दुर्गा सर्वत्र आहे…

– समीर गायकवाड

फोटोत दिसणारी झोपी गेलेली कोवळी मुलगी जास्मीन आहे, स्थळ आहे कालीघाट ऑफ रोड, कोलकाता.
आपल्याकडे जशा जगदंबा, भवानीमाता देवीभक्तीसाठी पूजनीय मानल्या जातात तसंच देशभरासाठी दुर्गा आणि काली ही रूपं प्रसिद्ध आहेत.
बारोमास ज्या प्रदेशात कालीपूजा चालते, जी तिथली आराध्य दैवता आहे त्या कालीच्या नावाने असणाऱ्या कालीघाटावर रेड लाईट एरिया आहे हे कोलकत्याचं दुर्दैवही आहे आणि षंढत्वदर्शक लक्षणही आहे..
बंगाल, झारखंड, ओरिसा, बिहार, आसाम आणि बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणावर बायकापोरी आणल्या जातात.

जस्मीनच्या आईचं नाव संगीता डे, ती बंगालमधली. बीरभूम मधल्या एका छोट्याशा गावातला तिचा जन्म. तिची आई ग्रामीण भागातील गणिका. आईला दारूचं व्यसन आणि पैशाचा हव्यास असल्यानं संगीता वयात येताच तिने पैसे घेऊन एका प्रौढाशी तिचं लग्न लावून दिलं.

संगीताचा नवरा आणि सासू तिला मारहाण करायचे. तिच्या दिराने तिचं शोषण केलं याला तिच्या नवऱ्याची फूस होती. संगीताला त्या नरक यातना सोसण्याशिवाय पर्याय नव्हता, तिने माघारी वळून जावं असं हक्काचं घरही तिला नव्हतं. अगदी कोवळ्या वयात तिला दोन मुली झाल्या, जस्मीन आणि जुमा ही त्यांची नावं.

संगीताचा मनसोक्त उपभोग घेऊन झाल्यावर हवा तितका छळ करून मनाची तृप्तता झाल्यावर तिच्या नवऱ्याने तिला विकायचं ठरवलं ! ते ही मुलींसह !

आशियातला सर्वात मोठा रेड लाईट एरिया असणाऱ्या कोलकत्यातल्या सोनागाचीत तिला विकलं तर कधीतरी आपलं बिंग फुटेल या भीतीनं त्यांनं तिला घेऊन दिल्ली गाठली. पण दोन चिमुरड्या मुलींसह संगीताला विकत घ्यायला कुणी तयार नव्हतं. अखेर तो तिला परत घेऊन आला आणि बेवारशासारखं रेल्वे स्टेशनवर सोडून गेला. आपल्या चिमुरड्या मुलींना घेऊन संगीतानं रेल्वे स्टेशन परिसरात दोन रात्री काढल्या.

प्लॅटफॉर्मवरती येणाऱ्या वेश्यांनी तिची अवस्था बरोबर ओळखली, तिला घेऊन त्या बाओबाजारमध्ये गेल्या. तिला लाईनमध्ये येण्याच्या चार गोष्टी शिकवल्या, समजावून सांगितल्या. समोर कुठलाच पर्याय नसल्यानं संगीतानं संमती दिली.

पहिल्या रात्री मिळालेल्या साठ रुपयातून तिने पोरींची भूक भागवली. नंतर धंदा तिच्या अंगवळणी पडला. त्याच परिसरात तिने भाड्याने एक खोली घेतली आणि सलग दशकभर धंदा केला.

तिच्याकडे गिऱ्हाईक आलं की ती थोरल्या जुमाला आपली धाकटी बहीण जस्मीन हिच्याकडे लक्ष देण्यासाठी बजावत असे. ‘फुल नाईट किंवा फुल डे’ चं गिऱ्हाईक आलं की तिच्या जीवाची अवस्था हरिणीसारखी होई, एकीकडे मुली रस्त्यावर आणि एकीकडे श्वापद तिच्या देहावर स्वार असे.

विष खाऊन मरण्यापेक्षा संगीताने मुली जगवायचं ठरवलं आणि या दलदलीत ती स्वतःला रुतवत गेली. माझ्या मते हा संघर्ष रक्तहीन नसला तरी प्रचंड थकवणारा आणि झुंजवणारा आहे ज्याला संगीताने तोंड दिलं.
रेड लाईट एरियावर अभ्यास करण्यासाठी फोटो जर्नलिस्ट डिना ब्रेनेट कोकलत्यात आली होती तिने रस्त्यावर झोपलेल्या जस्मीनला पाहिलं. ब्रेनेटचे सहकारी असलेले शाहनवाज सिद यांनी जस्मिनचा फोटो घेतला, (जो इथं पोस्टसोबत दिला आहे) डिना ब्रेनेटनं संगीताचा पाठपुरावा केला, तिच्या मदतीसाठी हातपाय मारले.

याच परिसरात उर्मिला बासू यांची ‘न्यू लाईट’ ही एनजीओ काम करते, उर्मी बासू या नावाने त्या अधिक परिचित आहेत. वेश्यांच्या मुलांचं पालन पोषण करणं हे यांचं ध्येय. त्यासाठी त्या अहोरात्र झटत असतात. सोमा हाऊसमध्ये त्यांचा व्याप चालतो, तिथं या मुली राहतात, त्यांच्या शिक्षणापासून ते जीवनावश्यक बाबींचा पुरवठा करण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टींचा खर्च न्यू लाईट कडून होतो.

संगीताची माहिती मिळताच जस्मीन आणि जुमाला त्यांनी सोमा हाऊसमध्ये दाखल करून घेतलं. मग कुठे संगीताला हायसं वाटलं. आता संगीता धंदा करत नाही पण तिने कुठंही नाव पत्ता बदलून राहिलं तरी लोक तिचा पूर्वेतिहास शोधून काढतात आणि तिच्या लुगड्याला हुंगत राहतात.

या मुलींचे पुनर्वसन होईल, यातल्या बायकांचे शोषण ही कमी होईल परंतु यांचा पूर्वेतिहास कळल्यावर यांना फुकटात वा पैसे टाकून उपभोगायच्या प्रवृत्तीत कधीच बदल होणार नाही. त्या साठी समाजाचा यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा आणि त्यात प्रगल्भता यायला हवी.

उर्मिला बासू यांच्या एका उपक्रमाचं नाव आहे ‘हाफ द स्काय’ ! या बायकांच्या आणि त्यांच्या मुलीबाळींच्या वाट्याला येणारं किमान अर्ध आकाश तरी आपण त्यांना बहाल करायला हवं असं त्यांना सुचवायचं आहे. समाज याला कधी तयार होईल माहिती नाही.

पण या पोस्टच्या निमित्ताने इतकं सांगता येईल की कुठे असहाय, दैन्यानं पिचून गेलेल्या, दुर्मुखलेल्या अवस्थेतली बाई, पोर दिसल्यावर त्यांना काही मदत करता येते का किंवा त्यांची मजबुरी काय आहे हे तरी जाणता येते का याची मानसिकता आपण ठेवायला हवी ! रस्त्यावर झोपलेल्या जस्मीनला पाहून डिना ब्रेनेटच्या काळजात कालवलं नसतं तर कदाचित भविष्यात जुमा आणि जस्मीन या देखील आपल्या आईप्रमाणेच धंद्याला लागल्या असत्या.

दुर्गा सर्वत्र आहे, तिला कुठं आणि कसं शोधायचं हे आपल्या हातात आहे. आणि दुर्दैवाने आपल्याला त्याचाच विसर पडला आहे.

संगीता आणि उर्मिला बासूंना वंदन ! मी त्यांच्यात दुर्गेला पाहतो !

(लेखक नामवंत स्तंभलेखक आहेत)

 

Previous articleमोदींचा बुद्ध , भिडेगुरुजी निर्बुद्ध
Next articleआत्महत्या केलेल्या आईच्या शोधात…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.