आंबेडकरांना दुर्लक्षित ठेवण्याचे प्रयत्न त्यांच्या तेजःपुंज राजकीय आणि नैतिक शक्तीला कदापि झाकोळू शकणार नाहीत. त्यांच्या पिढीतील कोणत्याही नेत्यापेक्षा त्यांना अधिक अनुयायी मिळाले. कोट्यावधी अनुयायी- ज्यांच्यासाठी ते एखाद्या धार्मिक प्रतिकापेक्षा अधिक आहेत… दलितांच्या वस्त्यावस्त्यांमधून, गल्ल्याबोळांतून त्यांची स्मृती जागवली जाते, त्यांना देवस्वरूप मानले जाते… याच्याशी कुणाही साध्यासुध्या राजकीय नेत्याच्या तुलनेचा प्रश्नच नाही… भूतकाळात होऊन गेलेल्या धर्मक्रांत्यांशीच केवळ याची तुलना होऊ शकते. ‘जय भीम’ हे दलित चळवळीचे पवित्र मानले जाणारे अभिवादन, अगदी धीमेधीमे पण कणखरपणे एका जोरदार शक्तीस्रोतात बदलून पसरत चालले आहे- ‘जय सियाराम’ला मागे टाकलंय त्या अभिवादनाने. ते आता केवळ नेते उरलेले नाहीत, तर अन्यायाला दूर करणारा प्रेषित म्हणूनच पाहिले जात आहेत.
दलितांमध्ये एक प्रकारची अगदी समर्थनीय अशी भयशंका आहे. ते केवळ दलित नेतेच नव्हेत तर सर्वांचे नेते आहेत या सारवासारवीतून त्यांचे उग्र विचार गुळगुळीत करून टाकण्याचा कावा आहे असे त्यांना वाटते. त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेला अन्यायाविरुध्दचा धगधगता, टोकदार संताप जरा मऊ करून टाकला की दलितेतरांना ते बरे वाटू लागतात. पण हा त्यांचा संताप त्यांच्या इंग्रजी लेखनापेक्षा मराठीतून अधिक थेटपणे उतरतो. अन्यायाला उघडे पाडणे हा त्यांच्या संपूर्ण करीअरमधला एकसंध धागा आहे. अन्यायावर कोणत्याही प्रकारे, कसल्याही प्रकारचा अगदी पातळसाही पडदा टाकू पाहाणारे कोणतेही कारण, राष्ट्र, सत्ता, संस्कृती किंवा संपत्ती त्यांना स्वीकार्य नव्हती. अरुण शौरींसारखे त्यांचे टीकाकार त्यांच्यावर नेहमीच ही टीका करीत आले आहेत- की ते राष्ट्रवादी नव्हते. ज्याचा पाया न्यायाधारित नाही अशा कशालाही राष्ट्र मानण्यासच त्यांनी नकार दिला यातच त्यांची थोरवी होती. दलितांवरील अन्याय, त्यांचे शोषण दृष्टीआड करण्यासाठी सारी तत्वज्ञाने वापरली जातात, पोटात दडलेल्या अन्यायाचे अंतरंग उघडे पडू नये म्हणून अमूर्त कल्पनांच्या धुक्याचा जाड पडदा सारला जातो हे त्यांनी सतत ठासून सांगितले. ती उघडीवाघडी हिंसा, छुपे, फसवे अत्याचार, रोजचे अपमानित जिणे हे सारे जे दलितांच्या वाट्याला आले त्याकडे आपण सारे नजर भिडवून पाहणेही टाळतो. दलितांच्या वाट्याला आलेला जुलूम, हिंसा हे सत्य होते हेसुध्दा धडपणे मान्य केले जात नाही… आणि मान्य केले गेलेच तर त्याचे गांभीर्य कमीतकमी ठेवूनच- त्यावर खोटेपणाची पांघरुणं घालत किंवा बचाव तयार ठेवतच ते मान्य केले जाते. त्यांनी नेहरूंवर गांधीपेक्षा जास्त जळजळीत टीका केली याचे कारण हेच होते- नेहरूंमध्ये भारतीय समाजातील हिंसकता किती मध्यवर्ती आहे हे ओळखण्याची क्षमताच नव्हती. त्यांनी लिहिले: ‘जवाहरलाल नेहरूंकडे पहा. ते स्फूर्ती घेतात, जेफर्सनच्या जाहीरनाम्यामधून. पण त्यांनी स्वतः कधीही या देशातल्या सहा कोटी अस्पृश्यांच्या स्थितीबद्दल दुःख, शरम व्यक्त केलेली नाही. त्यांच्या लेखणीतून स्रवणाऱ्या साहित्यकृतींच्या धबधब्यात कधीतरी त्यांनी त्यांचा उल्लेख केला आहे?’
गांधींवरील त्यांचे आरोप हे केवळ गांधी दलितांना न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरले एवढ्यापुरते मर्यादित नव्हते. त्यांच्या मते गांधींनी दलितांच्या मागण्यांची धार कमी करण्याचे जे अनैतिक उद्दिष्ट होते त्यासाठी अहिंसा तत्वाचा वापर केला. अहिंसेच्या आदर्शाचाही गांधींनी खोलवर असा पराभवच केला. अहिंसेच्या तत्वाचे समर्थन करणाऱ्या कुणालाही गांधींच्या या धोरणात्मक खेळ्यांच्या केंद्रस्थानी मानसिक जबरदस्तीच सापडेल असे ते म्हणत. त्यातील काही जबरदस्ती ते स्वतःवरही करतात असेही त्यांनी फार धारिष्ट्याने बोलून दाखवले. हा गांधींचाही मोठेपणा होता, की त्यांनी त्या आरोपातील तथ्य काही प्रमाणात मान्य केले. आंबेडकरांनी त्यांच्यावर आरोप केला की घटनात्मक संस्कृतीमध्ये सत्याग्रह हा एक प्रकारे हिंसेचाच प्रकार होतो आणि केवळ स्वतःला पटलेल्या सत्यासाठी इतर काही वास्तव आहे हे नाकारणे हा स्वमग्न आत्मप्रेमाचीच साक्ष ठरते हे त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकले. अन्यायाच्या अनुभवांचे संचित गाठीशी असतानाही आंबेडकरांची निष्ठा घटनात्मक पध्दतींवर होती, हे गांधींच्या अहिंसेच्या कल्पनेपलिकडले अधिक प्रखर अहिंसेचे दर्शन होते. अत्याचारांची इतकी खोल जखम वागवत असतानाही संतापाच्या उद्रेकाचे आवाहन न करण्यात जे नीतीधैर्य लागते ते फार वेगळे, फार धीरगंभीर असते हे लक्षात घ्यायला हवे. किंबहुना आंबेडकरांनी दलितांना घटनेचे पाईक बनवून अहिंसेची दीक्षा दिली ती गांधींनी दिलेल्या अहिंसेच्या शिकवणीपेक्षा कित्येक पटींनी अधिक धीरगंभीर होती- अजूनही काही दलित नेते यामुळे आपले हात बांधले गेले असल्याची तक्रार करताना दिसतात.
आपल्या अहिंसात्मक इतिहासासाठी भारतीय परंपरांतील मध्यवर्ती अहिंसातत्व जबाबदार आहे असे म्हणताच येत नाही. अगदी उलट आहे, भारतीय परंपरांमध्ये हिंसाच केंद्रस्थानी होती म्हणूनच ते शक्य झाले. ऑर्लँडो पॅटर्सन हा समाजशास्त्रज्ञ एकदा म्हणाला होता, की ग्रीसमध्ये स्वातंत्र्यावर विस्तृत विवेचन होऊ शकले कारण त्या समाजाच्या रचनेमध्ये गुलामी हा अविभाज्य भाग होता. स्वातंत्र्याची अधिकृत चर्चा झाली कारण समाजातील गुलामीचे वास्तव झुगारण्यासाठी त्याची अत्यंत आवश्यकता होती. त्याचप्रमाणे, अहिंसेवरील विवेचन हेच तर दर्शवते की समाजात हिंसा अंतर्भूत होती. अगदी ब्राह्मणवादानेही हिंसेचा विचार केला तेव्हा बौध्द टीका त्यांनी सामावून घेतली- आता त्यांना एक प्रतीक हवे होते. आंबेडकरांनी अस्पृश्यतेचे कारण गोमांसाशी जोडलेले होते अशी मांडणी केली. अस्पृश्य मानण्याइतका तिरस्कार कसा निर्माण झाला हे स्पष्ट करण्यासाठी गोमांस खाण्याशी संबंध जोडावा लागतो. अस्पृश्यांबद्दल द्वेष का निर्माण झाला याचे कारण शोधणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते. केवळ जुलूम किंवा विषमता याच्याशी हा संबंध जोडता येत नाही… शुध्दता, शुचिता केवळ आपल्याकडेच आहे हा समज राखण्यासाठी त्याची मदत झाली. ज्यांना हा इतिहास माहीत नाही, त्यांना आज भारतीय महाविद्यालयांच्या परिसरांमध्ये गोमांसावरून जो संघर्ष सुरू आहे त्याचे कारणच कळू शकत नाही.
या गुणत्रयीला आंबेडकरांनी तेजस्वीपणे स्वीकारले याचमुळे आपल्या काळातील लोकशाहीच्या स्वरुपासंबंधीच्या नव्या संघर्षातही त्यांची भूमिका केंद्रस्थानी रहाते. घटनेचा मसुदा लिहिण्यातील त्यांची विद्वत्ता कधीकधी आपले डोळे दीपवून टाकते आणि त्यांनीच घटनेच्या ज्या मर्यादा स्पष्ट केल्या त्याकडे आपले दुर्लक्ष होते. रॅडिकल इक्वालिटी: आंबेडकर, गांधी अँड द रिस्क ऑफ डेमॉक्रसी (स्टॅनफोर्ड युनिवर्सिटी प्रेस) या ऐश्वर्यकुमार लिखित पुस्तकात ते म्हणतात की आंबेडकर अनेक अर्थांनी उग्रवादी आहेत. लोकशाहीबद्दल भावनिक न होता आणि त्यातील कोणत्याही त्रुटी,चुका क्षम्य न मानण्याचा ते दृष्टीकोन ठेवतात म्हणून ते उग्र आहेत. ग्रोटने वापरलेले घटनात्मक नैतिकता नैतिक स्वनियंत्रणावर चालणारे शासन, रिवाजांचे पालन, मुक्त चर्चा हे शब्द आपलेसे करून वापरणारे, प्रचारात आणणारे ते एकमेव भारतीय विचारवंत आहेत. पण मुळात लोकशाही तत्वांचा अभाव असलेल्या भारतीय भूमीत हे शब्द म्हणजे केवळ सजावटीपुरतेच होते, पण तरीही घटनात्मक रुपबंध टिकवणे म्हणजेच लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन नव्हे याबद्दल त्यांच्या मनात स्पष्टता होती. खरे तर त्यांनी घटनात्मक नैतिकतेच्या दोन मर्यादा फार द्रष्टेपणाने स्पष्ट करून ठेवल्या. पहिली मर्यादा ही होती, “प्रशासनाची कार्यशैली ही घटनेच्या रुपबंधाशी सार्थ आणि सुसंगत असायला हवी.” हेच कारण असावे की- माधव खोसला म्हणतात तसे- भारताच्या घटनात्मक कायद्यामध्ये प्रशासनाचे कामकाज ठरवून देण्यावर खूप भर देण्यात आला आहे. जणू सत्तर वर्षांनंतरही ते आपल्याला सावध करीत असतात की- “घटनेत काहीही बदल न करता, केवळ प्रशासकीय कार्यशैली बदलून घटनेचे विकृतीकरण करता येणे सहज शक्य आहे. घटनेच्या आत्म्याशी विसंगत किंवा विरुध्द पध्दतीने काम करणारे प्रशासन तेवढे सहज करू शकते.” तसेच, प्रातिनिधिक सरकार हे जनतेला प्रतिसाद देणारे सरकार अशेलच असेही नाही हेही त्यांनी सांगून ठेवले आहे. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स या आपल्या पुस्तकात ते म्हणतात, “मताधिकार सर्व प्रौढांना मिळाला म्हणजे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले शासन निर्माण झालेच असे नसते.” शिवाय त्यांना एक लोकशाहीतला एक खोलवर लपलेला अंतर्विरोधही कळत होता : सामाजिक आणि आर्थिक विषमता असताना सत्तेत मात्र राजकीय समतेचे शासन आणण्याचा प्रयत्न हा तो अंतर्विरोध. कोणतीही लोकशाही हा ताण फार काळपर्यंत सहन करून तग धरू शकत नाही हे त्यांना उमजले होते.
लढ्यात दलित इतिहासाचे एकमेव स्थान विरळ झाले. याच इतिहासावर इतर अनेकांनी हात मारला… ओबीसीमधील काही जाती ज्या दलितांवर अत्याचार करण्यात सहभागी होत्या त्यांनीही तो इतिहास आमचाही आहे असे दामटले. सत्तासहभागाचे रूपक आणखी थोडे ताणल्यावर भेदभावाने ग्रस्त झालेल्यांवरील अन्याय जणू नजरेआडच झाले. आंबेडकरांना आशा होती की नव्या सत्तासंघर्षात नवीन नीतीमान संबंध परस्परांमध्ये प्रस्थापित होतील आणि प्रतिगामी शक्तींचा प्रतिकार होईल. आंबेडकर या विचारातूनही आपल्याला अस्वस्थ करून जातात, कारण ते कोणत्याही भ्रामक राजकारणाला आव्हान देतात- परंपरांची भ्रामकता, सत्तेबद्दलचे भ्रम, हिंदुत्वाचे भ्रम, लोकशाहीबद्दलचे भ्रम, आध्यात्मिक गुणगुणीचे भ्रम… साऱ्यांनाच ते आव्हान देतात. पण आंबेडकरांच्या विचारप्रक्रियेच्या केंद्रभागी अतिशय गंभीर असे कारुण्यही आहे- मानवी नीतीभ्रष्टतेची अनेक रूपे पाहूनही, अत्याचारांचा अनुभव घेऊनही त्यांना स्वतःची आशा तेवती ठेवणे कसे शक्य झाले? हे त्यांचे चिरंतन श्रेय राहील… की त्यांनी कधीही कुणाच्या कुबड्या घेतल्या नाहीत. इतिहासाचा द्वंद्ववाद, आध्यात्मिकतेचे लटके समाधान, धर्माशी जुळवून घेण्याने साध्य झाली असते असे सामावणे. खोट्या विज्ञानवादाची खोटी आश्वासने सारे नाकारून त्यांनी शतकांच्या अवहेलनेवर आशेने मात केली.
प्रदीर्घ पण चिकित्सक लेख.