कालिदासाच्या काव्यातील प्रतिभा व्यासंगाच्या वैभवाने समृद्ध झालेली दिसते. आपल्या सहज नि नैसर्गिक प्रतिभेला काटेकोर कोंदणात सजवून कालिदासाने अजोड काव्यसंपदा निर्माण केली. अलंकारशास्त्र, तत्त्वज्ञान, कामशास्त्र, वैद्यकशास्त्र, ज्योतिषशास्त्र, पुराण, महाकाव्य ‘रामायण’ व ‘महाभारत’ या आर्षकाव्याच्या शाखोपशाखांचा तर अभ्यास कालिदासाचा होताच, त्याचबरोबर निरनिराळी स्थळं, प्रदेश, तेथील राजसभा, लोकरीती, निरनिराळे मानवी स्वभावविशेष, मनोविज्ञान यांबाबतही त्याचे निरीक्षण अत्यंत सूक्ष्म होते. याशिवाय संगीत, शिल्प, चित्र यांसारखा ललिकलांचेही प्रत्यक्ष ज्ञान त्याने मिळविलेले असावे. याचा प्रत्यय त्याच्या काव्यातील वर्णनातून येत राहतो. विविध विद्या, शास्त्रे नि कला यांचा व्यासंग नि प्रत्यक्ष ज्ञान यांच्या तेजाने लखलखीत असलेली कालिदासाची प्रतिभा आजही रसिकांना मोहिनी घालते आहे.
कालिदासाच्या ‘मेघदूता’ची मराठी रसिक मनालाही विलक्षण भूरळ पडली. ‘मेघदूता’च्या विलोभनीयतेचे उत्कट दर्शन मराठीतून घडविण्यासाठी अवघ्या शे-दिडशे वर्षात साधारणतः २० पद्य अनुवाद रूपे झाली आहेत. १८६५ साली कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी ‘मेघदूतनामक काव्य’ या नावाने पहिला अनुवाद केला. नंतर ल. ग. लेले यांचे ‘मेघदूतकाव्याचे समवृत्त मराठी भाषांतर’ (१९०१), भा. शं. देवस्थळी यांचे ‘यक्षसन्देश’ (१९०१), बा. ल. अंतरकर यांचे ‘मेघदूतच्छाया’ (१९०५), गं. गो. दामले यांचे ‘मेघाचे अलकेस प्रयाण’ (१९०६), शां. आ. सबनीस यांचे ‘महाराष्ट्र मेघदूत’ (१९३८), चिं. द्वा. देशमुख यांचे ‘मेघदूत’ (१९४४), रा. चिं. श्रीखंडे यांचे ‘सुश्लोक मेघ’ (१९५०), ग. रा. हवलदार यांचे ‘मेघदूत’ (१९५०), द. वि. पंडित यांचे ‘मेघदूत’ (१९५४), ग.नी. कात्रे यांचे ‘मेघदूत’ (१९५५), कुसुमाग्रज यांचे ‘मेघदूत’ (१९५६), द. वें. केतकर यांचे ‘मेघदूतत्रिविक्रम’ (१९५६), रा. प. सबनीस यांचे ‘मेघदूत’ (१९५८), ना. ग. गोरे यांचे ‘मेघदूत’ (१९६४), शं. गो. जोशी यांचे ‘मुक्तामाला’ (१९६९), वसंत पटवर्धन यांचे ‘मेघदूत’ (१९७१), बा. भ. बोरकर यांचे ‘मेघदूत’ (१९८०), वसंत बापट यांचे ‘मेघहृदय’ (१९८७) आणि शान्ता शेळके यांचे ‘मेघदूत’ (१९९४) असे अनुवाद मराठी मध्ये झालेले आहेत. या ‘मेघदूता’च्या केलेल्या अनुवादांपैकी कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर आणि शान्ता शेळके या तिघांनी केलेल्या अनुवादांविषयी काही आकलन याठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
कुसुमाग्रजांनी केलेला ‘मेघदूता’चा अनुवाद १९५६ मध्ये प्रकाशित झाला. ‘मेघदूता’तील अप्रतिम सौंदर्याला मराठीतून आणण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. कुसुमाग्रज स्वतः एक प्रतिभासंपन्न कवी आहेत. कालिदासासारख्या श्रेष्ठ, अलौकिक प्रतिभासंपन्न कवीच्या ‘मेघदूत’ या कलाकृतीचा कुसुमाग्रजांनी मराठीमध्ये केलेला अनुवाद हा मूळ कलाकृतीच्या अधिक जवळ जाणारा आहे. त्यांनी ‘मेघदूता’तील ‘पूर्वमेघ’ व ‘उत्तरमेघ’ या भागांमधील प्रत्येक श्लोक मूळ संस्कृतमध्ये दिला असून त्याच्याच खाली त्या श्लोकाचा मराठी अनुवाद दिला आहे. कुसुमाग्रज ‘मेघदूता’ विषयी म्हणतात, “एखाद्या निर्जन बेटावर जाताना एकच काव्य बरोबर नेण्याचे जर माझ्यावर बंधन घालण्यात आले तर मी ‘मेघदूत’ या काव्याचीच निवड करीन… रसिकांच्या मनाला अथपासून इतिपर्यंत मंत्रमुग्ध करण्याचे, एक वेगळे भावविश्व त्याच्या सभोवार विणून त्याला उन्मनावस्थेत पोहोचविण्याचे सामर्थ्य ‘मेघदूता’त जितके आहे तितके अन्यत्र आढळणे फार कठीण आहे…” या भारावलेपणातून ‘मेघदूता’चे अतिशय तरल प्रकटन त्यांनी मराठीत केले. ‘मेघदूता’बाबत आपली भावना त्यांनी नितळ शब्दांत मांडली आहे. ‘मेघदूता’चे आशयसौंदर्य अधिक परिणामकारकपणे मराठीतून व्यक्त व्हावे, यासाठी कुसुमाग्रज अधिक आग्रही असल्याचे जाणवते. म्हणून ज्या ठिकाणी मूळ संस्कृत शब्द अधिक परिणामकारक आहेत, त्यांचा तसाच वापर त्यांनी अनुवादामध्ये केला आहे. कुसुमाग्रजांनी शब्दांवर व संदर्भावर भर न देता त्यांतून व्यक्त होणाऱ्या काव्यावर आपले लक्ष केंद्रित केले. निसर्गवर्णन, शृंगारप्रधानता, उपमा-अलंकारांचे उपयोजन, रसवत्तेचा प्रत्यय देणारे पदलालित्य इत्यादी अनेक वैशिष्ट्यांनी कुसुमाग्रजांचे ‘मेघदूत’ परिपूर्ण आहे. २८ व्या श्लोकांतील श्रृंगाररसाचे त्यांनी केलेले लालित्यपूर्ण आविष्करण अधिक तरल जाणवते.
अशा तरल प्रत्ययकारीकतेतून बोरकरांचा अनुवाद घडतो. कालिदासाचे काव्यगुणवैभव आणि अलौकिक प्रतिभाविलास यांच्या संस्पर्शानें बोरकर भारावून जातात. कालिदासाच्या संस्कृतिसमृद्ध मनाशी तादात्म्य पावण्याच्या साधनेत ते रमतात आणि रामगिरीपासून अलकेपर्यंतचा मेघाबरोबरचा प्रवास करीत कालिदासाने घडवलेले भारताचे सृष्टीसौंदर्य आणि संस्कृतिसौंदर्य याचा चित्रमय आस्वाद वाचकांना मराठीतून देतात. कालिदासाच्या भावनांशी तादाम्य पावताना ‘बनुनि तुझे हृदय दुजें’ असे म्हणत बोरकरांनी कालिदासाशी आपले एकरूप व्यक्त केले आहे. बोरकरांनी आपल्या ‘मेघदूता’च्या अनुवादात संस्कृत श्लोकांचा अंतर्भाव केला नसून केवळ मराठीतच आपला अनुवाद दिला आहे, जो साहित्यिकदृष्टा अतिशय सरस ठरला आहे. मात्र तत्सम शब्दांचा अतिवापर आकलन सुलभतेला कुठे कुठे जड जाणवतो.
शान्ता शेळके यांच्या अनुवादातून मेघदूतातील साधी-सरळ निवेदन पद्धती, छंदोबद्ध प्रवाही रचना, रसपूर्णता अधिक सहजपणे मराठी वाचकांसमोर येते.