भंडारा अग्नीतांडवात नर्सेसचा बळी…

 

प्रवीण बर्दापूरकर

भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या अग्नितांडव प्रकरणी दोन नर्सेस म्हणजे परिचारिकांवर गुन्हा दाखल झाल्याची बातमी वाचली आणि राजा    परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातलं ग . दि . माडगूळकर यांचं , आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेल्या ‘उद्धवा अजब तुझे सरकार ‘ या गाण्याची आठवण झाली . या अग्नीकांडात आधी निरागस बालकांचा आणि आता आगीशी संबंध नसलेल्या २ नर्सेसचा बळी गेला आहे , असाच या गुन्ह्यांचा अर्थ आहे .

उद्धव ठाकरे अजब नाहीत , लहरी नाहीत , ते अत्यंत सुसंस्कृत आहेत , संवेदनशील आहेत , महाराष्ट्रातल्या जनतेच्या  प्रश्नांची त्यांना अतिशय मूलभूत जाण आहे , असं माझं मत आहे . हे मत अर्थातच प्रदीर्घ अनुभवानंतर तयार झालेलं आहे . उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली , तेव्हापासून त्यांचं राजकारण  बघतो आहे आणि तेव्हापासून हे मत मी व्यक्त करत आलेलो आहे . उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाले तेव्हा महाराष्ट्रातील बहुसंख्य पत्रकार आणि संपादक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व शैलीबद्दल प्रश्न उपस्थित करत असतानाही मी मात्र त्यांच्यासंबंधी व्यक्त केलेल्या मतांवर ठाम होतो आणि दोन दशकानंतर का असेना माझ्या त्या मताशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर माध्यमातील बहुसंख्य ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सहमत झालेत . हे मी उपरोधिकपणे लिहित नाहीये , कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतानांच पक्षाची सूत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे आली आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतरही ती सूत्रं त्यांच्याकडेच राहिली . बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा करिष्मा असलेल्या नेत्याच्या पश्चातही या काळात राजकीय पक्ष कसा टिकवून ठेवावा याचा एक आदर्श वस्तुपाठच उद्धव ठाकरे यांनी लिहिला . त्यांनी पक्ष नेतृत्व म्हणून जी काही कामगिरी बजावली त्याचं फळ म्हणून आज ना उद्या महाराष्ट्राची सूत्र त्यांच्याकडे येणार याबद्दल माझ्या मनात तीळमात्रही शंका नव्हती आणि तसंच घडलंही आहे . म्हणूनच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या त्यांच्याच राज्यात भंडारा अग्निकांड प्रकरणी दोन परिचारिकांवर भारतीय दंड संहितेच्या ३०४ ( २ ) सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा ही बाब काही स्पृहनीय नाही , महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोभा देणारी तर मुळीच नाही , हे स्पष्टपणे सांगायलाच हवं .

मुळामध्ये आरोग्य यंत्रणेमध्ये नर्स या पदाला फार मोठे अधिकारच नाही , हे मी माईला म्हणजे माझ्या आईला काम करताना जे काही बघितलं त्यावरुन सांगतो . मराठवाड्याच्या अत्यंत दुर्गम भागात १९६० ते १९८० या काळामध्ये माईला नर्स म्हणून काम करताना बघितलं , तालुका आणि जिल्हा रुग्णालयातही काम करताना मी तिला बघितलं . त्या काळात नर्सचं ते जे जग मी अनुभवलं , ते मनावर कायम कोरलं गेलं . आरोग्य व्यवस्थेच्या यंत्रणेमध्ये नर्सचं कामच मुळी केवळ रुग्णांची शुषुश्रा म्हणजे  देखभाल करणं आहे . रुग्णालयाची देखभाल करणं नाही . रुग्णालयाचं प्रशासन सांभाळणंसुद्धा नर्सचं कधीच नसतं . त्या कामासाठी तिच्यापेक्षा वरिष्ठ असणारे , अनुभवी आणि तज्ज्ञ लोक असतात . भंडारा रुग्णालयातली आग ही शार्टसर्किटने लागली असं सांगण्यात आलेलं आहे , मग प्रश्न असा उपस्थित होतो की , शार्ट सर्किटने आग लागली असेल तर त्याला नर्स जबाबदार कशा ? तसं असेल तर विद्युत व्यवस्था सांभाळण्याचीही जबाबदारी नर्सेसवर सोपविण्यात आली आहे का ? कुणी सोपवली , कधी सोपवली ?

ज्या दोन नर्सेसवर गुन्हा दाखल झाला त्या , आग लागली तेव्हा बाल रुग्णांच्या त्या कक्षात नव्हत्या म्हणे . त्याबद्दल  फार फार तर त्यांना निष्काळजीपणाचा ठपका ठेवून निलंबनाची शिक्षा देता आली असती . परंतु  , शार्टसर्किने आग लागते , त्या आगीची तज्ज्ञांच्यामार्फत चौकशी केली जाते आणि त्यात नर्सेसला जबाबदार धरल जातं , हे ‘अंधेर नगरी चौपट राजासारखं‘ आहे . नर्सेस जर आगीसाठी जबाबदार असतील तर त्या इमारतीची देखभाल करणारे ,  विद्युत यंत्रणा आणि तत्सम यंत्र इन्स्टॉल करणारे ,  गुणवत्तेच्या दर्जाच्या निकषांवर ती यंत्रणा आणि संबंधित यंत्रे उत्कृष्ट दर्जाची होती की नाही ही पाहणारी यंत्रणा , त्या रुग्णालयातले प्रशासकीय अधिकारी , त्या रुग्णालयाचे जे कुणी सिव्हिल सर्जन , आरोग्य अधिकारी ,  प्रशासनातले अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या इमारतीच्या देखभालीची जबाबदारी असते त्यांच्या नियुक्त्या कशासाठी केल्या आहेत ?

एक लक्षात घ्या , नर्स हा आरोग्य व्यवस्थेतला तसा उपेक्षितच घटक आहे . वेळप्रसंगी अखंड काम करुन , रुग्णांच्या वेदनेच्या क्वचित रुग्णावर घोंगावणार्‍या  मृत्युच्या सावटात राहूनही त्यांच्या श्रमाचं चीज होत नाही ; त्यांना कायमच दुर्लक्षित ठेवलं जातं , असा अनुभव आहे . डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रुग्णावर औषोधोपचार करणं याशिवाय दुसरा कोणताही अधिकार नर्सला नाही . कोणत्याही रुग्णाला नर्स  स्वत:च्या मनानं/अधिकारात एखादं इंजक्शनच सोडाच  पण , अन्य औषधं-गोळ्या देता येत नाही . डॉक्टर लिहून देतील त्याप्रमाणे औषधोपचार करणं आणि रुग्णाची देखभाल करण्यापलीकडे नर्सेसला कोणतेही अधिकार नाहीत . अशा परिस्थितीमध्ये ती आग प्रतिबंधक यंत्रणा ठीक होती किंवा नाही , त्याची तपासणी व्यवस्थित होत होती का नाही . अचानकपणे आग लागली तर विद्युत पुरवठा आपोआप खंडित व्हावा अशी यंत्रणा बसवण्यात आली होती की नाही , मुळात  या सर्व यंत्रणा आहेत किंवा  नाहीत , याची जबाबदारी नर्सेसवर टाकणं कस काय समर्थनीय आहे ?

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची कोरोंना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे ; त्यांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा . आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांनी कोरोनाच्या काळात जोखीम पत्करुन प्रशंसनीय कामगिरी बजावली आहे . या कामगिरीबद्दल त्यांचं मुक्तकंठाने कौतुक झालं आहे . मात्र , भंडारा अग्नितांडव प्रकरणी दोन नर्सेसचा बळी दिला जावा आणि त्याला संमती देणारे त्याच राजेश टोपे यांची आरोग्यमंत्री म्हणून मान्यता असावी हे काही पटू शकणारं नाही . आरोग्य व्यवस्थेतले म्हणजे भंडारा जिल्हा रुग्णालयातले जे बाकी सर्व अधिकारी आणि कर्मचारी आहेत  त्यांना सोडून  ज्यांना या आगीशी प्रत्यक्ष तर सोडाच अप्रत्यक्षही  कोणताही संबंध नाही  त्या नर्सेसना जबाबदार धरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं हे चोर सोडून सान्याशाला फाशी देण्यासारखं आहे म्हणूनच ‘उद्धवा अजब तुझे सरकार ‘ हे गाणं आठवलं . हे गाणं भंडारा अग्नीकांडाच्या संदर्भात खरं आहे हा समज जनतेत पसरु नये म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच आरोग्यमंत्री  राजेश टोपे यांनी व्यक्तिश: या प्रकरणात लक्ष घालावं आणि जे कुणी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी असतील त्यांच्यावर कशी कारवाई होईल याकडे जातीनं लक्ष द्यावं .

■■■

दुसरा एक मुददा – गेल्या आठवडयात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विमान प्रवासावरुन बरंच वादंग निर्माण झालं . मात्र स्पष्ट सांगायला हवं , राज्यपालांना दिली गेलेली वागणूक खुजेपणाची असून महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत आणि पुरोगामी राज्याला असा खुजेपणा  शोभणारा नाही . महाराष्ट्राची ती परंपरा नाही . विरोधी पक्षाला आणि त्या पक्षाच्या नेत्याला कायम सन्मानानं वागवणारे , त्यांचा आदर करणारे शरद पवार राज्याच्या सराकारचे ‘मेंटर’ असताना मार्गदर्शक असताना राज्यपालांना विमान नाकारलं जावं , ही काही पटणारी बाब नाही .

राज्यपाल आणि मुख्यमंत्री वाद या देशातल्या कुठल्याही राज्याला नवा नाही . अगदी काल-परवा पाँडेचरीत काय घडलं आणि अखेर पाँडेचरीच्या राज्यपाल किरण बेदी यांची कशी उचलबांगडी करावी लागली हे आपण वाचलं आहे . महाराष्ट्रातही राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री किंवा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असे वादाचे अनेक प्रसंग कसे ओढावले ते माझे एकेकाळचे लोकसत्तातील सहकारी संदीप प्रधान यांनी ‘लोकमत’च्या तीन-चार दिवसांपूर्वीच्या अंकात विस्तृतपणे लिहिले आहे , त्यामुळे त्या सगळया प्रसंगांची पुनरावृत्ती करत नाही .

महाराष्ट्र राज्याच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार राज्यपाल कोश्यारी प्रकरणात सुसंस्कृतपणे वागलं नाही . उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात या विषयावर थेट कमेंट करण्याचं कारण एकच की , राज्य सरकारचं विमान हा मुख्यमंत्रीचा अधिकार कक्षेत येणारा विषय  आहे . उद्धव ठाकरे यांचे सल्लागार सध्या कोण आहेत हे मला माहीत नाही आणि जे जाहीर सल्लागार आहेत ते अजय मेहता हे काही फार कुशल अधिकारी किंवा सुसंस्कृत माणूस म्हणून प्रख्यात नाहीत . त्यांनी जर हा सल्ला दिला असेल तर माहीत नाही . पण , उद्धव ठाकरेंनी एक लक्षात ठेवावं , महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात एक सुसंस्कृत माणूस अशी त्यांची प्रतिमा आहे . मुख्यमंत्रीपद आलं , पण मुख्यमंत्रीपद हे कांही वज्रपट नव्हे ,  कधी ना  कधी  एक दिवस ते जाईलच  . तरी  सुसंस्कृत म्हणून उद्धव ठाकरे जनतेच्या कायम स्मरणात राहतील . कोरोनाच्या काळात ज्या धीरानं त्यांनी परिस्थिती हाताळली , महाराष्ट्राच्या जनतेला जो मानसिक आधार  दिला , या राज्याचा नेता म्हणून महाराष्ट्राच्या जनतेची जी काळजी घेतली ती अविस्मरणीय आहे आणि  त्याबद्दल मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं  करावं तेवढं कौतुक थोडंच आहे . म्हणून त्यांच्या या सुसंस्कृतपणाच्या प्रतिमेला तडा जाईल अशा पद्धतीची कोणतीही कृती उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री म्हणून होऊ नये अशी अपेक्षा आहे .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९

 

 

Previous article‘कीमिया’गिरी: साहिर
Next articleसंत गाडगेबाबांचा पारदर्शक पत्रव्यवहार  
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here