लोकसभेच्या नुकत्याच हाती आलेल्या निकालांनी सगळ्यांनाच चकित केले आहे. अनेक प्रतिक्रियांचे अवलोकन केल्यावर मला सारांश रूपाने, मतदारांचे राजकारणी मंडळींना पुढील संदेश दिसतात
१) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारवंतांकडून मी लहानपणापासून असे ऐकत आलो आहे की हिंदूंना कोणीही ‘सहिष्णुता’ शिकविण्याच्या भानगडीत पडू नये; कारण सहिष्णुता ही हिंदूंच्या रक्तातच आहे. त्यांचा तो सद्विचार अगदी खरा असल्याचा प्रत्यय यावेळी देशातील मतदारांनी दिला आहे. कारण हिंदु धोक्यात आहेत, कॉंग्रेस राम मंदिरावर बाबरीचे कुलूप लावेल आणि हिंदूंचे सोनेच नव्हे तर म्हशीसुद्धा लुबाडून मुसलमानांना देईल असला प्रचार सर्वोच्च नेत्याने करून सुद्धा, सर्वसामान्य हिंदूंनी मात्र सर्वसामान्य मुसलमानांचा द्वेष न बाळगता असा द्वेष पसरवणाऱ्या राजकारण्यांनाच सणसणीत चपराक हाणली आणि आपण कसे रक्तानेच सहिष्णू आहोत हे दाखवून दिले.
सध्या मुसलमानांनी कसे एकजुटीने व्होट जिहाद केले, त्यांना कितीही सोयीसवलती दिल्या तरी ते भाजपला मत देत नाहीत यावर सोशल मीडियामध्ये चर्चा सुरु दिसते. मला असे वाटते की, मुस्लिम दहशतवादाचा धाक दाखवून हिंदूंची एकजूट करू पाहणाऱ्या राजकारणाची सद्दी आता संपत आली आहे. मुस्लिमांचे प्रश्न समजून घेणे आणि त्यांना वेगळे न पाडता देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे भाजपसाठी देखील निकराचे आहे. कारण देशातील पंधरा-वीस कोटी लोकसंख्येला सतत हिणवत राहणे हे देशाच्या आणि भाजपच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने हितावह नाही. गेली काही दशके भाजपने हेच करूनही यावेळी त्यांना बहुतांश हिंदूंची मते मिळालेली नाहीत हे लक्षात ठेवा. भाजप हा हिंदु धर्मातल्या शेकडो जातींपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत असतोच; त्यासोबत आता मुसलमानांशी संवाद साधणे हेसुद्धा भाजपच्या राजकीय अस्तित्वासाठी निकडीचे आहे, असा या निकालांचा स्पष्ट संदेश आहे.
२) स्वच्छ नि पारदर्शक राजकारण करा आणि कालबाह्य चाणक्य नीतीच्या नावाखाली कपटी डावपेच खेळू नका, असा निदान महाराष्ट्रातल्या मतदारांचा तरी संदेश दिसतो. नवीन पिढीच्या हाती सत्य आणि तथ्य जाणून घेण्याची साधने विपुल आहेत; त्यामुळे यापुढचे युग हे सरळपणा आणि पारदर्शितेकडे वाटचाल करणाऱ्यांचे राहील. एकनाथ शिंदे व इतर काही मंडळी हिंदुत्वाच्या प्रेमापोटी उद्धव ठाकरेंना सोडून गेली असे क्षणभर जरी मानले, तरी अजित पवार आणि तत्सम मंडळींचे काय? मतदारांना हे पसंत पडलेलं नाही. त्यापेक्षा ज्या लोकांवर खुद्द मोदींनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना जर खरोखरच तुरुंगात टाकले असते तर कदाचित भाजपला अधिक मते मिळाली असती – जशी ती केजरीवालांना अटक करून दिल्लीत मिळाली.
३) विकास म्हणजे काय व कोणाचा ? या प्रश्नावर देखील सर्व राजकीय पक्षांनी मंथन करणे आवश्यक आहे. ८० कोटी लोकांना मोफत धान्य पुरवावे लागणे ही बाब अभिमानाची नसून लज्जेची आहे. सर्व लोकांना स्वाभिमानाने आणि स्वकष्टाने निरोगी व आनंदी जीवन जगता यावे, यासाठी कोणताही राजकीय पक्ष गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. त्यामुळे मतदारांची नाराजी ही कुठल्याही सत्तारूढ पक्षांविरुद्ध वेळोवेळी प्रगट होणारच.
४) भारताची विविधता जपणे अत्यावश्यक आहे. या देशावर एकच एक राजकीय, धार्मिक व सामाजिक संस्कृती लादण्याचा प्रयत्न कोणी करू नये. इथली विविधता ही सुंदर व अतिप्राचीन आहे. अशा या विविधतेत असलेली एकात्मता जाणून उत्तरेने दक्षिणेचा आणि पश्चिमेने पूर्वेचा आदर बाळगणे आवश्यक आहे. भाजप जितका पूर्वेत व दक्षिणेत वाढत आहे, तितकी या विविधतेचे रक्षण करण्याची गरज त्यालाही भासणारच.