वादळाचा संसार

-अविनाश दुधे

बच्चू कडू हे एक वादळ आहे. हे वादळ जेव्हा घोघावतं तेव्हा भल्याभल्यांची तारांबळ उडते. हजारो लोकांना आपल्याकडे खेचून घेण्याची चुंबकीय ताकद तर या वादळात आहेच; सोबतच त्यांना रस्त्यावर उतरविण्याची किमयाही ते सहज करतं. सामान्य माणसांच्या वेदनांनी कळवळणारं मन या वादळाला इतरांपेक्षा वेगळं करतं. जनतेच्या प्रश्नासाठी जेव्हा तो व्यवस्थेशी भिडतो तेव्हा त्याला कोणत्याच परिणामांची तमा नसते. सामान्यांच्या त्या लढाईत तो कोणाचाच उरत नाही, अगदी स्वतःचाही. तो तेव्हा असतो केवळ संघर्षयात्री. अशा या वादळाला कुठल्याच मर्यादा वा सीमारेषेत थोपवून धरता येत नाही. बांधून ठेवता येत नाही. ‘कलंदर’, ‘अवलिया’ अशा विशेषणात अगदी फिट्ट बसणार्‍या या माणसासोबत संसार करणं म्हणजे निखारा पदरात बांधून घेण्याजोगच आहे. निखारा विझायलाही नको अन् पदर पेटायलाही नको.

………………………

ही अवघड कसरत करणार्‍या सौभाग्यवती नयना बच्चू कडूंना त्यांच्या आईने बच्चू यांच्याशी लग्न होण्यापूर्वी  १८ वर्षांपूर्वी असाच काहीसा सल्ला दिला होता. ‘बाई गं! त्यांच्याशी संसार करणं म्हणजे छातीला गोटा लावणं आहे. विचार कर.’

पण त्या मुलखावेगळ्या पोरीला तरी कुठे परिणामांची फिकीर होती? तिचीही स्वप्नं काही वेगळीच होती. नयना कडू सांगतात, ‘मला चारचौघींपेक्षा वेगळा नवरा हवा होता. मला दिसण्याचं काही नव्हतं. पण पोरगा भरपूर शिकलेला असावा. त्याला स्वतःचं व्यक्तिमत्त्व असावं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तो ११ ते ५ च्या चाकोरीत अडकलेला नसावा, असं मला वाटायचं.’

गुलाबराव महाराजांच्या माधान येथील पंडितराव मोहोड या शिक्षकाची ज्येष्ठ कन्या असलेली नयना एम.ए. फायनलला असताना तिच्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या. मुले पाहायला येऊ लागली. अशातच काही नातेवाइकांकडून बेलोऱ्याच्या बच्चू कडूंचं स्थळ सांगून आलं. हे नाव तेव्हा सामाजिक व राजकीय क्षेत्रात गाजायला लागलं होतं. मजेची बाब म्हणजे, आपण बरं आणि आपला अभ्यास बरा, अशा विश्वात असलेल्या नयना कडूंना तेव्हा या माणसाबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यांच्या घरातली मंडळी व नातेवाइकांना मात्र बच्चूंच्या पराक्रमांची चांगलीच कल्पना होती आणि त्यामुळे या स्थळाला आई बहिणीसह सर्वांचा विरोध होता.

बच्चूंचे तेव्हाचे कारनामे कितीही चर्चेचा विषय असले तरी लग्नाच्या बाजारात त्याच qualification घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणारा असंच होत. मोहोडांच्या घरात त्यावेळी उठलेले तरंग नयना कडूंच्या शब्दात ऐकण्याजोगे आहेत.- ‘घरी काका व बाबा सोडून कोणीच या स्थळाला अनुकल नव्हते. आईचं म्हणण होतं, पोरगा चांगला आहे पण ज्या घरात नवरा सतत बाहेर राहतो, तेथे बाईची किंमत राहत नाही. शिवाय सहा भाऊ व चार बहिणी असलेल्या बच्चूंच्या मोठ्या कुटुंबाचीही तिला चिंता होती. तुला कामाची सवय नाही. तुझं कस होईल? असं ती म्हणायची. बहिणीचाही तीव्र विरोध होता. तुला आता जरी बरं वाटत असलं तरी पुढे त्रास होईल, असं त्या सांगायच्या. बच्चूंच्या घरीही काही वेगळी परिस्थिती नव्हती. शिकलेली पोरगी आपल्याकडे कशी adjust होईल, यावर तिथे चर्चा होती.’

‘अशा परिस्थितीतही यांचं व माझं लग्न झालं यासाठी माझ्या वडिलांना शंभर टक्के मार्क द्यावे लागतील. सर्वांचा विरोध असतानाही ते आपल्या मतावर ठाम होते. २००३ च्या उन्हाळ्यात लग्न पक्कं झालं.  बच्चूभाऊ जावयांसोबत जेव्हा मला पाहायला आले तेव्हा यांनी कोणत्याही अटी घातल्या नाहीत, प्रश्नही विचारले नाहीत. फक्त वडिलांना सांगितलं- ‘लग्न माझ्या पद्धतीने होईल. भगतसिंग जयंतीच्या दिवशी अपंगांना सायकल वाटप करुन वगैरे..

लग्न पक्कं झालं. मात्र लग्न जुळणं ते लग्न होणं हा सहा महिन्यांचा काळ नयना मोहोड यांच्यासाठी मानसिक संघर्षाचा काळ होता. आपण हो तर म्हटल पण आपण तेथे adjust होऊ का? कायम लोकांच्या गराड्यात राहणार्‍या, आंदोलनं करणार्‍या त्याला प्रेम वगैरे समजेल का? असे अनेक विचार डोक्यात यायचे. एखाद्या वेळी असंही वाटायचं, आता नाही म्हणायच का? डोक्यात अशी घालमेल असताना एकदा बाबा व मी एकत्र बसले. त्यांनी डोक्यावर हात ठेवला.- ‘बेटा, सर्वाचा विरोध घेऊन मी लग्न पक्कं केलं. तुला काय वाटतं?’  त्याक्षणी अतिशय आश्वासक स्वरात त्यांनी वाईटात वाईट काय होऊ शकतं. हे मला समजावून सांगितले. माणसाच जीवन, नियती नशीब, मृत्यू यावर चर्चा झाली आणि माझ्या डोक्यातील गोंधळ संपला. नयना कडू तेव्हाची मनःस्थिती आणि वादळासोबत संसार करण्याची मनोभूमिका कशी तयार केली, याबाबत सांगत होत्या.

साखरपुडा ते लग्न हा काळ तसा रोमँटिक असतो. मात्र नयना व बच्चू कडू यांचेसाठी तसं नव्हतं. ‘लग्न जुळल्यानंतर तीनेक महिने तर आमच बोलणंच झालं नाही. आमच्या घरी टेलिफोन होता. पण सर्वांसमोर बोलता येत नसे. एखाद्या वेळी यांच्या मित्राच्या मोबाइलवर बोलणं व्हायचं. तेव्हा हे काय बोलायच…तर आमच्या घरी डोक्यावर पदर घ्यावा लागेल. घरी लहान मुलं खूप आहेत. तुला त्यांना सांभाळावं लागेल वगैरे… वगैरे… रोमँटिक वगैरे कधी बोलल्याचं मला आठवत नाही. सहा महिन्यात एकदाच पत्रिका पक्की करताना भेट झाली. तीही सर्वांसमोर. एकदा दोघांनीच भेटायचं ठरवलं. पण हे नेमके आजारी पडले. पण या सहा महिन्यात एक गोष्ट समजली. या माणसाला प्रेम कळतं. आपल्या मनात काय आहे हे याला नक्की उमजेल,हा विश्वास त्या दिवसांत निर्माण झाला .-नयना कडू तेव्हाच्या आठवणी उलगडतात.

बच्चू कडू व नयना कडू २ ऑक्टोबर २००३ ला चांदूरबाजार भक्तिधाम येथे विवाहबद्ध झाले. लग्नाला गो.रा. खैरनार, बी.टी. देशमुख, नरेशचंद्र ठाकरे असे अनेक मान्यवर उपस्थित होते. चांदरबाजारात हे लग्न तेव्हा चर्चेचा विषय होते. बच्चू कडू हे नाव प्रकाशझोतात असलं तरी नयना मोहोड या नावाभोवतीही तेव्हा वलय निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. काही कार्यक्रमांमध्ये नयना यांनी केलेली भाषण चांगलीच गाजली होती. एका कार्यक्रमात नामवंत वर्‍हाडी कवी विठ्ठल वाघ यांनी नयनाचं भाषण ऐकून तिचा उल्लेख ‘वाघाची माय’ असा केला होता. वर्तमानपत्रांनी त्या घटनेला  चांगली प्रसिद्धी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर फोकसमध्ये असलेल्या या दोघांचं लग्न चांगलंच गाजलं. अनेकांना तर हे love marriage आहे, असंच वाटल.

लग्नानंतर बेलोर्‍यात सहजीवनाला सुरुवात झाली. नयना वहिनीसाठी ते विश्व संपूर्णतः नवीन होतं. एका छोट्या कुटुंबातून त्यांनी मोठ्या खटल्यात प्रवेश केला होता. तेथे त्यांना तेव्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा. तेव्हाच्या अनेक गमती-जमती आहेत. त्यांच्या जावा चुलीवर सराईतपणे स्वयंपाक करायच्या. भराभर पोळ्या करायच्या. यांची मात्र प्रत्येक पोळी जळायची. पोळीत वेगवेगळे आकार उमटायचे. नयना वहिनीचे चुलीवरच्या स्वयंपाकाचे प्रयोग त्यांच्या तोडूनच ऐकण्याजोगे आहेत. अंगावरची हळद सुकत नाही तोच काही दिवसात नयना कडूंनी चांदुरबाजारच्या जी.आर. काबरा कनिष्ठ महाविद्यालयात Contributory lecturer म्हणून पुन्हा काम सुरु केलं. बच्चूभाऊ तेव्हा रोज त्यांना चांदूरबाजारला मोटारसायकलने सोडून द्यायचे व घ्यायला पण यायचे. ‘ते दिवस खुप सुखद होते. नवर्‍याच्या पाठीमागे बसून सारा शीण विसरायला व्हायचं. एकमेकांना समजून-उमजून घेणं सुरु झालं होतं. तेव्हा जाणवलं, या लढाऊ माणसाच्या कप्पा खूप हळवा आहे. तो खूप भावनिक आहे. त्या प्रवाहात तो गेला की, त्याला बाहेर काढणं जड जातं.’- नयना वहिनी लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवासातील सुखद आठवणीत चांगल्याच रमतात.

हे रम्य दिवस फार टिकले नाहीत. बच्चू कडूंसारखं वादळ या भावनिक गुंताळ्यात फार दिवस अडकून राहण शक्यच नव्हत. काही दिवसांतच त्यांची आंदोलनं सुरु झालीत. लग्नानंतरची पहिली दिवाळी कुठल्याही विवाहितेसाठी किती महत्त्वाची असते! पण हा बहाद्दर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या बायकोला घेऊन पूर्णा नदीच्या पात्रात उपोषणाला बसला. नयना कडू सांगतात, ‘तेव्हाच लक्षात आलं. आपली परिक्षा सुरु झाली. याचे एकापाठोपाठ एक आंदोलनं लढे सुरु होते. मला सगळ्याच गोष्टी माहीत नसायच्या. एकदा यांनी अर्धदफन आंदोलन केलं. दोन-तीन दिवसानंतर त्या आंदोलनातील भयावहता मला कार्यकर्त्यांकडून कळली. तेव्हा आयुष्यात मी प्रथमच भीती अनुभवली. तेव्हा आणखीही एक गोष्ट लक्षात आली. हा माणूस जिवावर बेतले ते आपल्याला सांगलेच असं काही नाही.’

याच दरम्यान बच्चू कडूंची एक सवय त्यांच्या भीतीत भर घालून गेली. ‘तुम्हाला ऐकायला नवल वाटेल पण; मोटारसायकल चालविताना हे अनेकदा झोपतात. मी देवाच्या (मुलगा) वेळेस Pregnant होते तेव्हाची गोष्ट. एकदा चांदूरहून बेलोर्‍याला येत असताना मोटरसायकल रस्त्यावरुन खाली उतरली. वाकडी-तिकडी चालायला लागली. मी समोर वाकून पाहते तर हे चक्क झोपलेले. माझा धरकाप उडाला. लगेच गाडी थांबविली. एका झाडाखाली यांना विश्रांती घ्यायला लावली. तेव्हापासून नवीनच घोर लागला. हे रात्री-बेरात्री घरी येतात. मोटारसायकलवर काही कमी-जास्त झाले तर? हा विचार डोक्यातून जात नव्हता. मी कायम चिंतेत राहायला लागले. अनेक रात्री मी जागून काढल्या. मात्र एका रात्री मला स्वप्न पडलं. हे गाडी चालवीत आहेत आणि मागे गुलाबराव महाराज बसले आहेत. तेव्हापासून भिती निघून गेली.’ – नयना कडू आमदार बच्चू कडूंच्या अनोख्या सवयीबाबत आपल्याला सांगतात.

थोरला बाजीराव घोड्यावरच झोप घेत असल्याच्या कथा आपण ऐकून आहोत. मात्र हे मोटरसायकलीवरचं झोपणं नवीन कथांना जन्म देणारं आहे.

२००४ सालची लोकसभा निवडणूक लागली. बच्चू कडूंच्या आयुष्यातील ते एक अविस्मरणीय पर्व आहे. सामान्य माणूस प्रेम-प्रेम करतो म्हणजे नेमके काय करतो, याचा भावनोत्कट अनुभव कड़ दाम्पत्याला या निवडणुकीत आला. हजारो लोक वेड्यासारखे कामाला लागले. अमरावतीत ’न भूतो’ अशी विशाल मिरवणूक निघाली. लोक वर्गणी करून बच्चूला पैसे देत होते. ही निवडणूक बच्चू लढवीत नसून लोक लढत आहेत, असा अभूतपूर्व माहोल होता. वातावरण असं भारलेलं असताना बायकोला मागे राहून कसं जमेल? त्यावेळी नयना कडूंना सहावा महिना लागला होता. त्या अवस्थेत पहिल्या बाळंतपणाचे लाड करून घेण्याऐवजी ही बाई रणरणत्या उन्हात नवर्‍यासाठी पायपीट करीत होती. नयना कडूंच्या तोंडून तो अनुभव ऐकताना आपण हेलावून जातो.

‘त्या अवघडलेल्या अवस्थेत मी रोज सात-आठ तास सभा करायची. त्या अवस्थेत डायसच्या पायर्‍या चढताना-उतरताना माझा जीव निघायचा. रोजच्या सभांसोबत घराघरांत, वस्त्यावस्त्यांत जाऊन प्रचार तो वेगळाच. जिवाची लाही-लाही व्हायची. चक्कर यायचे. अनेकदा सभा आटोपली की दुसर्‍या गावात जाताना गाडीत पोतं ओलं करून मी ते पायाखाली ठेवायचे. हे सारं करताना घरातील कामांपासून सुटका नसायची. कामं टाकून मला जाता येत नसे. सकाळी पाचला उठून सारी कामे उरकून मी बाहेर पडे. पाठ टेकायला रात्रीचे दोन व्हायचे. या काळात यांना बोलायचीही सवड नव्हती. काही मिनिटांसाठी घरी आले तरी हे आपल्याच तालात असायचे. यांचेशी बोलायची भीती वाटायची. खूप दगदगीचे दिवस होते ते. आठवलं तरी अंगावर शहारे येतात. मात्र त्या दगदगीतही काही अनुभव मोरपीस फिरविल्यासारखं सुख द्यायचे. माझी एवढी मेहनत पाहून एखादी म्हातारी जवळ घ्यायची. म्हणायची, ’पोरी, तू एवढी फिरते आहेस. तुझा नवरा नक्की निवडू येईल बघ.’

अनेक बायका बच्चू कडूची बायको कशी आहे हे पाहायला यायच्या. कौतुकाने माझी दृष्ट काढायच्या. शरीराला जीव भारी असल्याच्या कठीण काळातील त्या मेहनतीच नवर्‍याला कौतुक होत का? आपण विचारतो. ‘त्या निवडणूक रणधुमाळीत तर यांना माझ्याशी बोलायलाही फुरसत नव्हती. नंतर त्यांना कार्यकर्त्यांकडून माहिती मिळाली असावी. त्यानंतर मात्र त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं.- ‘त्या काळात तू खूप सहन केलंस.’   बाईला दुसर काय हव असतं? मी भरुन पावले.

त्या २००४ च्या निवडणुकीत जनतेचं अपार प्रेम व कार्यकर्त्यांच्या जिवापाड मेहनीनंतरही बच्चू कडू थोडक्यात हरले. मात्र तो संघर्ष वाया गेला नाही. सहाच महिन्यात जनतेने त्यांना विधानसभेत पाठविले. बच्चूभाऊ आमदार झाले. आमदार झाल्यानंतर कोणाच्याही आयुष्यात मोठे बदल होतात. तसे बदल कडू दाम्पत्याच्या जीवनात झालेत का? आयुष्यातील संघर्ष कमी झाला? आयुष्य सोपं झालं का? या प्रश्नांना नयना वहिनी अतिशय सुरेख उत्तर देतात, ’प्रवाहाच्या विरुद्ध पोहणाऱ्याचं, व्यवस्थेविरुद्ध लढणार्‍याचं आयुष्य कधीच सोपं होत नाही. संघर्ष हा यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे. Settelement हा विषयच यांना कळत नाही. तो विषय ते गंभीरतेने घेतही नाहीत. आमदार झाल्याचा फायदाच सांगायचा झाल्यास, यांचं आमदारकीचं नियमित मानधन तेवढं यायला लागलं. आर्थिक वणवण थोडी कमी झाली. पण इतर व्याप आणखी वाढलेत. गर्दी वाढली.’

कायम माणसांच्या कोंडाळ्यात व त्यांच्या प्रश्नांचा गुंता सोडविण्यात व्यस्त राहणार्‍या बच्चू कडूंच्या आयुष्यात नयना कडूचं नेमकं स्थान कोणतं. याची आपल्याला उत्सुकता असते. – ‘तुम्हाला खरं सागू का, हा माणूस अतिशय हळवा आहे. उत्कट आहे. पण कोण्या एका ठिकाणी हे नाही गुंतून राह शकत. स्पष्ट सांगायला हरकत नाही, मी यांची Priority निश्चित नाही. तो माणूस कामाशिवाय राहूच शकत नाही. गेली अनेक वर्षे मी त्यांना पाहते आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं विश्लेषण करणं फार कठीण आहे. वैयक्तिक संबंधांपेक्षा त्यांच्यासाठी समाजाची दुःख मोठी आहेत. त्यांच्या या वृत्तीचा अभिमान वाटतो आणि त्याचवेळी आपण त्यांची Priority नाही, याची खंतही वाटते.’

गंभीर विषयातून बाजूला काढून आपण नयना कडूंना विचारतो, ’पण नवरा म्हणून बच्चू कडू कसे आहेत? कधी भांडणं वगैरे होतात की नाही?’ नयनावहिनी सांगतात – ’नवरा म्हणन यांना ’इगो’ अजिबात नाही. आंघोळीसाठी स्वतः पाणी काढन घेतात. मी कामात असले तर स्वतःचं जेवण स्वतः वाढूनही घेतात. एखादी गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे झाली नाही की मात्र ’बह्याड’, ’मॅड’ या शब्दांनी माझा उद्धार होतो. काही वेळा त्यांच्यातला नवरा वर येतो. शर्टाचं बटण तुटलं असेल आणि आपलं लक्ष नसेल तर बडबड होते. आमच्यात भांडणंही होतात. कधी कधी हे खूप तुसडेपणाने बोलतात. ’तुले कायी कळत नायी. तू बह्याड आहे,’ असं म्हणतात. तेव्हा वाईट वाटतं. मात्र हे चिडले म्हणजे मी उलट उत्तर देत नाही. भांडणं मिटविण्यातही तेच पुढाकार घेतात. तेव्हा खूप मस्का लावतात. आपली चूक कबूल करतात’ – नयना वहिनी अवलिया माणसासोबतच्या संसारातील खट्टे-मिठे अनुभव सांगतात.

या दोघांच्या लग्नाला आता जवळपास साडेचार वर्षे झालीत. या एवढ्या वर्षांत बच्चू एकदाच नयना कडूंना बाहेर फिरायला घेऊन गेलेत. ’दिलीला एक कार्यक्रम होता. आम्ही तेव्हा पहिल्यांदा विमानात बसलो. विमानात प्रवेश केल्याबरोबर हे म्हणाले  ’नयना, आज आपण लोकांमुळे विमानात बसू शकलो.’ यांच्या डोक्यात हे असं कायम सुरू असतं. त्यानंतर दोघांनी कुठे गेल्याचं आठवत नाही. एरवी आमच्यासोबत कायम कार्यकर्ते व पेशंट असतात.’ बच्चू कडूंच्या आवडी-निवडींबाबत आपण छेडताच नयना कडू सांगतात, ’माणसांच्या समस्या सोडविणे एवढंच एक व्यसन यांना आहे.
त्या व्यतिरिक्त सांगायचं झाल्यास पोहायला यांना मनापासून आवडते. मोकळा वेळ असला, तर नाना पाटेकरचे चित्रपट आवडीने पाहतात. पुस्तकं वगैरे वाचत नाहीत. वाचनाने काही फरक पडत नाही, असे ते मानतात. आयुष्यात एकमेव ’श्रीमान योगी’ हे पुस्तक यांनी वाचलंय. गांधीजींचे ’सत्याचे प्रयोग’ अर्धवट वाचलं.

‘जबर आत्मविश्वास हा यांच्या व्यक्तिमत्त्वातील Strong Point आहे. एखादी गोष्ट आपण करू शकत नाही, असे त्यांना वाटतच नाही. एखाद्या विषयात डोकं घातलं की पार उधळून देतात. जिवावर उदार होतात.’ नयना कडूंना बच्चूंच्या याच स्वभावाची भीती वाटते. यांनी स्वतःला थोडा आवर घालावा, स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असं त्यांना वाटतं. पण काळजी हा विषय बच्चू कडूंच्या गावी नसतो. कुठल्याही स्त्रीप्रमाणे नयना कडूंच्याही काही अपेक्षा आहेत. ’इतरांप्रमाणे आपलंही एक स्वतःचं घर असावं. घर चालविण्यासाठी ठरावीक Income Source असावा, अडचणी सांगून येत नाहीत. त्यामुळे गाठीशी थोडाफार पैसा असावा.’  पण बच्चूंना हे पटत नाही. आपण असं काही बोललो की ते म्हणतात, ’आपल्यावर वाईट दिवस आले, तर समाज आपल्याला मदत करणार नाही?’ आपला चेहरा पाहून हे म्हणतात, ’तू काळजी करू नको. काम पडलं तर मी चहाचं कॅन्टीन लावेल.’ यावर आपण काय बोलायचं?

कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचा हा कणखरपणा बच्चूंमध्ये कुठून आला? नयना कडू याचं सारं श्रेय आपल्या सासूला देतात. ‘आज हे जे काही आहेत त्यात आईचा फार मोठा वाटा आहे. प्रत्येक भल्याबुर्‍या प्रसंगात त्यांनी याची पाठराखण केली उद्या काही बरं वाईट झााल, तर बाकी कोणाच सांगता योणार नाही पण, आई आामच्या पाठीमागे ठामपणे उभ्या राहतील, याची मला खात्री आहे. बच्चूची खर्‍या अर्थाने ताकद कोण असेल तर त्या आईच आहेत.’- नयना वहिनी सासूच ऋण कृतज्ञतापूर्वक नमूद करतात.

हे सुद्धा नक्की वाचा – कहाणी बच्चूभाऊ आणि नयनावहिनीसोबतच्या स्नेह्बंधाच!https://bit.ly/35z1GJG

बच्चूसोबत आयुष्याची साथ निभविताना नयना कडूंना लहान वयातच खूप बदलावं लागलं नवरा संघर्षयात्री असला की, तसंही बाईला खूप सोसावं लागतं. ते सोसण त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसतं. बच्चू कडू या वादळासोबत संसार करताना काय गमवावं लागलं? या प्रशाला उत्तर देताना त्या झटकन सांगतात, ’निवांतपणा, मला शांतपणे जगायला आवडतं.  पण, आता आयुष्यात निवांतपणाला जागा नाही,मी साहित्याची विद्यार्थिनी असल्याने काहीसा Romantism डोक्यात होता. तोही बाजूला ठेवून आता वास्तविकतेला भिडणं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधीही काही घडू शकतं, यासाठी मनाची कायम तयारी ठेवावी लागते.’

आयुष्यातील काही स्वप्नं बाजूला ठेवावी लागली असली तरी नयना कडूंना आज त्याची अजिबात खंत नाही. उलट लढाऊ नवर्‍याच्या कर्तृत्वाचा अभिमान त्यांच्या चेहर्‍यावर साफ झळकतो. ’आज त्यांची स्वप्नं माझी स्वप्नं झाली आहेत. मला एकाच गोष्टीची खंत आहे, मी त्यांच्या गतीची बरोबरी नाही करू शकत. त्यांच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकत. पण मी ठरवलंय, ऊर फाटेपर्यंत त्यांच्यासोबत धावायचं, सारं झोकून द्यायचं. नयना कडूंच आज परमेश्वराजवळ एकच मागणं आहे. ’तो हरला, तो थकला’ असं कधीही कोणी म्हणायची पाळी येऊ नये.  आणि हो…, ’या अवलिया माणसासोबत प्रत्येक जन्मात संसार करायला मला आवडेल,’ हे सांगायलाही त्या विसरत नाहीत.

(ही मुलाखत २००६ साली दैनिक ‘लोकमत’ साठी घेतली होती . प्रस्तुत लेखकाच्या ‘आमदार सौभाग्यवती’ या पुस्तकात या मुलाखतीचा समावेश आहे .)

(लेखक ‘मीडिया वॉच’ वेब पोर्टल व दिवाळी अंकाचे संपादक आहेत)

8888744796

Previous articleपंडित नेहरू-एडविनाची उत्कट प्रेमकहाणी
Next articleअखेर आज त्याचे श्वास थांबले…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

3 COMMENTS

  1. मी २००७ ते २0११ या काळात अमरावतीत शिकत असताना आवर्जून तुमचे लेख, बातम्या वाचायचो. आज जवळपास १० वर्षांनी पुन्हा मीडिया वॉच च्या पोर्टलच्या माध्यमातून तो आनंद घेता आला. मनःपूर्वक शुभेच्छा सर..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here