संत गाडगेबाबांचा पारदर्शक पत्रव्यवहार  

 – संतोष अरसोड 

संत गाडगेबाबा निरक्षर जरी असले तरी त्यांचा दृष्टीकोन साक्षरांनाही लाजविणारा होता. देशाच्या कानाकोपऱ्यात प्रबोधन करून त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकजागरण केले होते. महाराष्ट्रामध्ये शिक्षण, गो-रक्षण, धर्मशाळा, वृद्धाश्रम, पाणपोया यासह विविध क्षेत्रात प्रचंड काम त्यांनी उभे केले असताना त्यात अजिबात गैरप्रकार होऊ दिला नाही. त्यांचे अनुयायीसुध्दा तितकेच प्रामाणिक होते. बाबांच्या कार्यात त्यांनी आपले सर्वस्व झोकून दिले होते. बाबांच्या या पारदर्शक सामाजिक कार्यात त्यांनी केलेला पत्रव्यवहार हा अत्यंत बोलका आहे. या पत्रव्यवहारातून बाबांची सामाजिक उंची आपल्या लक्षात येईल. ही सारीच्या सारी पत्रे बाबांनी त्यांच्या अनुयायांकडून लिहून घेतली आहे. या पत्रांमधून त्यांची सामाजिक कणव आपल्या दृष्टीस पडते.

नातेवाईकांसंदर्भात लिहिलेली पत्र तर अफलातून आहेत. एका कर्तव्य कठोर सामाजिक कुटुंब प्रमुखाचे दर्शन घडविणारी पत्रे काळजाचा ठोका चुकवितात. एकेका पैशाच्या हिशेबापासून तर यात्रेकरून, गोरक्षण, गायी राखणारा या सर्वांबाबतची कणव या पत्रांमधून समोर येते. स्वयंपाकात काय असावे, कुणी उपाशी राहू नये इथपासून तर बांधकामात कोणते साहित्य वापरावे इथपर्यंत सूचना या पत्रांमधून त्यांनी दिल्या आहेत. विशेष म्हणजे ज्यांना ही पत्र त्यांनी लिहिली, त्यांचा उल्लेख अत्यंत आदरार्थी शब्दांनी करण्यात आला आहे. साहेब, बाईसाहेब, दादासाहेब, श्रीमान सावकार, श्रीमान दयाळू, कर्णासारखे उदार असे आदरार्थी उल्लेख पत्राच्या प्रारंभी आढळतात. ही सारी पत्रे सामाजिक काम करणाऱ्या संस्थांसाठी दिशादर्शक ठरावी अशी आहेत.

संत गाडगेबाबा कायम भ्रमंतीवर असायचे त्यामुळे ते पत्रव्यवहाराच्या माध्यमातून अनुयायांना वेळोवेळी सूचना देऊन सर्व कामे निटपणे करवून घेत असत. ही पत्रे एक प्रकारचा ‘वॉच’ठेवण्याचे काम करीत. बाबांनी ही सारी पत्रे कधी गुरूदास ढेमरे गुरूजी तर कधी अण्णा ठाकरे, अच्युतराव दादा, सखाराम सावंत, रामलाल मास्तर, यशवंतराव शिंदे, वासुदेव सोनोने, ब.आ. कळसकर, नगीणदास, किसन पेटीवाला, गुणवंतराव चराटे, तुकाराम रत्नागिरीकर, ओंकार जोशी, जयराम राघोजी वारंग, भुजंगराव आंजनखेडकर, सुखदेवराव घोंगटे, गणपतराव गांगण, नारायण महाराज ढाणकीकर, कृ.भा. घाणेकर आदी सेवकांकडून लिहून घेतली आहेत. पत्रांमधील प्रत्येक शब्दांमध्ये बाबांनी उभारलेल्या या सामाजिक कार्यात कुठलीही हयगय होऊ नये याची काळजी घेतली आहे. सामाजिक काम किती पारदर्शक असावे याचा हा आदर्श परीपाठ आहे. प्रत्येक पत्र बोलके व डोळ्यात अंजन घालणारे आहे. स्वत:च्या मुलीस, पत्नीस अत्यंत कठोर शब्दांमध्ये त्यांनी या पत्रातून खडसावले सुध्दा आहे.

बाबांच्या या सामाजिक कार्यात अनेक दानशूर लोकांचा सहभाग होता. या दानशूर लोकांविषयी ते पत्रांमधून कायम कृतज्ञता व्यक्त करायचे. धर्मशाळेत अनेक गरीब, श्रीमंत येत असत. या लोकांशी आपण अत्यंत आदरपूर्वक वागले पाहिजे. आहो, काहो, या, बसा अशा आदरपूर्वक शब्दांचा वापर करावा, अशा त्यांच्या सूचना असायच्या. यात्रेकरूंची गैरसोय करू नका, स्वच्छता पाळा इथपासून तर स्वयंपाकीन अथवा झाडू मारणाऱ्या बाईस अत्यंत आदराने बाईसाहेबच म्हणावे हे सुध्दा ते पत्रातून सांगायचे. स्वच्छता, वृक्ष संवर्धन याकडे बाबांचे विशेष लक्ष असायचे. काडी, कचरा, घाण याचा नियमित बंदोबस्त करा, शनिवारी झाडांना पाणी द्या, फुलझाडांची काळजी घ्या, घाट स्वच्छ ठेवा, जुने बेकार सामान फेकून द्या, कचरा पेट्या तयार करून स्वच्छतेवर अधिक भर देत चला आदी बारीकसारीक सूचना संत गाडगेबाबा आपल्या अनुयायांना पत्रांमधून द्यायचे. “घार उडे आकाशी, परी लक्ष तिचे पिला पाशी” अशीच भावना यातून दिसून येते. ज्या-ज्या देणगीदात्यांनी सहकार्य केले. त्यांना आभाराची सुंदर पत्र लिहून पाठवा, असे सांगण्यास ते कधीच विसरत नसत. ज्यांची देणगी घेतली, त्यांना पावती द्या. घाट बांधणीसाठी मदत केलेल्याची नावे संगमरवरी दगडावर कोरून काढा अशा कृतज्ञतेच्या सूचना असायच्यात. आजही ऋणमोचन येथील घाटावर देणगीदात्यांची नावे कोरलेले संगमरवरी दगड आपल्या नसरेस पडतात. कुटुंबप्रमुख या नात्याने त्यांनी सेवकांच्या प्रकृतीची काळजी घेतल्याचे अनेक पत्रांमधून दिसून येते. लोकवर्गणीतून उभ्या केलेल्या या कामात गैरव्यवहार होऊ नये याची त्यांनी पत्राच्या माध्यमातून प्रचंड दक्षता घेतली आहे. एकदा एका अनुयायाकडून दूध, चहा, बिस्कीट, बाकीचा खर्च बांधकाम खर्चात लिहिला गेला हे लक्षात येताच बाबांनी ही चूक लगेच लक्षात आणून देऊन नाराजी सुध्दा व्यक्त केली होती.

महानंदस्वामी या त्यांच्या जवळच्या सेवकाने जेव्हा चूक केली तेव्हा त्यांनी महानंदस्वामीला पत्र पाठवून चांगलीच खरडपट्टी काढली होती. आपल्या तोंडातून आपली बढाई करणे म्हणजे मूर्खपणा आहे, असे खडे बोल जवळच्या सेवक असलेल्या महानंदस्वामीला त्यांनी सुनावले होते. याच महानंदस्वामीच्या पंढरपुरातील त्यागाभिषेकाचे वृत्त अनंतराव गद्रे यांनी त्यांच्या वृत्तपत्रात छापले तेव्हा हे वृत्त चुकीचे असून, याबाबतचा त्वरित खुलासा छापा असा दमही बाबांनी गद्रे यांना दिला होता. तसेच दीक्षा समारंभ जो महानंदस्वामीने आयोजित केला होता त्याबाबतही अनंत गद्रे यांना बाबांनी सुनावले होते. मी सुरूवातीपासून मला कुणी शिष्य नाही व मी कुणाचा गुरू नाही असे सांगत असतो. गेल्या पन्नास वर्षांपासून आजपर्यंत कोणाला अंगारा दिला नाही. ‘तुझे बरे होवो’ असे म्हटले नाही व कोणाला आशिर्वाद दिला नाही, कोणाला पाया पडू देत नाही, चुकून कुणी पाया पडले तर जीवाला दु:ख होते, असे स्पष्ट शब्दात बाबांनी गद्रे यांना पत्र पाठविले होते.

हभप भीष्माचार्य हे बाबांचे सेवक होते. या भीष्माचार्य बाबांना तर खूपच कठोर शब्दात पत्रांमधून दणके हाणले. या पत्रात बाबा म्हणतात की, ‘आपण कीर्तनाच्या तारखेसाठी खूपच पत्रे घातली. आपण येऊनही भेटले. तुम्ही म्हणालात तारीख द्याल तर बरे नाही तर आमची मोठी फजीती होईल. ज्याची फजीती त्याच्या हाताने होत असते, दुसऱ्याच्या हाताने होत नाही. तुम्ही सांगितले असेल की, गाडगेबुवांना आणतो. गाडगेबुवा येतात असे लोकांना सांगून वर्गणी केली असेल. लोकांनी दिली असेल म्हणून तुमच्या हाताने तुमची फजीती…..’ वर्गणीतील ठरलेल्या पैशाचा गैरवापर होण्याची शंका बाबा यातून व्यक्त करतात. सामाजिक कार्याच्या नावाखाली वर्गणीच्या रुपात खंडणी वसूल करणाऱ्या आजच्या काळातील खंडणीबहाद्दर कार्यकर्त्यांना बाबांच्या या भूमिकेतून चांगला बोध घेता येऊ शकतो. किती हा पारदर्शकपणा. पत्रात बाबा पुढे म्हणतात की, ‘मी सांगतो त्या प्रमाणे वर्गणी करा, पैशाचा हिशेब ठेवा, गोरगरीबांना शिरा-पुरी खाऊ घाला आणि उरलेल्या रकमेतून अंधू-पंगू लोकांना कपडे वाटप करा, गरीबांच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना पाटी, पुस्तके, टोप्या द्या तरच मी येतो. ‘काय प्रचंड आशय दडलेला आहे या पत्रांमध्ये. सामाजिक काम कसे निष्ठेने करायचे असते याचेच हे बोलके उदाहरण आहे. प्रत्येक पैशाचा चोख हिशेब ठेवण्यावर बाबांचा असलेला कटाक्ष व गोरगरीबांची पत्र व्यवहारातून घेतलेली काळजी हाच या पत्र व्यवहाराचा मतीतार्थ आहे.

बाबांचे बांधकाम क्षेत्रातील कौशल्यही अफाट होते. त्यांनी त्यांच्या निगराणीत अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. सिव्हील इंजिनिअरलाही लाजवेल इतके परफेक्ट बांधकाम विषयक ज्ञान बाबांकडे होते. नाशिक व इतर ठिकाणी बांधलेल्या धर्मशाळांच्या देखण्या बांधकामावरून ते आपल्या सहज लक्षात येईल. बांधकाम कसे असावे, खोदकाम किती घ्यायचे, हाईट किती, चुना, माती किती वापरायची इतपर्यंत त्यांच्या सूचना असायच्या. विहीर कशी खोदायची, गवंडी कसा हुशार असावा हे सुध्दा ते पत्रातून सांगत. बांधकाम अधिक देखणे व्हावे म्हणून त्यांनी झाड कशी लावावी याच्या सूचनासुध्दा पत्रातून दिल्या आहेत. ‘वड, पिंपळ, चिंच, लिंब आदी झाडे लावा, त्याला खत टाका, पाणी द्या, राखण करा’ तसेच झाडे सारख्या उंचीची व एका रांगेत लावावी याकडे ही ते पत्रातून लक्ष वेधून घेतात. डाळ, तांदूळ, गहू किती आले इथपासून कुणी किती वर्गणी दिली याचा चोख हिशेब दर्शविणारी अनेक पत्र बाबांनी लिहून घेतलीत.

या लोकवर्गणीचा हिशेबही ते सरकारकडे सादर करायचे. सदावर्तामध्ये कुणीही उपाशी राहू नये हा करूणेचा भाव अनेक पत्रांमधून दिसून येतो. वेळ प्रसंगी कठोर तर कधी भावनाप्रधान मनाचे दर्शन घडविणारी ही पत्र आहेत. या पत्रांमध्ये कार्यकर्त्यांच्या प्रामाणिकपणांचे कौतुक तर आहेच पण चुकला तर त्यांना रोखठोकपणे फटकारणारीही पत्र आहेत. लोण्यासारखे मऊ व प्रसंगी वज्रासारखे कठीण असे संत गाडगेबाबांचे विराट रुप या साऱ्या पत्र व्यवहारातून पुढे येते. त्यांच्या सबंध सामाजिक कार्याचा लेखाजोखा जगापुढे मांडणारी ही अजरामर पत्र आहेत. सामाजिक काम करायचे असेल तर कुटुंबप्रमुख म्हणून कसे वागायचे असते याचे आदर्श उदाहरण म्हणजे हा पत्रव्यवहार आहे. हा पत्र व्यवहार संत गाडगेबाबांच्या व्यक्तिमत्वाचा तेजस्वी पैलू आहे. हा तेजस्वी पैलू सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी नवी दिशा देणारा मैलाचा दगड आहे.

(टीप: मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित संतोष अरसोड यांच्या गाडगेबाबांवरील पुस्तकातून साभार)

(लेखक ‘मीडिया वॉच’ वेब पोर्टल व दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक आहेत)

9623191923

Previous articleभंडारा अग्नीतांडवात नर्सेसचा बळी…
Next articleगोविज्ञानाच्या नावाखाली धार्मिक भंपकगिरी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here