गोव्यात उत्साहाने साजरा केला जाणारा ‘सांन जॉव’ सण

-कामिल पारखे

पावसाचं आगमन झाल्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस गोव्यातील झरे-ओढे, विहिरी, तलाव आणि तळी पाण्यानं तुडुंब भरतात. सर्व परिसर हिरवाईनं नटतो. या काळात २४ जून रोजी गोव्यात ‘सांन जॉव’ हा सण अगदी उत्साहाने साजरा केला जातो. अनेक गावांत तरुण या दिवशी घुमट, गिटार आणि इतर वाद्यांच्या संगीतात धुंद होत ‘सांन जॉव’ अशी आरोळी ठोकत पाण्यात सूर मारून हा सण साजरा करतात.

‘सांन जॉव’ (São João) म्हणजे पोर्तुगीज आणि कोकणी भाषेत ‘सेंट जॉन’. St. John the Baptist… (संत जॉन बाप्तिस्ता) हा ‘बायबल’च्या ‘नव्या करारा’तील एक महत्त्वाची व्यक्ती आहे. येशू ख्रिस्ताचा हा जवळचा नातेवाईक. येशूपेक्षा वयानं केवळ सहा महिन्यांनी मोठा. मात्र ‘देवाचा पुत्र असलेल्या येशू ख्रिस्तासाठी वाट तयार करण्यासाठी आपण आलो आहोत, अरण्यात ओरडणारी वाणी मी आहे’ असं सेंट जॉन द बॅप्टिस्टने स्वतःबाबत म्हटलं आहे. त्याने येशूचा जॉर्डन नदीत पाण्यानं बाप्तिस्मा केल्यानंतरच ‘सुताराचा मुलगा’ असलेला येशू आपलं खरंखुरं जीवितकार्य सुरू करतो.

त्याशिवाय सेंट जॉन द बॅप्टिस्ट हा ‘बायबल’च्या ‘नव्या करारा’तील अगदी सुरुवातीचा एक हुतात्मा. नव्या करारातील अगदी पहिले हुतात्मे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या बेथलेहेम येथील जन्माच्यावेळीच त्या परीसरात जन्मलेली इतर अनेक बाळे. आकाशात अचानक अवतरलेल्या ताऱ्याचा माग काढत आलेल्या पूर्वेकडच्या त्या तीन ज्ञानी राजांनी हेरोद राजाला सांगितले कि नुकत्याच जन्मलेल्या एका राजाचे दर्शन घेण्यासाठी, त्याला वंदन करण्यासाठी ते आले आहेत.आपल्या सिंहासनाला आव्हान देणारा कुणीतरी जन्माला आहे असे वाटून हेरोद राजा मग त्या परीसरात जन्मलेल्या सर्व बाळांची हत्या करण्याचा आदेश देतो. सुदैवाने मारिया आणि जोसेफ यांनी आपल्या येशू बाळासह तेथून पलायन केल्याने ते बाळ वाचते. बायबलमधली हत्या झालेल्या निरपराध बाळांची ही कथा राजा कंसाच्या तुरुंगातील वसुदेव-देवकीच्या कृष्णाआधीच्या नऊ अपत्यांची आठवण करून देते.

(प्रसिद्ध गोवन चित्रकार अँजेलो डी फोन्सेका यांनी १९६७ साली भारतीय शैलीत आणि प्रतिमांसह काढलेले
संत जॉन बाप्तिस्ता याचे हे चित्र. )

 

नाताळाच्या २५ डिसेंबरच्या सणानंतर लगेचच म्हणजे २८ डिसेंबरला हत्या झालेल्या निष्पाप बाळांचा (The Holy Innocents) सण साजरा केला जातो. हेरोदच्या हत्याकांडातून येशू वाचतो, मात्र जॉन द बॅप्टिस्ट नाही. पुढे अनेक वर्षांनंतर आपल्या मुलीच्या नृत्यकौशल्यावर खूष झालेला राजा हेरोद तिला ‘बक्षीस म्हणून काय हवं?’ असं भरलेल्या दरबारात विचारतो. राजकन्या आपल्या आईच्या सुचनेनुसार तुरुंगात खितपत पडलेल्या जॉन द बॅप्टिस्टच्या शिराचा नजराणा आपल्याला ताबडतोब तबकात घालून मिळावा, अशी मागणी करते. अनिच्छेनेच राजा हेरोद ती मागणी पूर्ण करतो.

सेंट जॉन द बॅप्टिस्ट आणि येशू ख्रिस्त आपापल्या आईंच्या उदरांत असताना त्या दोघींची भेट झाली आणि त्या वेळी झालेल्या एका घटनेशी संबंधित या उत्सवाची जन्मकथा आहे. गॅब्रिएल देवदूताने मारियेला भेट देऊन तिच्या पोटी देवपुत्र येशू जन्माला येणार आहे, असं सांगितलं.
त्यापूर्वी सहा महिने आधी याच देवदूताने मारियेची नातलग असलेल्या एलिझाबेथला भेटून तिच्या पोटी सेंट जॉन जन्माला येईल, असं सांगितलेलं असतं. येशूचा जन्म अपौरुषेय म्हणजे पवित्र आत्म्याच्या संयोगानं झाला अशी श्रद्धा आहे. इस्लाम आणि ज्यू धर्मांप्रमाणेच ख्रिस्ती धर्मातही एकदेवतावाद (मोनोथिझम) असला तरी ख्रिस्ती धर्मात पिता, (येशू) पुत्र आणि पवित्र आत्मा असं एक त्रैक्य मानलं जातं.

‘बायबल’मध्ये मायकल, राफाएल आणि गॅब्रिएल हे तीन देवदूत वेगवेगळ्या प्रसंगांत प्रकट होतात. यापैकी गॅब्रिएल देवदूताचं मुख्य काम म्हणजे देवाचा निरोप मानवापर्यंत सोपवणं. मानवानं त्याबद्दल शंकाप्रदर्शन करायचं नसतं. गॅब्रिएल देवदूताने झेकरायहाला ‘तुझी पत्नी एलिझाबेथ गर्भवती राहील’ असा निरोप दिला, तेव्हा त्याने देवदूतालाच उलट प्रश्न केला, ‘असं कसं घडेल? कारण मी तर वृद्ध आहे आणि माझ्या बायकोचंही वय झालं आहे.’ याबद्दल झेकरायहाला कडक शिक्षा मिळाली.
गॅब्रिएलने त्याला म्हटलं- ‘माझे शब्द यथाकाळी खरे ठरतील. परंतु तोपर्यंत तुझी वाचा जाईल आणि तू मुकाहोशील. कारण तू माझ्या वचनावर विश्वास ठेवला नाहीस.’याउलट मारियेची वागणूक होती. गॅब्रिएल देवदूत मारियेला भेटला आणि म्हणाला- ‘तुझ्या पोटी पवित्र आत्म्याने संयोगाने देवपुत्र जन्मेल आणि त्याचे नाव येशू ठेव.’ असा निरोप देवदूताने सांगितला त्यावर मारियेने ‘जशी प्रभूची इच्छा’ म्हणून नम्रपणे मान तुकवली. म्हणून तर तिला ‘स्त्रीजातीमध्ये तू धन्य’ असा सन्मान मिळाला.
त्यानंतर मारिया तातडीनं आपल्या बहिणीला भेटायला निघते. त्या भेटतात, तो सेंट लुकच्या
शुभवर्तमानातील प्रसंग फादर फ्रान्सिस दिब्रिटो-संकलित ‘सुबोध बायबल’ या ग्रंथात पुढील शब्दांत लिहिला आहे –

“त्या वेळी मारिया घाईघाईने ज्युडेयाच्या पहाडी प्रदेशातील एका गावात गेली. तिने झेकरायहाच्या घरी जाऊन एलिझाबेथला अभिवादन केले. मारियेचे अभिवादन ऐकताच एलिझाबेथच्या उदरातील बालकाने उसळी मारली आणि एलिझाबेथ पवित्र आत्म्याने भरून पावली. ती मोठ्या स्वरात म्हणाली, ‘स्त्रियांमध्ये तू धन्य आणि धन्य… तुझ्या कुशीचे बालक! माझ्या प्रभूच्या मातेने माझ्या पायरीवर चढावे, हा माझा किती मोठा सन्मान आहे. पाहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने आनंदाने उसळी मारली” . बायबलमधील उदरातील बालकाने आनंदाने उसळी मारण्याच्या प्रसंगानिमित्त याच प्रसंगानिमित्त सेंट जॉन द बॅप्टिस्टच्या फेस्ताच्या म्हणजे जन्मदिनाच्या सणाच्या दिवशी खोलवर पाण्यात उडी मारुन गोव्यात हा `सांन जॉव' उत्सव साजरा केला जातो.

जूनअखेरीस गोव्यातील नदीओढे, तलाव, तळे आणि विहिरी पाण्याने तुडुंब भरलेल्या असतात. किरिस्तांव गोंयेंकारांनी आपल्या या निसर्गदत्त देणगीचा हा सण साजरा करण्यासाठी कल्पकतेनं वापर केला आहे. गोव्यातल्या तुडुंब भरलेल्या विहिरी आणि तळ्यांवरुन आठवले. १९७०च्या दशकात बार्देस तालुक्यातील शिवोली इथल्या बामणवाडो येथे मित्र लेस्टर फर्नांडिस यांच्या घरी महाविद्यालयीन सुट्टीमध्ये काही दिवस राहिलो होतो. त्याच्या आजीने मासळी आणायला सांगितले, तिचा मुलगा म्हणजे लेस्टरचा मामा बाहेर पडला. मीही त्याच्याबरोबर निघालो. त्या वेळी घरामागच्या टेकडीजवळच्या शेतांपाशी असलेल्या तलावात आम्ही दोघं एक सुती कापड धरून जवळजवळ एक तास थांबलो.वरून पाऊस कोसळत होता आणि तलाव भरून वाहत होता. त्या दिवशी फिश-करीसाठी आणि तळण्यासाठी पुरेसे मासे पकडल्यानंतरच आम्ही घरी परतलो. स्वतःच्या हातांनी पकडलेले मासे खाण्याचा आनंद काही औरच होता !

विहिरी हा गोव्यातल्या जुन्या घरांचा एक अविभाज्य भाग असतात. पणजीजवळच सान्त इनेझपाशी
असलेल्या ताळगावात १९८० च्या दशकात मी राहात होतो. त्या घराच्या शेजारी वापरात असलेली विहीर होती. माझ्या भाटकाराच्या (घरमालकाच्या) त्या विहिरीचे पाणी आम्ही सर्व जण पिण्यासाठी आणि इतर कामांसाठी वापरायचो. (भाटकार म्हणजे शेतमालक आणि मुंडकार म्हणजे शेती कसणारा, हे खास गोमंतकातले विरुद्धअर्थी शब्द!) या काळात ताळगावच्या या विहिरी जवळ जवळ काठोकाठ भरलेल्या असत.मला आठवते तेव्हा याकाळात ताळगावच्या या विहिरीत अगदी जमिनीच्या समांतर रेषेत पाणी असायचे !बादली किंवा कळशी बांधलेला पोहोरा विहिरीत दोनतीन फूट खाली सोडला तरी ती बादली वा कळशी पाण्यात लगेचच बुडायची.

गावांत सगळीकडे विहिरी, ओढे, तलाव पाण्याने तुडुंब भरलेले असताना आणि वरून पाऊस कोसळत असतानासाजऱ्या केल्या जाणाऱ्या या उत्सवाची मजा काही वेगळीच असते. उत्तर गोव्यात आणि विशेषतः बार्देस तालुक्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. उत्तर गोव्यातल्या साळगाव, शिवोली वगैरे गावांत या उत्सवादरम्यान तरुण मुलांना ‘सांन जॉव’ असे ओरडत पाण्यात सूर मारताना मी पाहिले आहे. विविध पानेफुले यापासून तयार केलेले कॉपेल (मुकुट) डोक्याला लावून पाण्यात डूब मारली जाते. पारंपरिक संगीताची साथ असतेच.समुद्रात डुंबणे आणि पोहोणे मला आवडत असले तरी विहिरीत मी कधीही उडी घेतलेली नाही. त्यामुळे या उत्सवात मी प्रेक्षक म्हणूनच सहभागी होत असतो.

आजपावेतो तरी ‘सांन जॉव’ हा लोकांचा फेस्त राहिला आहे.विशेष म्हणजे हा सण जगभरातील ख्रिस्तीविश्वात सगळीकडे चर्चमधील उपासनेत साजरा केला जात असला तरी केवळ गोव्यातच, कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि पोर्तुगीजांच्या राजकीय वसाहतीचा इतिहास असलेल्या गुजरातेजवळील दमण वगैरे परीसरात हा सण अशा प्रकारे साजरा होतो. या दिवशी गोव्यात सर्वच चर्चमध्ये प्रार्थना होत असल्या तरी या उत्सवात कॅथोलिक चर्चचा कुठल्याही प्रकारचा सक्रिय सहभाग नसतो. कार्निव्हल हासुद्धा ख्रिस्ती धर्मातील संकल्पनेशी आणि श्रद्धेशी संबंधित असलेला आणखी एक लोकप्रिय उत्सव आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यांत सुरू होणाऱ्या ‘ऍश वेन्सडे’ किंवा भस्म बुधवारापासून ख्रिस्ती धर्मातील चाळीस दिवसांचा ‘लेन्ट सिझन’ हा उपवासाचा काळ सुरू होतो. या भस्म बुधवाराच्या आधीच्या शनिवारी हा चार दिवसांचा कार्निव्हल फेस्टिव्हल गोव्यात, युरोपातील आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांत सुरू होतो. अशाच प्रकारे ‘सांन जॉव’ हा उत्सवही अलीकडे गोव्याबाहेर काही ठिकाणी साजरा होऊ लागला आहे. विहिरी-तलावांत डूब मारून नाही तर ‘रेन डान्स’च्या शैलीवर पाण्याच्या कारंजात गाऊन-नाचून तो साजरा केला जातो.

या उत्सवाचे कार्निव्हलसारखे सुदैवाने मोठ्या प्रमाणात बाजारीकरण झालेले नाही. गोव्यातील
लोकसंस्कृतीचा तो एक भाग राहिला आहे आणि तो तसाच राहावा ही अपेक्षा. गोव्याप्रमाणेच त्या काळी पोर्तुगिजांची वसाहत असलेल्या आणि गुजरातजवळील दमण येथे जन्म झालेले
चित्रकार आणि व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा हे मूळचे दक्षिण गोव्यातील लुथाली या गावचे. मारिओ मिरांडा यांनी गोव्याची संस्कृती दर्शवणारी अनेक चित्रे रेखाटलेली आहेत. ‘सांन जॉव’ या सणाची वैशिष्ट्यं दाखवणारं त्यांचं एक सुंदर चित्र प्रसिद्ध आहे.आपल्याकडे वर्षभराचं पंचाग असतं, तसं कॅथोलिक चर्चचं पूर्ण वर्षाचे (विविध संतांच्या सणांचं, आगमन,ख्रिस्तजन्मसोहळा आणि उपवासकाळ अशा विविध हंगामांचं) कॅलेंडर असते.जगभरातील ख्रिस्ती समाजाप्रमाणेच जॉन हे महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजातीलसुद्धा एक सर्वसामान्य नाम आहे, जसे फ्रान्सिस, मारिया, एलिझाबेथ, गॅब्रिएल, फातिमा, बेन्यामीन, पौलस. इत्यादी. येशू हे नाव मात्र कधीही कुणाला दिले जात नाही.
ख्रिस्ती धर्मात नामकरणविधी या बाप्तिस्मा स्नानसंस्काराच्यावेळी होत असतो, त्यामुळेच बॅप्टीझम या
विधीला ख्रिस्टनिंग समारंभ असेही म्हटले जाते. बाप्तिस्मा विधीचे पौराहित्य धर्मगुरु करत असल्यामुळेच बहुधा येशू हे अतिपवित्र समजले नाव इतर कुणालाही दिले जात नाही.

ख्रिस्ती धर्माच्या कॅलेंडरमध्ये वर्षभर दररोज कुणा न कुणा संतांचा सण असतो, जसे कि तीन डिसेंबर हा संत फ्रान्सिस झेव्हियरचा सण. या दिवशी कुणाचा जन्म झाला तर त्या अपत्याला फ्रान्सिस किंवा फ्रान्सिका ते नाव देण्याची पद्धत असायची. माझा जन्म १७ जुलैचा आणि हा संत कामिल्स याचा सण. म्हणून श्रीरामपूर पॅरिश (धर्मग्राम) चे जर्मन जेसुईट धर्मगुरु फादर आयवो मायर यांनी माझा बाप्तिस्मा करताना माझे नाव कामिल असे ठेवले. तर जॉन हे माझ्या वडिलांचेही नाव. जून महिन्याअखेरीस ते `माझा सण जवळ आला’ असे ते म्हणत असत. इंदिरा गांधींचा आणि माझा जन्म एकाच सालचा, असेही ते म्हणत असत. दादांच्या जन्मदिवसाचा किंवा शालेय शिक्षणाचा कागदोपत्री कुठलाही पुरावा नसल्याने त्यांचे हे म्हणणे आम्ही हसण्यावारी नेत असू.

पंधरा वर्षांपूर्वी दादांचे नव्वदाव्या वर्षी निधन झाले. त्यानंतर कुठलेसे कागदपत्र शोधत असताना औरंगाबाद जिल्ह्यातील घोगरगाव येथील ख्रिस्तराजा चर्चच्या शिक्क्यानिशी त्यांच्या बाप्तिस्म्याचा दाखला अचानक सापडला. फादर जॉन मेरी बेर्जे (Berger) या फ्रान्सिलियन (MSFS) संस्थेच्या फ्रेंच धर्मगुरुंनी १९१७ साली त्यांचा बाप्तिस्मा करुन त्यांना जॉन असे नाव दिले होते असे त्या जीर्ण कागदपत्रावर लिहिले होते ! आम्ही पारखे मंडळी वाहेगावची, मात्र त्याकाळात तेथे देऊळ आणि फादर नसल्याने तेरा किलोमीटर अंतरावर असलेले घोगरगाव हीच आमची पॅरिश होती.
प्रत्येक व्यक्तीच्या बाप्तिस्म्याची, लग्नाची आणि इतर सांक्रामेंतांची अगदी मृत्यसंस्कारांची त्या त्या
चर्चच्या रजिस्टरमध्ये नोंद होत असते. चर्चची या जुन्यापुराण्या नोंदवह्या त्यामुळेच इतिहासाची खाणच असतात. त्या जुन्या सापडलेल्या कागदामुळे आजकाल `सांन जॉव’ फेस्त साजरा करताना दादांचीही आठवण हमखास येतेच.चर्चच्या या कॅलेंडरमध्ये गॅब्रिएल देवदूताने मारियेला निरोप सांगितला, तो दिवस १४ मार्चला साजरा होतो,म्हणजे नाताळाआधी बरोबर नऊ महिने गरोदरपणाचा नऊ महिन्यांचा काळ ध्यानात ठेवून चर्चने या काही सणांची तारीख मुक्रर केली आहे. २४
जूननंतर बरोबर सहा महिन्यांनी म्हणजे २४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ख्रिस्तजन्माचा म्हणजे नाताळाचा आनंदमयी उत्सव सुरू होतो.

(लेखक नामवंत पत्रकार व ब्लॉगर आहेत)
९९२२४१९२७४

[email protected]

Previous articleशिंदेसाहेब, ही जाहिरात तयार करणाऱ्याला ‘महाराष्ट्र-भूषण’ द्या!
Next articleराजकीय बंडाळीचा रोचक इतिहास
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.