बालाजी सुतार
आपल्याकडे माणसं शाळा कॉलेजात जाऊन शिकतात म्हणजे काय? तर अक्षरओळख होऊन ती केवळ साक्षर होतात. वाचन साक्षरता हा प्रकार आपल्याकडे व्यापक अवकाशात अस्तित्वात नाही. कितीही शिकलो तरी आपल्याला नीट वाचता येत नाही. म्हणजे आपण अस्खलितपणे कथा वाचू शकतो, कविता आणि कादंबरीही. पण डोळ्यांसमोरून सरकणाऱ्या दृश्य ढोबळ शब्दांच्या पलीकडे आपल्याला त्याचे अन्वयार्थ लावता येत नाहीत. उदाहरणार्थ ‘स्तन’ असा शब्द आला की आपल्याला वाटतं तो लैंगिक अवयवाचा, लैंगिक भावनेने केलेला उल्लेख आहे. केवळ एवढ्या एका शब्दाच्या उल्लेखाने कुणाच्या लैंगिक भावना चाळवल्या जातील आणि समस्त स्त्रीजातीचा (किंवा आपल्या जातीच्या स्त्रीचा) अवमान होईल, असं वाटून लोक पेटून उठतात. ‘स्तन’ शब्द वाचल्यावर ‘म्हणजे ज्यातून अर्भकांना जीवन देणारं स्तन्य पाझरतं तो अवयव’ असं फारच क्वचित कुणाच्या मनात येत असेल. असा अवयव, जो नसता, तर मानवी मुलं जन्मल्यावर अवघ्या तासा-दोन तासांत उपासपोटी मरून गेली असती, तो जीवनदायी अवयव. पण हे नाही कुणाच्या लक्षात येत. किंवा योनी किंवा लिंग. दोन-पाच मिनिटांच्या संभोगासाठी वापरले जाणारे हे अवयव माणसाचं आरोग्य निकोप राहावं यासाठी आणखीही काही अत्यावश्यक सेवा देत असतात, उदाहरणार्थ ‘योनी किंवा लिंगाच्या साह्याने मूत्रविसर्जन’ ही क्रिया ‘त्यांच्याच माध्यमातून केल्या जाणाऱ्या संभोगापेक्षा’ आपण कितीतरी अधिक वेळा करतो. ही क्रिया झाली नाही, तर माणूस पोट फुगून विषबाधेने मरून जाईल. या अवयवांचे हे ठळक महत्वाचे उपयोग आपल्याला माहित नसतात का? माहित असतात. तरीही यांच्या केवळ उल्लेखाने आपल्यात लैंगिक उत्तेजन होते, किंवा लैंगिकतेविषयी आपल्या मनात असलेल्या गंडांतून उद्भवलेल्या आपल्या खाजगीपणाचा अवमान होतो, असं का वाटतं मग आपल्याला?
‘वाचन निरक्षरता’ हे यामागचं कारण. भाषिक अन्वयार्थ लावण्याच्या क्षमतेचा अभाव. आपल्याकडे शाळा महाविद्यालयांतून ‘मराठी’ हा विषय असतो. ज्याला ‘साहित्य’ म्हटलं जातं, त्यातून केलं गेलेलं लेखन अर्थांच्या अनेक शक्यतांना जन्म घालत असतं, ते बहुपेडी, बहुस्तरीय असतं, त्याचं नेमकं अर्थानिर्णयन करायला आपण शिकवायला हवं असं प्राध्यापकांना वाटत नसेल, आणि विद्यार्थ्यांनाही यासंदर्भात काही गंधवार्ता नसेल तर कसं होणार?
बीएच्या दुसऱ्या वर्षाला असताना आम्हाला ना. धो. महानोरांची ‘गांधारी’ ही कादंबरी अभ्यासाला होती. तिच्यात ‘जयवंता’ नावाची एक तरुण विधवा किंवा परित्यक्ता स्त्री उसाच्या शेतात जाऊन हस्तमैथुन करत असते, असा प्रसंग आहे. दुर्दैवाने तो पेपर एका प्राध्यापिकेकडे होता. तो भाग शिकवताना त्या मॅडम खूप संकोचून काहीतरी अस्पष्ट स्वरात वाचून घाईगडबडीने पुढे जायच्या, त्या कधीही त्या भागाबद्दल काही विवेचन करण्याच्या फंदात पडत नसत. मुली खाली मान घालून बसलेल्या असत, त्यांना काय वाटत असेल ते त्यावेळी कळलं नव्हतं पण आम्हा मुलांच्या मनात विशेषत: लैंगिक उत्तेजनच होई, हे नाकबूल करण्यात अर्थ नाही. मी ती कादंबरी आता वाचतो तेव्हा त्या प्रसंगाशी आल्यावर त्या जयवंताविषयीच्या करुणेने मनात भरून येतं. एका सहजसाध्या निसर्गभावनेचं शमन करताना तिला काय काय भोगावं लागलं असेल, या विचाराने अस्वस्थ व्हायला होतं. लेखनातल्या अशा किंवा याहून अत्यंतच निरुपद्रवी उल्लेखानेही आज समाजमनात उफाळून येणारे न्याय लावायचे तर ती कादंबरी शिकणारे आम्ही सगळे एकतर लैंगिक विकृत व्हायला हवे होतो किंवा शरमेने मरून जायला हवे होतो. पण असं काहीही झालं नाही. आमच्या वर्गातली सगळी मुलंमुली धडधाकट नॉर्मलपणे आपल्याला हवं तेवढं शिक्षण घेत राहिली. कुणीही महानोरांविरुद्ध किंवा अभ्यासमंडळाच्या विरुद्ध मोर्चे काढले नाहीत किंवा महानोरांना फोन करून शिवीगाळ केली नाही. काय कारण असेल या थंड बसण्याचं? आता लक्षात येतंय की त्या जयवंताची जात महानोरांनी लिहिली नव्हती. ती सूचक होती पण स्पष्टपणे लिहिलेली नव्हती, त्या सूचकतेवरून अंदाज बांधून महानोरांवर धावून जावे इतकी जातीय अक्कल, किंवा उत्सुकता म्हणूनही तिच्या जातीचा अंदाज बांधावा इतकी वाचन-साक्षरता आमच्यात नव्हती.
जाती कितपत महत्वाच्या असतात लेखनात? उदाहरणार्थ कुसुमाग्रजांनी ‘प्रेम कुब्जेच्या कुबडावर किंवा राधेच्या वत्सल स्तनावर करावं’ असं लिहिलं तेव्हा का लोक भडकून उठले नसतील? त्या कुब्जेची किंवा राधेची आणि आपली जात एक नाही म्हणून? किंवा कुणी कवी ‘जोशाच्या बाईच्या मांड्या’ असं कवितेत लिहितो तेव्हा बाकीचे कुणी सोडा, खुद्द जोशीही भडकून उठल्याचं का दिसलं नसेल? ‘जोशी’ लोकांच्या जातीत रस्त्यावर येऊन झगडण्याइतकी मनगटी ताकद नाही म्हणून? ज्यांच्यात ही ताकद आहे, ते जोशीच्या जातीचे नाहीत म्हणून? काय असतं नेमकं हे? आणि कितपत चांगलं असतं?
परवा सुदाम राठोड यांनी मनवरांच्या कवितेचं समर्थन केल्यावर त्यांचा इनबॉक्स मनवर-विरोधकांच्या शिव्यांनी ओसंडून वाहू लागला. तुमच्या जातीतल्या स्त्रियांवर अशी कविता लिहून बघा म्हणजे कळेल, असं अनेकांचं म्हणणं होतं. त्यानंतर सुदामने त्या कवितेत ‘आदिवासी’ ऐवजी ‘बंजारा’ असा बदल करून ती कविता लिहिल्यावर त्याने बंजारांच्या भावना दुखावल्या. हेच काल वीरा राठोड यांनी केलं तेव्हा बंजारा लोक वीराच्या पोस्टवर धावून आले आहेत आणि त्यांना शिवीगाळ करत आहेत, असं चित्र दिसलं. लोकांना स्वत:च्या जातींपलीकडे काहीही दिसतच नाही की काय, अशी शंका यावी इतक्या भयावह पद्धतीने हे चालू आहे. दोन वर्षांपूर्वी वीरा राठोडला एका पुरस्काराच्या निमित्ताने अंबाजोगाईला आमंत्रित केलं गेलं होतं. तिथे मी पाहिलं, की त्या मुख्य कार्यक्रमाच्या आधी आम्ही रेस्टहाऊसवर थांबलेलो असताना तिथे काही बंजारा तरुण आले आणि त्यांनी वीराचा पुष्पगुच्छ वगैरे देऊन साग्रसंगीत सत्कार केला. आपल्या जातीतल्या एका कवीचा सत्कार करताना त्यांना आनंद झालेला होता. ‘त्या सगळ्यांनी वीराची कविता वाचलेली होती काय?’ या प्रश्नाचं उत्तर बहुधा नकारात्मकच येईल. कारण कविता वाचणारा निखळ समाज आपल्याकडे अजून अस्तित्वात यायचा आहे. कविता लिहिणारेच एकमेकांच्या कविता क्वचित वाचतात. मग या तरुणांना वीराचा सत्कार करावा असं का वाटलं असेल? उत्तर वाईट आहे. जातीय आहे. आपल्या जातीचा म्हणून परवा वीराचा सत्कार करणारे आणि त्याने आपल्या जातीच्या स्त्रीच्या स्तनाचा उल्लेख केला म्हणून आज त्याच्यावर हल्ला करणारे याच गोष्टीचे निदर्शक आहेत की आपल्या एकूण समाजात केवळ जातीयतेला स्थान आहे आणि वैयक्तितेचा संपूर्ण अभाव.
‘कविता वाईट आहे, फसली आहे आणि त्यामागची साहित्यविषयक कारणे ही-ही आहेत’ असं सांगायला अभ्यास करावा लागतो. कवी हलकट आहे, जातीय आहे, व्यभिचारी आहे, त्याच्या मनात पाप आहे असं म्हणायला काहीच लागत नाही. जीभ उचलायची आणि टाळ्याला लावायची, इतकं हे सोपं आहे. लोक हे मनापासून करत राहतात.
यात शिक्षकांची-प्राध्यापकांची जबाबदारी मोठी आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना भाषा कशी वाचायची, साहित्य कसं समजून घ्यायचं हे शिकवणं अपेक्षित असतं. या चालू प्रकरणात मनवरांच्या कवितेचं समर्थन करणा-यांना शिवीगाळ करणा-यांत शिक्षक-प्राध्यापकांची संख्या बरीच मोठी आहे. अशा अनेकांच्या प्रोफाईलवर स्वत:चा व्यवसाय ‘शिक्षक’ किंवा ‘प्राध्यापक’ असा नमूद केलेला मी पाहिला आहे. स्वत:ला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचा दावा करणारा एक भाषेचाच प्राध्यापक कवितेचं समर्थन करणा-यांना भयंकर अश्लील शिवीगाळ करताना दिसत आहे. श्रीकांत देशमुख, पी. विठ्ठल, वीरा राठोड यांच्या पोस्टवर या प्राध्यापकाची मुक्ताफळे वाचायला मिळतील. स्वत:ला अकादमी मिळालेला हा प्राध्यापक, त्याला कविता आवडली नसेल, त्यातला एखादा उल्लेख खटकला असेल तर त्यासंदर्भात साहित्यिक अंगाने मांडणी करू शकत नाही? भसाभस शिव्या देणे एवढाच एक उपाय त्याच्या हातात उरलेला असतो? ‘कशाला असल्या बधिर बिनडोक समाजासाठी कविता लिहाव्यात कवींनी?’ अशी उद्वेगातून आलेली एक कॉमेंट मी सुदामच्या पोस्टवर लिहिली होती. तिथे ‘समाज’ म्हणजे ‘अमुक जात किंवा वर्ग’ असं काहीही मला अपेक्षित नव्हतं. ‘एकूणच कविता न समजणारा समाज’ मला अभिप्रेत होता. असा वाचननिरक्षर समाज, जो वसंत गुर्जरांच्या ‘गांधी मला भेटला’वरही अन्याय करतो आणि विजय तेंडूलकरांच्या ‘घाशीराम कोतवाल’वरही. त्यानंतर, ‘तो बधिर बिनडोक समाज म्हणजे आम्हीच’ असं समजून काही पोस्ट्सवर मला गलिच्छ अश्लील शिवीगाळ केली गेली. मी ती वाचली आणि शांत बसून राहिलो. तिथे ज्या शिव्या दिल्या होत्या त्यापेक्षा अधिक टोकदार, अधिक जखमी करणा-या शिव्या मीही देऊ शकलो असतो, पण मी दिल्या नाहीत. कारण या प्रकरणात मला मूळ कवितेच्या आणि कवी-लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्याहून वेगळ्या अशा भांडणात रस नव्हता. केवळ शिव्याच देऊ शकणा-या, आपल्या निकटच्या स्त्रियांच्या लैंगिक रक्षणासंदर्भाने पेटून उठताना इतरांच्या निकटच्या स्त्रियांच्या अवयवांचे बीभत्स उल्लेख करून शिव्या देण्यातली विसंगतीही ज्यांच्या लक्षात येत नाही, ज्यांची भाषिक वाढ शिव्यांशीच येऊन खुंटलेली दिसते, त्यांची आपण कितपत दखल घ्यावी, हाही त्यातला एक मुद्दा.
एकुणात कुठल्या दिशेने प्रवास चालू आहे हा? आणि यातून निदान लेखकांना तरी वगळता येतं का?
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका ज्येष्ठ मान्यवर संपादकांनी विषय निघाला म्हणून खाजगीत एक किस्सा सांगितला. एक मराठी साहित्यिक (यालाही साहित्य अकादमी मिळालेला आहे.) त्यांच्याकडे बोलताना म्हणाला, ‘माझी आयुष्यात एकच महत्वाकांक्षा आहे, मला अमुक उच्च जातीची बाई एकदातरी भोगायची आहे.’. हे ऐकल्यावर संपादक चिडले आणि त्यांनी तो साहित्यिक अक्षरश: हाकलून काढला.
मधु मंगेश कर्णिकांच्या एका कादंबरीतही या प्रकारचा एक लेखक आलेला आहे. कवी-लेखक स्वत:ही लैंगिक गंडांपासून मुक्त नसतात असा याचा अर्थ होतो. या पार्श्वभूमीवर मनवरांच्या संदर्भित कवितेचा विचार केल्यावर काय दिसतं? काहीही दिसत नाही. या कवितेतला तो उल्लेख कसल्याही लैंगिकतेपासून मुक्तच आहे. स्वच्छ निरामय आहे. अजूनही आदिवासी हेच सर्वाधिक प्रदूषणमुक्त उरलेले आहेत, जीवनदायी पाण्याशी तुलना येऊ शकतील इतके नितळ, असं काही ती विवक्षित ओळ लिहिताना मनवरांच्या मनात असू शकेल. आदिवासी हा निसर्गपूजक वर्ग असतो, त्याही अर्थाने इतर समाज-वर्गांच्या तुलनेत तो अधिक नितळ जाणवतो, असं काही त्यांच्या मनात असू शकेल. अर्थात हा उल्लेख केला नसता तरी त्या कवितेत काही उणेपण आलं नसतं असं मला वाटतं, पण एखादी कविता लिहिताना मनात असलेल्या भावांना शब्दरूप देताना काय प्रकारची शब्दयोजना करावी, हा संपूर्णपणे कवीचा अधिकार असतो, हेही मला माहीत आहे. त्यामुळे त्यांनी तो वापरायला नकोच होता, असं मी म्हणणार नाही.
बेकायदा स्वरूपाचं काही कवी-लेखकांच्या अभिव्यक्तीतून येत नाही, निदान तोपर्यंत तरी समाजाने त्यांची पाठराखणच करायला हवी. जाती-धर्मविषयक, लैंगिकतेविषयक, रूढी-परंपरांविषयक अनेकानेक गंडांनी ग्रस्त असलेल्या आपल्या समाजात ही अपेक्षा पुरी होणारी नाही, पण तरीही ती गैर नक्कीच नाही.
पाणी स्तनांच्या रंगांचं, स्तनांच्या गुणधर्मांचं आणि स्तनांइतकं जीवनदायी, पवित्र आणि शुद्ध-नितळ असू शकतं.
असतंच.
(बालाजी सुतार हे नामवंत कवी व सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या ‘गावकथा’ या नाटकाचे लेखक आहेत)
9325047883