हलशी आणि सिद्दी

-राकेश साळुंखे

कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील  खानापूर तालुक्यात असलेल्या हलशी या ठिकाणाला भेट देण्याचे आम्हा काही मित्रांचे ठरले. प्राचीन कदंब राजवटीची दुसरी राजधानीअसलेले हे ठिकाण बेळगाव ते दांडेली या मार्गावर आहे . बनवासी ही कदंबांची  पहिली राजधानी होती . अनेक प्राचीन मंदीरे  त्यातही तेथील एक मंदिर जे राष्ट्रीय स्मारक आहे ते पाहण्याची तसेच पुरातत्व विभागाचे उत्खनन चालू असणारे ठिकाणही  पाहण्याची आम्हा सर्वांना उत्सुकता होती .

         सातारहून सकाळी लवकर निघून कोल्हापूरमध्ये  सोलापूरहून आलेल्या मित्रांना घेवून बेळगावकडे सकाळी सात च्या दरम्यान निघालो. कोल्हापूर ते हलशी हे अंतर  १६५ किमी आहे.  बेळगाव ते हलशी अंतर ४५ किमी आहे. बेळगावमध्ये प्रथम आम्ही प्रसिद्ध कन्नड साहित्यिकांना भेटलो. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते मराठी भाषिक आहेत पण त्यांचे संपूर्ण साहित्यिक योगदान कन्नड भाषेत आहे.  त्यांच्या सोबत संवाद साधत असताना २-३ तासाचा वेळ कसा निघून गेला समजलेच नाही. शेवटी माझ्या प्रकाशनाच्या काही पुस्तकांचे  कन्नड भाषेमध्ये भाषांतर करण्याचे ठरवून बाहेर पडलो. बेळगाव वरून निघून खानापूर ला दुपारी १ च्या दरम्यान पोहचलो .

      खानापूरला स्वातंत्र्यपूर्व काळातील चळवळींचा खूप मोठा इतिहास आहे . स्वातंत्र्यपूर्व काळातील सर्वात जुनी प्रिंटींग प्रेस येथीलच आहे .खानापूरस्थित पहिला सत्यशोधक मठ पाहिला . मलप्रभा नदी काठी असणारा हा मठ सध्या खंडहर स्वरूपात उभा आहे . तो पाहून खानापूर येधील मित्रांच्या सोबतीने हलशीच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला .

      दुपारचे दोन वाजले असल्याने सगळ्यांना भुकेची जाणीव होऊ लागली . त्यामुळे वाटेत सोबतचे डबे उघडून एका शेतात पंगत मांडली. हा तसा रिमोट एरिया असल्याने  येथे हॉटेल वगैरे नाहीत . येथून पुढे जंगल सुरु होते . नंदगडमार्गे हलशी ला पोहचायला अडीच वाजले .

      पूर्वी राजधानी असलेले हे ठिकाण सध्या एका छोट्याशा खेड्याच्या स्वरूपात दिसते . आम्ही प्रथम वराह नरसिंह मंदिर पहायला गेलो . भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असणारे हे मंदीर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे . या मंदिरात दोन गर्भगृहे आहेत . त्यांची तोंडे एकमेकांकडे आहेत . त्यापैकी एका गर्भगृहात वराह मूर्ती तर दुसऱ्या मध्ये  नरसिंहाची मूर्ती आहे . दुपार असल्याने दोन्ही गर्भगृहे बंद होती . आम्ही मग मंदिर पाहून घेतले  . थोड्या वेळाने तेथील पुजारी आला . त्याने गर्भगृहाचे दार  उघडून दिले .  आत गेलो असता मूर्तींना वस्त्रे घातली असल्याचे दिसले त्यामुळे त्या मूर्तींचे मूळ  रूपच बदलून गेले असे वाटले . सकाळी पूजेच्या वेळी तुम्हाला मूळ मुर्त्या पाहता येतील असे तो पुजारी म्हणाला . तेथील वराह मूर्तीच्या सोंडेवर एक छोटीशी देवीची मूर्ती आहे . तिला पृथ्वीचे रूपक समजतात . संपूर्ण ग्रॅनाईटमध्ये या मूर्ती घडवल्या आहेत . मंदिरात एक मोठा शिलालेख काचेत ठेवला आहे . जयकेशीन कदंब की जो सहाव्या विक्रमादित्य चालुक्य राजाचा जावई होता त्याचा हा शिलालेख आहे . तो देवनागरी लिपीत आहे . त्या शिलालेखावरील मजकूर जर इंग्रजी भाषेत त्याच्या शेजारी बोर्ड वर असता तर तो पर्यटकांना समजू शकला असता असे वाटले . तेथे येणारे उत्सुकतेने तो शिलालेख पहात होते पण मजकूर वाचता येत नसल्याने त्यांची निराशा होत होती . या मंदिराच्या परिसरात अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत . हे सर्व पाहून येथून एक किमी अंतरावर असलेल्या सुवरनेश्वर मंदिराकडे निघालो . वाटेत कलमेश्वर मंदीर आहे . तेथे गर्भगृहात मध्यम आकाराची पिंड असून बाहेरच्या बाजूला   गणपतीची व सप्तमातृका यांची सुस्थितीतील मूर्त्या आहेत . पुढे  एके ठिकाणी सतीची शिला बघायला मिळाली . ही शिला इतर शिलांपेक्षा वेगळी होती . त्यावर असणारा हात आकाराने छोटा होता व त्यावर स्त्री व पुरुषाचे शिल्प कोरले होते .

   सुवर्णेश्वर मंदिर हे उंच चौथऱ्यावर पडझड   झालेल्या स्थितीत असून   त्याच्या सभामंडपाचे दगडी  खांब व तुळया फक्त शिल्लक आहेत . तेथे भव्य नंदीची मूर्ती  पहायला मिळते . तसेच  सुस्थितीत असलेल्या गर्भगृहात शंकराची मोठी पिंड असून त्याची पूजा केली जाते . या मंदिराच्या आवारात मोठी शिला असून ब्रह्मदेव समजून त्याला पुजले जाते . सुवर्णेश्वर मंदिर पाहून जेथे पुरातत्व खात्याचे उत्खनन चालू होते तिकडे गेलो . जाताना वाटेत एक प्राचीन काळापासून असलेले तळे लागले . तेथे थोडा वेळ रेंगाळलो . जेथे उत्खनन चालले होते तेथे जाण्यासाठी शेतातून पायवाटेने जावे लागते . भातशेतीतून जाणारी ही पायवाट खूप सुंदर आहे . काही ठिकाणी पिक काढले होते तर काही ठिकाणी ते शेतातच मोठ्या दिमाखात डौलत होते.

         खूप मोठ्या शेडमध्ये उत्खननाचे काम चालू असलेले दिसत होते  . त्या उत्खननात प्राचीन इमारतीचा ढाचा दिसत होता .  संध्याकाळची वेळ असल्याने तेथे कोणी जबाबदार कर्मचारी उपस्थित नव्हता त्यामुळे त्या उत्खननासंदर्भात काही माहिती मिळू शकली नाही . वॉचमनला काही सांगता येत नव्हते . त्यानंतर गावात चहा पिण्यासाठी गेलो तर तेथील काही गावकऱ्यांनी आम्हाला वेढा घातला . त्यांना आम्ही पुरातत्व खात्याचे लोक आहोत असे वाटले . ज्यांच्या जमिनी सरकारने ताब्यात घेतल्या मात्र त्याचा मोबदला अजून दिला नाही ते हे लोक होते . आमच्या खानापूरमधील कन्नड येणाऱ्या मित्राने त्यांचा गैरसमज दूर केला . आम्हाला दांडेलीला मुक्कामी जायचे होते . हलशीतील रामलिंगेश्वर मंदिर डोंगरावर असल्याने आम्ही ते नंतर पहायचे ठरवून दांडेलीच्या दिशेने निघालो.  हिवाळ्यातील संध्याकाळ असल्याने  लवकर अंधार पडला होता .दांडेलीला जाण्यासाठी जंगलातून वाट असल्याने प्रवास चांगलाच थरारक झाला . अनायसे आमची रात्रीची जंगल सफारी घडली .

    दुसऱ्या दिवशी सकाळी हुलियाल नजीकच्या काही गावांमध्ये जायचे होते . या गावात हबशी म्हणजेच सिद्दी लोक राहतात, त्यांना भेटायचे ठरले होते . त्याप्रमाणे आम्ही तिकडे गेलो . सुमारे चारशे वर्षांपासून हे लोक भारतात वास्तव्यास आहेत . पूर्व आफ्रिकेतून  ( इथिओपिया ) या लोकांचे वंशज  भारतात आले . यांपैकी काही गुलाम म्हणून तर काही सैनिक म्हणून आले . या  लोकांच्या वसाहती भारतात उत्तर कर्नाटक , गुजरात , हैद्राबाद  येथे आहेत .  इतिहासात आपल्या पराक्रमाचा ठसा उमटविलेल्या या लोकांचे वंशज सध्या काय करतात , कसे राहतात याबद्दल कुतूहल वाटल्याने त्यांना भेटायचे ठरवले होते . आम्ही जेथे गेलो ते गाव दुर्गम भागात असूनही एकदम स्वच्छ होते . आपल्याकडे कोकणात जशा वाड्या असतात तसे त्याचे स्वरूप होते .

त्यांचा मुखिया ७५ वर्षांचा गृहस्थ होता . त्याने आम्हाला सिद्दी समाजाविषयी माहिती सांगितली  . सिद्दी लोक हे  मुस्लिम  ,हिंदू व ख्रिश्चन देखील आहेत . या लोकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे . त्यांच्यातील काही वनविभागाच्या अंतर्गत असणाऱ्या भागात शेती करतात तर काही आसपासच्या खेडेगावातील शेतात मजुरी करतात . शिक्षणाच्या बाबतीत मात्र अजूनही हे मागासच आहेत . त्यांच्यात एक गोष्ट विलक्षण वाटली, त्यांची लग्ने आपापसात होतात परंतु त्यात त्यांचा धर्म आड येत नाही . म्हणजे कोणत्याही धर्मातील व्यक्ती दुसऱ्या कोणत्याही धर्मातील व्यक्तीशी लग्न करू शकते . त्यांच्या बाह्य रंगरूपामुळे ते मुख्य सामाजिक प्रवाहापासून तुटलेले आहेत असे वाटत रहाते . मार्गारेट अल्वा या केंद्रीय मंत्री असताना त्यांना अनुसुचित जमाती  (ST ) अंतर्गत आरक्षण त्यांना देण्याचा प्रयत्न झाला . परंतु अजूनही हे प्रकरण प्रलंबित आहे . त्या काळात त्यांच्या तगड्या शरीरयष्टीमुळे त्यांना काही क्रीडाप्रकारात संधी दिली गेली परंतु ते भारतीय वंशाचे नाहीत या गैरसमजुतीतून त्यांना नंतर डावलण्यात आले, ही खंत त्यांच्या बोलण्यात जाणवली .

(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)

84849 77899

Halasi – an ancient capital- By Rakesh Salunkhe