लेखक- डॉ. विनय काटे
प्रिय नथुराम,
तुला “प्रिय” म्हणतोय म्हणून आश्चर्य अजिबात वाटून घेऊ नकोस कारण मला तुझाच काय कुणाचाही द्वेष करता येत नाही. हवं तर ह्याला माझी अगतिकता समज किंवा माझा ढोंगीपणा, पण द्वेषाच्या भावनेवर मात करायला खूप कष्ट घेतलेत मी. ज्यांनी आपल्या देशावर राज्य केलं त्या ब्रिटिशांच्या २३ पोलिसांना जेव्हा चौरी-चौरा मध्ये “असहकार आंदोलन” मध्ये जिवंत जाळले गेले तेव्हा मी ते आंदोलनच मागे घेतलं आणि प्रायश्चित्त केलं. माझा लढा ब्रिटिश राज्याविरुद्ध होता, ब्रिटिशांविरुद्ध नव्हताच मुळी!
३० जानेवारी १९४८ ला जेव्हा तू माझ्या छातीत ३ गोळ्या झाडून मोकळा झालास त्यादिवशी तुझं आणि माझं नाव कायमचं जोडलं गेलं इतिहासात. पण माझ्या देहाला मारून तू माझा विचार संपवू शकत नाहीस, हे तुला कुणी समजावून कसं सांगितलं नाही याचं खरंच खूप दुःख वाटतं, अगदी तुझ्या गोळ्यांनी दिलेल्या वेदनेपेक्षा जास्त! आणि माझा विचार तरी माझा एकट्याचा कुठे होता अरे? महावीर, बुद्ध आणि येशूची अहिंसा घेऊन मी हृदयात घेऊन चालत होतो. ते तिघेही मेले पण त्यांचे विचार हजारो वर्षे संपले नाहीत, मग माझ्या मरणाने असा कोणता मोठा आघात तू त्या चिरंतन विचारांवर करणार होतास? तुझी फाशी दुसऱ्या शिक्षेत बदलावी म्हणून माझ्या मुलांनी सरकारकडे याचना केली पण दुर्दैवाने तसं झालं नाही. तसं झालं असतं तर कदाचित तू अमेरिकेतल्या मार्टिन ला आणि आफ्रिकेतल्या नेल्सनला पाहू शकला असतास त्या बुद्ध, महावीर, येशूच्या अहिंसेने क्रांती घडवताना. तेवढं आयुष्य नक्कीच शिल्लक होतं तुझं!
तुझ्यावर खटला चालवताना म्हणे कोर्टाने तुला आठवडाभर तुझी बाजू मांडायची संधी दिली. तशीच माझी बाजू मांडायची संधी जर तू जर मला दिली असतीस तर मी खात्रीने सांगतो की तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी यथाशक्ती देऊ शकलो असतो, तुझ्या प्रत्येक शंकेच निरसन मी करू शकलो असतो आणि कदाचित तुझ्यातल्या उर्जेला एका विधायक मार्गाने व्यक्त व्हायला मार्गही देऊ शकलो असतो. बरं झालं अंगुलीमालकडे तेव्हा बॅरेटाची रिव्हॉल्वर नव्हती, नाहीतर तो बुद्ध एकही प्रश्न विचारायच्या आधीच संपला असता माझ्यासारखा आणि तो अंगुलीमाल कायमचा खुनीच राहिला असता. तंत्रज्ञानातील प्रगती अविचारी माणसाचा घात करते ती अशी!
मला कळले की तुला म्हणे एक हिंदुराष्ट्र निर्माण करायचे होते. पण मला अजून समजले नाही की मला मारून तू हे तुझे ध्येय साध्य कसे करणार होतास? ना मी कुठल्या पक्षात होतो, ना मी कुठल्या धर्माची धुरा वाहत होतो. आणि हिंदू धर्माच बोलशील तर मी तर आजन्म हिंदू म्हणून जगलो. फरक फक्त एवढाच आहे की मी ज्या हिंदू धर्मात जगलो त्यात मला दुसऱ्या धर्मांच्या लोकांप्रती द्वेष नाही तर प्रेम करायची शिकवण मिळाली होती, त्यांच्याशी शांततापूर्ण सहजीवनात जगायची कला शिकवली होती. तुझ्या कल्पनेतला हिंदू धर्म मला तरी अकल्पित आणि भयानक वाटतो बाबा!
मला अजूनही एका गोष्टीचं खूप वाईट वाटत तुझ्या बाबतीत, ते म्हणजे तुझ्या एकटे पडण्याचं. मला मरून कित्येक दशके झाली तरी जगभरातील लोक मला त्यांच्या आयुष्याचा भाग मानतात, माझ्या नावाने तिकिटे छापतात, रस्ते बांधतात. पण तुला मात्र खूप उपेक्षा सहन करावी लागली, जन्मभर आणि जन्मानंतर पण! ज्यांनी तुला मला मारण्यासाठी तयार केलं त्यांनी तू त्यात यशस्वी झाल्यावरसुद्धा तुझं पालकत्वच नाकारलं! तू कदाचित तेव्हा समजून घेतलं असशील की संघटना वाचावी म्हणून ते हा त्याग करतायत, पण आज त्या घटनेला 70 वर्षे होत आली तरीही ते तुझा संबंधच नाकारतात त्यांच्याशी. आणि उलटपक्षी माझा चरखा घेऊन फोटो काढतात आणि जगभर भाषणे देताना माझाच उल्लेख करतात. तुझा वापर करून नंतर तुला इतकं वाऱ्यावर टाकून दिलेलं मलासुद्धा पाहवत नाही. जन्मलेल्या मुलांना सुद्धा कोणी नथुराम असं नाव ठेवत नाही आजकाल. कसं सहन करतोस रे हे सगळं?
एका मर्त्य मानवाने, दुसऱ्या मर्त्य मानवाला जीवे मारून जगात कुठला विचार संपलाय आजवर? मला माहित आहे की तुझ्या गोळ्यांनी मला मरण आले तरी माझा विचार संपलेला नाहीये, आणि माझ्या खुनाची शिक्षा म्हणून तुला फासावर चढवून तुझा विचार पण अजून संपलेला नाहीये. येशूला मारताना तो त्याच्या मारेकऱ्यांसाठी देवाकडे क्षमायाचना करत होता, मला तेवढा तरी वेळ द्यायचा होतास तू की मी तुला माफ करण्यासाठी मी चार शब्द तरी बोलू शकलो असतो. कदाचित विनोबाला सांगू शकलो असतो की या मुलाला थोडं प्रेम द्या, ज्ञान द्या आणि सोबत ठेवा स्वतःच्या. तुझेही आयुष्य बदलले असते त्याने आणि तुला अमूलाग्र बदललेला पाहून येणाऱ्या काळातली मुलेही तुझ्यासारखी वाट चुकली नसती. कदाचित पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी यांच्या डोक्यात गोळ्या उतारणारे हात कधी तयारच झाले नसते. तुझा आततायी विचार तुझ्याचकरवी मारायची ताकद माझ्या विचारांत नक्कीच होती, पण दुर्दैव की तुला ती संधी द्यायला मी शिल्लक नव्हतो.
नथुरामा, तुझी अवस्था पाहून खरंच खूप दुःख वाटते रे. घड्याळाचे काटे जर उलटे फिरवता आले असते तर तुलाही नेलं असतं माझ्या सोबत आफ्रिकेला, भारतदर्शनाला, इंग्लंडला आणि नोआखाली ला सुद्धा. दाखवलं असतं तुला या जगातलं द्वेष आणि प्रेमाचं चिरंतन द्वंद्व. ओळख करून दिली असती तुला प्रेमातून निपजणाऱ्या आनंदाची, सुखाची, शांततेची आणि मानवतेची जी या द्वेषाच्या वणव्याला विझवून टाकायची शाश्वत शक्ती ठेवून असते. कदाचित तुझ्यामधून एखादा विनोबा, एखादा नेल्सन, एखादा मार्टिन सुद्धा निर्माण करू शकलो असतो. पण आता सगळंच तुझ्या आणि माझ्या हाताबाहेर गेलंय. मला अनुसरणे हे नेहमीच खूप अवघड आहे हे मला माहित आहे, तुला अनुसरणे मात्र आजकाल खूप सोपं झालंय. इतकं सोपं झालंय की मला आदर्श मानणारेही आता तुझ्या शैलीत विरोधकांचे आवाज बंद करतायत!
नथुरामा, कालाय तस्मै नमः !
तुझा प्रिय,
बापू
लेखक- डॉ. विनय काटे
वाह विनय सर, अगदी याच शब्दांत हे सगळं मांडव अस अनेक दिवसांपासून वाटतं होत.. बापू असते तर खरंच असेच व्यक्त झाले असते,या पत्रातून तुम्ही खऱ्या अर्थाने बापूना मांडल.. अगदी सहज सोपं शब्दातून, लिखाण शैलीतून बापूंना तुम्ही रेखाटलं,या पत्रातून बापू सहज समजून जातात.. हे पत्र कायम माझ्या संग्रही ठेवेल… तुम्हाला,तुमच्या शब्दांना,आणि तुमच्या लेखणीला सलाम….