■ ज्ञानेश महाराव
—————————— ————-
त्याची चिरफाड करताना ‘प्रबोधन’कार केशव सीताराम ठाकरे म्हणतात, ‘महाराष्ट्रात पेशवाईच्या म्हणजे ब्राह्मणी सत्तेच्या पुनर्घटनेशिवाय ब्राह्मण क्रांतिकारकांच्या डोक्यात, मस्तकात दुसरे वेडच नव्हते. आजही ते नाहीसे झालेले नाही. (हे सावरकरांना उद्देशून आहे.) किंचित स्पष्टच बोलायचे तर, चालू घडीला हिंदुत्वनिष्ठेच्या मुखवट्याखाली चाललेल्या या (‘मी परत येईन’ छापाच्या) लोकांच्या उघड-गुप्त खटपटी, या ब्राह्मणी सत्तेच्या प्रस्थापनेसाठी आहेत. ही दीर्घ सूचनेची मख्खी महाराष्ट्रातला तमाम ब्राह्मणेतर वर्ग पुरेपूर ओळखून आहे. ( तथापि, ‘भाजप’ बरोबरच्या युतीत ‘शिवसेना’च्या प्रगतीची २५ वर्षं सडली, हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येण्यास २०१४ ची विधानसभा निवडणूक यावी लागली.) महात्मा गांधींच्या राजकारण प्रवेशापूर्वी हे लोक स्वतःला ‘राष्ट्रीय’ म्हणवीत असत. यांचा पक्ष राष्ट्रीय, सभा राष्ट्रीय, पुढारी राष्ट्रीय, व्याख्यान राष्ट्रीय; यांची वर्तमानपत्रे, कीर्तने, ग्रंथ, गणपतीचे मेळे, सर्व काही राष्ट्रीयच राष्ट्रीय ! आता नेमका तोच ‘राष्ट्रीय’ शब्द शिवी म्हणून काँग्रेसी राजकारणाला वापरून ते आता ‘हिंदुत्वनिष्ठ’ म्हणून मिरवण्यात धन्यता मानतात! स्वजातीच्या अभिमानावर लांबरुंद तणाव्याची विश्वबंधुत्वाची शालजोडी पांघरून इतर जनांना भुरळविण्याच्या कामात या लोकांचा हात कोणीही धरू शकणार नाही !’ ( वाचा : ‘प्रबोधन’कार ठाकरे लिखित ‘हिंदवी स्वराज्याचा खून’ (प्रकाशन : १९२२) व ‘प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी’ (१९४८) हे ग्रंथ.) या पार्श्वभूमीवर संघ परिवाराचे हिंदुत्व तपासायला हवे !
संघाला जर अस्सल हिंदुत्वाचं मूल्य प्रस्थापित करून हिंदूराष्ट्र निर्माण करायचे होतं, तर हिंदू- हिंदुत्ववादाऐवजी ‘जनसंघा’ला ‘एकात्म मानवता’ वादाच्या आणि ‘भाजप’ला ‘गांधीवादी-समाजवादा’च्या पाळण्यात टाकण्याची गरज काय होती ? या पक्षांना थेट ‘हिंदुत्व’वादी अवतारात प्रकट करण्याची हिंमत संघाने का दाखवली नाही ? याउलट थेट हिंदुत्व सांगणाऱ्या, पक्ष-संघटना ठसठशीत ‘हिंदू’ कुंकू लावून चालवणाऱ्या सावरकरांना नाकारण्याचा आणि सोयीप्रमाणे वापरून बदनाम करण्याचा उद्योग संघ परिवाराने केला आहे.