभा गाजवली. कॉंग्रेसवाल्यांचेही जिव्हाळ्याचे मित्र होते. एकदा काय झालं, कृष्णा देसाईने नागपूर विधानसभा अधिवेशनाला त्याच्या ४ वर्षाच्या मुलाला आणले. कृष्णा विरोधी पक्षाच्या दालनात मुलाला घेवून बसला होता. त्याची सभागृहात ‘लक्षवेधी सूचना’ होती. मुलाला एकटं ठेवून कसं जायचं… तेवढ्यात समोरुन रामभाऊ म्हाळगी आले . कृष्णांनी त्यांना पाहिले आणि हाक मारली… ‘ रामभाऊ… इकडे ये,.. माझी लक्षवेधी आहे मी सभागृहात जातोय… माझ्या मुलाला अर्धा तास सांभाळ’ रामभाऊ म्हाळगी आले, भारतीय बैठकीवर ते बसले, अर्धा तास मुलाला खेळवलं. मी तिथून जाताना ते पाहिले … तेवढ्यात कृष्णा आला… मग त्या दोघांच्या गप्पा झाल्या. दुसऱ्या दिवशीच्या ‘मराठा’त मी छान चौकट टाकली. ‘कम्युिनस्ट आमदाराच्या मुलाला अर्धा तास खेळवणारा जनसंघाचा आमदार’ ती बातमी त्या दिवशी वाचनीय झाली. ही गोष्ट १९६७ च्या डिसेंबरमधली. त्यावेळी आमदारांमध्ये असे वातावरण होते.
अगदी अलीकडची गोष्ट रामभाऊ नाईक उत्तरप्रदेशचे राज्यपाल होते,त्यांच्या वाढदिवसाला अखिलेश यादव अभिनंदन करायला राजभवनवर आले. रामभाऊंनी ते लक्षात ठेवून अखिलेशच्या वाढदिवसाला तो कोणत्याही पदावर नसताना त्यांचे घर गाठले आणि अभिनंदन केले. अमित शाहंना काय वाटेल याची परवा त्यांनी केली नाही. अखिलेश यादव सपाचे. भाजपाच्या विरोधात. नाती अशी जपली जात होती. आता दु्:ख याचे आहे की, मैत्रीचे रुपांतर शत्रूत्वात झाले आणि म्हणून चिखल झाला.निव डणूक ४ दिवसांची असते,विजय , पराजय हा त्याचा भाग असतो. तो चार दिवसाचा नंतर सर्वा्ंंना एकाच गावात प्रेमाने आिण एकोप्याने रहायचे असते. ही भावना पूर्वी टिकवली गेली होती. आता सगळे वातावरण शत्रूत्वाचे झाले आहे. राजकारणातला धटींगणपणा वाढलेला आहे म्हणून नवीन पिढीला हे सर्व सांगायला हवं…त्यासाठी पुढारी व्हायची गरज नाही. पण जबाबदारी झटकता येणार नाही. पत्रकाराला, प्रबोधनाची भूमिका घ्यावी लागेल. असे मनात येवून सभा घ्यायचा अत्रे साहेबांचा आदेश असेल. आणि म्हणून िवचार केला. फडणवीस साहेबांच्या पाठोपाठ सभा घेण्यामागे तो अर्थ आहे.किती जमतंय ते बघू या….तेव्हा फडणवीस साहेब. तुम्ही पुढे आणि मी मागे.. तुम्ही फडणवीस… मी भावे… फरक इतकाच की, तुम्ही नाना फडणवीसांपैकी आहात की नाही, मला माहीत नाही. पण मी पु.भा.भाव्यांपैकी नाही…विनोबा भाव्यांपैकी आहे. त्यामुळे थोडी मजा येईल बघू या… कशी कल्पना वाटते फडणवीस साहेब तुम्हाला?