मानवजात ‘अव्दितीय’ आहे का?

 

-किशोर देशपांडे    

पृथ्वीवर जन्मलेल्या सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य हा फारच आगळावेगळा जीव असून, त्याची बरोबरी करू शकणारा दुसरा प्राणी पृथ्वीवर अवतरलाच नाही, असे मानवांना वाटते. वानरांच्या अनेक प्रजाती पृथ्वीवर एकाचवेळी वावरताना दिसतात, पण मानवासारखी अन्य प्रजाती दिसत नाही. म्हणूनच, मानवजात  ‘अव्दितीय’ असल्याचा गोड गैरसमज आपण करून घेतो.

   जीवशास्त्राने पृथ्वीवरील प्राण्यांचे जे वर्गीकरण केले आहे त्यानुसार, ज्या प्राण्यांच्या संभोगातून प्रजननशील अपत्य जन्म घेते त्या प्राण्यांची एक ‘प्रजाती’ (Species) असे मानले आहे. ज्या ज्या वेगवेगळ्या प्रजातींचा एकच पूर्वज आढळून येतो, अशा सर्व प्रजातींची एक जातकुळी (Genus) असल्याचे विज्ञान मानते. दोन भिन्न जातकुळी असलेल्या प्राण्यांमध्ये शरीरसंबंध होत नाहीत. एका जातकुळीतील भिन्न प्रजातींच्या प्राण्यांमध्ये देखील स्वेच्छेने शरीर-संबंध होत नाहीत आणि क़्वचित तसे झाले तरी त्यांचे अपत्य पुढे प्रजनन करू शकत नाही. उदा. घोडा व गाढवी यांच्या संबंधातून खेचर जन्मते, परंतु खेचरांची पुढे प्रजा होऊ शकत नाही.

   सुमारे चारशे कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर जीवनाचा प्रारंभ झाला. आजच्या मानवाचे अजूनही हयात असलेले जवळचे नातेवाईक म्हणजे चिंपांझी, गोरिला, ओरांग-उटान हे इतर महा-वानर (Great Apes) होत. सुमारे साठ लक्ष वर्षांपूर्वी एका वानरीने दोन मुलींना जन्म दिला. त्यांपैकी, एकीच्या वंशजांची चिंपांझी ही प्रजाती वाढत गेली तर दुसरी आपली मूळ पूर्वज होती. जीवशास्त्राच्या परिभाषेनुसार, आजचे आपण सारे मानव हे ‘होमो’ या जातकुळीतले ‘सेपियन्स’ (म्हणजेच शहाणे) नावाच्या प्रजातीचे सदस्य आहोत. ‘होमो’ या जातकुळीमध्ये नियांडरथल, इरेक्टस, सेपियन्स इत्यादी अनेक मानवी प्रजाती होत्या. ते सर्व मानव मागील दोन पायांवर चालू लागले आणि त्यामुळे त्यांच्या समोरच्या दोन पायांचे रुपांतर हळूहळू हातांमध्ये होत गेले. या हातांनी दगडी अवजारे तयार करणे, एकावर एक गारगोट्या घासून अग्नी तयार करणे इत्यादी हस्तकौशल्ये त्यांना विकसित करता आली.

   अग्नीवर नियंत्रण मिळविणे म्हणजेच पाहिजे तेव्हा व पाहिजे त्या जागी अग्नी प्रगट करणे, हे संपूर्ण प्राणी-जगतात केवळ या ‘होमो’ जातकुळीच्या मानवांनाच शक्य झाले. तिथून खऱ्या अर्थाने मानव आणि अन्य प्राणी-जगत यांच्यात दरी निर्माण झाली. अग्नी हाताळल्यामुळे, शिजवून अन्न खाणे व पचनक्रियेला लागणाऱ्या वेळेची नि ऊर्जेची बचत करणे देखील मानवांना शक्य झाले. याचा एक परिणाम असा झाला की त्यांच्या अन्ननलिका लहान होत गेल्या व मेंदू वाढू लागले. जठराकडे जाणाऱ्या ऊर्जेचा काही भाग मेंदूकडे वळू लागला.

  मोठ्या मेंदूच्या अर्भकांना जन्म देणे मानवी स्त्रियांना मात्र अत्यंत अवघड जात होते. कारण, चार पायांवर चालणाऱ्या वानरीचा पार्श्वभाग मोठा असायचा व पिलाचा जननमार्गही रुंद असायचा. पण दोन पायांवर शरीराचा भार वाहणाऱ्या मानवी स्त्रीचा पार्श्वभाग हळूहळू लहान होत गेला आणि जननमार्ग अरुंद. त्यामुळे बाळंतपणातच मृत्यू होणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण अधिक होते. मात्र अर्भकाची गर्भावस्था पूर्ण होण्यापूर्वीच ज्या स्त्रिया बाळंत होत असत, त्या पुढेही आणखी बालकांना जन्म देण्यासाठी जगू शकत. उत्क्रांतीच्या ओघात निसर्गाने अशी सोय केली की, मेंदूची पुरेशी वाढ न होताच अर्भक जन्म घेऊ लागले आणि जन्मल्यानंतर अनेक वर्षे त्यांच्या मेंदूची वाढ होऊ लागली.

  वरील कारनाने, मानवी अर्भके इतर प्राण्यांच्या तुलनेत अगदीच असहाय्य असतात व बरीच वर्षे त्यांचे सर्व प्रकारे इतरांना संगोपन करावे लागते. असे संगोपन एकटी माता करू शकत नव्हती. त्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांची व शेजाऱ्यांचीही मदत घेणे गरजेचे ठरले. ज्यांचे आपसांतील सामाजिक बंध मजबूत राहिले, असेच मानवी समूह उत्क्रांतीच्या प्रवाहात टिकू शकले. त्याचप्रमाणे, मानवांच्या मुलांचा मेंदू हा त्याच्या लवचिकतेमुळे बाहेरून शिक्षण व संस्कार ग्रहण करण्यासाठी अधिक सक्षम ठरला.

  अर्थात अग्नी हाताळणे, अवजारे बनविणे, मेंदू मोठा असणे व जटील सामाजिक संरचना बांधणे ही वैशिष्ट्ये ‘होमो’ (मानव) या जातकुळीतील सर्व प्रजातींमध्ये असूनही, सुमारे वीस लक्ष वर्षे पृथ्वीवरील प्राणीजगतात मानवप्राण्याने महत्वाचे स्थान मिळविले नव्हते. अन्नाच्या साखळीत त्याचा क्रमांक मधलाच राहिला. एखाद्या मोठ्या जिराफाची सिंह जेंव्हा कळपाने शिकार करून मेजवानी झोडायचे, तेव्हा उरलेल्या मांसावर लांडग्या-कोल्ह्यांचा हक्क असायचा. त्यानंतरच, उरलेसुरले मांस व हाडे ठोकून त्यातील मज्जा-गर खाण्याची मानवाला संधी मिळायची. सुमारे दीड लक्ष वर्षांपूर्वी मानवांच्या विविध प्रजाती आगीचा उपयोग करून सिंहांना पिटाळून लावत, स्वतःचे थंडीपासून रक्षण करीत व अधून-मधून जंगलही जाळत. तरीसुद्धा, पृथ्वीवरच्या सर्व मानवी प्रजातींची मिळून एकूण लोकसंख्या दहा लाखांपेक्षा अधिक नव्हती. आपण ‘होमोसेपियन्स’ तर त्यावेळी आफ्रिकेच्या एका कोपऱ्यात निमूटपणे वावरत होतो.

  ‘होमो’ कुळातील आपली सेपियन्स ही प्रजाती, सुमारे सत्तर हजार वर्षांपूर्वी पूर्व आफ्रिकेतील आपल्या मूळ निवास-स्थानातून बाहेर पडून मध्य-पूर्व आणि युरोपकडे पसरू लागली. त्याआधीच, आशिया व युरोपच्या दूरवरच्या भागांमध्ये अन्य मानवी प्रजाती पोहोचल्या होत्या व नांदत होत्या. पुढे या इतर सर्व प्रजाती लुप्त होऊन, केवळ सेपियन्स ही आपली प्रजाती विस्तार पावत गेली. त्या इतर मानवी प्रजाती का व कशा नष्ट झाल्या याचे नेमके कारण सांगता येत नाही. आजच्या मानवाची जनुकीय रचना तपासली असता, अगदी थोड्या प्रमाणात या लुप्त झालेल्या अन्य प्रजातींचा अंश आपल्यात आढळतो. म्हणजेच, भिन्न प्रजातींमध्ये थोड्या प्रमाणात संकर झाला असावा. भिन्न प्रजातींच्या दोन प्राण्यांमध्ये शरीरसंबंध होऊन प्रजननक्षम संतती निर्माण होऊ शकत नाही हा निसर्ग-नियम असला तरीही, बहुधा या मानवी प्रजातींच्या आपापल्या स्वतंत्र जनुकीय रचना पूर्णपणे विकसित होण्यापूर्वीच्या संधीकाळात अशी संतती कमी प्रमाणात झाली असावी.

  इतर प्रजातींना जाणीवपूर्वक नष्ट करण्याचा पराक्रमही आपण केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्व आफ्रिकेतून निघून आशिया व युरोपमध्ये पोहोचलेल्या आपल्या पूर्वजांना अन्नासाठी इतर मानवी प्रजातींसोबत स्पर्धा व लढाई करावी लागली असणार. त्यातून, त्या इतर प्रजातींचा समूळ वंशनाश देखील आपल्या पूर्वजांनी केला असणे शक्य आहे.सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी, होमो-सोलोएन्सिस नावाची मानवी प्रजाती नष्ट झाली. त्यानंतर लवकरच होमो-डेनिसोवा ही प्रजातीदेखील संपली. नियांडरथल मानव अंदाजे तीस हजार वर्षांपूर्वी तर बुटके मानव सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी नष्ट झाले. म्हणजेच आपण अव्दितीय नव्हतो हे निश्चित.

  पर्यावरणीय संतुलन नैसर्गिकरीत्या असे राखले जाते की, एकीकडे भक्षक प्राण्याची शक्ती उत्क्रांती-क्रमात वाढत असतानाच भक्ष्य प्राण्यांची चपळता व पळण्याचा वेगदेखील वाढत राहतो. हे बदल फार सावकाश व लाखो वर्षांच्या कालावधीत जनुकीय रचनांमध्ये होत राहतात. अन्नाच्या साखळीत मधल्या पायरीवर असलेल्या आपल्या पूर्वजांनी, एकप्रकारची अनैसर्गिक उडी मारली व ते पहिल्या स्थानावर पोहोचले. त्यामुळे, निसर्गाला पर्यावरणीय व्यवस्थेतील आवश्यक फेरबदल करण्याची पुरेशी संधी मिळाली नाही. पृथ्वीवरील बहुतेक मोठे भक्षक प्राणी हे लाखो वर्षांच्या प्रभुत्वामुळे डौलदार, राजबिंडे व सहजतेने ‘झोकात’ वावरणारे आढळतात. उलटपक्षी, मनुष्यप्राणी मात्र भय आणि चिंता यांनी ग्रासलेला व त्यामुळेच गरजेपेक्षा अधिक क्रूर आणि धोकादायक झालेला आहे.

(डॉ. युवाल नोवा हरारी यांच्यासेपियन्सया ग्रंथाच्या आधारे

(लेखक नामवंत विधीज्ञ व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत)

9881574954 

हेही वाचा-मानवजातीचे प्रश्नांकित भविष्य!https://bit.ly/30chGhS

 

Previous articleकोस्टल कर्नाटक
Next articleमहात्मा फुले यांचे वैचारिक चरित्र- पुस्तक परीक्षण
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.