बाईत खोल काय असतं?…आईपण की बाईपण?

-माणिक बालाजी मुंढे

बाईत खोल काय असतं? तिचं आईपण की बाईपण? पर्ल बकची नायिका म्हणते बाईपण. काही काही पुस्तकांना लोहचुंबक असतो बहुधा. ते तुम्हाला पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे खेचतात. पर्ल बकची ‘लेटर फ्रॉम पेकिंग’ त्यापैकीच एक. मी ती आता दुसऱ्यांदा वाचली. शब्दांना ओल असते, त्यांना पाझर फुटतो. वाचक त्या ओलीचा भाग होतो असा अनुभव किती पुस्तकं देतात? लेटर फ्रॉम पेकिंगच्या शब्दा शब्दात, पाना पानावर ती ओल अनुभवायला मिळते. म्हणून शेवटपर्यंत माणूस त्या पानांना मधमाशीसारखा चिकटून बसतो.

‘लेटर फ्रॉम पेकींग’ गोष्ट सांगते एलिझाबेथची. तिचा नवरा आहे जो हाफ अमेरिकन, हाफ चायनिज आहे. गेरोल्ड त्याचं नाव. तिचा सासरा अमेरिकेतून चीनमध्ये जातो. तिथं तो एका चायनीज बाईशी लग्न करतो. त्यांना एक मुल होतं. तोच एलिझाबेथचा नवरा. तोही अमेरिकेत शिक्षण घेतो आणि परत चीनला जातो. एलिझाबेथ त्याच्या प्रेमात पडते ते दोघे अमेरिकेत शिक्षण घेत असताना. पण नवऱ्यासोबत तीही चीनला जाते. दोघांना मुल होतं. त्याचं नाव रेनी. चीनमध्ये राजेशाही, क्रांती, कम्यूनिझम याचे वारे वाहत असतात. अमेरिकन लोकांबद्दल भावना धूमसत असतात. शेवटी एलिझाबेथ रेनीला घेऊन अमेरिकेत परतावं लागतं. गेराल्ड कधी तरी परत येईल या अपेक्षेनं एलिझाबेथ जगत असते. त्याच काळात तिला गेराल्डचं चीनहून पत्रं येतं. तेच पत्र म्हणजे ‘लेटर फ्रॉम पेकिंग.’

पत्रात काय आहे हे मी सांगणार नाही. पण पात्रं कशी गुंफावीत आणि त्यात आपण कसे गुंतत जातो हा अनुभवच जगावेगळा. खरं तर ती पात्र नाहीतच. ते आयुष्य आहे. म्हटलं तर ही गोष्ट अमेरिकेतून चीनला जाऊन तिथल्या चायनीज बाईशी लग्न करणाऱ्या मॅकलॉईडची ही गोष्ट आहे. म्हटलं तर बाप अमेरिकन आणि आई चायनीज क्रांतीकारी असणाऱ्या गेराल्डची ही गोष्ट आहे. म्हटलं तर जिचा नवरा हाफ चायनीज-हाफ अमेरिकन असणाऱ्या एलिझाबेथची गोष्ट आहे, म्हटलं तर ज्याचा बाप मिक्स असलेला पण आई अमेरिकन असणाऱ्या रेनीची ही गोष्ट आहे. म्हटलं तर ज्या पुरूषावर आपलं प्रेमच नाही त्याचा वंश वाढवणाऱ्या क्रांतीकारी बाईची ही गोष्ट आहे. म्हटलं तर एका अमेरिकनची दुसरी बायको होऊन त्याचं मुल वाढवणाऱ्या चायनीज बाईची ही गोष्ट आहे. म्हटलं तर नवऱ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या, पत्रातून एकमेकांना सर्व काही सांगणाऱ्या दोन सवतींची ही गोष्ट आहे. पण गोष्ट सांगते ती एलिझाबेथच.

लेटर फ्रॉम पेकिंगची गोष्ट अगदी साधीय म्हणूनच कालातीत असावी. १९५७ साली कादंबरी प्रकाशित झालीय पण त्यातला वांशिक, भाषिक संघर्ष आजही आपल्याला रिलेट करतो. ज्यावेळेस जग हिंदू-मुसलमान-ख्रिश्चन आणि त्याच्या प्युअरटीवर जोर देतंय त्यावेळेस लेटर फ्रॉम पेकींगमधलं जग आपले डोळे उघडे करतं. माणसं जगताना काय काय करत रहातात, काळ-वेळ त्यांना काय काय करायला लावते हे वाचणंच एका दिर्घ प्रवासाचा अनुभव देतं.

आणखी एक गोष्ट- लोकसत्ताचं मराठी संपादकीय तुम्हाला एक वेळेस अवघड जाऊ शकतं पण बकच पर्ल बकचं इंग्रजी नाही. सर्वात अवघड काय तर सोप्पं लिहिणं. ते एका सिद्धहस्त लेखकाचंच काम असू शकतं. मी पर्ल बकच्या ‘द गूड अर्थ’ आणि ‘लेटर फ्रॉम पेकिंग’ अशा दोन्ही कादंबऱ्या वाचल्या. कुठेही तिच्या कादंबऱ्या ग्यान पाजळत नाहीत. शब्दबंबाळ भाषा नाही. जड जड असं काही त्या देत नाहीत. गोष्ट कौटूंबिक, रोजच्या जगण्यातली अशी असते म्हणूनच ती तगडी होऊन जाते.

हे पुस्तक त्यांच्यासाठी नाही जे वंश, जात, धर्म शुद्धीवर विश्वास ठेवतात. अर्थात त्यांनीही ते वाचावंच. पण त्रास होऊ शकतो. पण मी सुरुवातीलाच बकचं वाक्य टाकलंय- बाईचं बाईपण जास्त खोल असतं. अर्थातच त्यानं चांगल्या चांगल्यांचा इतिहास कलरफूल केलाय.

पर्ल बक ही देशी रायटर आहे. १९३८ साली तिला ज्यावेळेस नोबेल मिळालं त्यावेळेसचं तिचं भाषण वाचलं तरी त्याचा अंदाज येईल. पर्ल बक स्वत: अमेरिकन पण मिशनाऱ्यांचं पोर म्हणून चीनमध्ये गेली. बहुतांश आयुष्य तिनं तिथेच घालवलं. तिचं चायनीज नावही आहे. तिच्या कादंबरीची गोष्ट आणि ती वेगळी नाही. तिचे अनुभव उसने नाहीत. ती जे जगली तेच तिच्या पुस्तकात दिसतं. म्हणूनच तिचं काहीच वाचताना हवेतलं नाही वाटत.

माझ्याकडची कॉपी १९५७ चीच आहे. ऑनलाईनही पुस्तक विक्रीसाठी आहे. पण अर्थातच ते महाग असणारच. पर्ल बकची पुस्तकं फुटपाथवरही ओरीजनल जुनी मिळतात. तिथही तुम्ही तिचं अख्खं कलेक्शन घेऊ शकता.

-(लेखक ‘टीव्ही ९  मराठी’ चे कार्यकारी संपादक आहेत.)

9833926704

(तुम्ही जर एखादं पुस्तक लिहिलं असेल तर मला पाठवा, त्यावर लिहायला मला नक्की आवडेल. कथा, कादंबरी, वैचारीक, ललित, शैक्षणिक काहीही चालेल.
माझा पत्ता-
माणिक बालाजी मुंढे,
भूमीसागर सोसायटी, बी विंग,
फ्लॅट नंबर-305, प्लॉट नंबर- 112, 113,

सेक्टर-22, कामोठे, नवी मुंबई ))

Previous articleभागवती हिंदुत्वाचे कर्मकांड
Next articleविमानवाहू युद्धनौकांचे अद्भुत विश्व
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.