मोदींचा बुद्ध , भिडेगुरुजी निर्बुद्ध

साभार: साप्ताहिक चित्रलेखा

-ज्ञानेश महाराव

संभाजीचे ‘मनोहर’ झालेल्या भिडेगुरुजीचा आता पुरता ‘मंबाजी’ झालाय. ताज्या अमेरिका दौर्‍यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, ‘भारताने जगाला युद्ध नाही, बुद्ध दिले !’ त्यासरशी भिडेगुरुजी सांगलीतून आरवले, ‘भारताला बुद्धाची नाही, संभाजीराजांच्या शिकवणुकीची गरज आहे!’ मुळात, मोदींचं बुद्धप्रेम हे ढोंग आणि त्या वरचढ भिडेगुरुजीचं संभाजीराजेंच्या प्रेमाचं सोंग ! मोदींची मातृ-पितृसंस्था असणार्‍या रा.स्व.संघाची विचारधारा पूर्णपणे बुद्धांच्या समता, शील, बंधुता याचा आग्रह धरणार्‍या विचारांवर आघात करणारी; तर त्याला पूरक अशी भिडेगुरुजीची कृती संभाजीराजांचं नाव घेत ब्राह्मणेतर तरुणांच्या शक्ती-बुद्धीचा घात करणारी; त्यांची उमेद, जिद्द नासवणारी आहे.
असो. तथागत बुद्धांनी सामाजिक विषमतेला विरोध केला. जगाला शांतीचा संदेश दिला. हाच विचार संत तुकाराम महाराजांनी दिला, म्हणून त्यांची ओळख ‘जगद्गुरू’ अशी झाली. गांधीजीही ‘बुद्ध जगले’ म्हणून ‘महात्मा’ झाले ! ‘गांधीजी फक्त भारताचे नाहीत, तर विश्वाचे आहेत,’ अशी कबुली नरेंद्र मोदींनाही विदेशात द्यावी लागते. अशा काळाला आणि आक्रमणांना पुरून उरणार्‍या तथागतांच्या बौद्ध धम्माचा भारतातून र्‍हास का झाला ? कुणी केला ?
गुजरातेत बौद्धांची संख्या गेल्या १० वर्षांत ३०,०००ची ७०,०००वर गेली असताना, गुजरातेत गोरक्षाच्या नावाखाली दलित समाजावर जीवघेणे अत्याचार मोदी सरकारच्या काळात का झाले ? या प्रश्नांच्या उत्तरात मोदी मजबुरीने गांधीजी, बुद्ध, शिवराय यांची नावं घेतात, हे स्पष्ट होतं.
तथागत बुद्धांचा जन्म इ.स.पूर्व ५६३ मध्ये अखंड भारतातील नेपाळमधील लुंबिनी येथील कपिलवस्तूमध्ये झाला. ‘राजा’ असलेल्या सिद्धार्थ गौतम यांना बिहारातील-बोधगया येथील पिंपळ वृक्षाखाली ध्यानाला बसले असता ज्ञान प्राप्त झालं. तेव्हापासून सिद्धार्थ गौतमाची ओळख ‘परिपूर्णपणे स्वयं जागृत’ करणारा सम्यकसंबुद्ध अशी झाली. बुद्धांनी स्वआनंद आणि आत्मसंवेदनांच्या कणांपासून दूर राहाण्याचा ‘मध्यम मार्ग’ शोधला. त्यानुसार, जगणे म्हणजे धम्म. धम्माच्या प्रसारासाठी बुद्धांनी तेव्हाच्या मगध देशाचा शासक बिंबिसार याच्याकडे सहकार्य मागितलं. ते देताना या सम्राटाने बौद्ध धम्माला वैयक्तिक विश्वास म्हणून स्वीकारलं. आपल्या राज्यात बौद्ध विहारांची स्थापना करण्यास परवानगी दिली. या क्षेत्राची आज बिहार राज्य अशी ओळख आहे.
तथागत बुद्धांच्या महानिर्वाणानंतर पुढील दोन शतकात; विशेष करून सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध धम्माचा प्रसार भारतभर झाला. त्यानंतरच्या काळात बौद्ध धम्म मध्य, पूर्व व आग्नेय जम्बुमहाद्वीप (ईस्ट इंडिज) प्रमाणेच जगभर पसरला. आज चीनची ९० टक्के लोकसंख्या आणि जपानची ९६ टक्के लोकसंख्या बौद्ध धर्मीय आहे. आशिया खंडातील ४९ टक्के लोकसंख्या बौद्ध धर्मीय आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्या ख्रिस्त्यांची (२ अब्ज) असून त्याखालोखाल क्रमांक बौद्धांचा (१ अब्ज ८० कोटी) लागतो.
तथापि, बुद्धांच्या तत्त्वानुसार, जे मानवतावादी, विज्ञानवादी जीवन जगतात, त्यांची संख्या पकडल्यास बौद्ध धम्म जगात सर्वाधिक
(२ कोटी ३० लाख) लोकसंख्येचा होईल. उगमस्थानापासून (भारत) जगभर पसरलेला जगातील पहिला धर्म हा ‘बौद्ध धम्म’ आहे. तो आधुनिक विज्ञान आणि मानवी मूल्यांचं समर्थन करणारा धर्म आहे. तो ‘युद्ध नव्हे बुद्ध’ अशी छटेल यमकं जुळवण्यासाठी नाही; आचरणात आणण्यासाठी आहे. धर्म असो वा धम्म; ती संस्था आहे. संस्थेत अंतर्विरोध असतात. निर्माण होतात. हे छेद-भेद सर्व धर्मांत आहेत. हिंदू धर्मात पंथ-उपपंथ, संप्रदाय, आखाडे-फड असे नानाविध प्रकार आहेत. ख्रिश्चनांत कॅथलिक, रोमन कॅथलिक, प्रोटेस्टंट आणि मुस्लिमात शिया-सुन्नी असे मुख्य भेद आहेत. तसे बौद्धातही महायान, हिनयान असे संप्रदाय तयार झाले. तथापि, विभाजन हेच बौद्ध धम्माच्या भारतातील र्‍हासाला एकमेव कारण नाही. आद्य शंकराचार्यांच्या इशार्‍यानुसार, हिंदू सम्राट पुष्यमित्र व मिहिरगुल या राजाने बौद्ध भिख्खूंच्या कत्तली करून बौद्ध धम्म भारतातून संपवला, असं म्हटलं जातं. ते पटण्यासारखं नाही.
भिख्खूंच्या कत्तलीने फार तर भिख्खू संघ उद्ध्वस्त होईल; त्याने बौद्ध धर्मीय कसे संपतील ? तसे असेल तर ख्रिस्त प्रचारकांना ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून वा इस्लामी राज्यकर्त्यांना भट-ब्राह्मणांना संपवून हिंदू धर्म नष्ट करता आला असता. पुष्यमित्राच्या कत्तलींना प्रतिवाद म्हणून, विशेषकरून ब्राह्मणवाद्यांकडून इस्लामी आक्रमकांनी भारतातला बौद्ध धम्म संपवला, असा दावा केला जातो. त्यासाठी अफगाणिस्तानात गौतम बुद्धांची जगातील सर्वात उंच मूर्ती होती, ती इस्लामी धर्मांधांनी-तालिबान्यांनी जमीनदोस्त केल्याची (२००२ मध्ये) साक्ष काढली जाते. महाराष्ट्र शासनने प्रकाशित केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समग्र साहित्याच्या ग्रंथात (खंड-३; पृष्ठः२२९) डॉ.आंबेडकर बौद्ध धम्माबद्दल लिहितात, ‘पर्शियन भाषेतील बट या शब्दाचा अर्थ मूर्ती. परंतु, या शब्दाची व्युत्पत्ती बौद्ध साहित्यातून झालीय. मुस्लीम हे मूर्तिपूजेचे विरोधक. त्यामुळे मूर्तिभंजकता म्हणजे बुद्धिझमचा नाश, हे इस्लामचं मिशन बनलं. केवळ भारतातच नव्हे, तर जगात जिथे इस्लाम पोहोचला, तिथे त्याने बौद्ध धर्माचा नाश केला. मुस्लीम आक्रमकांनी मोठ्या संख्येत बौद्ध साधूंना ठार मारलं व बुद्ध विहार जमीनदोस्त केली.’ तथापि, बाबराने राम मंदिर पाडून अयोध्येत मशीद उभी केली, तसे बुद्ध विहारांबाबत इस्लाम धर्मांधांनी केल्याचं दिसत नाही.
उलट, विहारांच्या जागी देवळं निर्माण झाली, असं ‘प्रबोधन’कार केशव सिताराम ठाकरे ‘देवळांचा धर्म, धर्माची देवळे’ (१९२६) या पुस्तिकेत लिहितात. ते म्हणतात, ‘शंकराचार्यांनी (हिंदू नव्हे) ब्राह्मणी धर्माचा पुरस्कार करण्यासाठी बौद्ध धर्माचा नायनाट केला. त्यातल्या सुडाची नांगी इतकी भयंकर जहरी व खूनशी होती की, चालू घटकेपर्यंत बौद्ध धर्माचा दिवसाढवळ्या अपमान व उपहास करीत आहे. हिंदुजनांच्या मनात बौद्धद्वेषाचे पेरलेले भिक्षुकशाहीचे विष आज कसे थैमान घालीत असते, ते वाटेल त्या बौद्ध लेण्यात पाहून घ्यावे. वास्तविक, विहारात वा लेण्यात महात्मा बुद्धाचे अहिंसा परमोधर्मःचे बौद्ध भिक्षू तत्त्वचिंतन आणि भूतदया-क्षमा-शांती या सात्त्विक गुणांचा परिपोष व प्रसार करीत असत. पण शंकराचार्यांचा भिक्षुकी हात या विहारांवरून फिरताच त्याची खाडकन स्मशाने बनली. ते गरीब जनसेवक बौद्ध भिक्षू रसातळाला गेले. त्यांचा अहिंसावाद हवेत वितळला. ताबडतोब प्रत्येक लेण्यात एकेका उग्र देवाची अगर देवीची देवळे उगवली; आणि त्यांना कोंबड्या-बकर्‍यांच्या कंदुर्‍यांनी संतुष्ट करणार्‍या भक्तजनांच्या टोळ्या लाखांनी मोजण्याइतपत फुगल्या.’
प्रबोधनकारांनी नेमक्या शब्दांत भारतातल्या बौद्ध धर्माच्या र्‍हासाचा पट मांडलाय. हा बदल इसवी सन ७-८च्या शतकात झाला. तो हिंदू धर्म उद्धारक आद्य शंकराचार्यांनी घडवून आणला आणि देव-देवळांबरोबर भटशाही माजवली; अस्पृश्यता लादली, असंही ‘प्रबोधन’कार ठाकरे यांचं म्हणणं आहे. या अस्पृश्यता विरोधी संघर्षात डॉ.आंबेडकरांना पुन्हा ‘समता-विज्ञान-मानवतावादी’ बुद्ध सापडला आणि त्यांनी आपल्या हयातीत अस्पृश्य ठरवलेल्या ५
लाख मागास जातीबांधवांचं बौद्ध धम्मांतर घडवून आणलं. बौद्ध धर्मीयांची भारतातील संख्या गेल्या ६३ वर्षांत ७ कोटीच्या पुढे गेलीय. भारतीय लोकसंख्येत ती ६ टक्के आहे. त्यात निरंतर वाढ होतेय. म्हणूनच संघ-भाजपच्या प्रधानमंत्रींना, मुख्यमंत्रीना मतांसाठी बुद्ध हवाय. पण तो बूद्ध ‘मतीचा नको,’ हे सांगण्यासाठी भिडेगुरुजीसारखे निर्बुद्ध बुद्धविरोधी बांग ठोकतात. त्यासाठी छत्रपती संभाजीराजांच्या नावाचा वापर करतात.
भिडेगुरुजी संभाजीराजांना मृत्यूनंतर बदनामीच्या जाळ्यात अडकवून ठेवणार्‍या कुळातील आहेत. त्यांची नियत साफ असती, तर संभाजीराजांचं नाव घेऊन मराठा-बहुजन समाजातील तरुणांची माथी मुस्लीम-बौद्ध-दलित विरोधी करण्याचा नीचपणा केला नसता. संभाजीराजांच्या अंत्यविधी व समाधी संबंधाने गोपाळ महार (गायकवाड) यांचं नाव येतं. ती खरी सामाजिक समरसता आहे. पण त्याला छेद देणार्‍या ‘भीमा-कोरेगाव दंगली’त एक नंबरचा आरोपी म्हणून भिडेगुरुजीचं नाव पुढे येतं. शाळा-कॉलेजच्या परीक्षा-अभ्यासाच्या काळात शिव शंभूंच्या नावाने गडदौडी काढणार्‍या भिडेगुरुजीला; जेम्स लेनच्या पुस्तकातून जिजाऊ-शिवरायांची बदनामी झाली, तेव्हा भांडारकर संस्थेविरोधात ‘ब्र’ काढण्याएवढीही ब्रह्मबुद्धी झाली नाही. राम गणेश गडकरी यांच्या राजसंन्यास नाटकात संभाजीराजांचे चित्र शिवपुत्र, छत्रपती म्हणून अपात्र असल्याचं रंगवण्यात आलंय. त्या गडकरींचा पुतळा पुण्यात संभाजी पार्कच्या दारी का, असा प्रश्न भिडेगुरुजींना आयुष्याची ऐशीतैशी झाली तरी सुचला नाही. पण प्रधानमंत्र्याने बुद्ध म्हणताच गुरुजीला संभाजीराजे आठवतात, हा ब्रह्मघोटाळा आहे. तो मराठा-बहुजन आणि बौद्ध-दलित यांच्यात भेद पाडण्यासाठी आहे.
मराठा समाजाने उशिरा का होईना, डॉ.आंबेडकरांचा थोरपणा समजून घेतलाय. आता ते बुद्ध समजून घेत आहेत. बुद्ध हे बुद्धिप्रामाण्यवादी होते, म्हणून त्यांचं नाव आणि ज्ञानतत्त्व २,५०० वर्षं टिकून आहे. विषमतावादी ‘मनुस्मृती’चा पुरस्कार करणार्‍या; ‘आपल्या बागेतील आंबे खाणार्‍याला मुलगा होतो,’ अशा बाता मारणार्‍या भिडेगुरुजीचा निर्बुद्धपणा टाकाऊ आहे. पण इतिहासाला उजाळा देण्यासाठी उपयुक्त आहे. तथापि, संत तुकाराम महाराज यांचे म्हणणे लक्षात ठेवा-
तुका म्हणे ऐसी | बुद्धी ज्याची जड
त्याहुनी दगड | बरा असे-

(लेखक साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक आहेत)

Previous articleलग्न-स्त्री-पुरूष संबंध-ट्रस्टीशिप
Next articleदुर्गा सर्वत्र आहे…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here