दिवाकर रावते यांचं मराठी प्रेम सर्वज्ञात आहे . मराठी विद्यापीठ आणि मराठी भाषा भवन हा प्रश्न ते गेली अनेक वर्षे आधी शिवसैनिक आणि मग आमदार , मंत्री म्हणून मांडत आलेले आहेत .उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री म्हणून समावेश झाला नाही म्हणून दिवाकर रावते यांनी मराठीकडे होत असलेल्या सरकारच्या दुर्लक्षावर टीका केली , मंत्रीपद न मिळाल्याची निराशा विषादपूर्ण शब्दांत व्यक्त केली , वगैरे टिकात्मक प्रतिक्रिया वाचनात आल्या . तसं असेल ते फार कांही गैर नाही तरी ती निराशा , मराठीसाठी इष्टापत्ती ठरली आहे , असा सकारात्मक विचार करायला हवा . दिवाकर रावते यांनी हे विधान परिषदेतले भाषण सरकारवर टीका म्हणून केले असलं , मंत्रीपद मिळालं नाही म्हणून आलेल्या निराशेतून केलं असलं गृहीत धरलं तरी , ते आहे मोठं बोचरं व खुमासदार . निराशा व्यक्त करतानाही एखादा प्रश्न कसा लावून धरावा याचं चपखल उदाहरण म्हणून या भाषणाकडे बघायला हवं . त्यात शासकीय स्तरावर होणारी मराठी अवहेलना आहे आणि त्याबद्दलची खंत त्यांनी बोचर्या शब्दात मांडली आहे . विद्यापीठ आणि भाषा भवनाचा मुद्दा लावून धरताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांना काय सांगू , असा निरुत्तर करणारा सवाल करून सत्ताधारी पक्षाला खिंडीतही पकडलं . दिवाकर रावते यांचं विधानपरिषदेलं ते संपूर्ण भाषण ऐकण्यासारखं आहे ; जिज्ञासूंनी ते भाषण अवश्य ऐकावं . त्याची लिंक अशी- https://youtu.be/mskqHa_uQE0 .