या कवितेचं आता काय करायचं?

— बालाजी सुतार

ही जी आग
आत्ता इथे धुमसताना दिसतेय नं,
तिथे काल एक मूल खेळत होतं.
हसरं, आनंदी,
श्वास घ्यायला शिकलेलं नुकतंच.

ती, तिथे, त्या धुमसत्या निखा-यांत
बाळ-कवटी दिसतेय का एक?
ती त्याचीच बहुधा.

आणि या गोळ्या झाडल्या जातायत नं,
ती विद्यापीठ नावाची शाळा आहे. मोठ्या मुलांची.

मुलं – नुकतीच प्रेमात पडू लागलेली.
मुलींच्या प्रेमात पडता-पडता
देशाच्याही प्रेमात पडलीच असती त्यातली काही
आज ना उद्या.

त्या विच्छिन्न रक्तलांच्छित
बुलंद छात्या इतस्ततः विखुरलेल्या,
त्या, त्या मुलांच्या आहेत,
जी, भविष्ये म्हणवली जायची या भूमीची,
ज्यांच्या निर्भ्रांत कोवळ्या श्वासांतून
वर्तमान टवटवीत फुलणार होता इथला.

नुकतीच प्रेमात पडायला लागलेली मुलं होती ती.

हे इथे, उघड्यावर
या पोरीवर चढतायत हे नं गुंड
ते देशभक्त धर्मवीर म्हणवतात स्वतःला,
ते – संस्कृती शिकवतायत त्या पोरीला.

ते चढतायत तिच्यावर,
त्यांच्या संस्कृतीला साजेशी वस्त्रे नव्हती पेहेरलेली तिने,
म्हणून.

आपल्या उदात्त संस्कृतीच्या रक्षणार्थ
एवढं सोसायलाच हवं तिने.
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी
आणि
परस्त्री मातेसमान की कायसं,
अशी पवित्रोदात्त संस्कृती.

आणि – तिथे, त्या थिएटरात
एकाला बडवतायत नं जत्थ्याने लोक,
देशभक्तच आहेत, तेही. जाज्वल्य.
तो कुणीसा बडवला जात असलेला
उभा नव्हता राहिला राष्ट्रगीतावेळी
त्याला गुडघेदुखीचा विकार असेलही कदाचित,
पण
देशभक्तीपुढे गुडघेदुखी किरकोळच मानतात ते लोक.

हा, या इथून,
रक्ताचा हा जो अशक्त ओहळ वाहतोय,
तो, त्या अर्धनागड्या म्हाता-याचा आहे,
ज्याला ‘बाप’ म्हणत आलो आपण,
नि, आपल्याशिवाय सगळं जग पूजत आलं ज्याला,
पिढ्यानपिढ्या,
त्याच्या छातीत आधी, नि पुतळ्यावर आता,
गोळ्या घालून मारू पाहतायत काही लोक त्याला पुनःपुन्हा.

शस्त्राने मरणा-यांतला हा म्हातारा नाही,
हे उमगतच नाहीय त्यांना.
त्यांना सुडाचं समाधान लाभतं आहे,
ते चिरंजीव वाहतं रक्त पाहताना.

तर –
आसमंत असा कोंदटून गेला आहे चौफेर
कुट्टकाळ्या धुराने
रक्ताच्या ओहळाने
बाळ-कवटीच्या चुराड्याने
बुलंद छात्यांच्या चिंधड्याने
भोगल्या पोरीच्या किंकाळीने
अश्रापांच्या आक्रंदनाने –

– अशा भेसूर वेळी मी ही कविता लिहितो आहे.

– हिचं काय करायचं ते तुम्हीच ठरवा आता.

तुम्ही ठरवा –

या
कवितेचं
आता
काय
करायचं?

काय
करायचं
या
कवितेचं
आता?

ठरवा तुम्ही!-

– (बालाजी सुतार हे प्रतिभावंत कवी व कथाकार आहेत)

93250 47883

Previous articleथप्पड: गोष्ट विवाहसंस्थेतील कॅज्युअल सेक्सिझमची आणि सोयीस्कर दुर्लक्षाची!
Next articleफिलीप, ॲरिस्टॉटल आणि सिकंदर
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.