गुमराह: वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमक़िन..

(साभार : दैनिक ‘महाराष्ट्र दिनमान’)

-मिथिला सुभाष

*****

बी आर चोप्रा हे हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव आहे. पृथ्वीच्या विशाल प्रतिकृतीवर उभं असलेलं कष्टकरी जोडपं आणि पार्श्वभूमीवर वाजणारं ‘कर्मण्येवाधिकारस्ते…’ पाहिलं-ऐकलं नाही असा हिंदी सिनेमांचा रसिक शोधूनही सापडणार नाही. समस्याप्रधान विषय आणि व्यावसायिक हाताळणी अशी किमयागारी असलेले सिनेमे ही चोप्रांची खासियत होती. ‘नया दौर,’ ‘साधना,’ ‘वक़्त’ ‘धूल का फूल,’ आणि अगदी ‘पति, पत्नि और वो,’ ‘ऩिकाह’ आणि ‘इन्साफ़ का तराज़ू’सारखे त्यांचे सिनेमे वेगळे विषय आणि सामाजिक प्रश्न घेऊन आलेले होते. असंच वैशिष्ट्य घेऊन १९६३ साली आला ‘गुमराह!’ वाट चुकलेल्या, दिशाभूल होऊन काही काळासाठी पथभ्रष्ट झालेल्या नायिकेची धाडसी गोष्ट – गुमराह.

‘गुमराह’कडे वळण्याआधी थोडेसे या कथेच्या प्रेरणास्त्रोताबद्दल! कामिनी कौशल हे दिलीपकुमारचं मधुबालाच्या आधीचं प्रेम! पण कामिनीच्या थोरल्या विवाहित बहिणीचं अकाली निधन झालं. दोन लहानग्या मुली सोडून ती गेली. या मुलींना सावत्र आई येऊ नये म्हणून घरच्यांनी कामिनीला मेव्हण्याशी – कॅप्टन सूदशी लग्न करण्याची गळ घातली. कौटुंबिक दबाव आणि मुलींना असलेला आपला लळा लक्षात घेता कामिनीला ते लग्न करावं लागलं. पण त्यानंतरही ती दिलीप कुमारला भेटतच राहिली. हे प्रकरण कामिनीच्या नवऱ्याने समंजसपणे हाताळलं की लोक म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच त्याच्या सांगण्यावर, कामिनीच्या मिलीटरीतल्या भावाने दिलीपवर पिस्तुल ताणलं होतं यात नको पडायला. कारण या प्रकरणाचा इंडस्ट्रीत बराच गवगवा झालेला असला तरी वादळ शमल्यावर कॅप्टन सूद आणि कामिनी कौशल हे दांपत्य आपल्या दोन अधिक तीन अशा पाच मुलांसोबत सुखी झालं. चोप्रांनी ‘गुमराह’साठी हीच गोष्ट घेतली.

आता वाचकांना गोष्ट कळलेली आहे. मीना (माला सिन्हा) आणि राजेंद्र (सुनील दत्त) हे प्रेमी जोडपं. कमला (निरुपा रॉय) ही मीनाची बहीण आणि बॅरिस्टर अशोक (अशोक कुमार) म्हणजे आधी मेव्हणा नंतर नवरा! ही जी पात्रयोजना आहे तेच ‘गुमराह’चं अर्धं यश आहे. राजेंद्र चित्रकार आणि गायक आहे. या दोघांचं प्रेमप्रकरण कॉलेजपासूनच सुरु झालेलं आहे. नैनीतालमधे घडणारी ही कथा मीना-अशोकसोबत लग्नानंतर मुंबईत येते. पण त्या आधीचा जो नैनीमधला भाग आहे तो इतका नेत्रसुखद आणि सुरम्य आहे की त्याच्या प्रेमातच पडायला होते.

मीना आणि राजेंद्रमधला प्रणय आणि ‘इन हवाओं में, इन फ़िज़ाओं में, तुझको मेरा प्यार पुकारे, आजा आजा रे,’ हे गाणं..! त्यांच्या प्रत्येक भेटीत घुमणारा ‘आजा आजा रे’चा आलाप प्रेक्षकाला रोमांचित करायला पुरेसा आहे. आणि म्हणूनच मीना लग्न करुन मुंबईला निघून जाते तेव्हा ‘ये हवा.. ये हवा.. ये हवा, है उदास जैसे मेरा दिल…मेरा दिल… मेरा दिल’मधे बेमालूमपणे मिसळलेला ‘आजा आजा रे’चा आलाप डोळे ओले करतो. (या गाण्यात प्रतिध्वनीचा अत्यंत सुंदर वापर केलेला आहे.) नैनीच्या डोंगरदऱयातून घुमणारा ‘आ भी जा… आ भी जा… आ भी जा…’चा व्याकूळ स्वर उदास करतो. याला काय म्हणून ही विरहाची शिक्षा? याची काय चूक आहे? असे प्रश्न मनात येतात. मागोमाग अनेक प्रश्न. तिची तरी काय चूक होती! आणि अशोकची? त्याची तर बायकोच संसारातून निघून गेलेली. आणि मग आपोआप एक छापाचं उत्तरही येतं – प्रेमापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं! और भी ग़म हैं दुनिया में मोहब्बत के सिवा…! इथेच सगळं संपलं असतं तर या सिनेमाने आजपर्यंत मन कुरतडलं नसतं. पण खरा ‘गुमराह’ इथे सुरु होतो.

मुंबईत आल्यानंतर मीना जुनं सगळं मनात दडपून संसाराला लागते. अशोकही प्रेमळ, सभ्य आणि दिलखुलास असतो. शिवाय आपल्यापेक्षा बऱ्याच लहान असलेल्या आपल्या या मेहुणीने फक्त आपल्या दोन मुलांसाठी आपल्याशी लग्न केलंय, त्यामुळे तिला सुखी ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे, या धोरणाने वागणारा असतो. पण ‘धोरणीपणा’ने संसारात सुख येत नसतं. बेमालूम भासली तरी ती असते तडजोडच! प्रेक्षकाला या ‘फील’मध्ये ठेवण्यात दिग्दर्शकाने यश मिळवलंय. वरवर सारे काही छानछान, पण कधीतरी हे सुखाचं वस्त्र उलटतं आणि त्याला असलेले त्याग आणि विरहाचे अस्तर ओझरतं दर्शन देऊन जातं. चटका लावून जातं. असं सारं सुरु असतांनाच एका कंपनीसाठी गाणं गायला राजेंद्र मुंबईत अवतरतो आणि सुखी संसाराचं ते वस्त्र विरायला लागतं. एक होतकरु कलाकार आणि मीनाच्या कॉलेजातला वर्गमित्र म्हणून अशोकची आणि त्याची ओळख नैनीतालमधेच झालेली असते. साहजिकच त्याचं घरी येणं अशोकला डाचत नाही. भान सुटलेली मीना पुन्हा त्याला भेटायला लागते. त्यानंतर असे असंख्य प्रसंग येतात ज्यात मीनाच्या मनातला चोर बाहेर पडतो. प्रेक्षकाचे प्राण घशाशी येतात. पण अशोक इतका सहज सुस्वभावी असतो की त्याला कधीही तिचा संशय येत नाही.

‘चलो इक बार फिर से अजनबी बन जाएँ हम दोनो’ हे राजेंद्रने अशोकच्या आग्रहाखातर गायलेलं गाणं तर मीनाच्या सहनशक्तीचा आणि अशोकच्या सुस्वभावीपणाचा कळस आहे. ‘तआरुफ़ रोग हो जाये तो उसको भूलना बेहतर…’ कुठलाही परिचय रोगट झाला तर तो विसरुन जावा! ‘तआल्लुक बोझ बन जाये तो उसको तोडना अच्छा…’ कुठलाही संबंध टिकवणे जड जायला लागले तर तो तोडून टाकावा! ‘वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे इक ख़ूबसूरत मोड देकर छोडना अच्छा…’ जी गोष्ट शेवटापर्यंत नेणं शक्य नसतं, तिला एक दिलचस्प वळण देऊन तिथेच सोडून द्यावं हे चांगलं! ‘चलो इक बार फिर से…’ चल, आपण पुन्हा ‘अपरिचित’ होऊन जाऊ! साहिरने गाणी नाही, कविता लिहिल्यात ‘गुमराह’साठी! असं म्हणतात की एका फिल्मी पार्टीत साहिरची जुनी प्रेमिका सुधा मल्होत्रा अजाणतेपणे त्याच्या समोर आली. चार पावलं मागे तिचा नवरा होता. अचानक साहिरला समोर पाहून ती गडबडली. तेव्हा तिला दिलासा देण्यासाठी साहिरने एक ओळ म्हंटली – चलो इक बार फिर से अजनबी बन जाएँ हम दोनो….! असो. आप आये तो ख़याले दिले-नाशाद आया’ हेही एक असंच अप्रतिम गाणं ‘गुमराह’मधे आहे.

नक्की पाहा , ऐका… लिंकवर क्लिक करा – चलो इक बार फिर…

https://www.youtube.com/watch?v=zwx6a_dPoOM

ध्यानीमनी नसताना राजेंद्रच्या तथाकथित बायकोचा या गोष्टीत प्रवेश होतो. ती लीला – शशिकला! चाव्यांची साखळी बोटात फिरवत येण्याची तिची अदा धडकी भरवणारी आहे. ती मीनाला ब्लॅकमेल करायला लागते. तुझं हे प्रकरण तुझ्या नवऱ्याला सांगेन, अशा धमक्या देऊन ही लीला आपल्या नायिकेला बेजार करते. तिच्या मागण्या पुरवता-पुरवता मीनाच्या नाकी नऊ येतात. शेवटी ती मीनाच्या बोटातली हिऱ्याची महागडी अंगठी घेऊन जाते. उद्या पैसे देऊन अंगठी घेऊन जा, असं सांगते. दुसऱ्या दिवशी मीना-अशोकच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस असतो. त्यासाठी मीनाला अंगठी हवीच असते. ती दुसरे दागिने विकून लीलासाठी रकमेची सोय करते. पण ठरल्यावेळी लीला तिला भेटतच नाही. मीना परेशान! बेचैनीतच ती घरी येते. काय करावं तिला सुचत नाही. नवराही घरातच असतो. आणि अशा अवेळी बोटातली चावी फिरवत लीला घरी येते. नवऱ्यासमोरच पितळ उघडं पडायची वेळ येते. मीना म्हणते, मी हिला ओळखत नाही. दोघींचं भांडण टिपेला जातं. आणि एका नाजूक क्षणी अशोक सांगतो की ही लीला म्हणजे माझी सेक्रेटरी आहे. मीच हिला तुझ्यामागे लावलं होतं. आई शप्पत, पहिल्यांदा ‘गुमराह’ पाहतांना अशोकचं हे वाक्य ऐकून लागलेला धक्का जस्साच्या तस्सा आठवतोय! मग सारंच उलगडतं. अशोकला काहीही कळत नाहीये या भ्रमात मीना आणि आपण सगळेच होतो, हे लक्षात येते. त्याला सगळं कळत असतं. बॅरिस्टरच तो! शेवटी तो मीनाला राजेंद्रकडे जाण्याची मोकळीक देतो. राजेंद्र दारात येतो. मीना दार उघडते… तिला पाहताच तो हाक मारतो, ‘मीना…’ आणि मीना सांगते, ‘यहाँ कोई मीना नहीं रहती, मैं मिसेस अशोक हूँ…!’ त्याच्या तोंडावर दार लावते आणि नवऱ्याच्या मिठीत कोसळते. आपल्याला हसावं की रडावं कळत नाही… मन कुरतडत राहतं. हे काय झालं…?

संगीतकार रवीची या सिनेमातली कामगिरी त्याला अमर करुन गेलीये. आजही ‘गुमराह’ची गाणी लोकप्रिय आहेत. महेंद्र कपूरने गायली आहेत तरीही. अभिनयाच्या बाबतीत बाजी मारलीये ती अर्थातच अशोक कुमारने. बायकोशी फ्रेंच भाषेत रोमांस करण्याची त्याची लकब त्याच्या सगळ्याच दृश्यात बहार आणते. माला सिन्हा हे काय रसायन आहे कळत नाही! ‘टकाटक’ म्हणता येत नाही तिला, या शब्दातला ‘ट’ काटकुळीतल्या ‘ट’सारखा टोचतो! माला सिन्हा म्हणजे रसरशीत… घवघवीत… घसघशीत…! (भावना पोचल्या असतीलच!) रोमँटिक गाण्यात ती डोळ्याने मटकते, भिवयांनी मटकते…मानेनं.. खांद्यानं.. कमरेनं … पट्ठी सर्वांगाने मटकते! गंभीर दृश्यंही तितक्याच कौशल्याने करवून घेतलेली आहेत तिच्याकडून. सुनील दत्त त्या काळात रुबाबदार आणि हॅन्डसम होताच. यात त्याला प्रेक्षकांची पूर्ण सहानुभूती मिळत असल्यामुळे तो जास्तच आवडतो.

हे सुद्धा नक्की वाचा-गीला मन शायद बिस्तर के पास पडा हो..!https://bit.ly/3r4z4Qk

हा विषय मेलोड्रामाच्या अंगाने जाण्याची पूर्ण शक्यता होती. पण चोप्रांनी मेलोड्रामा कमी ठेवून सस्पेन्स एलिमेंट वाढवल्यामुळे सिनेमा उत्कंठावर्धक झालाय. त्यासाठी भिंतीवरच्या घड्याळाचा आणि शशिकलाच्या हातातल्या की-चेनचा डाऊजिंग पेंड्युलमसारखा केलेला वापर अप्रतिम आहे.

आदर्शवाद, पब्लिक की मांग किंवा नवीन काहीतरी देत आहोत असा देखावा उभा करुन जुनेच विचार मांडण्याचं व्यावसायिक कसब म्हणू हवं तर, पण मीनाने राजेंद्रला धुडकावून लावल्यावर आपल्या काळजात कळ उठते. सिनेमा संपल्यावरही ‘पुढे काय’ हा विचार मनाला कुरतडत राहतो. लादला गेलेला लग्न नावाचा संस्कार इतका महत्त्वाचा असतो की त्यापुढे खरं प्रेमही गौण ठरावं?? हा प्रश्न मनात उमटताच ती दोन छोटी मुलं आठवतात आणि मन निःशब्द होतं. ‘गुमराह’मधली हीच सल प्रेक्षकाला तो सिनेमा विसरु देत नाही. त्यातला अभिनय विसरता येत नाही, गाणी तर मनात इतकी घट्ट पाय रोवून बसली आहेत की ती आठवावीच लागत नाहीत. ज्याने ‘गुमराह’ पाहिलाय अशा प्रत्येकाला ती गाणी कुठल्यातरी गाफिल क्षणी ‘कितने भूले हुये ज़ख़मों का पता’ विचारत राहतात… शोधत राहतात!

हेही वाचायला विसरू नका -गाईड : आज फिर जीने की तमन्ना है…!https://bit.ly/3m0NEak

************************

(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)

Previous articleपगलैट: फुल्ल ‘पगलैट’ अनुभव देणारा पिक्चर
Next articleभटक्या – विमुक्तांच्या समृद्ध परंपरेचा अनमोल ठेवा    
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.