फिलीप, ॲरिस्टॉटल आणि सिकंदर

-सुनील तांबे

मॅसिडोनिया हा प्रदेश ग्रीसच्या उत्तरेचा. ह्या प्रदेशातील लोक रानटी म्हणजे असभ्य आहेत अशी ग्रीकांची समजूत होती. मॅसिडोनियाचा राजा फिलीप. ग्रीक नगर-राज्यांमधील लोकशाही, व्यक्तीमूल्य वा व्यक्तिवाद ह्यांनी जोपासलेल्या कला व सभ्यतेचं त्याला अप्रूप वाटत नव्हतं. विज्ञान, कला, तत्वज्ञान ह्या क्षेत्रात ग्रीक नगर-राज्यांमधील प्रतिभावंतांनी केलेल्या कामगिरीचं त्याला कौतुक नव्हतं. ग्रीक नगर-राज्यांमधील भ्रष्टाचार आणि अराजकता त्याला दिसत होती. लोभी व्यापारी आणि सावकार देशाची संपत्ती लुटत आहेत, नादान राजकारणी लोकांना गंडवत आहेत आणि भाषणं करून लोकांची दिशाभूल करणारे वक्त्यांची या नगर-राज्यांमध्ये भरमार आहे, असं फिलीपचं मत होतं. प्रतिभावंत आणि गुलाम या नगर-राज्यांमध्ये राहतात, असं निरीक्षण फिलीपने नोंदवलं आहे. नगर-राज्यांमध्ये चिरफळ्या उडालेल्या ग्रीसची एकात्मता साधणं आणि त्या देशाला जगाचं केंद्र बनवण्याची फिलीपची आकांक्षा होती.

ॲरिस्टॉटल मॅसिडोनियाचा. त्याचे वडील मॅसिडोनियाच्या राजाचे म्हणजे फिलीपच्या वडलांचे डॉक्टर होते. अथेन्स या नगर-राज्यात प्लेटोने सुरू केलेल्या शाळेत ॲरिस्टॉटल शिकायला आला. रानटी असभ्य लोकांच्या प्रदेशातून आलेल्या या विद्यार्थ्याकडे बुद्धी कितपत असेल असा प्रश्न कदाचित प्लेटोला पडला असावा. पण ॲरिस्टॉटलच्या प्रतिभेने प्लेटो दिपून गेला. ॲरिस्टॉटल म्हणजे चालती-बोलती प्रज्ञा या शब्दांत प्लेटोने आपल्या शिष्योत्तमाची नोंद केली आहे. ॲरिस्टॉटल प्रतिभावान होताच पण तालेवार घराण्यातला होता. पुस्तक म्हणजे हस्तलिखितं खरेदी करण्यावर तो भरपूर पैसे खर्च करत असे. वाचनघर असं ॲरिस्टॉटलच्या घराचं वर्णन प्लेटोने केलं. प्लेटोच्या पश्चात ॲरिस्टॉटल त्याच्या शाळेची जबाबदारी घेईल अशी अनेकांची अपेक्षा होती. मात्र ॲरिस्टॉटलने स्वतःची शाळा सुरू केली.

मॅसिडोनियाचा राजा फिलीप ह्याने सर्व ग्रीक नगर-राज्यांचा पराभव करून त्यांचं एकत्रीकरण केलं. त्याची आकांक्षा होती. ग्रीसला जगाचं केंद्र बनवण्याची म्हणजे सर्व जग आपल्या टाचेखाली आणण्याची. त्याचा मुलगा—अलेक्झांडर वा सिकंदर. आपल्या मुलाचा शिक्षक म्हणून फिलीपने ॲरिस्टॉटलची निवड केली. त्यावेळी सिकंदर १३ वर्षांचा होता. फेफरं येणारा दारूडा मुलगा होता तो. जेमतेम दोन वर्षं सिकंदर ॲरिस्टॉटलकडे शिक्षण घेत होता. ह्या दोन वर्षांत तो काय शिकला देवजाणे. माझ्या सत्तेच्या क्षेत्रात काय आहे ह्यापेक्षा चांगुलपणाच्या ज्ञानामध्ये मी आपल्यामुळे पारंगत झालो, असं सिंकदरने ॲरिस्टॉटलला लिहिलेल्या एका पत्रात म्हटलं आहे.

फिलीपचा खून करण्याची सुपारी पर्शियाच्या सम्राटाने दिली होती. जग जिंकण्याचं बापाचं स्वप्न पूर्ण करण्याची महत्वाकांक्षा सिकंदरला होती. तो जग जिंकण्याच्या मोहिमेवर रवाना झाला. ॲरिस्टॉटल मात्र ग्रीसमध्येच राह्यला. ॲरिस्टॉटलच्या सांगण्यावरून नाईल नदीचा उगम शोधण्याची आणि तिला येणार्‍या पुरांची कारणमीमांसा करण्याची महागडी मोहीम सिकंदरने हाती घेतली. त्याशिवाय आशियातील ज्या प्रदेशांमध्ये सिकंदरची सेना गेली तेथील दगड, माती, वनस्पती, जीव-जंतू, प्राणी ह्यांचे अवशेष ॲरिस्टॉटलकडे पोहचते केले जात. ॲरिस्टॉटलच्या संशोधनाला सिकंदरने सुमारे ८०० टॅलेंट म्हणजे आजच्या हिशेबाने ४०लाख डॉलर्सची (संदर्भ- द स्टोरी ऑफ फिलॉसॉफी, लेखक- विल ड्युरंट) मदत सरकारी खजिन्यातून केली. युरोपच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा प्रचंड निधी संशोधनासाठी खर्च करण्यात आला.

ॲरिस्टॉटल तालेवार होता, त्याचा विवाहही तालेवार घराण्यात झाला. तो सम्राटाचा गुरू होता. त्याने आपली संपत्ती संशोधनाच्या आणि शिक्षणाच्या कामी वापरली. ग्रीसमधील नगर-राज्यांमध्ये मॅसिडोनियन अधिकार्‍यांची सत्ता होती. ह्या सत्तेच्या विरोधात असंतोष खदखदत होता. ह्या काळात ॲरिस्टॉटल आपल्या शाळेमध्ये जीवशास्त्र, काव्यशास्त्र, खगोल, गणित अशा अनेक विषयांवर संशोधन आणि अध्यापनही करत होता.

सॉक्रेटीसच्या आधी ग्रीक तत्वज्ञान वा दर्शन होतं आणि ॲरिस्टॉटलच्या आधी ग्रीक विज्ञान होतं. मात्र ग्रीक तत्वज्ञानाची इमारत सॉक्रेटीसने रचलेल्या पायावर उभी राह्यली तर विज्ञानाच्या इमारतीचा पाया ॲरिस्टॉटलने घातला असं विल ड्यूरंटने नोंदवलं आहे.

(लेखक नामांकित पत्रकार व अभ्यासक आहेत)

9987063670 

हे सुद्धा नक्की वाचा-सॉक्रेटीस, प्लेटो,ॲरिस्टॉटल http://bit.ly/2TezcyN

 

Previous articleया कवितेचं आता काय करायचं?
Next article‘माडिया’ जमातीमधील पहिली महिला डॉक्टर
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here