अरुणा सबाने : विजा झेलणारं झाड !

महाराष्ट्र फाउंडेशन(अमेरिका) या संस्थेचा २०२० चा अतिशय प्रतिष्ठेचा कार्यकर्ता (प्रबोधन) पुरस्कार लेखिका व नामवंत सामाजिक कार्यकर्त्या अरुणाताई सबाने यांना जाहीर झाला . त्यानिमित्ताने त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारा हा लेख –

-प्रमोद मुनघाटे

अरुणा सबाने ह्यांची ओळख महाराष्ट्राला लेखिका आणि समाजिक कार्यकर्त्या म्हणून आहे. पण त्यांच्या जवळच्या माणसांना त्यांच्या अनेक भूमिका माहित आहेत. त्या प्रकाशिका आहेत. कवयित्री, कथाकार आहेत. संपादक आहेत. चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या नेत्या आहेत. रात्रीबेरात्री घराबाहेर काढून दिलेल्या किंवा निराधार महिलांच्या त्या आधार आहेत. त्या एक आदर्श आई, सासू आणि आजी तर आहेतच. या सगळ्या भूमिका एकमेकात मिसळलेल्या आहेत. अनेकदा आयुष्यातील वेगेवगळ्या भूमिका वेगेवेगळ्या उद्देशाने घेतलेल्या असतात. त्यात एकात्मता असतेच असे नाही. परंतु अरुणा सबाने यांच्या सगळ्या भूमिकांचे बीज एकच आहे. एक खंबीर स्त्री, आई, लेखिका, मोर्चातील कार्यकर्ती, प्रकाशक, संपादक, वसतिगृहाची संचालक आणि आयुष्यातून उठलेल्या बायकांच्या आधारवड. पण या वृक्षाने स्वत:च आपल्या अंगावर किती विजांचे प्रहार झेलले असतील? पण तरीही या फांद्या आकाशात उंच उंच वाढत गेल्या दिसतात.

अरुणा सबाने ह्यांनी आपले घर सोडले (म्हणजे सोडावे लागले) ही दुर्दैवी घटना. अशी घटना कुणाच्याही वाट्याला येऊ नये. पण त्या दुर्दैवाचे दशावतार लोकांपुढे सांगत बसल्या नाहीत. लोक चार दिवस बाईचे किस्से चघळतात आणि तोंडातल्या च्युईंगगमप्रमाणे शेवटी ‘संस्कार-संस्कृती’ नावाच्या केराच्या टोपलीत थुंकून टाकतात.

अरुणा सबाने यांनी मुलांना मोठं करताना स्वतःलाही मोठं केलं. सगळ्या प्रकारच्या संघर्षातून जाताना पुन्हा स्वत:ला आपल्या कथा-कादंबर्यातून उभे केले. एव्हढेच नव्हे तर परंपरा, नाते आणि स्त्री-पुरुषसंबंधाच्या सनातनी चिखलातून एक एक पाउल पुढे टाकत स्वतःबरोबर त्यांनी भोवतालच्या अन्यायग्रस्त महिलांच्याही वेदनांना बोलते केले. त्यांच्या कथा-कवितांना साहित्याच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी ‘आकांक्षा’ मासिक सुरु केले. पुढे तो प्रवाह अधिक रुंद झाला, त्याचे ‘आकांक्षा’ प्रकाशन झाले. हे सगळे अरुणा सबाने ह्यांना आणि त्यांच्या ‘आकांक्षा’ मधील महिलांना लेखिका म्हणून लोकांनी ओळखावे, त्यांना पुरस्काराचा मान मिळावा म्हणून नव्हते. तर तो त्यांचा मोकळ्या वातावरणात घेतलेला श्वासच होता. तो श्वास घेतला नसता तर त्यांचा कोंडमारा झाला असता. ते लेखन ते प्रकाशन त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न होता. त्या सगळ्या लेखिकांच्या अस्तित्वाचा पुरावाच होता.

असे फार क्वचित होते की आपल्या वेदना, आपले दु:ख, आपला संताप चीड, आपला आक्रोश, आपली सगळी थरथर, अश्रुंचे ओघळ हे सगळे बायका निर्मितीमध्ये रूपांतरीत करतात. साहित्यशास्त्रात या प्रश्नाचे उत्तर काहीही असले तरी अरुणा सबाने यांच्या ‘आकांक्षा’ने हेच सिद्ध केले आहे की कोणत्याही सर्जनशील निर्मितीसाठी आपल्या अस्तित्वालाच कुठली तरी आच लागावी लागते.

‘विमुक्ता’ या अरुणा सबाने यांच्या कादंबरीची अर्पणपत्रिका बघा;

“दुख अवहेलना

भोगूनही पुन्हा नव्यानं उभी

राहिली

जी सतत माझ्या आजूबाजूलाच

वावरत असते, तिलाच…”

‘विमुक्त स्त्री’ जी स्पर्शाने आणि नजरेने दाखवता येत नाही, पण ती शब्दातून जिवंत करता येते. ‘विमुक्ता’ च्या दुसऱ्या आवृत्तीच्या मनोगतात अरुणा सबाने आपल्या वाचकांच्या प्रतिक्रिया लिहितात. त्या पैकी एक अशी: “तुमची कादंबरी वाचल्यावर मला कळलं की मी माझ्या आईला, बहिणीला किती गृहीत धरत होतो. त्यांची स्वतःची काही मत असू शकतात, हे माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. ‘विमुक्ता’ ने मला शिकवलं स्त्रीकडे आधी एक व्यक्ती म्हणून बघितलं पाहिजे. माझी आई, माझी बहीण आधी एक व्यक्ती आहेत. नंतर त्या माझ्या आई किंवा बहिणी आहेत. “

अरुणा सबाने यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्या सर्व पुस्तकांच्या प्रेरणा म्हणजे त्यांच्या आयुष्यातील त्या एका घटनेचे बीज आहे. पण त्या बीजाचा परीघ केवळ त्यांच्या स्वत:च्या दु:खाच्या कुंपणात राहिलेला नाही. तो समस्त स्त्रीत्वाच्या क्षितिजापर्यंत विस्तारला गेला आहे. त्यांच्या पुस्तकातील नायिका, इतर पात्रे आणि त्यांच्या एकमेकात गुंतलेल्या समस्या या खऱ्या आहेत, वास्तवातील आहेत, हे महत्त्वाचे. म्हणून त्यांच्या शब्दांना मोल आहे. कारण त्या अनुभवांना सामोरे जाण्यासाठी त्यांना आयुष्यात किंमत चुकवावी लागली आहे.

त्यांचे साहित्य, त्यांचे प्रश्न आणि प्रत्यक्षात त्या ज्या काही चळवळी आणि उपक्रम करतात, त्या वेगवेगळ्या नाहीतच. स्वातंत्र्य आणि समता ही मूल्ये नुसती काळ्यावर पांढरे करण्यासाठी नसतात. वास्तवात त्या मूल्यांसाठी संघर्ष करावे लागतात. घटस्फोटीत, परित्यक्ता, विधवा, आणि वेगवेगळ्या कारणांसाठी घर सोडावे लागलेल्या स्त्रियांचे प्रश्न जितके गंभीर आहेत, तेव्हढेच ते नाजूक आणि किचकट असतात. सहसा पोशाखी, मध्यमवर्गीय, सुरक्षेच्या कवचातील लोक असे प्रश्न आपल्या अंगाला लागू देत नाहीत. एखाद्या संसर्गजन्य रोगाच्या जंतूंची जशी दहशत असते, तशीच बाईचे घर, तिचा उंबरठा, तिचा पदर, तिचे कुंकू यांची प्रचंड दहशत असते. उंबरठ्याबाहेर पडलेली स्त्री जणू विस्तव किंवा महारोगाचे विषाणूच.

अरुणा सबाने यांनी यांनी हे विस्तव किंवा हे विषाणू आपल्या पदरात घेतले. ‘माहेर’ नावाचा संस्थेत अशा स्त्रियांना आधार दिला. त्यांचे प्रश्न समजून घेतले. त्यांना ऐकून घेणे हे सुद्धा एक मोठे काम असते. स्त्रीपुरुष संबंधाच्या पारंपारिक चौकटीत त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायलाही कोणताच कोपरा नाही. नात्यांचे सगळे संबंध रक्ताच्या आणि कायद्याच्या औपचारिकतेत बद्ध असतात. तिथे बायकांचे खरे प्रश्न ऐकून घ्यायला जागाच नसते. कोंडलेल्या वाफेला बाहेर पडायला सेफ्टी व्होल्व नसतो. रक्ताच्या किंवा कायद्याच्या नात्याशिवाय एक नाते असते, मैत्रीचे! पण वास्तवात ते असते का? हाच प्रश्न अरुणा सबाने यांच्या ‘विमुक्ता’ आणि ‘मुन्नी’ मधील पात्रे एकमेकांना विचारतात. त्यांच्या या कादंबऱ्या बारकाईने वाचल्या तर लक्षात येते की ‘मित्र हाच सखा असतो’ अशी स्त्रीसाठी एक रोमांटिक कल्पना मध्यमवर्गीय साहित्यात आढळते. पण ती प्रत्यक्षात तशी असते का? आपल्या समाजातील रूढ स्त्रीपुरुषसंबंधात मित्र आणि मैत्रीचे संबंध हे मृगजळासारखे कसे असतात, हा एक पैलू अत्यंत सूक्ष्मपणे अरुणा सबाने यांच्या कादंबरीतून अधोरेखित होतो.

त्यांच्या कादंबऱ्यातील खरे प्रश्न पुन्हा वेगळेच आहेत. जाणीवपूर्वक घराबाहेर पडलेली स्त्री किंवा अपघाताने घराबाहेर पडून देहविक्रीच्या सापळ्यात अडकलेली स्त्री हा खरा प्रश्न नाही. ज्या स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांचा आपण उठताबसता जयघोष करतो, त्यांचे सामाजिक वास्तव हे अशा महिलांच्या रूपाने प्रश्नचिन्ह म्हणून आपल्यापुढे उभे ठाकले असतात. खरा प्रश्न हा आहे की कोणत्याही कारणाने घराबाहेर पडलेल्या स्त्रियांच्या संदर्भात तिचे जवळचे नातेवाईक, भोवतालचा समाज आणि प्रसार माध्यमे असोत की पोलीस यंत्रणा असो त्यांची काय भूमिका असते, हा आहे. अशा स्त्रीच्या पाठीशी ‘स्वातंत्र्य आणि समता’ या मूल्यांच्या रक्षणासाठी या पैकी कोणीच उभे राहत नाहीत. तिला एकटीला स्वत:चे संरक्षण करावे लागते. आपल्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करावा लागतो. समतेच्या तत्त्वासाठी संपूर्ण परंपरा आणि रुढींच्या दगडी भिंतीवर कपाळ आपटावे लागते. अशा रक्तबंबाळ स्त्रियांच्या कहाण्या अरुणा सबाने यांच्या कथा-कादंबर्यात येतात. पण त्या रक्तबंबाळ आहेत, म्हणून पराभूत आहेत असे नाही. त्यांना न्यायासाठी आपला स्वतःचा मार्ग स्वत:च निर्माण करावा लागला असे दिसते.

अरुणा सबाने लेखिका म्हणून असा मार्ग केवळ आपल्या कादंबऱ्याच्या पानावर ठेवत नाहीत, तर तो प्रत्यक्ष आपल्या व्यवहारात उतरवतात. स्वतःला भोगाव्या लागलेल्या जखमांना जागूनच त्या सामाजिक रूढीपरंपरांच्या दगडांनी जखमी झालेल्या स्त्रियांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांनी माहेर ही संस्था स्थापन केली. घरात किंवा घराबाहेर बलात्कार झालेल्या, आपल्याच कुटुंबियांकडून अत्याचार झालेल्या किंवा भोगवस्तू म्हणून फसवल्या गेलेल्या स्त्रियांना ‘माहेर’ हा एक आधार वाटू लागला. अक्षरशः रात्री बेरात्री घराबाहेर पडलेल्या स्त्रियांना अरुण सबाने यांनी आपल्या घराचा आसरा देऊन त्यांना विश्वास दिला आहे. त्यांच्या या कृतीतून अन्यायग्रस्त स्त्रियांना माहेरसारख्या संस्थेचा विश्वास वाटतो. पण अरुण सबाने यांना स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांवरील नवीन पिढीचा विश्वास उडू नये म्हणून त्यांना ती स्वतःची सामाजिक जबाबदारी वाटते. अशा सामाजिक क्षेत्रात अनेक व्यक्ती कार्यरत असतात. प्रामाणिकपणे स्वतःला झोकून देतात. पण अरुणा सबाने ज्या मूल्यनिष्ठ जाणीवेने हे सगळे करतात, ते दुर्मिळ आहे.

अरुणा सबाने यांचे साहित्य असो की ‘आकांक्षा’ किंवा ‘माहेर’ सारखी संस्था असो या सगळ्यात स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांचे अधिष्ठान आहे. म्हणून त्यांच्या लेखनातील वैचारिक भूमिकेत आणि प्रत्यक्ष कार्यात एकात्मता दिसते. त्यांच्या व्यक्तिमत्वातील याच एकात्मतेचा भाग म्हणजे त्या सामाजिक अन्याय व अत्याचार विरोधातील वेगवेगळ्या चळवळीमध्ये केवळ भाग घेत नाही तर नेतृत्वही करतात. स्त्री अत्याचार परिषद असेल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, हुंडा विरोधी आघाडी असेल, पाणी परिषद असेल किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य व असहिष्णुतेच्या मुद्द्यावरील दक्षिणायनसारखे आंदोलन असेल, या सगळ्यात अरुणा सबाने हे नाव सातत्याने आघाडीवर असते.

हुंडाबळी, बलात्कार किंवा स्त्रियांवर कुटुंबात होणारे अत्याचार हे अंधश्रद्ध, रोगट आणि विकृत समाजव्यवस्थेचे परिणाम आहेत. स्त्रीला एक माणूस म्हणून असा समाज मान्यता देत नाही. संस्कृतीच्या उत्क्रांतीमध्ये आपण कुठे आहोत? असा प्रश्न या सगळ्या चळवळी विचारतात आणि सामाजिक प्रबोधनासाठी लढा उभारतात. कारण आपण म्हण संस्कृतीचे पाईक आहोत असे सांगणारी ही संस्कृती ‘स्वातंत्र्य आणि समता’ हे मूल्य संकुचित करीत असेल, तर ती संस्कृती नव्हे ती विकृतीच आहे, हे ठामपणे आपल्या प्रत्येक साहित्यकृतीतून आणि सामाजिक कृतीतून अरुणा सबाने आपल्या लक्षात आणून देतात.

‘पाणी परिषद’ आणि ‘जलसाहित्य संमेलन’ हे अरुणा सबाने यांच्या दीर्घकाळच्या कार्याचा अपरिहार्य भाग बनतो, तेंव्हा त्यामागील त्यांची भूमिका आणखीच त्यांच्या व्यक्तिमत्वाशी सुसंगत आहे असे दिसते. पाणी हे मानवी जीवनाचे जीवन आहे. पण सत्ता आणि संपत्तीप्रमाणे पाण्याचीही भांडवलशाही या समाजात दिसते. आपण लोकशाहीत राहतो, पण क्षणोक्षणी लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडविण्याचा अनुभव येतो. हा अनुभव तर कुटुंब आणि घरापासून सुरू होतो. घर सांभाळणारी स्त्री म्हणून तिचा गौरव केला जातो. घरातील एकूणच कामाचा केंद्रबिंदू पाणी हेच असते. सकाळी झोपून उठल्यावर पाण्याचा प्रश्न प्रथम घरातील स्त्रीलाच सोडवावा लागतो. ती स्त्री नुकतीच हळद लागलेली नववधू असो, बारा-तेरा वर्षाची मुलगी असो की ऐंशी वर्षाची म्हातारी असो, कुटुंबव्यवस्थेत पाण्याची व्यवस्था स्त्रीच्या माथी मारलेली असते. म्हणून स्त्रियांवरच्या अत्याचाराबद्दल विचार करताना त्यांना पाणी ही एक समस्या दिसली. भर उन्हात मैलभर अंतरावरून डोक्यावर मडके घेऊन पाणी आणणाऱ्या खेड्यातील स्त्रिया असोत की डोळ्यावरील अर्धवट झोप गुंडाळून भल्या पहाटे सार्वजनिक नळावर रांगेत उभ्या राहणाऱ्या शहरातील झोपडपट्टीतील बायका असोत, त्या असमानतेच्या बळी आहेत. यात पुरुष कधी दिसत नाही हा एक स्त्री-पुरुष विषमतेचा भाग आहेच. पण कोणत्याही शहराच्या सिव्हील लाईन्स मध्ये हे दृश्य दिसत नाही, हा परत सामाजिक विषमतेचा भाग आहे. नैसर्गिक संसाधन म्हणून पाण्यावर सर्वांचाच सारखा हक्क आहे. पण काहीना मुबलक पाणी मिळते आणि काही तहानलेले राहतात. या वास्तवाचा सामना मोठ्या संघटना, संस्था त्यांच्या पातळीवर करीत असतील. पण अरुणा सबाने यांना हा प्रश्न महत्त्वाचा वाटला आणि त्यांनी यावर प्रबोधनाचा कार्यक्रम हाती घेतला. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी जलसाहित्य संमेलनाची चळवळ सुरु केली. त्या चळवळीला आता व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.

अरुणा सबाने ह्यांच्या आजवरच्या एकूण कामाकडे पहिले तर असे लक्षात येते की त्यांनी कथा-कादंबरी असे सर्जनशील लेखन असो की स्त्रियांच्या पुनर्वसनासाठी स्थापन केलेली माहेर संस्था असो, त्यामागे विषमतेच्या वास्तवाविरुद्धचा लढा आहे आणि स्वातंत्र्य-समता या मूल्यांसाठी चाललेला त्यांचा अविरत सत्याग्रह आहे.

□□

महाराष्ट्र फाउंडेशन(अमेरिका) या संस्थेचा २०२०चा अतिशय प्रतिष्ठेचा कार्यकर्ता (प्रबोधन) पुरस्कार अरुणाताईना जाहीर झाला आणि वाटले विजा झेलणाऱ्या झाडावर जणू आकाशातून पुष्पवृष्टीच झाली.

अरुणाताई अभिनंदन !!

(लेखक नामवंत समीक्षक आहेत)

अरुणाताई सबाने-9970095562

प्रमोद मुनघाटे-7709012078

Previous articleहलशी आणि सिद्दी
Next articleमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वाचनसंस्कृती
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.