लावणीला पुन्हा बदनाम करू नका!

 -डॉ. मुकुंद कुळे

…………………………………

आजवर गावकुसाबाहेर ठेवल्या गेलेल्या लावणीला आता कुठे बरे दिवस येत होते. आता कुठे विविध विद्यापीठांतील लोकककला विभागांत लावणीचं शिक्षण-प्रशिक्षण द्यायला सुरुवात झाली होती. आता कुठे लावणी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची लोककला म्हणून देश नि जगभरात नावारूपाला येत होती. अन्यथा आतापर्यंत तिला ग्राम्य, अश्लील ठरवून तशी बाजूलाच सारण्यात आली होती. केवळ लावणीलाच नाही, लावणी-तमाशा सादर करणाऱ्या कलावंत समाजालादेखील. वस्तुतः लावणी अश्लील वा शृंगारिक होती खरी; पण ती आशयाच्या पातळीवर, सादरीकरणाच्या पातळीवर नाही. तसंच कितीही शृंगारिक असली तरी सादरीकरणाच्या पातळीवर लावणी कायमच सभ्य होती. ती सूचक होती, पण उच्छृंखल नव्हती. किंबहुना ती बहुतांशी कलात्मक होती. पण केवळ लावणीतील शृंगारिक आशयामुळे तत्कालीन पांढरपेशा समाजाने लावणीला थेट अश्लील-असभ्य-असंस्कृत ठरवलं… परिणामी लावणी आणि लावणी सादर करणाऱ्या महिला कलावंत बदनाम झाल्या. इतक्या की कलावंत म्हणून देखील त्यांची दखल कुणी मनापासून घेतली नाही. आता कुठे हे सांस्कृतिक मळभ निवळत होतं आणि आता एवढ्या वर्षांनी पुन्हा एकदा लावणी नि लावणी कलावंतांवर तेच बालंट आलंय. लावणी पुन्हा एकदा बदनाम होण्याच्या मार्गावर आहे!

वस्तुतः यात पारंपरिक लावणी आणि लावणी कलावंतांचा काहीच दोष नाही. दोष असलाच तर तो बदलत्या सामाजिक मानसिकतेचा आणि नैतिक साधनशुचितेचा आहे. कारण महाराष्ट्राची प्रमुख लोककला असलेली लावणी आता केवळ पारंपरिक लोककलावंतांच्या हातात राहिलेली नाही. रसिकांना घायाळ करण्याची पुरेपूर ताकद राखून असलेल्या या लावणीची महत्ता आता विविध माध्यमं आणि इतर समाजातील महिलाकलावंतांनाही उमगली आहे. सिनेमांतून होणाऱ्या लावणीच्या प्रोजेक्शनमुळे तर, लावणी सादरीकरण हे या इतर समाजातील महिलाकलावंतांसाठी जणू प्रसिद्धीचं तंत्रच ठरलं आहे. परिणामी वेगवेगळ्या शहरांत होणारे राजकीय नेत्यांचे वाढदिवसाचे कार्यक्रम असोत किंवा दही-हंडी उत्सवात लोकांच्या मनोरंजनासाठी होणारे कार्यक्रम असोत, तिथे पारंपरिक लोककलावंतांऐवजी सिनेमा वा सोशल मीडियावर लोकप्रिय ठरलेल्या महिला नृत्यांगनांना लावणी सादर करण्यासाठी बोलावलं जातं… आणि तिथे या नृत्यांगना लावणीच्या नावाखाली जो काही हैदोस घालतात तो सामाजिक सभ्यतेच्या चौकटीत न बसणाराच असतो. परंतु गोम अशी असते की या नृत्यांगना लावणीच्या नावाखाली जो काही छचोरपणा करीत असतात, तो तिथे उपस्थित असलेला महिला-पुरुष असा समस्त रसिक वर्ग मिटक्या मारत पाहत असतो. मुख्य म्हणजे हा रसिकवर्ग चेकाळला की या नृत्यांगनांना अधिक जोम चढतो आणि मग उत्साहाच्या भरात त्या अगदी नको ते करून बसतात. काही दिवसांपूर्वी असंच घडलं.

रंगमंच कुठल्याशा दहीहंडीचाच होता. तिथे नाचण्यासाठी समाजमाध्यमावर सतत आपल्या लावणीनृत्याचे रील टाकणाऱ्या कुठल्या तरी नृत्यांगनेला बोलावलं होतं. तिने नाचायला सुरुवात करताच तिच्या दिलखेचक अदांनी उपस्थित रसिक प्रेक्षक खुळावला. त्यानंतर ‘राती अर्ध्या राती असं सोडून जायाचं न्हाय, मोडूनी संग हा रंग हा जायाचं न्हाय न्हाय न्हाय…’ या गाण्यावर नृत्य करताना प्रेक्षकांना अधिक नादाला लावण्यासाठी तिने जे काही हावभाव केले ते निव्वळ अश्लील होते. पण त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या कुणाचाही मर्यादाभंग झाला नाही, उलट सगळ्यांनी अधिक उत्कटपणे तिला दाद दिली… जणू काही त्यांच्यासाठी ते सगळं ‘ओके’ होतं. मात्र याच नृत्याची झलक नुकतीच समाजमाध्यमावर प्रसिद्ध झाली आणि मग लावणीवर खरोखर प्रेम करणारे रसिक आणि लावणी हा ज्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे अशा सुरेखा पुणेकर, माया खुटेगावकर यांच्यासारख्या कित्येक लावणीनृत्यांगना या प्रकाराने संतापल्या. त्यांचं हे संतापणं साहजिकच होतं. कारण लावणीवर झालेल्या अश्लीलतेच्या आरोपामुळे त्यांच्या आधीच्या पिढ्यांना कोणत्या प्रकारच्या सामाजिक-सांस्कृतिक मानहानीला सामोरं जावं लागलं, ते त्यांना ठाऊक आहे. क्वचित कधी त्यांनीही ते अनुभवलं आहे. एवढंच नव्हे तर, लावणी किंवा तमाशा कलावंतांना सामाजिक प्रतिष्ठा नसल्यामुळे इतर समाज त्यांच्याकडे कोणत्या नजरेने पाहतो, याचीही चांगलीच जाण या पारंपरिक कलावंत महिलांना आहे. त्यामुळेच जेव्हा त्या मुलीच्या अश्लील हावभावांचं प्रकरण घडलं तेव्हा या पारंपरिक कलावंत महिला पुढे आल्या आणि त्यांनी त्या मुलीला आणि आयोजकांनाही फैलावर घेतलं.

खरं तर कुठलीच कला ही मूलतः अश्लील किंवा असभ्य नसते. कालौघात तिला वेडवाकडं वळण मिळू शकतं आणि तसं वळण मिळायला अनेकदा समाजाची मानसिकताच कारणीभूत असते. अनेकदा कोणत्या स्तरातील समाज हा त्या कलेचा रसिक आहे त्यावरही कलांचं स्खलनशील होणं अथवा न होणं अवलंबून असतं. पूर्वी धर्म-वर्ण-वंश आणि सांस्कृतिक वर्चस्ववादामुळे सरसकट निम्नवर्गातील कला, कलावंत आणि त्यांचा आस्वाद घेणाऱ्या समाजांना स्खलनशील ठरवण्यात आलं होतं. परंतु आताच्या जमान्यात सिनेमा किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कलाकृती, त्यांत काम करणारे कलाकार आणि त्यांचा आस्वाद घेणारा समाज पाहिला की काळाचा लंबक उलटा फिरलेला दिसतो. अर्थात लावणीकला मात्र कधीच अश्लील नव्हती. ज्या दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीत लावणी बहराला आली त्याचे आश्रयदाते असलेले बहुतांशी शाहीर हे सुशिक्षित समाजातील होते आणि त्यांनी आपल्या आश्रयदात्याला खूश करण्यासाठीच शृंगारिक लावण्या रचल्या. केवळ शृंगारिक नाही, तर भक्तिरसपूर्ण लावण्याही लिहिल्या. परंतु त्यांतील समाजमनात पाझरल्या त्या शृंगारिक लावण्याच. परिणामी त्याच लावण्या नंतरच्या काळात विशिष्ट भटक्या कलावंत समूहांतील महिलांनी आत्मसात केल्या आणि रसिकांसमोर सादर केल्या. मात्र त्यावेळीही लावण्यांतील शब्द शृंगारिक असले तरी त्यावरील आपलं नृत्य, आपल्या अदा आणि आपला अभिनय याची मर्यादा या महिलांनी कायम पाळली. अंगभर नऊवारी लुगडं नेसून झाकून घेतलेली पाठ नि पोट, यात त्यांची संस्कृती नि सभ्यता सामावलेली होती. म्हणूनच तमाशा फडात नाची म्हणून उभी राहिलेली पहिली महिला कलावंत पवळा हिरवगावकर असो नाहीतर त्यानंतरच्या गोदावरीबाई पुणेकर, राधाबाई बुधगावकर, विठाबाई नारायणगावकर, बकुळाबाई इस्लामपूरकर, हिराबाई अवसरीकर किंवा यमुनाबाई वाईकर, गुलाबबाई संगमनेरकर असोत… कुणाचेही फोटो पाहा, एखाद्या खानदानी महिलेप्रमाणे त्यांनी आपला आब राखलेला दिसतो. त्यांच्या सादरीकरणाच्या कथा तर चकित करणाऱ्या आहेत. शृंगारिक आशय सरळसोट बीभत्सपणे सादर करण्याऐवजी त्या अतिशय सूचकपणे सादर करायच्या. लावण्याही कशा तर-

‘चवथ्या दिवसाची आज मी न्हाले

का रुसलासी असा, राजसा का रुसलासी असा

शून्य हा मंचक बघ राजसा…’

किंवा

‘अहो भाऊजी मी कोरा माल, मुखी विडा लाल

नरम गोरे गाल, वर तीळ झळझळी

जशी फुलली चाफ्याची कळी गं… बाई गं’

तरीही पारंपरिक लावणी नृत्यांगनेचा ना कधी पदर ढळला, ना कधी अनावश्यक केसांचा बुचडा सुटला. त्यांच्या अदा आणि भावकामातला प्रतीकात्मक सूचकपणाच एवढा भावविभोर असायचा की समोरचा रसिक गारद व्हायचा.

मग आताच लावणी सादर करणाऱ्या नृत्यांगनांना छचोरपणा का करावासा वाटतो? त्यामुळे आमची पारंपरिक लावणी मात्र नाहक बदनाम होतेय…!

(साभार : दैनिक पुण्यनगरी)

(लेखक हे लोककला व लोकपरंपरेचे अभ्यासक आहेत)

9769982424

मुकुंद कुळे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात मुकुंद कुळे– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleएक विश्व श्रीमंत, करोडो बेरोजगार !
Next articleअफवा पसरवणारे नवं गुलाम
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here