विचारांचे पूर्वग्रह आणि कसोटीचा काळ

साभार: साप्ताहिक साधना

– डॉ. आनंद नाडकर्णी

…………………………………………………..

माझे वडील मला त्यांच्या आयुष्यातली एक आठवण सांगायचे. काळ होता मोठ्या धामधुमीचा. गेल्या शतकामधला. एकीकडे दुसरे महायुद्ध भरात आलेले आणि भारतामध्ये ‘चले जाव’ आंदोलनाचा काळ. माझे वडील होते कोल्हापूर शहरात. राजकीय दृष्टीने ते होते डाव्या, मार्क्सवादी विचारांचे. त्या काळामध्ये राजकीय विचार स्वीकारताना वाचन, अभ्यास, चर्चा करण्याची पद्धत आजच्यापेक्षा जास्त होती. मी वाचायला लागलो तेव्हाही वडिलांच्या संग्रहात मार्क्स, एंजल्ससोबत गॉर्की, चेकॉव्ह, टॉलस्टॉय यांची पुस्तके असायची. त्यांना सुबक कव्हर्स घातलेली. त्यावर हाताने काढलेला भारताचा नकाशा आणि त्यात रंगवलेला लाल तारा. तर, या तरुणांनी त्या वेळी ‘बुक स्टॉल रिपब्लिक’ नावाचे पुस्तक दुकानही काढले होते. पुढे ‘लाल निशाण’ गटाचे नेते झालेले यशवंत चव्हाण, संतराम पाटील हे माझ्या वडिलांचे मित्र. पुढे ह्या साऱ्यांबरोबरची त्यांची मैत्री टिकून होती. तो भाग ओघात येईलच.

तर, ह्या साऱ्या कट्टर डाव्या तरुणांनी ठरवले की, कट्टर उजव्या गटाचे विचार समजून घ्यायला हवेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अशाच भारलेल्या तरुण गटाबरोबर ही बौद्धिक चर्चा झाली. अनेक तास चालली. तापली, थंड झाली, भरकटली, मार्गावर आली. शेवटी जाणीव झाली की, मध्यरात्र उलटून उत्तररात्र सुरू झाली आहे. तरीही गाडी काही Agree to Disagree म्हणजेच ‘आपले मतभेद आहेत, राहणार हे मान्य करू या’ ह्यापुढे जायला तयार नव्हती. तेव्हा तोड निघाली. एका तरुणाने त्याच्या सुरेल आवाजात देशभक्तीची गाणी गायची. त्याबद्दल एकमत झाले. ते तरुण गायक होते संघीय गटामध्ये. त्या सुरांनी भारावलेल्या अवस्थेत सारे पांगले. त्या गायकाचे नाव होते सुधीर फडके.

ही आठवण नव्याने घोळायला लागली माझ्या मनात. आत्ताच्या लॉकडाऊनच्या कालखंडात. आपण ज्या राजकीय-सामाजिक विचारांचे नाही, त्या विचारांना जाणून घ्यायचे कुतूहल आणि अशा माणसांचा ‘माणूस’ म्हणूनचा स्वीकार ह्यामध्ये आज आपण किती अन्‌‌ कसे बदललो आहोत, ते मला समजून घ्यावेसे वाटले. खास करून समाजमाध्यमांमध्ये होणारे कर्कश संवाद वाचून. कसोटीच्या काळामध्ये नवे मतभेद होणार, जुने आळवले जाणार; पण त्या प्रवासात अनाठायी, आक्रमकतेचे पूर्वग्रहदूषित असे लिखाण व वर्तन व्हायलाच हवे का, ह्याची मानसशास्त्राच्या दृष्टीने केलेली ही मांडणी… प्रत्येक वाचकाच्या चिंतनासाठी.

माझ्या वडिलांच्या आठवणीमधले ठळक मुद्दे पाहू या. दोन्ही गट आपापल्या मतांबद्दल आग्रही होते, पण त्यांनी दुसरी बाजू नीटपणे ऐकली. विचारांच्या देवाण-घेवाणीतील दरीला ‘माणूस’ म्हणूनच्या, म्हणजे माणुसकीच्या व्यवहारात आणले नाही. एकमेकांच्या स्वदेशनिष्ठेबद्दल संशय घेतला नाही. संगीत नावाच्या ऐक्य निर्माण करणाऱ्या घटनेने ह्या चर्चेची सांगता करण्याचा विवेकही दाखवला.

पुढे वडील प्राध्यापक म्हणून काम करण्यासाठी खानदेशात आले आणि साने गुरुजींच्या प्रभावाखाली आले. राष्ट्र सेवादलात आले. पण डाव्या चळवळीतल्या एकाही मित्राबरोबरचे त्यांचे नाते तुटले नाही, तसेच उजव्या चळवळीतल्याही. मला आता फारच गंमत वाटते की, आमच्या घरी येणारे प्रा. ग. प्र. प्रधान आणि प्रा. रामभाऊ कापसे हे दोघेही माझ्यासाठी सारखेच आदरणीय ‘काका’ होते.

नरहर कुरुंदकरांच्या लिखाणामध्ये साधारणपणे अकरा-बाराव्या शतकांपर्यंत चालणाऱ्या धर्मचर्चांचा संदर्भ आहे. वैदिक धर्म, जैन धर्म आणि बौद्ध धर्म यातील पंडितांमध्ये तत्त्वज्ञानाचे वाद-विवाद व्हायचे. अर्थातच प्रत्येकाला आपल्या विरोधी मांडणीच्या धर्म-विचाराचाही सखोल अभ्यास करायला लागायचा. ह्याचा फायदा संपूर्ण समाजाला झाला. वादविवादात हरल्यावर अग्निकाष्ठे भक्षण करण्यासारख्या अतिरेकी गोष्टी अपवादानेच होत्या, हे नमूद करून ते लिहितात की, एकसुरी-जहाल-एकांगी विचारापासून संस्कृतीची जणू सुटकाच झाली ह्या संवादांमुळे.

आता आपण ‘मते कशी बनतात’ ती प्रक्रिया प्रथम समजून घेऊ. त्यानंतर ती आग्रही कशी बनतात, दुराग्रही कशी बनतात ते पाहू. अगदी लहान वयापासूनच मते बनवण्यासाठी एक गोष्ट आवश्यक असते. ती म्हणजे, प्रत्यक्ष अनुभव. पण ह्या घटकाची व्याप्ती लहानपणी मर्यादित असल्यामुळे व्यक्ती मते बनवते ती आजूबाजूच्या महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या मतानुसार. ह्याला म्हणतात, Acquisition किंवा ‘मिळकत’… ही प्रक्रिया जेव्हा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होते, तेव्हा तिला आपण म्हणतो संस्कार. माणूस वयाने मोठा होतो तसा तो ‘स्वतः’ची विचारशक्ती चालवू लागतो. (अलीकडे ही वाढ अगदी दीड-दोन वर्षांच्या मुलातही दिसते.) घटनेकडे पाहण्याचा स्वतःचा दृष्टिकोन तयार होण्याची ती सुरुवात असते.

पुढे आपापल्या वकुबाप्रमाणे व्यक्ती शिकते. म्हणजे माहिती गोळा करते. त्याचे आकलन, पृथ:करण करते. त्यासाठी वाचणे, ऐकणे, पाहणे ही सारी माध्यमे असतात. या सगळ्या ‘विचारमंथना’मधून जे सूत्र आपले मन स्वतःचे म्हणून स्वीकारते, त्याला म्हणतात ‘मत’… मत म्हणजे पक्का होऊ घातलेला दृष्टिकोन… बहुतेक वेळा व्यक्ती आपल्या मतानुसार वागून पाहते. त्यातला प्रतिसाद पाहते. इतरांच्या मताबरोबर ते मत जुळते, न जुळते हे तपासते… जुळले तर ते ‘पक्के मत’ (Opinion) बनते… विश्वासार्ह मत म्हणजे Belief! हा बिलीफ जर इतरांच्या विरोधात असेल, तर मनाला वैचारिक बंडखोरीची किंमत काढावी लागते. ही किंमत व्यावहारिक असते आणि भावनिकसुद्धा… या टप्प्यावर माणूस किती ‘अभ्यासू’ वृत्तीचा आहे, हा मुद्दा येतो.

अभ्यास म्हणजेच त्या-त्या विचारसूत्राच्या, विषयाच्या संदर्भात जे उपलब्ध असेल आणि जे वाचणे शक्य असेल अशा मतांचा, माहितीचा शोध घेऊन त्याचे वाचन-मनन करणे. त्यामुळे विश्वासार्ह दृष्टिकोनाचे रूपांतर धारणेमध्ये म्हणजेच (Firm Belief) मध्ये होते. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या चरित्रातून ही प्रक्रिया शिकता येते. त्यांच्या आयुष्याच्या एका टप्प्यावर ते आणि त्यांचे वडील ह्यांच्यातील मतभेद विकोपाला जातात. ज्योतिरावांचा आपला अभ्यास व चिंतनावर आधारित दृष्टिकोन एकीकडे तर गोविंदराव फुल्यांचा परंपरावादी दृष्टिकोन दुसरीकडे. १९४८ च्या ऑगस्ट महिन्यात मुलींची शाळा (आणि तीही सर्व जातींच्या मुलींसाठी) काढल्यावर ज्योतिराव आणि सावित्रीबाईंना वडिलोपार्जित घराला रामराम ठोकावा लागतो.

ज्योतिबा जसे समता आणि विषमतानिर्मूलन ह्या तत्त्वांना चिकटून राहतात, तेव्हा त्यांच्या विरोधकांची संख्या व संताप दोन्ही वाढतो. मग विचारांच्या विरोधाऐवजी ते ज्योतिबांनाच संपवण्यासाठी मारेकरी घालतात… हा पर्याय मानवी इतिहासात अनेक आधुनिक धारणांना खतम करण्यासाठी वापरला गेला आहे… त्याचे कारण फुल्यांविषयी निर्माण झालेले पूर्वग्रह. आपल्या अभ्यासू ठामपणाच्या आधारावर महात्मा फुले ह्या पाशवी आक्रमकतेचा सामना करतात. त्याचा पुरावा असा की, मारेकऱ्यांपैकी एक धोंडीराम कुंभार हा ज्योतिबांच्या प्रभावाखाली येऊन शिकला, सत्यशोधक समाजाचा कार्यकर्ता झाला आणि त्याने पुस्तकही लिहिले.

ह्या कालखंडातले फुल्यांचे वर्तन ध्येयनिष्ठ आणि विवेकी दिसते. त्यांना उच्च जातींतील (तथाकथित आणि समकालीन) अनेकांचा विरोध होता, पण त्यांचे काही सहकारीही अशा जातीतले होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातही हे म्हणता येईल. म्हणजे स्वतःच्या मतावर ठाम राहूनही, विरोधी मतांचा वैचारिक प्रतिकार करूनही ‘माणूस’ ह्या पातळीवरचा आदर राखणे मानवाला शक्य असते.

विचार, मते, विचारसूत्रे आणि धारणा अशा ह्या घडणीच्या प्रवासात ‘विवेकी’ कशाला म्हणायचे? माझ्या धारणेबद्दल मला खात्री, विश्वास आहे आणि तो वरवरचा नसून मी केलेल्या अभ्यासातून आला आहे. म्हणूनच मी माझ्या धारणेवर आधारित वैचारिक भूमिकेचा अंगीकार आणि पुरस्कार करणार. परंतु माझ्या धारणेसंदर्भातल्या नव्या पैलूंचा, माहितीचा, ज्ञानाचा मी अव्हेर न करता तेही समजून घेईन. त्या अभ्यासानंतरच मी ठरवेन की, माझ्या भूमिकेत फरक करायचा की नाही? मला न पटणाऱ्या मतांचा मी उपहास-धिक्कार न करता, पुरावे आणि वैचारिकता याचा वापर करत विरोध करेन. पण, दुसऱ्या माणसाचे मत माझ्यासारखे असायलाच हवे, असा हट्ट धरणार नाही. वैचारिक विरोध करणाऱ्या व्यक्तीला ‘विरोधक’ असे लेबल देऊन त्याच्याशी शत्रुत्व करण्याचे मला कारण नाही. त्याने तसे केल्यास मी अनुरूप मार्गाने स्व-विचारांचे संरक्षण करेन. माझ्या धारणा ह्या जगातील अपरिवर्तनीय सत्य आहेत, असे न मानता मी त्यांची वारंवार तपासणी करेन.

हा मजकूर लिहिताना गांधीजींची एक भूमिका आठवली. ते लिहितात की- एकाच विषयावरची माझी भिन्न मते आढळली, तर काल दृष्ट्या जे ताजे ते माझे (त्या विषयावरचे) मत मानावे. ‘If the reader still believes in my sanity’ असा मिश्किल शेराही त्यांनी मारला आहे.

समोरच्या व्यक्तीचे मत-वर्तन आपल्याला पटले नाही, तर त्यावर प्रखर टीका करण्याचा पर्याय घ्यावा लागतो. पण आपण त्या व्यक्तीबद्दल पूर्वग्रह न बाळगता, किंबहुना योग्य आदर बाळगून तसे करू शकतो. गांधीजींचा विषय निघाला म्हणून त्यांनी सुभाषबाबूंना लिहिलेल्या एका पत्रातला मजकूर इथे उद्‌धृत करतो. पत्र लिहिले आहे ३ जानेवारी १९३० ला, लाहोरच्या वार्षिक काँग्रेस अधिवेशनानंतर. सुभाषबाबूंची काही जाहीर वक्तव्ये, वर्तन, पावलांनंतर गांधीजींचे म्हणणे असे…

‘तुझे वागणे मला कोड्यात पाडणारे झाले आहे. लाहोर अधिवेशनातले तुझे वागणे समजण्याच्या पलीकडचे, अगम्य तर होतेच; पण त्याला उथळ असूयेचा गंधही होता… मला दमदार विरोधाचे कधीच काही वाटत नाही. मी त्यावरच पोसला गेलो आहे आणि मित्रांपेक्षा विरोधकांकडूनच जास्त शिकलोही आहे. पण लाहोरमध्ये तू (दुर्दैवाने) अडथळे उभे करणारा ठरलास.

‘कोणत्याही विषयावरच्या तुझ्या दृष्टिकोनात तू बदल कर, असे मला सांगायचे नाही आहे. पण तुझे दृष्टिकोन ठोसपणे सादर करताना तू जसे वर्तन करतोस, त्यामध्ये मात्र बदल करावास, असे मला नक्की वाटते.’’ हा उतारा पुन:पुन्हा वाचण्यासारखा आहे. एकीकडे कठोर टीका आहे. आपली निरीक्षणे गांधीजी आडपडदा न ठेवता मांडतात. आपला आक्षेप ‘नेमका’ कशाला, ते सांगतात. सुभाषबाबूंचे विचार ‘त्यांचे’ म्हणजे बापूंना न पटणारे असू शकतात, हे मान्यही करतात. परंतु संघभावनेला, म्हणजेच समान ध्येयाला तडा जाणारे वर्तन होता कामा नये, असे ठामपणे बजावतात.

‘व्यक्ती’ आणि ‘वर्तन’ ह्यामधला फरक, ‘विचार’ आणि ‘आचार’ ह्यातला भेद जर मनात स्पष्ट असेल, तर तो विवेकी विरोध म्हणायचा. मीच सत्याचा ठेका घेतला आहे, असे विवेकशक्ती कधीच म्हणत नाही.

विनोबा लिहितात : ‘सत्याग्रही तोच असेल, जो सत्याचा दावा तर सोडणार नाही; परंतु समोरच्या जवळ सत्य नाहीच, असेही मानणार नाही. सत्याचा एक अंश माझ्यापाशी आहे, जो मी सोडणार नाही; परंतु दुसरा अंश त्याच्यापाशी असू शकतो आणि तो अंश कमी-अधिक असू शकतो. तटस्थ बुद्धीने त्याची चर्चा होऊ शकते… म्हणून सत्याग्रही बनण्यासाठी प्रथम सत्यग्राही बनायला हवं.’

विनोबा सांगताहेत की- ‘सत्याला कणा असतो पण ते हेकेखोर नसतं… त्यात लवचिकपणा असतो. तो प्रथम अभ्यासाने आणि नंतर व्यासंगाने येतो. अभ्यासामध्ये वाचन, शोधन, उत्खनन, चर्चा, वैचारिक जोडणी हे सारे आहेच. व्यासंग ही पुढची पायरी… अभ्यासाची बैठक अधिक विस्तारणारी… आशयाचे नवे आयाम देणारी. विविध ज्ञानशाखांबरोबरचे धागे शोधणारी. ‘व्यासंग’ ही बहुअंशी अंतर्गत प्रक्रिया. तुलनेने अभ्यासामध्ये ‘करणे’ येते. व्यासंग तर पुढे-पुढे घडत जातो. तो अधिक Holistic म्हणजे सर्वसमावेशक असतो. जगातील सर्व काही कवेत घेणाऱ्या व्यासांचा सहवास म्हणजे व्यासंग!

म्हणजे मनःपूर्वक अभ्यास जिथे कमी पडतो तिथे पूर्वग्रहांना थारा मिळतो. दुराभिमान वाढतो. ‘माझे तेच खरे’ असा हटवाद निर्माण होतो. मग विरोधकांवर प्रसंगी शारीरिक, पण बहुतेक वेळा वाईट शब्दांचे हल्ले होतात. योग्य अभ्यासाविना मंडळी बाजू घ्यायला लागतात. विरुद्ध बाजूच्या मंडळींना ‘ट्रोल’ करतात… उचकवतात… उत्तम उचकवणाऱ्यांना राजकीय-आर्थिक पाठबळही मिळते, असे ऐकून आहे. समाजमाध्यमांच्या वाढत्या वापराबरोबर आपण जुन्या पूर्वग्रहांना खतपाणी घालणे, नव्यांना जन्माला घालणे या गोष्टी नव्या जोमाने करू लागलो आहोत. लॉकडाऊनच्या काळात तर आपल्याला उसंतही मिळाली आणि सामग्रीसुद्धा. त्यामुळे ताळतंत्र सोडलेल्या शेऱ्यांची संख्या आणि तीव्रताही वाढवली. ह्याला आंधळं धाडस म्हणायचं की मर्यादित बुद्धीला लागलेला चळ, हे मला ठाऊक नाही; परंतु कोणत्याही विषयावरील मते बनवताना अभ्यास न करणे, उथळ माहिती जमवण्याला अभ्यास मानणे आणि सध्या पटणाऱ्या बाजूचाच एकांगी अभ्यास करणे ह्या प्रवृत्ती वाढताहेत का, हे खरं तर प्रत्येकानेच आपल्या मनापुरते तरी तपासून पहायला पाहिजे.

पूर्वग्रहातून निर्माण होतात ‘निवाडे’… विचारांचा विरोध झाला की, माझे मन समोरच्या व्यक्तीवरचे एक जजमेंट- फैसला-निवाडा पास करते. तो एक तर माझ्या ‘बाजूचा मित्र’ किंवा ‘विरोधी शत्रू.’… ही धारणा घट्ट होत जाते. Mind of prejudiced person is like pupil of the eye, the more you throw light upon it, more it contracts. पूर्वग्रहदूषित माणसाचे मन डोळ्यातल्या बाहुलीसारखे असते. सत्याचा, पुराव्यांचा किती प्रकाश टाकाते, आकुंचित-संकुचितच राहणार. मानसशास्त्र सांगते की, असे Judgemental Attitudes ¬ म्हणजे मानसिक अनारोग्याची सुरुवात. आपण असेही मान्य करू की, माणूस म्हणून आपल्याला संपूर्णपणे पूर्वग्रहमुक्त होणे अशक्य आहे. पण त्या संदर्भातली जाणीव होणे आणि त्यावर डोळसपणे काम करणे महत्त्वाचे.

म्हणजे काय करायचं?… निवाडा करणाऱ्या विचारांसोबत येणाऱ्या भावना अत्यंत तीव्र असतात. मग तो राग असो वा लोभ. ह्या भावना उसळल्या की आपलं ‘ऐकणं’ संपतं, बंद होतं. खरं तर हे सिग्नल असतात माझ्या मनातले, मला सावध करणारे.

समोरच्या व्यक्तीचे विचार समजून घेण्यापेक्षा मी जेव्हा तिथेच- ‘पुरावे’ शोधायला लागतो, तेव्हा समजावे आपण घसरतोय… पुरावे कसले, तर त्याला खोटे पाडणारे! त्याच्या वैचारिक साखळीतली कमजोर कडी शोधणे, ही वेगळी प्रक्रिया आहे… एवढी मॅच्युरिटी कुठे यायला लोकांमध्ये!… असे म्हणून आपण हा विषय बाजूला न सारता निदान ही परिपक्वता काय, कुठे, कशी ह्याचे दिग्दर्शन तरी करायला हवं.

आतापर्यंत मांडलेली ही भूमिका मनात उतरावी म्हणून (पुन्हा) विनोबांकडे वळतो. त्यांनी ‘बुद्धी’ आणि ‘प्रज्ञा’ ह्यामध्ये भेद केला आहे. ते सांगतात, ‘बुद्धी’ माणसाच्या मनोविकाराप्रमाणे पालटणारी असते. ही रंगीत बुद्धी बिनचूक निर्णय देण्याचे कार्य करू शकत नाही. (दयाबुद्धि-द्वेषबुद्धि) शुद्धबुद्धी म्हणजे प्रज्ञा नेमका निर्णय देते. कारण तिला स्वतःचा रंग नसतो. ती थर्मामीटरसारखी असते. थर्मामीटरला स्वतःला ताप आलेला नसतो, म्हणूनच तो इतरांच्या तापाचे मापक होऊ शकतो.

हे सगळे वाचताना मस्त वाटले तरी प्रत्यक्षात यायला कठीण. त्याचे एक मूलभूत कारण आहे, आपल्यातली आदिम अशी ‘कळपात’ राहण्याची उर्मी. मी एकदा ‘बाजू घेतली’, ‘गट पकडला’ की- त्या प्राचीन काळात मला शारीरिक व भावनिक सुरक्षितता मिळायची. एकांडे राहण्यापेक्षा हे बरं, असं म्हणून मी माझी मते बहुसंख्येकडे वळवायचो. प्रभावी नेतृत्व करणारी व्यक्ती मला नेमकी हीच सुरक्षा देत असते. त्या व्यक्तीच्या विचारांची दिशा-व्याप्ती महत्त्वाची की त्याच्या व्यक्तिमत्त्वातून मला मिळणारी सुरक्षित भावना- ह्यामध्ये भल्या-भल्यांचा गोंधळ होतो… कोणत्याही क्षेत्रातील पुढाकारी, प्रभावी नेतृत्वाच्या विरोधाला जशी धार येते तशी ‘अंधभक्त’ आणि ‘अंधशत्रू’ ह्या दोन्ही धारणा वाढीला लागतात. लोकोत्तर व्यक्तींपैकी अनेकांना आपल्या हयातीत अंधशत्रूंशी मुकाबला करावा लागला आणि त्यांचे निर्वाण झाल्यावर त्यांच्या अंधभक्तांनीच त्यांच्या वारशाला मलिन केले. हीसुद्धा बुद्धदेवांपासूनची परंपरा आहे.

कर्तृत्ववान माणसांच्या कर्तृत्वाइतकेच त्यांच्याबद्दलचे पूर्वग्रहसुद्धा टिकून राहतात, हे निरीक्षणही बऱ्याच व्यक्तींच्या बाबतीत खरे ठरते. नुकत्याच एका प्रतिरूप संवादात (Virtual Session) मी लोकमान्यांच्या गोष्टी सांगत होतो. तर एका विद्यार्थिनीचा प्रतिसाद आला- मी त्यांच्याबद्दल आजवर वाईट-साईटच ऐकले आहे. असा प्रतिसाद गांधीजी, नेहरू, सुभाषबाबू, विवेकानंद, सावरकर, आंबेडकर अशा अनेक व्यक्तींबद्दल ऐकायला मिळतो. त्याचे कारण असते लहानपणापासूनचे घरातले वातावरण आणि संस्कार (मिळकत). समाजातल्या जाती- धर्म-भेदांचे पूर्वग्रह त्या-त्या जातीत जन्मलेल्या माणसांना का बरं सोडतील?…

आणि लोकोत्तर असली तरी सगळी माणसं ही माणसंच होती, हे आपण का विसरायचं?… प्रत्येकाला कळलेल्या सत्याचे अंश त्यांनी आपल्यासाठी सोडले आहेतच की. आणि त्यांच्या महान गुणांच्या सोबत त्या काळाच्या, त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाच्या-व्यक्तिमत्त्वाच्या काही मर्यादा असणारच. काही मर्यादा तर ह्या माणसांनीच स्वतः स्वतःवर घालून घेतलेल्या. आपण एक तर ह्या व्यक्ती आणि त्यांचे विचार-धारणा ह्यातला भेद लक्षात ठेवावा. म्हणजे, ‘आदर्श’ किंवा ‘दैवी’ व्यक्ती असे न मानता त्यांच्या गुणांमधून, कर्तृत्वावरून आपल्याला काय कळते, त्याचा अभ्यास करावा. जिथून ठाम विचार, खंबीर धारणा ऐकायला-वाचायला मिळताहेत, त्या आत घेऊन त्यावर आपल्याला स्वतःचा अभ्यास करायचा आहे, हे लक्षात ठेवावे. बुद्धाचा पट्टशिष्य आनंद आपली भूमिका मांडतो, ‘गौतम बुद्ध बोलत असताना मी जे ऐकले, ते मी सांगत आहे.’ बुद्धाच्या वाणीवरही आनंदाचे मन संस्कार करत असणार आणि त्यानंतर तो बोलत असणार… वृत्तीचा हा आरस्पानीपणा अभ्यासाला नेहमी पोषक असतो.

कोणत्याही विषयावरच्या एकांगी विचारांमुळे आजवर जग पुढे गेलेले नाही. खरे तर अनेक विचारधारांचे स्वागत करत त्याना तपासणे आणि त्यांची आपल्या उद्दिष्टाप्रमाणे जुळवणूक करणे महत्त्वाचे. कोरोनावरची लस करण्यासाठी शास्त्रज्ञांचा जागतिक गट किती पद्धतीने विचार करत असेल आज… वेगवेगळ्या जागतिक सत्तांचे काही नेते आपले पूर्वग्रहदूषित बोलणे हेच अंतिम सत्य मानताहेत… पण ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ‘भेदाभेद अमंगळ’ ही उक्ती जगणारे मात्र जगाला एका संकटापासून वाचवायची साधना करताहेत- विघटनाच्या पूर्वग्रहांच्या तटबंद्या पार करत!.

(लेखक नामवंत मनोविकास तज्ञ आहेत)

Previous articleजेसिंडा आर्डेनचे जादुई नेतृत्व
Next articleनियतीला पूर्वसंकेत
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here