महात्मा फुलेंवरील विविध प्रभाव शोधताना संत तुकारामांचा प्रभाव त्यांच्या ‘अखंड’ रचनेतून विस्ताराने शोधला आहे. अभंगावरून घेतलेला हा रचनाप्रकार पाहता जोतीराव आपले पूर्वसूरी कसे शोधत होते याचा शोध घेतात. हे सांगताना मोरे लिहितात, ‘ब्राह्मण्याची चिकित्सा करणाऱ्या जोतीरावांना तुकोबा आपले पूर्वसूरी वाटले असल्यास विशेष नाही. त्यानींच पहिल्यांदा शिवाजीकडे शेतकऱ्यांचा राजा व तुकोबांकडे शेतकऱ्यांचा संत या रूपात पाहून त्यांची तशी मांडणी केली.’ (२७) अशा पद्धतीने नवी मांडणी करणारी विलक्षण बुद्धिमत्ता आणि दृष्टी जोतीरावांकडे होती. ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करणारे नाटक ‘तृतीय रत्न’ ही जोतीरावाची पहिली रचना होय. ज्ञान हाच माणसाचा तिसरा डोळा असल्याने या नाटकाचे मूळ नाव ‘तृतीय नेत्र’ असावे, असे मोरे म्हणतात. या नाटकातील नेमक्या गोष्टी उद्धृत करून ते जोतीरावांच्या द्रष्टेपणाचे दर्शन घडवतात.