लग्न-स्त्री-पुरूष संबंध-ट्रस्टीशिप

-उत्पल व्ही. बी.

मी : व्हॉट द…
गांधीजी : कर…पूर्ण कर वाक्य.
मी : सॉरी. पण हे वाईटाय.
गांधीजी : काय वाईट आहे?
मी : हे जे सुरू आहे ते…
गांधीजी : कुठे? अच्छा, सिनेमा बघतोयस…
मी : हो.
गांधीजी : काय नाव?
मी : हम साथ साथ है. मला हा सिनेमा गेली अनेक वर्षं बघायचा होता. हृदयातली आस होती माझ्या.
गांधीजी : का बरं?
मी : कारण तो भयंकर आहे हे माहीत होतं, पण किती भयंकर आहे बघायचं होतं.
गांधीजी : भयंकर? हा तर काय हॉरर वगैरे वाटत नाही.
मी : करिश्मा कपूर आहे की…शिवाय सैफ अली खानला बघाच. क्या ये वही सैफ है जिसे हमने ओंकारा और सेक्रेड गेम्स में देखा?
गांधीजी : काय बोलतोयस बाबा?
मी : काही नाही. सोडून द्या.
गांधीजी : बरं. पण भयंकर काय ते तर सांग.
मी : अहो श्रीमंत, संस्कारी आणि विशेष कष्ट घेऊन मूर्खपणा कमावलेले लोक आहेत हे. तो हम आपके है कौन एक असाच भयंकर होता. तिथूनच सुरूवात झाली. लग्नाचं उदात्तीकरण, नात्यांचं उदात्तीकरण, उदात्तीकरणाचं उदात्तीकरण…अहो, लग्नाकरता जन्म घेतलाय का आपण? या अशा सिनेमांनी आणि सीरियल्सनी ना प्रेम, टुगेदर लिव्हिंग या गोष्टींची पद्धतशीर माती केलीय हो….मला कुणी पॉवर दिली ना तर मी तर लग्नावर कायद्याने बंदी आणीन.
गांधीजी : पाणी हवंय का तुला?
मी : द्या थोडं.
गांधीजी : बरं वाटलं का?
मी : हं.
गांधीजी : लग्नाला तुझा विरोध आहे हे मला माहितीय. पण तो जरा जास्तच कडवा नाहीये का?
मी : नाही. कडवा नाहीये. पण या सिस्टीममुळे राजश्री प्रॉडक्शन्सचं फावतं म्हणून जरा अपसेट झालो. मी एक प्रबंधच लिहिणार आहे आता. लग्नव्यवस्था आहे त्या स्वरूपात कशी डेंजरस आहे यावर.
गांधीजी : लिही लिही. पण मग तुझा पर्याय काय?
मी : पर्याय म्हणजे बंधनाशिवाय एकत्र राहणं. बंधनाशिवाय प्रेम करणं. एकत्र राहून मुक्त असणं. स्त्री-पुरूषांमधलं किंवा दोन किंवा अधिक माणसांमधलं आकर्षण, प्रेम, एकत्र जगण्याची इच्छा या गोष्टी मोकळ्या आणि स्वतंत्र नकोत? यात नैतिकतेची भानगड कशाला आणायची? शिवाय लग्न म्हणजे बऱ्याच स्त्रियांसाठी उपजीविकेचा मार्ग असतो असं तर रसेलने म्हणूनच ठेवलंय. ही एक व्यवस्था बदलली ना की त्याचे पडसाद अर्थकारणापासून किती ठिकाणी पडतील बघाच तुम्ही. डोकी ताळ्यावर येतील सगळ्यांची. आत्ता आहेत त्यापेक्षा अनेकपटीने शहाणी, जबाबदार आणि रॅशनल होतील माणसं. मुख्य म्हणजे स्त्रिया स्वतंत्र आणि स्ट्रॉंग होतील.
गांधीजी : हं. पण हे असं सहज सोपं नसावं. यावर नीट विचार केला पाहिजे.
मी : जरूर विचार करावा. विचारच तर करत नाहीत लोक.
गांधीजी : बरं बरं…आपण सांगू हां लोकांना विचार करायला.
मी : थट्टा करा तुम्ही. पण मी हे गंभीरपणे बोलतोय.
गांधीजी : हो…त्याची खात्री आहे मला. तू तीन ग्लास पाणी प्यायला आहेस इतक्यात.
मी : पण काय हो, तुम्हाला माझं म्हणणं पटत नसेल ना?
गांधीजी : माझी जी व्हिजिबिलिटी आहे त्यात मला हे दिसत नाही. पण तुझ्या म्हणण्यात तथ्य असेलही. विचार करावा लागेल.
मी : ग्रेट. तेवढं पुरेसं आहे मला.
गांधीजी : तू रोमँटिक स्वरूपाच्या प्रेमाला, स्त्री-पुरूषांमधील संबंधाना नैतिक मानतोस का?
मी : तुम्ही खासगी मालमत्तेला नैतिक मानता का?
गांधीजी : प्रश्नावर प्रश्न…?
मी : तो अशाकरता की खासगी मालमत्तेचा संबंध स्त्री-पुरूष संबंधांशी, विशेषतः लग्नाशी आहे.
गांधीजी : माझ्याकडील संपत्तीवर माझा अधिकार नाही, मी त्या संपत्तीचा विश्वस्त आहे आणि समाजातल्या असंख्यांची जी साधी जीवनशैली आहे ती स्वीकारून उरलेली संपत्ती मी समाजासाठी वापरली पाहिजे हे मी म्हटलंच आहे.
मी : ट्रस्टीशिप.
गांधीजी : बरोबर.
मी : या मार्गाने हाव कमी होईल असं तुमचं मत आहे. बरोबर?
गांधीजी : हो.
मी : मग हीच संकल्पना थोड्या वेगळ्या प्रकारे भावनिक संबंधांना लावता येईल का? भावनिक परावलंबित्व कमी करण्यासाठी? म्हणजे असं की नातं हवं, पण मालकी हक्क नको…
गांधीजी : अच्छा. इंटरेस्टिंग आर्ग्युमेंट…
मी : थँक्स.
गांधीजी : वकीलच झालास की…
मी : आप ही की दुआ है!
गांधीजी : मग पुढची तारीख ठरवू. काय?
मी : कशासाठी?
गांधीजी : प्रबंध घेऊन ये. सुनावणी करू.

9850677875

Previous articleपिसाटलेली पत्रकारिता !   
Next articleमोदींचा बुद्ध , भिडेगुरुजी निर्बुद्ध
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here