उत्पल व्ही. बी.
गांधीजी : ही बाकी एक गंमतच आहे.
मी : काय?
गांधीजी : मुसलमान या देशात सुरक्षित आहेत असं म्हणतायत भाजपवाले.
मी : बरं मग?
गांधीजी : तुला विश्वास ठेवणं थोडं अवघड नाही जात? किंवा काही विरोधाभास नाही जाणवत?
मी : कसला विरोधाभास? छाने की असं म्हणणं…
गांधीजी : अरे, भाजपने धार्मिक विद्वेषाला चिथावणी दिली आहे. अगदी दंगलीही घडवल्या आहेत.
मी : कधी? कुठे?
गांधीजी : मुजफ्फरनगर, गुजरात, बाबरी मशीद…
मी : ते सगळं आता जुनं झालं हो. ‘ये नया भारत है’ हे विसरू नका तुम्ही. स्वतःला दिवसातून दोनदा तरी आठवण करून देत जा. वाटल्यास अलार्म लावा तसा. सकाळी आणि संध्याकाळी ‘ये नया भारत है’ असं वाजलं पाहिजे. रिंग टोन करून घेतलात तर उत्तमच.
गांधीजी : अरे पण क्रेडिबिलिटीचा मुद्दा येतोच ना.
मी : आता तुमचं मनच साफ नाहीये त्याला काय करणार?
गांधीजी : माझं मन साफ नाहीये?
मी : मग काय तर. विश्वासच ठेवायचा नाही कशावर.
गांधीजी : विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही. पण मग भाजपने एकदा सविस्तर माफी मागावी मागील घटनांची. आमच्याकडून मागे चुका घडल्या आहेत पण आता आम्ही ‘नये’ आहोत याची खात्री बाळगा असं म्हणावं प्रांजळपणे.
मी : तुंम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला?
गांधीजी : काय बोलतोय?
मी : अहो, असं कोण कबूल करेल?
गांधीजी : धैर्यशील माणूस.
मी : उफ्फ…आपके ये उसूल…
गांधीजी : हे काय मधेच?
मी : काही नाही, सोडून द्या.
गांधीजी : बरं.
मी : अहो ते काय मूर्ख आहेत का असं कबूल वगैरे करायला?
गांधीजी : अच्छा. म्हणजे याचा संबंध शहाणपणाशी आहे तर.
मी : अर्थात. राजकीय शहाणपणाशी. तुम्ही एक काम करा.
गांधीजी : काय?
मी : पहिलं म्हणजे शंका वगैरे काही घेऊ नका.
गांधीजी : बरं. आणि?
मी : ‘सबका साथ सबका विकास’ म्हणा, मैं भी सावरकर म्हणा, आय सपोर्ट कॅब म्हणा, मोदी है तो मुमकिन है म्हणा….काहीतरी म्हणत राहा सारखं. बरं वाटेल.
गांधीजी : ते कसं रे जमणार?
मी : का नाही जमणार?
गांधीजी : तुला माहीत नसेल म्हणून सांगतो.
मी : काय?
गांधीजी : मीसुद्धा ना अहिंसक आहे… मूर्ख नाहीये.
(लेखक हे फ्रीलान्स कॉपी रायटर आहेत . अनेक वर्तमानपत्र, नियतकालिकात ते लिहितात)
-9850677875