कोस्टल कर्नाटक

-राकेश साळुंखे

एकसंध अशी कोस्टल कर्नाटक ट्रीप करायची, हे  खूप दिवसापासून मनात होते . तसा बऱ्याचदा त्या भागात गेलो होतो, पण पूर्ण अशी कोस्टल ट्रिप झाली नव्हती . संधी मिळताच थोडीफार तयारी करून गोव्यावरून प्रवास सुरू केला . प्रवासात प्रथम लागले ते कारवार .

कारवार

गोवा आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमेवर समुद्रकिनाऱ्यावर हे टुमदार, समृद्ध असे शहर वसलेले आहे . शांत व सुंदर समुद्र किनारे व  ऐतिहासिक मंदिरांसाठी कारवार प्रसिद्ध आहे . या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पाच किनाऱ्यांचा आनंद घेता येतो . त्यामुळेच कारवारला समुद्र किनाऱ्यांचे शहर म्हटले जाते .
कारवार हे नाव काडवाड या कोकणी शब्दावरून पडले आहे . कोकणी भाषेत काडे म्हणजे शेवटी  व वाड किंवा वाडे म्हणजे भाग होय . दांडेलीच्या जंगलात उगम पावणारी काली नदी जेथे अरबी समुद्राला मिळते त्याच्या मुखावर कारवार शहर विस्तारलेले आहे . पूर्वी कारवार हे  मसाले तसेच कापड व्यापारासाठीचे एक प्रमुख बंदर होते .सतराव्या शतकात हा भाग मराठा साम्राज्याचा हिस्सा होता . पोर्तुगीज , मराठे  , इंग्रज यांचे या भागावर वर्चस्व राहिले आहे . १८५७ च्या उठावानंतर ब्रिटिशांनी उत्तर कन्नडाचे हेडक्वार्टर कारवार केले व हा भाग बॉम्बे रेसिडेन्सीला जोडला. त्यामुळे राजकीय दृष्ट्याही  कारवारला महत्त्व प्राप्त झाले होते.


सुंदर बीचेससाठी प्रसिद्ध असणाऱ्या या शहरात कारवार बस स्टेशनपासून जवळ असलेला बीच म्हणजे कारवार बीच . यालाच रवींद्रनाथ टागोर बीच असेही म्हणतात .रवींद्रनाथ टागोर यांचे भाऊ  १८८२ साली कारवारला डिस्ट्रिक्ट जज होते. तेव्हा रवींद्रनाथ टागोर आपल्या पत्नीसह येथे काही महिने राहिले होते .  टागोरांनी कारवारला आपल्या आठवणींमध्ये विशेष स्थान दिले आहे . टागोरांप्रतीअसलेल्या आदरातून कारवार बीचला त्यांचे नाव देण्यात आले आहे . मऊसर वाळूचा हा सुंदर किनारा आपल्याला त्याच्या प्रेमात पडण्यास भाग पाडतो . तेथे असणारी छोटी बाग व त्यातील टॉय ट्रेन लहान मुलांचे विशेष आकर्षण आहे . सकाळी लवकर किंवा संध्याकाळी बीचवर जाणे योग्य .येथील फिश हाऊस पहाण्यासारखे आहे .
तिलमिती बीच हा काळ्या वाळूचा किनारा  असून कौटुंबिक सहलीसाठी  उत्कृष्ट आहे . येथून सूर्योदय व  सूर्यास्त दोन्ही दृश्ये  अनुभवण्यासारखी असतात. मी जेव्हा पहिल्यांदा या बीचवर गेलो तेव्हा येथील वाळूचा रंग प्रदूषणामुळे काळा झालाय, असे वाटले होते . पण नंतर कळले की हा वाळूचा रंग काली नदीमुळे आलेला आहे . देवबाग बीच जो गोव्याला जवळ आहे, तो तेथील दाट झाडी, मोठाले वृक्ष यामुळे देखणा  झाला आहे . येथे बेटखोल (Baitkhol ) हे नैसर्गिक बंदर आहे . या ठिकाणी छोटी छोटी नैसर्गिक बेटे पहायला मिळतात .
या शहराजवळ भारतीय नौदलाचा तळ आहे . येथे नौदलातील बोटी तसेच सैनिकांची लगबग चालू असते . अंजदिवा आयर्लंडचा हा भाग असून तेथे एक जुना  किल्ला अवशेष रुपात पहायला मिळतो . हा सर्व भाग प्रतिबंधित क्षेत्रात येतो . कारवार जसे किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे , तसेच तेथील खाद्यसंस्कृतीही लाजवाब आहे . मासे विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने तेथे माशांचे विविध प्रकार आपली रसना तृप्त करतात .  हॉटेल ‘अमृत ‘ हे कारवारी पद्धतीचे मासे  खाण्याचे एक उत्तम ठिकाण आहे . झणझणीत कारवारी फिश करी आणि राईसच्या आठवणीनेही तोंडाला पाणी सुटते .

गोकर्ण

सुंदर समुद्रकिनाऱ्याकाठी असलेल्या या क्षेत्राला  इतिहास काळापासून महत्व आहे. हे मंदिर इसवी सनाच्या तिसऱ्या- चौथ्या शतकातील असून त्याचा वेळोवेळी जीर्णोद्धार झालेला आहे.छत्रपती शिवराय व संभाजी महाराज यांचा या भागाशी संबंध आला आहे . दक्षिण दिग्विजयाच्या वेळी शिवाजी महाराजांची अनेक ठाणी या भागात होती.  गोकर्ण महाबळेश्वर हे  कर्नाटकात उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमठा तालुक्यात आहे. कारवार पासून दीड तासाच्या अंतरावर आहे. तर कुमठा  बंदरापासून ३१ किमीवर आहे.
गोकर्ण म्हटले की तीर्थक्षेत्र तसेच सुंदर  समुद्रकिनारे डोळयांसमोर येतात. गोकर्णचा विस्तीर्ण किनारा , ओम बीच, ज्याचा आकार ओम या अक्षराप्रमाणे आहे, कुडले बीच, पॅराडाईज बीच, हाफ मून बीच असे एकापेक्षा एक सुंदर किनारे लाभलेले हे ठिकाण आहे .
गोकर्ण महाबळेश्वर याचे माहात्म्य रामायण, महाभारत, भागवतपुराण, शिवपुराण  इ. ग्रंथांत वर्णिले असून ‘गोकर्णमाहात्म्य’  नावाचा एक स्वतंत्र ग्रंथही आहे. येथील महाबळेश्वराचे मंदिर द्राविड शैलीचे असून ते बारा ज्योतिर्लिगांपैकी एक आहे. या मंदिरातील भव्य गाभारा व सभामंडप प्रेक्षणीय असून येथे ब्रह्मा, विष्णू, शिव, अगस्ती, राम, रावण, ताम्रगौरी, गणपती इ. अनेक देवदेवतांची लहान मोठी मंदिरे आहेत. स्मार्त व लिंगायत समाजास हे स्थान विशेष महत्त्वाचे वाटते. येथे शंभरांहून अधिक नंदादीप अखंड तेवत असतात.
गोकर्णच्या शिव मंदिरातील पिंड ही भगवान  शिवाचे आत्म लिंग आहे, अशा संदर्भातील एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. रावण  मोठा शिव भक्त होता . त्याने घोर तपश्चर्या करून शंकराचे  वरदान मिळवले व त्यानुसार तो शंकराचे आत्मलिंग घेऊन लंकेला निघाला.  पण शंकराची एक अट असते- ती म्हणजे, लंकेत जाईपर्यंत त्याने  ते जमिनीवर ठेऊ नये . वाटेमध्ये सूर्यास्तसमयी अर्घ्य देताना हे आत्मलिंग जमिनीवर ठेवल्यास गुप्त होऊ नये म्हणून रावणाने ते गुराखी वेषधारी गणपतीजवळ दिले.  गणपतीने रावणाला दोनचार हाका मारून ते जमिनीवर ठेवले व  तो गुप्त झाला.  रावणाने ते आत्मलिंग उचलण्याचे बरेच प्रयत्न केले. त्यामुळेच ते आत्ताच्या पिरगळलेल्या अवस्थेत आहे अशी आख्यायिका आहे. त्याच जागी गोकर्ण महाबळेश्वराचे मंदिर उभारलेले असून रावणाने रागाने डोक्यावर ठोसा मारलेली गणपतीची मूर्तीही तेथे आहे .
सहा फुटी आत्मलिंगाचा आकार पिरगळलेल्या गाईच्या कानासारखा आहे म्हणून गोकर्ण तर महाबलशाली रावणाने अनेक प्रयत्न करुनही आत्मलिंग हलले नाही म्हणून महाबळेश्वर (महा+बळ+ईश्वर). अशा प्रकारे महादेवाच्या या आत्मलिंग असणाऱ्या स्थानास ‘गोकर्ण महाबळेश्वर’ असे नाव पडले .
आत्मलिंगाची स्थापना झालेली पाहून रावणाने संतापून आत्मलिंगासोबत आणलेली सर्व सामग्री इतरत्र फेकून दिली (उदा. आत्मलिंग आणलेला डब्बा, डब्ब्याचे झाकण, आत्मलिंगावर टाकलेले कापड, धागा इ.) या चारही वस्तू वेगवेगळया ठिकाणी जाऊन पडल्या. गोकर्ण महाबळेश्वरबरोबरच या चारही ठिकाणांस धार्मिक महत्त्व प्राप्त झाले.  त्या ठिकाणांस गोकर्ण महाबळेश्वर, सज्जेश्वर, धारेश्वर , गुनावंतेश्वर, मुरुडेश्वर  असे पंचक्षेत्र  नाव आहे. समुद्राच्या बाजूने गावाकडे पाहिले असता गावाचा आकार गोकर्णासारखा दिसतो, म्हणूनही त्याला गोकर्ण नाव पडले असावे, अशीही एक व्युत्पत्ती.
महाशिवरात्र हा येथील विशेष महोत्सवाचा दिवस असतो . दर चाळीस वर्षांनी होणाऱ्या अष्टबंध महोत्सवात आधीची पिंडी काढून नवीन बसवितात. त्यावेळी जमिनीतील  मूळचे   शिवलिंग  दिसते.
गोकर्णचा समुद्र किनारा विस्तीर्ण आहे.  एकदा असाच येथे समुद्रकिनारी चालत असताना जवळपास सगळा किनारा पूजलेल्या पिंडीनी भरलेला दिसला . तेव्हा कळले की पिंडदानासाठी येथे लोक येतात व ते पिंडी करून पूजतात .या तीर्थक्षेत्रास ‘मोक्षाचे द्वार’ समजले जाते.  म्हणूनच याला ‘दक्षिण काशी’ मानतात .  महाशिवरात्रीला खूप गर्दी असते, तेव्हा रथयात्रा व सजवलेला  रथ पाहण्यासारखा असतो.
जवळच्या ओम बीचला जाण्यासाठी डोंगरावर जाणाऱ्या रस्त्याने जावे लागते . आणि परत येतांना खाली छोटा ट्रेक करून उतरावे लागते. बीच खडकाळ असून त्याचा आकार बरोबर ‘ओम’ या अक्षरासारखा आहे. येथे समुद्र फेरीसाठी मोटर बोटी उपलब्ध आहेत. कुडले बीचला प्रसिद्ध ‘स्वस्वरा’  हे फाईव्ह स्टार हॉटेल आहे. या संपूर्ण भागात बीचेसवर परदेशी पर्यटक मोठया प्रमाणात असतात .
कारवार किंवा हुबलीकडून येताना अगसुर हे पुरातन गाव लागते. कृष्णाने ज्या नागरुपी असुराचा  वध केला तोच  तो अगसूर. तो पुतना व बकासुर यांचा भाऊ होता.  येथे नागदेवता व नागयक्षीचे मंदिर आहे तसेच राक्षसाचे सुद्धा मंदिर आहे. कुमठा येधील ‘मिरजान’ हे नाव असलेला समुद्रीकिल्ला ही पाहण्यासारखा आहे.  जवळच अघनाशिनी ही भारतातील शेवटची अखंड वाहणारी नदी आहे. ही नदी जगातील अश्या मोजक्या नद्यांपैकी एक आहे.

क्रमशः

(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)

84849 77899

Previous articleही तर भयकंपाची नांदी…
Next articleमानवजात ‘अव्दितीय’ आहे का?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.