–नीलांबरी जोशी
विल्यम वर्डस्वर्थ या कवीनं “पैसे मिळवणं आणि खर्च करणं” या चक्रातून माणूस दु:खाकडे वाटचाल करतो असं म्हणलं होतं. “या दोन्ही गोष्टींमुळे मित्रमैत्रिणी, आप्तेष्ट यांच्याबरोबर वेळ घालवणं, निसर्गाबरोबर संवाद साधणं या आनंददायक गोष्टींना देता येणारा वेळ कमी होतो. साहजिकच “गेटिंग अॅंड स्पेंडिंग” हे दु:खाकडे लोटतं” असं वर्डस्वर्थचं म्हणणं होतं.
“माणसांवर प्रेम करायला हवं यासाठी माणूस जन्माला आला आणि वस्तू वापरायला हव्यात यासाठी त्यांचं उत्पादन झालं. आजच्या जगातला गोंधळ या दोन गोष्टींची गल्लत झाल्यामुळे होतो आहे. आपण वस्तूंवर प्रेम करतो आणि माणसं वापरतो” असं दलाई लामांचंही प्रसिध्द वाक्य आहे.
याला पुष्टी देणारी अनेक उदाहरणं “द हाय प्राईस आॉफ मटेरिअॅलिझम” या पुस्तकात टिम कॅसर या लेखकानं दिली आहेत. वस्तूंचा साठा करणं या गोष्टीना अनन्यसाधारण महत्व देणारी माणसं दु:खी, वैफल्यग्रस्त आणि मानसिक तणावांनी गांजलेली असतात. त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा आलेला असतो.
वस्तू जमवणं, पैसा मिळवणं, प्रतिष्ठा, समाजातलं स्टेटस, पारितोषिकं, सततची स्तुती यापैकी कशालाही किंवा सगळ्या गोष्टींना अनन्यसाधारण महत्व दिलं जातं. या गोष्टींना कॅसर बाह्य गोष्टी मानतो. अंतर्यामी आनंदी असणारी वैयक्तिक उन्नती, समाजाबरोबर चांगले संबंध आणि भोवतालच्या सगळ्यांना आनंदी ठेवणं यासाठी झगडतात.“हे जास्त.. अजून जास्त” आत्ताच्या समाजात शिस्तबध्दपणे रुजवलं गेलंय. १८७७ साली युरोपियन लोक अमेरिकेतील लोकांवर राज्य करुन त्यांचा विध्वंस करत होते. “तेव्हा अधिकाधिक वस्तूंबद्दलचं प्रेम हा एक आजार आहे“ असं तलाकोटा या अमेरिकेतील राज्याचा प्रमुख म्हणाला होता. या अधिकाधिक वस्तूंची हाव असण्याच्या प्रवृत्तीला आजार हाच शब्द अतिशय योग्य आहे. वस्तूंची वाढती लालसा हे नैसर्गिक नाही. ते वेगळ्या संस्कृतीतून आलंय.
अमेरिकेतले इतिहासकारांनी रेड इंडियन्स लोकांबद्दल ‘ते सगळे समान आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांपेक्षा कोणीच गरीब किंवा श्रीमंत नाही. जेवढं गरजेचं आहे तेवढंच ते मिळवतात’ असं लिहून ठेवलंय. ते नैसर्गिक होतं. तसंच मानववंशशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांच्या म्हणण्यानुसारदेखील पूर्वीच्या लोकांचं एकमेकांशी जास्त सौहार्दपूर्ण होतं. आत्ताचं स्पर्धात्मक, एकमेकांच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जाण्याऱ्या आणि स्वार्थी माणसांचं जग आधुनिक भांडवलशाही युगात तयार झालं. पूर्वी लोक एकमेकांना धरुन रहात. खाजगी संपत्तीची त्यांना हाव नव्हती. स्वार्थीपणापेक्षा वागण्यातला उदारपणा व्यक्तिमत्वाला योग्य ते रुप देत होता.कुटुंब, नातेसंबंध, सामाजिक बांधिलकी अशा गोष्टी आणि पैशाच्या मागे धावणं यापैकी काय निवडावं याबद्दल ज्यांच्या मनात गोंधळ असतो ते सर्वात जास्त असमाधानी असतात. चंगळवादी गोष्टी चांगल्या किंवा वाईट नसतात. त्यांच्यामागे कधी, किती त्रास सहन करुन आणि कोणती तडजोड करुन धावायचं हे ठरवणं महत्वाचं असतं.
(नीलांबरी जोशी ‘कार्पोरेट कल्लोळ’ , ‘झपूर्झा’, ‘जिथे मुलांना पंख फुटतात’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत)
…………………………