आपल्या संसदीय लोकशाहीत पक्षाविरुद्ध किंवा नेत्यांविरुद्ध बंडाळीचा इतिहास तसा फार जुना आहे. पक्षातील बुजुर्ग नेत्यांनी ‘गुंगी गुडिया’ म्हणून पंतप्रधानपदावर प्रतिष्ठापना केल्यावर लगेचच इंदिरा गांधींनी या नेत्यांविरुद्ध बंडाळी केली होती.काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करुन खुद्द पंतप्रधान गांधी यांनी आपला स्वतःचा उमेदवार वराहगिरी वेंकट गिरी यांना १९६९ साली राष्ट्रपतिपदी निवडून आणले होते. यापेक्षा यशस्वी बंडाळीचे दुसरे कुठले मोठे उदाहरण देता येईल?
त्यांना राज्याबाहेर ठेवण्याच्या हेतूने राजीव गांधींनी त्यांची राजस्थानला राज्यपालपदी नेमणूक केली तर तिथल्या राजभवनातून मुख्यमंत्री पवार यांना आणि राजीव गांधींना त्रास देण्याचे काम वसंतदादांनी चालूच ठेवले. मात्र त्यातूनही पुरते समाधान होईना तेव्हा राज्यपालपदाचा चक्क राजीनामा देऊन ते महाराष्ट्रात परतले होते. पुण्यात टिळक रोडवर बाजीराव रोडच्या एका टोकाशी असलेल्या लांबरुंद चौकात वसंतदादांचा पूर्णाकृती पुतळा आहे, राजीव गांधी यांनीच अनावरण केलेला. आजही तिथून जाताना हा घटनाक्रम माझ्या डोळ्यांसमोर उभा राहतो.
छगन भुजबळ हे शिवसेनेत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविरुद्ध बंडाळी करणारे पहिले मोठे नेते. या बंडानंतर शिवसैनिकांचा उद्रेक टाळण्यासाठी त्यांना अनेक दिवस भूमिगत राहावे लागले होते. नंतरच्या विधानसभा निवडणुकीत तरुण शिवसेना नेते बाळासाहेब नांदगावकर यांनी त्यांचा माझगावमध्ये पराभव केला होता, आणि भुजबळ यांना नाशिक जिल्ह्यात सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला होता. शिवसेनेविरुद्व गद्दारी करणाऱ्या भुजबळ यांना निवडणुकीत पराभूत करणारे नांदगावकर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राज ठाकरे यांच्याबरोबर आहेत.
भुजबळ यांच्या तुलनेत नारायण राणे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फार मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला नाही, कारण राणे आपल्या कोकण बालेकिल्ल्यात राजकीयदृष्ट्या सुरक्षित होते. त्यांच्याबरोबरच्या निम्हण वगैरे नऊ आमदार टप्प्याटप्प्याने राजीनामे देत नंतर काँग्रेसच्या तिकिटांवर निवडून आले. भारतीय जनता पक्षाने राणेंचा आणि काँग्रेसचा हाच फॉर्मुला आपल्या `ऑपरेशन लोटस’ साठी गोवा, कर्नाटक वगैरे राज्यांत वापरला आहे.
भारतीय जनता पक्षामध्ये पक्षांतर्गत किंवा सरकारविरोधी बोलण्याची हिम्मत एक सुब्रह्मण्यम स्वामी यांच्याशिवाय इतर कुणीही करु शकत नाही. अशी हिम्मत तेव्हाचे भाजपचे खासदार नाना पटोले यांनी दाखवली आणि पक्षाचा अन पदाचा राजीनामा देऊन ते काँग्रेसमध्ये आले. आपली बंडाची खुमखुमी कायम आहे हे पटोले अधूनमधून दाखवत असतात. भाजपने गेल्या काही वर्षांत एकामागून एक अशा अनेक राज्यांत आपले सरकार स्थापन करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र यापैकी एकही राज्यांत मुख्यमंत्र्यांविरुद्ध कधी कुरबुर ऐकू येत नाही. उलटपक्षी हा पक्षच आपणहून कसलीही पूर्वसूचना न देता या राज्यांतील मुख्यमंत्र्यांची उचलबांगडी करत असतो.