(महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रकाशित केलेल्या ‘पृथ्वीमोलाचा माणूस’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी २० नोव्हेंबर २०१५ रोजी पुणे येथे केलेले भाषण)
-मिलिंद बोकील
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रकाशित होत असलेल्या ‘पृथ्वीमोलाचा माणूस’ या डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्याविषयक लेखांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ‘विवेकवाद आणि धर्मचिकित्सा’ या विषयाची चर्चा करणे औचित्याचे ठरेल. ही चर्चा मी एका लेखकाच्या भूमिकेतून आणि लेखकाच्या पद्धतीने करणार आहे. म्हणून प्रथम एक वैयक्तिक अनुभव सांगून सुरुवात करतो. गेल्या वर्षी ९ नोव्हेंबरला माझ्या आईचं ऐंशीव्या वर्षी निधन झालं. ती त्याआधी साधारण दोन-तीन महिने मूत्रपिंडाचं कार्य मंदावल्याच्या कारणानं आजारी होती. तिची रुग्णालयात जायची इच्छा नव्हती. त्यामुळे तिची शुश्रूषा आम्ही घरीच डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करीत होतो.
मूत्रपिंडाचेच काम मंदावल्याने तिची प्रकृती हळूहळू ढासळतच जाणार आणि एक दिवस तिचे निर्वाण होणार, हे आम्हाला व तिलाही समजलं होतं. आपले आयुष्य हे सुफल व संपूर्णपणे जगून झालेले आहे आणि त्यामुळे आपण शांतपणे व आनंदाने जगाचा निरोप घ्यायचा, अशी तिची भावना होती. आणि एक ना एक दिवस ती जाणार, हे सत्य माहीत असल्याने आम्हीही मनाची तयारी केली होती. मात्र तिचे प्रत्यक्ष निर्वाण होणार ते कसे होणार, याविषयी मला फार कुतूहल होतं आणि त्या क्षणी आपण तिथे असू का, अशी शंकाही होती. कारण ती रात्री झोपेत असताना जाण्याची आणि आपण अगदी जवळ असलो तरी आपल्याला न कळण्याची शक्यता असते. मात्र ही शंका फोल ठरली.
त्या दिवशी रविवार होता. सकाळी दहा वाजता. खोलीभर पसरलेल्या भरपूर सूर्यप्रकाशात आणि केवळ मीच नाही, तर घरातील सगळे नातेवाईक तिच्या बिछान्याभोवती जमलेले असताना तिचे निधन झाले. ते मरण कसे आले ते मी अगदी जवळून, नीटपणे पाहिले. तिचा श्वास हळूहळू मंदावत जाऊन एका क्षणी थांबला. अक्षरश: एखादे यंत्र जसे त्यातील इंधन संपल्याने हळूहळू धडधड मंदावत जाऊन थांबते, तसेच ते होते. आलंकारिक भाषेत आम्ही लेखक म्हणतो की, प्राणपाखरू उडून गेले; पण प्रत्यक्षात तिच्या शरीरातून असा काही आत्मा किंवा प्राण किंवा कसली ज्योत निघून गेलेली मला दिसली नाही. दिसलं ते असं की- हृदय थकून धडधडायचं थांबलं, नाडी बंद झाली आणि ते तसं झाल्याने ती मरण पावली, असं निश्चित झालं.
म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की, आत्मा नावाची अशी काही वेगळी गोष्ट नसते. ती अशी कुठे उडून किंवा निघून जात नाही. शरीरात एक ऊर्जा असते, तिला चैतन्य म्हणता येईल आणि ते इंधन संपलं की शरीर कार्य करायचं थांबतं. फार-फार तर एवढं म्हणता येईल की, चैतन्यभारित शरीर हाच आत्मा असतो आणि त्यामुळे स्थूल व सूक्ष्माची किंवा जड व चैतन्याची वैज्ञानिक एकरूपताच नजरेला भरली.
पुढचा प्रश्न नंतरच्या विधींसंदर्भातला होता. आम्ही आईला असं विचारलं होतं की, तुझी काय इच्छा आहे? तेव्हा ती असं म्हणाली होती की- तेव्हा माझ्या इच्छेचा काही प्रश्नच येणार नाही, कारण इच्छालहरी या मेंदूमध्ये तयार होतात आणि मेंदूचं कार्य थांबलं, नंतर शरीर भस्मीभूत झालं की इच्छा नावाची काही गोष्टच राहत नाही; तेव्हा माझी इच्छा काही शिल्लकच राहणार नाही. इच्छा तुमची असणार, तर तुम्हाला काय करायचं ते करा. आम्हालाही काही इच्छा नव्हती. त्यामुळे आम्ही कोणतेही विधी न करता शांतपणे विद्युतदाहिनीत अग्नीला देह अर्पण केला. कारण आमच्या हातात कोणतंही चैतन्य नसलेलं, कोणतीही इच्छा नसलेलं शरीर होतं. त्यामुळे त्याच्याशी संबंधित असे कोणतेही विधी त्याला लागू होऊ शकत नव्हते. हीच गोष्ट नंतरच्या दिवसांची होती. आपल्याकडे दहावा, बारावा, पंधरावा असे दिवस करतात.
पण माझ्या मानवशास्त्राच्या थोड्याशा अभ्यासामुळे मला हे कळत होतं की, आपण जेव्हा आदिम अवस्थेत होतो तेव्हाचे हे विधी आहेत. त्या वेळी सृष्टीचं आणि मानवी शरीराचं आपलं आकलन मर्यादित होतं. ‘मरण’ म्हणजे काय, ते आपल्याला माहीत नव्हतं आणि मरणानंतर माणसाचं काय होतं, हे माहीत नव्हतं. मुख्य म्हणजे, सभोवतालच्या सृष्टीमध्ये आपण प्रचंड भ्यालेलो होतो आणि म्हणून ते विधी आपण करत होतो. आता ते केले पाहिजेत, असं कोणतंही कारण दिसत नव्हतं. त्यातूनही पूर्वसुरींनी काय सांगितलं आहे ते पाहण्यासाठी आमच्याकडे गरुडपुराणाची जी प्रत आहे, ती पाहिली. माझ्या वडिलांचं अशा प्रकारच्या साहित्याचं वाचन असल्यानं ते पुस्तक आमच्याकडे होतं.
ते पाहिल्यावर लक्षात आलं की- त्यात अनेक गोष्टी सांगितल्या असल्या तरी अमुक केलंच पाहिजे किंवा तमुक केलंच पाहिजे, असं काहीच म्हटलं नव्हतं. त्यात तर असं म्हटलं होतं की- काहीही करायचं नसेल, तर माळावर जाऊन दोन्ही हात वर उभारून आरोळी दिली तरी चालतं. मग कोणी तरी सांगितलं की, इथे एका संस्थेनं सुटसुटीतपणे, कमी खर्चात व मराठीत अंत्येष्टिविधी करण्याची पद्धत काढली आहे आणि त्यांचे पुरोहित घरी येऊन ते करतात. मग तिथे जाऊन त्यांची ती पोथी आणली. त्यातले ते मंत्र आणि विधी मी वाचले, तेव्हा तर माझ्या अंगावर काटाच आला. कारण त्या विधीत भाताचा गोळा म्हणजे दिवंगत व्यक्ती असं समजून; त्या गोळ्याला दह्याची साय लाव रे, काजळ लाव रे, त्यावर लोकरीचा धागा टाक रे… असले विधी होते. ती म्हणजे माझ्या भावनांची क्रूर थट्टाच होती. माणूस कितीही भाविक आणि श्रद्धाळू असला, तरी त्याला ते सहन करणे कठीण जाईल. आणि सर्वांत उद्वेगजनक गोष्ट म्हणजे, संस्कृतमध्ये त्या गोळ्याला उद्देशून सारखं प्रेत-प्रेत असंच म्हणत होते.
माझी आई अस्तित्वात नव्हती ही गोष्ट खरी होती, पण म्हणून काही तिला मी प्रेत म्हणणार नव्हतो. संस्कृतमध्ये अर्थ काही असेल, पण मराठीत अर्थ काय असतो ते आपल्याला माहीत आहेच. म्हणून मग आम्ही ठरवलं की, यातलं काहीही आपण करायचं नाही. आपल्या मनात जी सुतकाची किंवा अशौचाची भावना असते किंवा तो दहा- बारा दिवसांचा काळ असतो तो संपावा आणि आपण पुन्हा नित्य कार्याला लागावे; म्हणून मग आम्ही आईचा फोटो समोर ठेवून त्याला हार घातला आणि मनातल्या मनात तिची आठवण केली- बस्स! सगळा मिळून तेवढाच विधी केला. कोणी तरी आम्हाला सांगितलं की, उदकशांत करा. ती कल्पना मला केवळ हास्यास्पदच नाही, तर अमानुष वाटली. माझ्या आईचं अस्तित्व हे काही अशुभ नव्हतं, की मी त्याची शांत करावी!
हे सगळं मी सांगतोय, यामागे दोन-तीन कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे, अनेक विधी हे आपण निव्वळ एक रूढी किंवा वहिवाट म्हणून करतो. त्या विधींमध्ये नक्की काय म्हटलंय याचा शोध घेत नाही. तसा शोध घ्यायला गेलो, तर मनाला धक्का बसेल अशा गोष्टी लक्षात येतात. हे विधी विचित्र तर असतातच, पण आधी म्हटले तसे अमानुषही असू शकतात. इतर काही धार्मिक विधींसंदर्भात आपण चौकसपणा दाखवतो आणि कालानुक्रमे बदलही करतो. उदा.- वैदिक पद्धतीने लग्न करण्याऐवजी रजिस्टरपद्धतीने करतो. पण अंत्येष्टिविधींची बाब मात्र अशी आहे की, त्यांना निमूटपणे शरण जातो. याचे कारण ‘मरण’ या संकल्पनेसमोर आपण धास्तावलेले असतो. अमुक एक गोष्ट केली नाही तर काही तरी अशुभ घडेल- वाईट होईल, अशी भीती आपल्याला वाटते. गेलेल्या माणसाची इच्छा, असं आपण म्हणतो; पण खरं तर ते आपलं धास्तावलेपण असतं.
माझा अनुभव असं सांगतो की, असं धास्तावलेपण मनात ठेवायची काही गरज नाही. आपण आपल्या मनाला जी गोष्ट पटेल तीच करू शकतो. आणि जर आपलं मन निर्भय केलं, तर मग ते आपोआप शांत राहतं. धास्तावलेलं मन शांत असत नाही, उलट जे मन निर्भय आणि शांत असतं, त्यालाच प्रसन्नपणाचा अनुभव येऊ शकतो. आई गेल्यानंतरचा माझा वर्षभराचा अनुभव असा आहे की, मी कोणतेही विधी केले नाहीत म्हणून मला कोणताही विपरीत किंवा भीतीदायक अनुभव आला नाही. घरातलं वातावरण अतिशय शांत आणि प्रसन्न राहिलं. माझा मुलगा तर ती ज्या बिछान्यावर गेली, त्यावर दुसऱ्या दिवसापासूनच झोपायला लागला. आम्हाला आई नसल्याची पोकळी जाणवली, पण शोक झाला नाही.
आणि हे साध्य झालं, कारण आम्ही अगदी सरळ साधा विचार केला की- जे आपल्या मनाला योग्य वाटतं, तेच करायचं; कोणत्या तरी आदिम विधींची वहिवाट पडली आहे म्हणून नाही. मला असं वाटतं की, यालाच विवेक असं म्हणतात. विवेक म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून विशिष्ट प्रसंगात योग्य काय, आणि अयोग्य काय हे ठरवायची बुद्धी. ही बुद्धी प्रत्येक माणसाजवळ असते आणि तिचा वापर करण्याचं धैर्यही तो मिळवू शकतो.
निर्भयता आणि विवेक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या संदर्भात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे- अंत्येष्टिविधी हा सगळा माझा ‘पर्सनल मामला’ आहे. म्हणजे, मी आणि माझी आई यांच्यामधला हा मामला आहे; बाकीच्यांनी त्यात दखल देण्याची अजिबात गरज नाही. या विधींच्या ज्या पोथ्यांचा मी उल्लेख केला, त्यात असे म्हटले होते की, सच्च्या हिंदूचे हे कर्तव्य आहे की- त्याने पितरांचा आदर केला पाहिजे आणि दक्षिणा-पिंडदानादी विधी केले पाहिजेत; तसं केलं तर समाजात स्वाभिमान, आत्मविश्वास आणि तेज निर्माण होईल. हे वाचून तर मला हसू आवरलं नाही. मी पिंडदान करण्याचा आणि समाजात स्वाभिमान निर्माण होण्याचा काय संबंध आहे?
त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपले पितर हे तर आपल्या शरीरातच वस्ती करून असतात. आपलं शरीर हे आईकडून ५० टक्के आणि वडिलांकडून ५० टक्के ऐवज घेऊन बनलेलं असतं. त्याच रीतीने आजी-आजोबांकडून २५ टक्के आणि पणजीपणजोबांकडून प्रत्येकी साडेबारा टक्के ऐवज आलेला असतो. याच क्रमाने आपले सगळे पितर हे आपल्यातच वस्ती करून असतात. असं असताना मी अंतराळाकडे तोंड करून पाणी शिंपडण्यात काय हशील आहे? पुढची गोष्ट म्हणजे- मी अमुक गोष्ट केली नाही, तर माझे पितर माझ्यावर कोपू कसे काय शकतात? कारण कोपण्याचे किंवा रागावण्याचे जे इंद्रिय आहे- म्हणजे मेंदू- ते त्यांच्याजवळ आहेच कुठे? याचाच अर्थ असा की- तुम्ही हे विधी केले पाहिजेत यामध्ये कोणाचे तरी, म्हणजे धर्ममार्तंडांचे आणि पुरोहितांचे, हितसंबंध गुंतलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही ते करा, असं ते आग्रहाने सांगताहेत.
तिसरी गोष्ट माझ्या लक्षात आली आणि जी मला मुख्यत्वे सांगायची आहे, ती म्हणजे- अमुक एक विधी न करण्याची आणि त्याऐवजी आपल्या मनाला पटेल तो निराळा किंवा नवा विधी करण्याची मुभा आपल्या धर्माने, म्हणजे इथे माझ्या बाबतीत हिंदू धर्माने, मला दिलेली आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे याचाच दुसरा अर्थ असा की- माझा धर्म काय आहे, हे मी ठरवू शकतो. त्या अर्थाने प्रत्येक क्षणी मीच माझ्या धर्माचा संस्थापक असतो, त्यासाठी मला दुसऱ्या कोणाच्या मान्यतेची गरज नसते. मी अमुक विधी केले नाहीत, हे समजल्यावर धर्ममार्तंड असंच म्हणणार की- धर्म बुडाला, हा धर्मबुडव्या आहे. पण धर्म बुडाला म्हणजे कोणता धर्म बुडाला? तर, ते जे सांगत होते, तो धर्म बुडाला. विवेकाने वागणे हा जो माझा धर्म आहे, त्यानुसारच मी वागलो.
आपला धर्म आपणच ठरवण्याचं हे जे स्वातंत्र्य हिंदू धर्मात आहे, ते हिंदू धर्माचं फार मोठं वैशिष्ट्य आहे आणि ते केवळ त्याचं बलस्थानच नाही, तर तेच त्याचं मूळ स्वरूप आहे. माझ्या असं लक्षात आलं की- केवळ अंत्येष्टिविधीच नाही, तर जीवनातल्या कोणत्याही प्रसंगी काय करायचं ते माझं मी ठरवू शकतो. कारण मी स्वत:हून काही कोणता धर्म स्वीकारलेला नाही. मी काही बाप्तिस्मा घेऊन कोणत्या धर्माचा अनुयायी झालेलो नाही किंवा ॲफिडेव्हिट करून ‘तुमचे नियम मी पाळीन’ असं कोणाला लिहून दिलेलं नाही. मी या भूमीत आणि विशिष्ट आई- वडिलांच्या पोटी जन्मलो, म्हणून मला ‘हिंदू’ म्हटलं जातंय. माझी आपली जगण्याची एक पद्धत आहे, तिला बाकीच्यांनी हिंदू असं नाव दिलेलं आहे. मला जर अमुक देवाचा कंटाळा आला तर मी दुसरा घेईन. मला जर वाटलं की, अमुक एक अंधश्रद्धा आहे किंवा अघोरी प्रथा आहे; तर मी तिचा त्याग करीन. मला जर वाटलं की, इतरांप्रति प्रेम आणि बंधुभाव ठेवावा, तर मला त्यापासून कोणीही अडवू शकत नाही. हे जे मी करतोय, तोच माझा धर्म आहे; मग त्याला तुम्ही हिंदू म्हणा, सिंधू म्हणा नाही तर बिंदू म्हणा.
खरं तर ‘हिंदू धर्म’ हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. अनेक लोकांनी या आधी मांडलंय त्याप्रमाणे ‘हिंदूंचे धर्म’ असा तो शब्दप्रयोग पाहिजे. हिंदूंचा एकच एक धर्म नाही, तर अनेक धर्म आहेत. याचे प्रत्यंतर आपल्याला ठायी-ठायी येते. केवळ निरनिराळे उपासना संप्रदाय, पद्धती, दर्शनं त्यात आहेत म्हणून नाही; तर जेवढी म्हणून माणसं आहेत, तेवढ्या प्रकारचे धर्म त्यात असू शकतात. उदाहरणार्थ- आपण बघतो की- एक जण शंकराला भजतो, तर दुसरा विष्णूला. एक जण उभं गंध लावतो, तर दुसरा आडवं. कोणी पूर्णत: शाकाहारी असतो, तर कोणी फक्त श्रावणात शाकाहार करतो. एकाच घरात एक बहीण मंगळवारी उपास करते, तर दुसरी गुरुवारी. माणूस आस्तिक असताना हिंदू असतोच, पण नास्तिक असूनही हिंदू असू शकतो. गणपतीला अमुकच एक नैवेद्य दाखवला पाहिजे, असं काही नाही : केळ्याच्या कापांपासून ते वाटल्या डाळीपर्यंत आणि भिजकट साखरफुटाण्यापर्यंत कोणताही नैवेद्य चालतो. ही फार मोठी मजा आहे आणि फार मोठा आनंद आहे.
माझ्या मनात धर्माची भीती नसते, ही सर्वांत सुंदर गोष्ट आहे. हे जे सगळं उपासना-स्वातंत्र्य आहे, ते हिंदू धर्माच्या मूलभूत स्वरूपामुळे आलेलं आहे. कारण आधी म्हटलं तसं- या भूमीमध्ये ज्या विविध सांस्कृतिक परंपरा आणि तत्त्वचिंतने चालत आली, त्यांनाच समुच्चयाने हिंदू धर्म असे म्हणण्याची पद्धत पडली. विनोबांनी म्हटलंय त्याप्रमाणे हिंदू धर्माचा कोणी संस्थापक नाही, त्याचा कोणताही धर्मग्रंथ नाही. हिंदू धर्माचं गाठोडं जसं कोणत्याही विशिष्ट ग्रंथाच्या रुमालात बांधलेलं नाही, तसंच कोणा विशिष्ट व्यक्तीच्या खुंटीवर टांगलेलं नाही. हिंदू धर्माच्या गावाची रचनाच अशी आहे की, तेथे कोणाचेही वर्चस्व चालू शकत नाही. हिंदूंच्या धर्मात दोष अनेक आहेत; पण तो एक मोकळा-ढाकळा, बऱ्याच प्रमाणात गलथान पण आनंदी आणि सतत बदलत आलेला धर्मसमुच्चय आहे.
लेखकाच्या नजरेतून बघितलं, तर मला हिंदू धर्म म्हणजे एक मोठी मिरवणूक वाटते; जी कधी सुरू झाली आहे ते माहीत नाही, कोणी सुरू केली ते ज्ञात नाही. काळाच्या ओघात ती कधी कमी झाली, कधी वाढली. त्यात निरनिराळी माणसं आणि त्यांचे गट निरनिराळ्या टप्प्यांवर सामील झाले आणि काही वेळा सोडूनही गेले. बहुतेक गटांनी आपलं अस्तित्व यामध्ये जिरवून टाकलं, पण काहींनी ते अबाधितही राखलं. या निरनिराळ्या गटांचे निरनिराळे झेंडे होते, निरनिराळे वेष होते आणि ते घोषणाही निरनिराळ्या देत होते. पण मिरवणुकीच्या या स्वरूपामुळे ते सगळे चालून जात होते. या मिरवणुकीवर काही वेळा हल्ले झाले, त्या वेळी थोडीफार पडझड झाली; पण मिरवणूक थांबली नाही. उलट बहुतेक वेळा हल्लेखोरही त्या मिरवणुकीत सामील झाले आणि कालांतराने त्यांचे अस्तित्व त्यात मिटून गेले. ही मिरवणूकच असल्याने ती बेशिस्त आहे, गलथान आहे. त्यात माणसांचे एकमेकांना धक्के लागतात, काही वेळा त्यांच्यात भांडणंही होतात, पण मिरवणूक मूलत: अहिंसक आहे, सहिष्णू आहे. माणसे एकमेकांना सहन करून चालत राहतात. ती कुठे जाणार आहे ते माहीत नाही, पण माणसं चालत राहिलेली आहेत.
आता खरा प्रश्न असा आहे आणि ज्यामुळे सध्याच्या काळात एक संघर्ष चालू आहे, ज्या संघर्षात डॉ.नरेंद्र दाभोलकरांची आहुती पडली, तो म्हणजे- काही मंडळी हिंदू धर्माचं हे मूलभूत स्वरूप बदलून त्याला संघटित करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांची अशी इच्छा आहे की हिंदू धर्माचं हे जे विस्कळित, व्यक्तिस्वातंत्र्यवादी, परिवर्तनशील स्वरूप आहे; ते बदलून त्याला एक सुसंघटित, समष्टिवादी आणि अपरिवर्तनीय असा एकसंध धर्म करायचा. हे जे ध्येय त्यांनी मनाशी बाळगलंय, ते भोवतालच्या इतर धर्मांच्या उदाहरणावरून घेतलेलं आहे. त्यांनी अशी समजूत करून घेतलीय की, मध्ययुगीन इतिहासात हिंदू धर्म दुबळा व असंघटित असल्यानं त्याचा पराभव झाला आणि त्याला इतर धर्मीयांची सत्ता सहन करावी लागली. म्हणून आता त्याला संघटित, विजिगीषु बनवून बलदंड हिंदू राष्ट्राची स्थापना केली पाहिजे.
आता कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीने थोडा जरी विचार केला तरी तिच्या लक्षात येईल की- हा उद्देश अनैतिहासिक आणि अशास्त्रीय तर आहेच; पण इंग्रजीत ज्याला ‘सेल्फ डिफिटिंग’ म्हणतात, तसा स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणारा आहे. याचं मुख्य कारण असं की, हिंदूंच्या धर्माचं मूलभूत स्वरूपच अशा प्रकारचं नाहीये आणि त्यामुळे कोणीही कितीही दंड थोपटले तरी तो इतर धर्मांसारखा संघटित होणार नाही. किंबहुना, संघटित झाला तर मग तो हिंदू धर्मच राहणार नाही. कारण असंघटित राहणं, हीच हिंदू धर्माची पारंपरिक ताकद आहे. तसा तो आहे म्हणूनच तथाकथित आक्रमकांना स्वत:त जिरवून टाकून तो आज टिकून राहिलेला आहे.
मध्ययुगीन इतिहासात हिंदू राजांचा पराभव झाला, त्याची कारणं पूर्णपणे निराळी आहेत. खरं तर हिंदू राजे असा शब्दप्रयोग करणंच चुकीचं आहे. ब्रिटिशांच्या वासाहतिक काळात हा शब्दप्रयोग रूढ झाला. पण समजा- तसा केला तरी असं दिसेल की, त्यांचा पराभव हा त्यांच्या मर्यादित लष्करी ताकदीचा आणि सदोष युद्धतंत्राचा होता; तो हिंदू धर्माचा पराभव नव्हता. शिवाजीसारख्यांनी जेव्हा हे युद्धतंत्र सुधारलं, तेव्हा त्याला विजय मिळू लागला. पण नंतर इंग्रजांनी जेव्हा आणखी प्रगत युद्धतंत्र आणलं, तेव्हा सगळ्यांचाच पराभव झाला. म्हणजे हिंदू धर्म दुबळा होता म्हणून त्याचा पराभव झाला, हे खरं नाही. आधी म्हटलं तसं आक्रमणांना तोंड द्यायची हिंदू धर्माची पद्धत पूर्णपणे निराळी आहे. आक्रमण लष्करी असो वा सांस्कृतिक; तेवढ्यापुरते काही नुकसान झाले किंवा पडझड झाली तरी अंतिमत: आपल्या गलथान-विस्कळित रूपात आक्रमकांना जिरवून टाकायचे, आक्रमकांनी निर्माण केलेल्या आव्हानांतले काही घ्यायचे-काही सोडायचे, स्वत:त आवश्यक तो बदल करायचा आणि पुन्हा पूर्वीसारखेच आपले मिरवणुकीसारखे जगणे चालू ठेवायचे- हीच हिंदूंच्या धर्माची पद्धत राहिलेली आहे.
सध्याच्या काळात हिंदू-संघटनेचे हे जे काम चाललेले आहे, त्याच्यामागे एक विशिष्ट आराखडा किंवा डिझाईन आहे. बारकाईने निरीक्षण केले, तर कोणाही माणसाला ते सहज कळून येईल. इंग्रजांचं राज्य आलं आणि नंतर भारताला स्वातंत्र्य मिळून भारताने आपली राज्यघटना तयार केली, तेव्हापासून या समाजातल्या उच्चवर्णीयांची मिरासदारी किंवा प्रभुत्व संपलं. हे प्रभुत्व पुन्हा प्रस्थापित करणं, हाच यामागचा खरा डाव आहे. उच्चवर्णीयांच्या या गटाला असं वाटतं की, समाजावर आपली सर्व प्रकारची सत्ता असावी. सत्ता पूर्वीसारखीच तीन प्रकारची असते : राजकीय, आर्थिक आणि धार्मिक (स्टेट, मार्केट आणि रिलिजन). धर्मसंघटनेतून किंवा धार्मिक प्रचारातून राजकीय सत्ता मिळवण्याचा मनसुबा तर स्पष्टच आहे आणि तो काही अंशी साध्य झालेला आहे. भांडवलशाहीच्या विस्तारामुळे- विशेषत: जागतिक वित्त-भांडवलाच्या ताकदीमुळे- आर्थिक सत्ता मिळवणे दुरापास्त आहे, पण भांडवलशाहीला राष्ट्रवादी-धार्मिक रूप देण्याचे किंवा भारतीय भांडवलदारांनाच धार्मिक प्रभुत्वाखाली आणण्याचे प्रयत्न होत असतात. तिसरं राहिलं ते सांस्कृतिक किंवा धार्मिक प्रभुत्व. ते सर्वसामान्य लोकांना धर्माच्या बंधनात बांधूनच मिळवता येईल.
उच्चवर्णीयांच्या या घटकाला असं वाटतं की- इतर धर्मांच्या धर्मप्रमुखांजवळ जशी सत्ता आहे आणि ते जसे फतवे किंवा हुकूम काढून आपल्या अनुयायांना नियंत्रित करू शकतात, तसंच आपल्यालाही करता आलं पाहिजे आणि आपण सांगू तो धर्म प्रस्थापित झाला पाहिजे. त्यासाठी ते विविध संस्था, संघटना, मंडळं आणि समित्या काढत असतात, नव्या तंत्रज्ञानाचा व बाजाराच्या अर्थव्यवस्थेचा उपयोग करत असतात आणि त्या माध्यमांतून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे समाजावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत असतात. या सव्वाशे कोटी माणसांच्या देशात शंभरसव्वाशे भंगड, बेकार व मनोरुग्ण अनुयायी मिळवणं आणि त्यांना संभ्रमित करून किंवा त्यांची माथी भडकवून त्यांच्याकडून हिंसक कृत्ये घडवून आणणं, ही काही अवघड गोष्ट नाही.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदू धर्मसंघटनेची ही हाकाटी कोण देतंय? तर, उच्चवर्णीयांतील काही गट देतायत. समाजातील गोरगरीब, शेतकरी, मजूर, कारागीर, दलित, आदिवासी, भटके असे जे लोक आहेत (आणि जे बहुसंख्येने आहेत), त्यांच्याकडून ही मागणी आलेली नाही. उच्चवर्णीयांतील घटकच आपल्या स्वार्थासाठी हा उद्योग करतायत. पण त्या-त्या काळात थोडंफार यश मिळाल्यासारखं वाटलं तरी हिंदू धर्माला संघटित करण्याचा उद्देश हा कधीही सफल होणार नाही. याचं साधं कारण असं आहे की, मुळातच हिंदू धर्माचं ते स्वरूप नाही.
हजार-पाचशे वर्षांपूर्वी या बाबतीत काही तरी साध्य झालं असतं; पण आता एकविसाव्या शतकात आधुनिक विज्ञानाचा उदय झाल्यानंतर, व्यक्तिस्वातंत्र्यवादी भांडवलशाही अस्तित्वात आल्यानंतर, जागतिकीकरणाची प्रक्रिया झपाट्याने सुरू असताना, सगळं जग लोकशाही राज्यव्यवस्थेच्या दिशेनं चाललेलं असताना, भारतात महात्मा गांधी नावाचा माणूस निर्माण होऊन गेला असताना आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व न्याय यांचा पुकारा करत लोकशाही प्रजासत्ताकवादी भारतीय राज्यघटना अस्तित्वात असताना प्राचीन, जुनाट धर्माच्या आधारे समाजाचे संघटन व राष्ट्रनिर्मिती करणे कोणालाही शक्य होणार नाही. विशेषत: सगळे जगच मुळी धर्मोत्तर समाजाच्या (पोस्ट-रिलिजिअस सोसायटीच्या) दिशेने चाललेले असताना; व्रत-वैकल्यांच्या खाजणात बुडालेल्या, अतार्किक व अशास्त्रीय कल्पनांवर आधारलेल्या आणि भाकडकथांचे तत्त्वज्ञान बनवणाऱ्या जुनाट धर्माचे पुनरुत्थान कोण सहन करून घेणार आहे?
इतिहासाचा दाखला असा आहे की- कोणताही धर्म कठोर, संघटित आणि कडवा बनला की पहिली बंधने स्त्रियांवर येतात. आधुनिक भारतातल्या स्त्रिया अशी बंधने पाळणार आहेत का? मूलतत्त्ववादी संघटनांचा सगळा त्रागा आणि हिंसाचार चाललेला आहे, तो या कारणामुळे आहे. केवळ हिंदू मूलतत्त्ववाद्यांचाच नाही, तर सगळ्यांचाच. आपण म्हणू तसा समाज वागत नाही, यामुळे त्यांचा नुसता संताप संताप होतो. सुधारकांना गोळ्या घालणं, ही त्या हताशेमधून होणारी एक कृती आहे. दाभोलकरांची हत्या झाली ती ते अंधश्रद्धा निर्मूलन करत होते म्हणून नाही. अंधश्रद्धा, जादूटोणा आणि अघोरी प्रथा या काळाच्या ओघात नाहीशा होणारच आहेत; दहा वर्षांत की वीस वर्षांत, एवढाच प्रश्न. आजही हातातून अंगठी काढून देणाऱ्या बाबांकडे बघताना लहान पोरालाही कळत असतं की, ही निव्वळ जादू आहे आणि आपल्याला फसवलं जातंय. निरनिराळ्या लोकांचे निरनिराळे हितसंबंध असतात, म्हणून बुवाबाजी चालवून घेतली जाते. जे राजकारणी आणि उद्योगपती सत्य साईबाबांसमोर हात जोडतात- त्यांना हे सगळं ढोंग आहे, हे चांगलं माहीत असतं; पण त्यांचे वेगळे हितसंबंध गुंतलेले असतात. तो प्रश्न नसतो.
दाभोलकर, पानसरे किंवा कलबुर्गी यांची हत्या होते; कारण ते धर्मसंघटनेच्या आड येत असतात. ते जनतेला विवेकवादी, विज्ञाननिष्ठ व निर्भय बनण्याचं शिक्षण देत असतात आणि निर्भय, विवेकी जनता कळपात बांधता येत नाही. खरं दु:ख हे आहे. यांचा खरा झगडा भारतीय जनतेशी आहे. सुधारकांची हत्या ही केवळ या हताशेतून येते. जनतेनं बुद्धी गहाण टाकावी आणि आपल्या मागून यावे, ही खरी अपेक्षा आहे. हे तर कोणालाही कळून येईल की, ही अपेक्षा कधीही पुरी होणार नाही. कोणत्याही धर्माची पारंपरिक शिकवण काहीही असो; माणसांची मने ही दिवसेंदिवस मुक्तपणाच्याच दिशेने जाणार.
आपल्याला आनंददायक अशा सांस्कृतिक परंपरा जपणं, वैयक्तिक जीवनात माणुसकीने-सचोटीने-बंधुभावानं वागणं आणि सार्वजनिक जीवनात देशाच्या राज्यघटनेप्रमाणं आपला व्यवहार करणं, हेच कोणत्याही नागरिकाला श्रेयस्कर आहे. आधुनिक काळात हाच खरा धर्म आहे. हिंदू धर्माच्या चाललेल्या मिरवणुकीचा अगोदर उल्लेख केला. ही मिरवणूक कोणत्या दिशेनं चालली आहे, असा प्रश्न मनात येईल. आपण म्हणू त्या दिशेने या मिरवणुकीने जावे, असे काहींना वाटेल. पण दिशा ही आपण आपल्या सोईसाठी मानलेली संकल्पना आहे. पृथ्वी अंतराळात तरंगत असल्याने दिशा नावाची काही गोष्टच नसते. म्हणून कोणत्या दिशेने मिरवणूक चालली आहे, हा मुद्दा नाही. मुद्दा आहे तो या मिरवणुकीतील माणसांची मने काळाच्या ओघात उन्नत होणार आहेत की नाहीत?
उन्नत म्हणजे विवेकवादी, विज्ञाननिष्ठ, भेदाभेद न मानणारी आणि एकमेकांशी बंधुभावाने वागणारी. आमची आस्था ती आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चालवलेल्या विविध चळवळींमध्ये एक लेखक म्हणून मला प्रत्येक वेळी सामील होता येतंच, असं नाही. माझा तो पिंडही नाही. पण या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मी नम्रपणे सांगू इच्छितो की- या समाजाचे हिंसक आणि अविवेकी संघटन करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर आम्ही त्याच्या विरोधात खंबीरपणे उभे आहोत. आम्ही असाच प्रयत्न करणार की- माणसे बंधमुक्त, निर्भय आणि विवेकी असावीत; सर्वांमध्ये व्यापक बंधुभाव असावा, जाती- धर्माच्या भिंती असू नयेत आणि सर्वांना आपल्या मनासारखे जगता यावे. हे आमचे लेखक म्हणून, व्यक्ती म्हणून, एक नागरिक म्हणून निसर्गदत्त कार्य आहे आणि ते करण्यापासून कोणीही आम्हाला रोखू शकणार नाही.
(मिलिंद बोकील हे नामवंत लेखक व सामजिक कार्यकर्ते आहेत.)
VIVEKPURNA … BADHIYA UDBODHANPAR LEKH 👈👍