महाराष्ट्रात भटके- विमुक्तांमध्ये समावेश असलेल्या जमातींमध्ये खूप साऱ्या समृध्द परंपरा आहेत. अजूनही त्यांनी त्या बऱ्यापैकी जपून ठेवल्या आहेत. काळाच्या धबडग्यात त्या परंपरा नामशेष होण्याअगोदर त्याचं डॉक्युमेंटेशन करण्याचं महत्वाचं काम काही मंडळी करत आहे. यामध्ये यवतमाळचे पत्रकार व कलावंत आनंद कसंबे यांचा समावेश आहे. कसंबे यांनी भटक्या – विमुक्तांमधील जवळपास ३५ जमातींचा पारंपारिक व्यवसाय, जीवनपद्धती व त्यांचा जगण्याचा संघर्ष चित्रित करून ठेवला आहे. आगामी पिढीसाठी हा अनमोल ठेवा ठरणार आहे. महाराष्ट्रात जवळपास ३८ भटक्या व १४ विमुक्त जमाती आहे. या जमातीचं जगणं हे मुख्य प्रवाहातील जातींपेक्षा संपूर्णतः वेगळे आहे. या जमातींमधील वेगळेपणा व त्यांच्या प्रथा – परंपरांची सविस्तर माहिती देणारी पुस्तकं आतापर्यंत भरपूर आली आहेत . रामनाथ चव्हाणांचे ‘जाती आणि जमाती’ व ‘भटक्या विमुक्तांचे अंतरंग’ डॉ .ना . घो . कदम यांचे ‘महाराष्ट्रातील भटका समाज: संस्कृती व साहित्य’, लक्ष्मण माने यांचे ‘विमुक्तायन’, जयराम राजपूत यांचे ‘पडद्याआड’, त्रिंबक नारायण आत्रे यांचे ‘गुन्हेगार जाती’, डॉ. अनिल सपकाळ व डॉ. नारायण भोसले यांचे ‘महाराष्ट्रातील भटके- विमुक्त: सद्यस्थिती आणि आव्हाने’, श्रीकृष्ण काकडे यांचे ‘भटके विमुक्त समाज : भाषा आणि संस्कृती’, दिव्य मराठीच्या ‘रसिक’ पुरवणीचे संपादक प्रशांत पवार यांचे ‘३१ ऑगस्ट १९५२’ ही सारीच पुस्तके भटक्या-विमुक्तांचे जग समजून घेण्यासाठी अतिशय महत्वाची आहेत. साप्ताहिक ‘चित्रलेखा’ ने २० वर्षांपूर्वी ‘महाजाती’ या लेखमालेत भटक्या-विमुक्तांतील अनेक जमातींची सचित्र माहिती अतिशय वेधक पद्धतीने प्रसिध्द केली होती. आनंद कसंबे यांनी मात्र भटक्या- विमुक्त जमातीच्या जगण्याचं व्हिडीओ डॉक्युमेंटेशन केलं आहे . त्यासाठी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये भटकंती करून त्यांनी भटक्या-विमुक्त जमातीचं जगणं चित्रित केलं. गेली १० वर्ष ते याच कामात व्यस्त आहे. त्यांच्या या कामाचं महत्व लक्षात घेऊन दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीने काही वर्षांपूर्वी ‘भाकरीचा चंद्र’ या नावाने ३० भागांची मालिका प्रसारित केली होती.
छान ,आंनद कसंबे यांचे कामाची पावती.
फारच अतुलनीय वणॆन भाऊजी अभिनंदन तुम्हाला