स्पर्धा परीक्षांसाठी बसणारे विद्यार्थी वाचतात पण त्यांच्यातील बहुतेकांचा हेतू स्पष्ट असतो.पेपर सोडवण्यासाठी माहितीचे संकलन हा त्यांचा उद्देश एवढा प्रभावी असतो की, पुस्तके जीवन समजवून देतात किंवा आनंद देतात अशा किरकोळ गोष्टींकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नसतो! अशा एका वर्गावर मित्राचा आग्रह म्हणून मी एकदा तास घेतला. काही आगळ्या- वेगळ्या ,प्रेरणादायी आणि दिशादर्शक पुस्तकांचा त्यांना परिचय करून द्यावा, हा हेतू ठेवून मी बोलू लागलो. पहिल्या दहा मिनिटांत मी त्यांच्या नजरेतल्या अर्थाचा लसावी ( LCM ) वाचला. तो असा होता: सर, तुम्ही जी पुस्तके सांगत आहात त्यांवर स्पर्धा परीक्षेत काही प्रश्न येणार आहेत का ? नसतील तर पुस्तकांच्या थोरवीचे हे भावनिक भरताड आम्ही कशासाठी ऐकावे ? तिथेही एक विद्यार्थी अपवाद होता.त्याने माझा नंबर घेतला.मी सांगितलेली काही पुस्तके त्यानेही वाचली होती. मी अर्ध्या तासात माझ्या उफाळलेल्या पुस्तक प्रेमाचा मनातल्या मनात संहार करून विषयाचा उपसंहार केला आणि एका उद्विग्न मनस्थितीत घरी परतलो.