महात्मा गांधी जगातील सर्वात मोठ्या लोकलढ्याचे नेते

*
गांधी-१५० – महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती सोहळ्याचे  अमरावतीत थाटात उद्घाटन
 
 
भारतीय स्वातंत्र्य लढा आणि राष्ट्रीय चळवळ हा जगातील सर्वात मोठा लोकलढा आहे. जगातील एकूण लोकसंख्येपैकी वीस टक्के लोकसंख्या तत्कालीन महासत्तेसोबत लढत होती. या लोकांची शक्ती ही शस्त्रशक्ती नव्हती, तर सहनशक्ती हेच त्यांचं शस्त्र होतं. महात्मा गांधी यांनी सामान्य माणसाच्या हाती अहिंसा आणि सत्याग्रहाचं शस्त्र देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. महात्मा गांधी हे जगाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लोकलढ्याचे नेते होते. इतकंच नाही, तर ते नेत्यांचेही महानेते होते. असं प्रतिपादन ज्येष्ठ संपादक, साहित्यिक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी केलं.
 
यंदाचं वर्ष हे महात्मा गांधी यांच्या १५० वं जयंती वर्ष आहे. त्यानिमित्तानं आम्ही सारे फौंडेशन आणि ‘गांधी- १५०’ अमरावती जिल्हा आयोजन समितीच्या वतीने विमलाबाई देशमुख सभागृहात प्रा सुरेश द्वादशीवार यांचं ‘गांधी नावाचा महात्मा’ हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं. यावेळी द्वादशीवार यांनी महात्मा गांधी यांच्या नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्वातील सामर्थ्य आणि संघर्षाची उकल केली. महात्मा गांधी यांच्या शब्दात मंत्रशक्तीचे सामर्थ्य होते, असे द्वादशीवार म्हणाले. कार्यक्रमाला मंचावर विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष आ. डॉ. सुनील देशमुख, आम्ही सारे फौंडेशनचे अध्यक्ष, मीडिया वॉच पब्लिकेशनचे संपादक अविनाश दुधे उपस्थित होते. व्याख्यानाला अमरावतीकरांनी अलोट गर्दी केली.
 
प्रा. सुरेश द्वादशीवार यावेळी बोलताना म्हणाले की, आज महात्मा गांधींविषयी प्रचंड गैरसमज आहे. कारण गांधीजींनी त्यांचे तत्वज्ञान सुत्ररूपाने स्वतः लिहून ठेवलेले नाही. माझं जीवन हेच माझं तत्वज्ञान आहे असं त्यांचे म्हणणे होते. धर्माबद्दल देखील त्यांनी स्वतः लिहून न ठेवता धर्म म्हणजे काय, या प्रश्नाचे उत्तर तुमच्या आमच्या सद्सद्विवेकबुद्धीवर सोपविले. पण आपली विचार करण्याची प्रवृत्ती संपली आहे. त्यामुळे आपले गैरसमज होतात. आपल्या देशात मार्क्सवादी, हिंदुत्ववादी, आंबेडकरवादी आणि गांधीवादी अशा प्रामुख्याने विचारधारा आहेत. गांधीवादी सोडले तर इतर तीनही विचारधारानी गांधीजींची कठोर टिकाच नव्हे तर द्वेषही केला आहे. अशा परिस्थितीत गांधी समजावून सांगणं ही गांधीवाद्यांची जबाबदारी होती. पण गांधीवाद्यांनी गांधींच्या जीवनातील संघर्ष वजा करून गांधी मांडले. त्यामुळे तरुण पिढीला गांधींचं आकर्षण राहिलं नाही. गांधींच्या आयुष्यातून संघर्ष निघून गेला की मग गांधीमध्ये काही उरत नाही.
 
गांधींनी मुसलमानांचे लाड पूरविले, असा हिंदुवावाद्यांचा त्यांच्यावर लाडका आरोप आहे. पण लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर अली जिना यांच्यात झालेल्या लखनौ कराराच्या पुढे महात्मा गांधी कधीच गेले नाही. उलट या कराराने मुस्लिमांना जे दिलं ते गांधीजींनी काढून घेतलं. स्वातंत्र्य लढ्यात हिंदू मुस्लिम जनतेनें ब्रिटिश राजवटीविरुद्ध एकदिलाने लढावं यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. खिलापत चळवळीला पाठिंबा देणे हा देखील त्याच प्रयत्नांचा भाग होता. केवळ हिंदुत्ववादिच नव्हे तर इतरांच्याही आरोपांचा विचार करता नव्या प्रकाशात गांधी बघायला आपण शिकायला पाहिजे, असे द्वादशीवार यांनी स्पष्ट केलं.
 
ब्रिटिशांच राज्य जाणं आणि पुढाऱ्यांचं राज्य येणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे तर इथल्या सामान्य माणसाच्या हातात सत्ता येणे, म्हणजे खरे स्वातंत्र्य होय, इतकी गांधीजींची स्वातंत्र्याची व्याख्या विशाल होती. लोकमान्य टिळकानंतर काँग्रेस पक्षाला व लोकांना कार्यक्रम देणारा नेता उरला नव्हता. ही उणीव गांधींनी भरून काढली आणि 1920 मध्ये लोकांनी त्यांना स्वातंत्र्य लढ्याचे नेते म्हणून स्वीकारले. भारतात आल्यानंतर केवळ पाच वर्षात हा झालेला हा बदल म्हणजे एक चमत्कारच आहे. पण गांधीवाद्यांनी गांधींच्या आयुष्यातील हा लोकसंघर्ष संपविला. त्यांना गांधीजी पेलवले नाही. असे स्पष्ट प्रतिपादन करीत प्रा द्वादशीवार यांनी गांधींच्या आयुष्यातील संघर्ष पुढे मांडला.
 
आ. डॉ. सुनील देशमुख यांनीही महात्मा यांच्या सत्य, अहिंसा, सत्याग्रह या मुल्यांसह एकंदरीत गांधी विचारांची प्रसंगीकता सांगितली. ते म्हणाले की गांधी विचार हा विश्वास आहे. गांधी विचार हा आजच्या जगात उदभवणाऱ्या समस्यांची उकल साधणारा मार्ग आहे. प्रास्ताविकात अविनाश दुधे यांनी गांधी 150 निमित्त वर्षभर करण्यात येणाऱ्या आयोजनाची माहिती दिली. तत्पूर्वी शास्त्रीय नृत्यांगना ऍड शीतल मेटकर यांनी व सहकाऱ्यांनी ‘वैष्णव जन तो येणे कहीये जे’ या भजनावर शास्त्रीय नृत्य सादर केले. रंगोलिकार उमेश उदापुरे आणि शीतल मेटकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला आ प्रा वीरेंद्र जगताप, आ यशोमती ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी, किशोर बोरकर, रमेश बोरकुटे, अरुणा सबाने, सुरेंद्र भुयार, डॉ चंद्रशेखर कुलकर्णी, डॉ मोहना कुलकर्णी, मिलिंद चिमोटे, विजय विल्हेकर, गिरीश कराळे, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अतुल विडूळकर यांनी केले.
Previous articleगांधीजी आणि त्यांच्या साक्षात्काराचा क्षण
Next articleप्रत्येकाला आकळणारा वेगळा गांधी !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here